व्हिडिओ पाहण्यासाठी

ते काम मागतात पगार नव्हे

ते काम मागतात पगार नव्हे

गेल्या २८ वर्षांपासून, ११,००० पेक्षा अधिक यहोवाच्या साक्षीदारांनी, १२० राष्ट्रांत वेगवेगळ्या इमारतींचे बांधकाम करण्यासाठी आपले घर आणि इतकेच नव्हे तर आपला देशही सोडला. या सर्वांनी त्यांचे कौशल्य व शक्‍ती पणाला लावली. आणि हे सर्व बिनपगारी!

यांपैकी पुष्कळ जण स्वखर्चाने बांधकाम ठिकाणी गेले. काहींनी साठवलेली सुटी या कामासाठी वापरली. इतरांनी तर नोकरीतून काही दिवसांची बिनपगारी सुटी काढली.

हे त्याग करण्यास ते बांधील नव्हते. पण राज्याच्या सुवार्तेच्या जगभर प्रसारासाठी ते स्वच्छेने पुढे आले. (मत्तय २४:१४) त्यांनी कार्यालये, संकुले आणि बायबल व बायबल आधारित प्रकाशने छापण्याकरता छापखाने बांधले आहेत. यहोवाच्या साक्षीदारांनी १०,००० आसनांची संमेलन गृहे आणि ३०० आसनांची राज्य सभागृहेदेखील बांधली आहेत.

अशा प्रकारचे बांधकाम आजही चालू आहे. बांधकाम चाललेल्या ठिकाणी हे स्वयंसेवक पोहचल्यावर, स्थानिक शाखा कार्यालय त्यांच्या राहण्याची, जेवणाची, कपडे धुवून इस्त्री करण्याची आणि इतर दररोजच्या गरजा पूर्ण करण्याची सोय करते. स्थानिक साक्षीदारही आनंदाने बांधकामात भाग घेतात.

मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्‍या या कामाचे आयोजन करण्यासाठी, १९८५ साली एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमात भाग घेणारे स्वयंसेवक यहोवाचे साक्षीदार असतात. हे १९ ते ५५ वयोगटातील स्वयंसेवक, बांधकामाच्या निदान एका तरी कामात कुशल असले पाहिजेत. एक बांधकाम प्रकल्प, दोन आठवडे ते तीन महिन्यांपर्यंतचा असू शकतो. पण कधीकधी तो एक किंवा अधिक वर्षांचादेखील असू शकतो.

या बांधकाम स्वयंसेवकांच्या पत्नींना, स्टील सळया वायरने बांधायचे, टाईल्स लावायचे किंवा सॅण्डपेपरने घासण्याचे व पेंटिंगचे काम शिकवले जाते. बाकीच्या काही, कामाला येणाऱ्‍यांसाठी जेवण तयार करतात किंवा स्वयंसेवकांच्या घरांची साफसफाई करतात.

हे स्वयंसेवक जेव्हा परत आपापल्या घरी जातात तेव्हा काही जण, आपल्याला कामासाठी बोलवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करणारे कार्ड पाठवतात. एका जोडप्याने असे लिहिले: “बुडापेस्ट शाखेत काम करण्याच्या आम्हाला मिळालेल्या बहुमानाबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. हंगेरीतील साक्षीदार प्रेमळ व कदर करणारे आहेत. आम्ही तिथून अगदी जड मनाने निघालो. पण, आपण जगाच्या पाठीवर कुठंही गेलो तरी आपल्याला असेच वाटते नाही का? आमच्या पुढील सुटीत आम्ही कदाचित दुसऱ्‍या ठिकाणी जाऊ. आम्ही जेव्हा-जेव्हा अशा नेमणूका पार पाडण्यासाठी जातो तेव्हा-तेव्हा तो महिना आमच्या जीवनातला सर्वोत्कृष्ट महिना ठरतो.”