ते ईस्टर का साजरा करत नाहीत?
सर्वसामान्य गैरसमजुती
असत्य: यहोवाचे साक्षीदार ईस्टर साजरा करत नाहीत कारण ते मुळातच ख्रिस्ती नाहीत.
सत्य: येशू ख्रिस्त आमचा तारणकर्ता आहे असे आम्ही मानतो आणि होता होईल तितके त्याच्या “पावलांवर पाऊल” ठेवण्याचा प्रयत्न करतो.—१ पेत्र २:२१; लूक २:११.
असत्य: येशूच्या मृत्यूनंतर त्याला जिवंत करण्यात आले होते यावर ते विश्वास ठेवत नाहीत.
सत्य: येशूचे पुनरुत्थान झाले होते यावर आम्ही विश्वास ठेवतो; आमच्या ख्रिस्ती विश्वासाची ती मूलभूत शिकवण आहे असे आम्ही मानतो आणि प्रचारकार्यात त्याविषयी सांगतो.—१ करिंथकर १५:३, ४, १२-१५.
असत्य: त्यांची मुले ईस्टरचा आनंद गमावतात याचे त्यांना काहीच वाटत नाही.
सत्य: आमचे आमच्या मुलांवर प्रेम आहे. ते आनंदी राहावेत म्हणून आम्ही त्यांना होता होईल तितके प्रशिक्षण देण्याचा आणि मदत करण्याचा प्रयत्न करतो.—तीत २:४.
यहोवाचे साक्षीदार ईस्टर का साजरा करत नाहीत?
ईस्टर सणाचा बायबलमध्ये उल्लेख नाही.
येशूने त्याच्या पुनरुत्थानाचा दिवस नाही तर त्याचा मृत्युदिवस साजरा करण्याची आज्ञा दिली. बायबलच्या चांद्र दिनदर्शिकेनुसार आम्ही वर्षातून एकदा येशूच्या मृत्यूचा स्मारक दिन साजरा करतो.—लूक २२:१९, २०.
ईस्टर सणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या प्रथा या प्राचीन सुफलताविधींतून येत असल्यामुळे ईस्टर सण देवाला मान्य नाही. आपण देवाची अनन्य भक्ती करावी अशी तो अपेक्षा करत असल्यामुळे त्याला नापसंत असणाऱ्या प्रथांचा समावेश असलेल्या उपासनेचा त्याला तिटकारा आहे.—निर्गम २०:५; १ राजे १८:२१.
मानवी परंपरांचे डोळे झाकून पालन करण्याऐवजी बायबल, व्यावहारिक बुद्धीचा आणि विचारशक्तीचा उपयोग करण्याचे उत्तेजन देत असल्यामुळे ईस्टर सण न पाळण्याचा आमचा निर्णय बायबलवर आधारित आहे. (नीतिसूत्रे ३:२१; मत्तय १५:३) आम्हाला जेव्हा ईस्टरबद्दल विचारले जाते तेव्हा आम्ही आमच्या विश्वासाविषयी त्यांना सांगतो पण त्याचबरोबर लोकांच्या निर्णयाचा आदरही करतो.—१ पेत्र ३:१५.