यहोवाचे साक्षीदार येशूला मानतात का?
होय, आम्ही नक्कीच येशूला मानतो कारण “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही,” असे येशूने म्हटले. (योहान १४:६) आम्ही असा विश्वास करतो की पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गात होता आणि त्याने आपले परिपूर्ण मानवी जीवन खंडणी बलिदान म्हणून दिले. (मत्तय २०:२८) त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्याच्या मृत्यूमुळे व पुनरुत्थानामुळे सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त होते. (योहान ३:१६) आम्ही असाही विश्वास करतो, की सध्या येशू देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून शासन करत आहे आणि लवकरच तो संपूर्ण पृथ्वीवर शांती आणेल. (प्रकटीकरण ११:१५) पण, येशू सर्वसमर्थ देव आहे असे आम्ही मानत नाही, कारण “माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे,” असे जे येशूने शिकवले त्याचे आम्ही पालन करतो. (योहान १४:२८) आणि त्यामुळेच आम्ही येशूची उपासना करत नाही.