यहोवाचे साक्षीदार दुसऱ्या धर्माच्या लोकांना जाऊन प्रचार का करतात?
आम्ही अनुभवले आहे, की लोकांना आपापला धर्म असला तरी बायबलवर चर्चा करायला त्यांना आवडते. अर्थात, आमच्यापेक्षा वेगळे धार्मिक विश्वास असलेल्या लोकांचा आम्ही आदर करतो आणि म्हणूनच आम्ही त्यांना आमचा संदेश ऐकण्याची जबरदस्ती करत नाही.
लोकांशी धर्माच्या विषयावर बोलताना बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही “सौम्यतेने” आणि आदराने बोलण्याचा प्रयत्न करतो. (१ पेत्र ३:१५) आम्हाला माहीत आहे, की सगळेच लोक आमचा संदेश आवडीने ऐकतील असे नाही. (मत्तय १०:१४) पण, लोकांची प्रतिक्रिया काय असेल हे त्यांच्याशी बोलल्याशिवाय आम्हाला कळणार नाही; शिवाय, वेळेनुसार लोकांच्या जीवनातील परिस्थिती बदलते हे माहीत असल्यामुळे आम्ही त्यांना पुन्हापुन्हा जाऊन भेटतो.
उदाहरणार्थ, एखाद्या वेळी एक व्यक्ती खूप व्यस्त असल्यामुळे तिला आमच्याशी बोलायला वेळ नसेल; पण, दुसऱ्या एखाद्या वेळी तिच्याजवळ वेळ असेल. तसेच, लोकांना सतत नवनवीन समस्यांना, प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे बायबलचा संदेश ऐकण्यास ते उत्सुक असतील. म्हणूनच आम्ही बरेचदा लोकांना जाऊन बायबलचा संदेश सांगतो.