व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाच्या साक्षीदारांचं स्वतःचं बायबल आहे का?

यहोवाच्या साक्षीदारांचं स्वतःचं बायबल आहे का?

 यहोवाच्या साक्षीदारांनी आजपर्यंत बायबलच्या बऱ्‍याच भाषांतरांचा वापर केलाय. पण, ज्या भाषांमध्ये उपलब्ध आहे त्यांत आम्ही पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर  हे बायबल वापरणं पसंत करतो. कारण या भाषांतरात देवाचं नाव वापरलंय. तसंच, ते अचूक आणि समजायलाही सोपं आहे.

  •   देवाचं नाव. काही बायबल प्रकाशकांनी बायबलच्या लेखकाला सन्मान दिलेला नाही. उदाहरणार्थ, बायबलच्या एका भाषांतरात अशा ७० पेक्षा जास्त लोकांची नावं दिली आहेत, ज्यांनी ते भाषांतर तयार करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी मदत केली. पण, त्याच भाषांतरातून बायबलच्या लेखकाचं म्हणजे यहोवा देवाचं नाव पूर्णपणे काढून टाकण्यात आलंय.

     याच्या उलट नवे जग भाषांतरात, मूळ भाषांतल्या प्रतींमध्ये देवाचं नाव जितक्यांदा सापडतं, तितक्यांदा ते घालण्यात आलंय. शिवाय, या बायबलचं भाषांतर करणाऱ्‍या समितीतल्या सदस्यांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत.

  •   अचूक. सर्वच भाषांतरं बायबलमधला मूळ संदेश अचूकपणे सांगत नाहीत. उदाहरणार्थ, एका भाषांतरात मत्तय ७:१३ यात असं म्हटलंय: “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नरकाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे.” मूळ भाषेत “नरक” हा शब्द नाही, तर “नाश” हा शब्द वापरण्यात आला आहे. दुष्ट लोकांना नरकाच्या आगीत कायम यातना भोगाव्या लागतील असा कदाचित भाषांतर करणाऱ्‍यांचा विश्‍वास असावा, म्हणून त्यांनी “नरक” हा शब्द वापरला असेल. पण बायबलमध्ये या गोष्टीला आधार नाही. त्यामुळे, नवे जग भाषांतर  यात अगदी अचूकपणे म्हटलंय: “अरुंद दरवाजाने आत जा. कारण, नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद आणि रस्ता पसरट आहे.”

  •   समजायला सोपं. चांगलं भाषांतर फक्‍त अचूक असणंच पुरेसं नाही, तर ते स्पष्ट आणि समजायला सोपंही असलं पाहिजे. एका उदाहरणाचा विचार करा. १ पेत्र १:१३ या वचनात प्रेषित पेत्रने ज्या वाक्यांशाचा उपयोग केला त्याचा शब्दशः अर्थ “मनाची कंबर बांधा” असा होतो. पण या शब्दांतून नेमका अर्थ कळत नाही. त्यामुळे, नवे जग भाषांतरात  या वचनाचं अगदी स्पष्ट आणि समजायला सोपं असं भाषांतर करण्यात आलं आहे. त्यात ख्रिश्‍चनांना “आपलं मन सज्ज करा” असं सांगितलंय.

 नवे जग भाषांतर  यात देवाचं नाव असण्यासोबतच हे भाषांतर अचूक आणि समजायला सोपं आहे. या भाषांतराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांना विनामूल्य दिलं जातं. त्यामुळे, आज लाखो लोकांना—मग त्यांच्याजवळ बायबल विकत घेण्यासाठी पैसे नसले, तरीही त्यांना त्यांच्या मातृभाषेत बायबल वाचणं शक्य झालं आहे.