व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आनंदानं यहोवाची सेवा करत राहा

आनंदानं यहोवाची सेवा करत राहा

तुम्हाला तुमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस आठवतो का? तो तुमच्या लग्नाचा दिवस होता का? की, तुम्ही आई-बाबा बनला, तो दिवस होता? की, तुमच्या बाप्तिस्म्याचा दिवस होता? निश्‍चितच तुमच्या बाप्तिस्म्याचा दिवस तुमच्यासाठी आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस ठरला असेल. तुम्हाला बाप्तिस्मा घेताना पाहून तुमच्या बंधुभगिनींना किती आनंद वाटला असेल! कारण त्या दिवशी तुम्ही यहोवाला संपूर्ण मनानं, जिवानं, बुद्धीनं आणि शक्तीनं प्रेम करता हे सिद्ध झालं होतं.—मार्क १२:३०.

तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हापासून यहोवाच्या सेवेत तुम्हाला नक्कीच खूप आनंद मिळाला असेल. पण हा आनंद कित्येक प्रचारकांच्या बाबतीत थोडा कमी झाल्याचं दिसून आलं आहे. याचं काय कारण असावं? आणि अशी कोणती कारणं आहेत ज्यांमुळे आपल्याला यहोवाची सेवा आनंदानं करता येईल?

काही प्रचारकांचा आनंद का कमी झाला आहे?

राज्याच्या संदेशामुळे आपल्याला खूप आनंद होतो. कारण हे राज्य या दुष्ट जगाचा नाश करेल आणि नवीन जग स्थापन करेल असं अभिवचन यहोवानं आपल्याला दिलं आहे. याबद्दल सफन्या १:१४ हे वचन असं म्हणतं, “परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.” पण त्या दिवसाची अपेक्षेपेक्षा जास्त वाट पाहावी लागत आहे असं आपल्याला वाटत असेल, तर यहोवाच्या सेवेतला आपला आनंद कमी होऊ शकतो. आणि त्यामुळे आपला आवेशही कमी होऊ शकतो.—नीति. १३:१२.

आपल्या बंधुभगिनींसोबत वेळ घालवल्यामुळे यहोवाची सेवा आनंदानं करत राहण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळतं. यहोवाच्या सेवकांच्या चांगल्या वर्तनामुळे कदाचित सत्याकडे आकर्षित होऊन आपण आनंदानं देवाची सेवा करण्यास सुरवात केली असेल. (१ पेत्र २:१२) पण कधीकधी देवाच्या स्तरांनुसार न वागल्यामुळे एखाद्या बांधवाला किंवा बहिणीला ताडन दिलं जातं. अशा वेळी देवाच्या लोकांचं वर्तन पाहून सत्याकडे आकर्षित झालेले काही जण निराश होऊ शकतात आणि सेवेतला त्यांचा आनंदही कमी होऊ शकतो.

देवाच्या सेवेतला आनंद कमी होण्याचं आणखी एक कारण म्हणजे भौतिकवाद. सैतानाचं जग आपल्याला अशा वस्तू घेण्याची गळ घालते ज्यांची खरंतर आपल्याला गरज नसते. म्हणून आपण येशूचे शब्द नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. त्यानं म्हटलं होतं, “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर प्रीती करेल; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” (मत्त. ६:२४) जगातील भौतिक गोष्टींचा आनंद घेणं आणि त्याच वेळी यहोवाची आनंदानं सेवा करणं शक्य नाही.

आनंदानं यहोवाची सेवा करणं

यहोवावर प्रेम करणाऱ्यांना त्याची सेवा करणं एका ओझ्यासारखं वाटत नाही. (१ योहा. ५:३) येशूनं म्हटलं होतं, “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्त. ११:२८-३०) ख्रिस्ती या नात्यानं जीवन जगणं खूप आनंद आणि तजेला देणारी गोष्ट आहे. त्यामुळे, यहोवाची सेवा आनंदानं करण्याची नक्कीच आपल्याकडे काही सबळ कारणं असली पाहिजेत. त्यांपैकी तीन कारणांचा आपण आता विचार करू या.—हब. ३:१८.

आपण जीवन देणाऱ्या, आनंदी देवाची सेवा करतो. (प्रे. कृत्ये १७:२८; १ तीम. १:११) देवानं आपल्याला जीवन दिलं आहे, म्हणून आपण त्याच्यासाठी जगलं पाहिजे. आणि तो आनंदी देव असल्यामुळे आपला बाप्तिस्मा होऊन कितीही वर्षं उलटली तरी त्याची सेवा आपण आनंदानंच करत राहिलं पाहिजे.

एक्टर प्रचारकार्यात व्यस्त राहण्याद्वारे आणि राज्याला प्रथमस्थानी ठेवण्याद्वारे आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात

एक्टर नावाच्या बांधवाचंच उदाहरण घ्या. त्यांनी ४० वर्षं प्रवासी पर्यवेक्षक म्हणून यहोवाची सेवा केली. उतारवयातही ते यहोवाची सेवा आनंदानं करत आहेत. (स्तो. ९२:१२-१४) त्यांची पत्नी आजारी असल्यामुळे ते देवाच्या सेवेत जास्त कार्य करू शकत नाहीत. पण, त्यामुळे सेवेतला त्यांचा आनंद कमी झाला नाही. ते म्हणतात: “माझ्या पत्नीची दिवसेंदिवस खालावत चाललेली तब्येत पाहून मला खूप वाईट वाटतं. तिची काळजी घेणं अवघड होतं चाललं आहे. असं असलं तरी, मी देवाच्या सेवेतला माझा आनंद कमी होऊ दिलेला नाही. मानवांना एका खास उद्देशानं बनवणाऱ्या देवानं मला जीवन दिलं आहे, ही जाणीवच त्याच्यावर मनापासून प्रेम करण्यास आणि पूर्ण अंतःकरणानं त्याची सेवा करण्यास पुरेशी आहे. सेवेतला माझा आनंद कमी होऊ नये म्हणून मी प्रचारकार्यात व्यस्त राहण्याचा आणि राज्याला प्रथमस्थानी ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो.”

यहोवानं केलेल्या खंडणीच्या तरतुदीमुळेच आपल्याला आनंदी जीवन जगणं शक्य झालं आहे. “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहा. ३:१६) देवानं केलेल्या खंडणीच्या प्रेमळ तरतुदीवर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळते आणि सार्वकालिक जीवनाची आशा मिळते. खरंच, यहोवानं केलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असण्याचं हे किती मोठं कारण आहे! खंडणीसाठी असलेल्या कृतज्ञतेमुळेच आपण यहोवाची आनंदानं सेवा करण्यास प्रवृत्त होतो.

जेसूस यांनी आपलं राहणीमान साधं बनवलं आहे आणि बऱ्याच वर्षांपासून ते आनंदानं यहोवाची सेवा करत आहेत

मेक्सिकोमध्ये राहिलेल्या जेसूस नावाचा एका बांधवानं म्हटलं: “मी अक्षरशः कामासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. कधीकधी तर गरज नसतानाही मी सलग पाच शिफ्टमध्ये काम करायचो. जास्तीत जास्त पैसा कमवणं हाच माझा उद्देश होता. पण त्यानंतर मला यहोवाबद्दल शिकायला मिळालं. शिवाय, कशा प्रकारे त्यानं आपल्या पुत्राला मानवजातीसाठी दिलं आहे, हेदेखील मी शिकलो. तेव्हा यहोवाची सेवा करावी असं मला मनापासून वाटू लागलं आणि मी यहोवाला माझं जीवन समर्पित केलं. २८ वर्षांची माझी नोकरी मी सोडली आणि पूर्णवेळेची सेवा करण्याचं ठरवलं.” अशा प्रकारे जेसूसनं यहोवाची आनंदानं सेवा करण्यास सुरवात केली.

नैतिक रीत्या शुद्ध जीवन जगल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. यहोवाबद्दल शिकण्याआधी तुम्ही कशा प्रकारचं जीवन जगत होता, हे तुम्हाला आठवतं का? प्रेषित पौलानं रोममधील ख्रिश्चनांना याची आठवण करून दिली, की ते आधी “पापाचे गुलाम” होते. पण, आता ते ‘नीतिमत्त्वाचे गुलाम’ बनले आहेत. नैतिक रीत्या शुद्ध जीवन जगत असल्यामुळेच हे ख्रिश्चन सार्वकालिक जीवनाची वाट पाहू शकले. (रोम. ६:१७-२२) आपणदेखील यहोवाच्या शुद्ध नैतिक स्तरांचं पालन करतो; त्यामुळे अनैतिक किंवा हिंसक जीवन जगण्याच्या दुःखद परिणामांपासून आपलं संरक्षण होतं. मग आनंदानं यहोवाची सेवा करण्याचं हे आणखी एक सुंदर कारण नाही का?

“यहोवाच्या सेवेत घालवलेली वर्षं माझ्या आयुष्यातली सर्वात आनंदाची वर्षं आहेत.”—जेमी

पूर्वी नास्तिकवादावर आणि उत्क्रांतीवर विश्वास ठेवणाऱ्या जेमीचंच उदाहरण घ्या. त्याला बॉक्सिंगचं वेड होतं. पण नंतर जेव्हा जेमी सभांना जाऊ लागला तेव्हा तिथल्या लोकांमधलं प्रेम पाहून तो भारावून गेला. त्याला आधीची जीवनशैली सोडता यावी म्हणून आपला विश्वास वाढवण्यासाठी त्यानं यहोवाकडे मदत मागितली. जेमी म्हणतो, “मला हळूहळू प्रेमळ पिता असणाऱ्या दयाळू देवाच्या अस्तित्वाची ओळख होऊ लागली. यहोवाच्या नीतिनियमांचं पालन केल्यामुळे आजवर माझं संरक्षण झालं आहे. जर मी माझ्या जीवनात देवाच्या स्तरांनुसार बदल केले नसते, तर बॉक्सिंग करणाऱ्या माझ्या आधीच्या काही मित्रांप्रमाणेच माझाही जीव गेला असता. यहोवाच्या सेवेत घालवलेली वर्षं माझ्या आयुष्यातली सर्वात आनंदाची वर्षं आहेत.”

हार मानू नका!

या दुष्ट जगाच्या अंताची वाट पाहत असताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? हे नेहमी लक्षात असू द्या की सार्वकालिक जीवनाची वाट पाहत आपण यहोवाची इच्छा पूर्ण करत आहोत. त्यामुळे, “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” (गलती. ६:८, ९) तेव्हा यहोवाच्या मदतीनं धीर दाखवत, मोठ्या संकटातून वाचण्यासाठी लागणारे गुण विकसित करण्याकरता परिश्रम घ्या आणि आनंदानं त्याची सेवा करा.—प्रकटी. ७:९, १३, १४; याको. १:२-४.

आपण दाखवत असलेल्या धीरासाठी यहोवा आपल्याला नक्की बक्षीस देईल याची खात्री आपण बाळगू शकतो. कारण त्याच्यासाठी आणि त्याच्या नावासाठी आपण घेत असलेले परिश्रम, तसंच त्याच्यासाठी असलेलं आपलं प्रेम त्याला माहीत आहे. जर आपण आनंदानं त्याची सेवा करत राहिलो, तर आपल्यालाही स्तोत्रकर्त्या दाविदाप्रमाणे म्हणता येईल: “मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्लासतो; माझा देहही सुरक्षित राहतो.”—स्तो. १६:८, ९.