व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवानं त्याला “माझा मित्र” म्हटलं

यहोवानं त्याला “माझा मित्र” म्हटलं

“माझ्या सेवका, इस्राएला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहाम याच्या संताना.”—यश. ४१:८.

गीत क्रमांक: ५१, २२

१, २. (क) मानव देवासोबत मैत्री करू शकतात असं आपण का म्हणू शकतो? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?

आपला जन्म होतो त्या क्षणापासून शेवटल्या श्वासापर्यंत आपल्याला प्रेमाची नितांत गरज असते. प्रत्येक व्यक्तीला एका जोडप्यामध्ये असणाऱ्या प्रेमाचीच नव्हे, तर प्रेमळ मैत्रीची आणि जिव्हाळ्याचीदेखील गरज असते. पण, आपल्यापैकी प्रत्येकालाच सर्वात जास्त यहोवाच्या प्रेमाची गरज आहे. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं, की एका अदृश्य आणि सर्वशक्तिमान देवासोबत जिव्हाळ्याचा आणि मैत्रीचा नातेसंबंध जोडणं अशक्य आहे. पण असं मुळीच नाही, हे आपण जाणतो.

बायबलमध्ये अशा बऱ्याच व्यक्तींबद्दल सांगण्यात आलं आहे, ज्यांची देवासोबत मैत्री होती. आपण त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण केलं पाहिजे. का बरं? कारण देवासोबत मैत्री करण्यापेक्षा आणखी महत्त्वाचं असं कोणतंही ध्येय मानवी जीवनात असू शकत नाही. चला तर मग आपण अब्राहामाच्या उदाहरणाचा थोडा विचार करू या. (याकोब २:२३ वाचा.) देवासोबत असणारी त्याची घनिष्ट मैत्री विश्वासावर आधारलेली होती. म्हणूनच त्याला ‘विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा बाप’ असं म्हणण्यात आलं. (रोम. ४:११) त्याच्या उदाहरणावर चर्चा करत असताना, स्वतःला विचारा: ‘अब्राहामाच्या विश्वासाचं अनुकरण करण्याद्वारे मी यहोवासोबतची माझी मैत्री आणखी भक्कम कशी करू शकतो?’

अब्राहाम कशा प्रकारे यहोवाचा मित्र बनला?

३, ४. (क) कोणती गोष्ट अब्राहामासाठी त्याच्या विश्वासाची सर्वात मोठी परीक्षा असावी? (ख) अब्राहाम इसहाकाचं बलिदान देण्यासाठी का तयार होता?

अशी कल्पना करा की एक वृद्ध माणूस जड पावलांनी डोंगर चढत आहे. त्याच्या आयुष्यातला हा सर्वात कठीण प्रवास आहे. हा प्रवास त्याच्या वयामुळे कठीण बनला आहे, असं नाही. कारण त्याचं, म्हणजे अब्राहामाचं वय १२५ असलं तरी तो अजूनही सक्षम आहे. [1] त्याच्या मागून जवळपास २५ वर्षांचा एक तरुण मुलगादेखील चालत आहे. तो इसहाक आहे. त्याच्या पाठीवर लाकडाची एक मोळी आहे. अब्राहामाकडे एक सुरा आणि आग लावण्यासाठी लागणारं साहित्य आहे. हा प्रवास त्याच्यासाठी कठीण असण्याचं कारण म्हणजे, यहोवानं त्याला त्याच्या मुलाचं होमार्पण करण्यास सांगितलं आहे!—उत्प. २२:१-८.

अब्राहामाच्या विश्वासाची ही सर्वात मोठी परीक्षा होती. देवानं अब्राहामाला त्याच्या मुलाचं बलिदान देण्यासाठी सांगितलं, तेव्हा त्यात त्याचा क्रूरपणा दिसून येतो असं काही जण म्हणतात. तर इतर जण असंही म्हणतात, की अब्राहामाचं आपल्या मुलावर प्रेम नसल्यामुळे तो असं करण्यासाठी तयार झाला. लोकांचा देवावर विश्वास नसल्यामुळे आणि खरा विश्वास म्हणजे काय किंवा विश्वासाचं कार्य कसं असतं हे ते समजू शकत नसल्यामुळे ते असं बोलतात. (१ करिंथ. २:१४-१६) पण अब्राहामानं आंधळेपणानं म्हणजे काहीच विचार न करता यहोवाची आज्ञा मानली नव्हती. तर त्याच्यामध्ये खरा विश्वास होता म्हणून त्यानं असं केलं. त्याला माहीत होतं, की यहोवा असं कोणतंही कार्य करण्यासाठी सांगणार नाही, ज्यामुळे त्याचं कायमचं नुकसान होईल. उलट, यहोवाला आज्ञाधारक राहिल्यामुळे त्याला आणि त्याच्या लाडक्या मुलाला यहोवा आशीर्वादित करेल, हे त्याला पक्कं माहीत होतं. पण इतका खंबीर विश्वास बाळगण्यासाठी अब्राहामाला कशाची गरज होती? त्याला ज्ञान आणि अनुभवाची गरज होती.

५. अब्राहामाला यहोवाबद्दल कसं समजलं असावं, आणि याचा त्याच्यावर कसा परिणाम झाला?

ज्ञान. अब्राहाम ऊर नावाच्या एका शहरामध्ये लहानाचा मोठा झाला. तिथं लोक खोट्या देवतांची उपासना करायचे, आणि त्याचे वडीलही त्याला अपवाद नव्हते. (यहो. २४:२) मग अब्राहामाला यहोवाविषयी कसं समजलं? बायबल सांगतं की नोहाचा मुलगा शेम हा अब्राहामाचा नातेवाईक होता. शिवाय अब्राहाम १५० वर्षांचा होता, तोपर्यंत शेम जिवंत होता. शेमचा यहोवावर भक्कम विश्वास असल्यामुळे त्यानं आपल्या नातेवाइकांना यहोवाबद्दल नक्कीच खूप काही सांगितलं असावं. त्यामुळे अब्राहामालाही यहोवाबद्दल त्याच्याकडूनच समजलं असेल याची शक्यता नाकारता येत नाही. पण अब्राहामाला जे कळलं होतं त्यामुळे यहोवाबद्दल त्याच्या मनात प्रेम उत्पन्न झालं. आणि याच माहितीमुळे किंवा ज्ञानामुळे त्याचा यहोवावरील विश्वास वाढला.

६, ७. कोणत्या अनुभवामुळे अब्राहामाचा विश्वास आणखी भक्कम झाला?

अनुभव. पण आपला विश्वास भक्कम करण्यासाठी अब्राहामाजवळ अनुभवदेखील होता, हे आपण कसं म्हणू शकतो? असं म्हटलं जातं, की विचारांनी भावना उत्पन्न होतात आणि भावना एखाद्याला कृती करण्यास प्रवृत्त करतात. अब्राहामाच्या बाबतीत ही गोष्ट खरी होती. देवाबद्दल त्याला जे काही शिकायला मिळालं होतं त्यामुळे त्याच्या मनात खोल भावना उत्पन्न झाल्या. आणि याचा परिणाम म्हणजे, आकाश व पृथ्वीचा निर्माणकर्ता, परात्पर देव यहोवा याच्याबद्दल त्याच्या मनात गाढ आदर निर्माण झाला. (उत्प. १४:२२) यालाच बायबलमध्ये ‘सद्भय’ किंवा ईश्वरी भय असं म्हटलं आहे. (इब्री ५:७) देवासोबतच्या घनिष्ट मैत्रीसाठी, आपल्यालाही ईश्वरी भयाची गरज आहे. (स्तो. २५:१४) ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे अब्राहामाला यहोवाची आज्ञा पाळणं शक्य झालं.

देवानं अब्राहाम आणि सारेला ऊर शहरातलं त्यांचं राहतं घर सोडून एका अनोळखी देशात जाण्यास सांगितलं. ती दोघंही तरुण नव्हती. शिवाय त्यांना आयुष्यभर तंबूंमध्ये राहावं लागणार होतं. तसंच, अनोळखी ठिकाणी जाऊन राहण्यात धोका आहे, हे अब्राहामाला माहीत होतं. तरीदेखील त्यानं यहोवाच्या आज्ञेनुसार करण्याचं ठरवलं. त्याच्या आज्ञाधारकतेमुळे, देवानं त्याला आशीर्वादित केलं आणि त्याचं संरक्षणही केलं. उदाहरणार्थ, त्याच्या सुंदर पत्नीला, सारेला त्याच्यापासून दूर नेण्यात आलं. शिवाय त्याच्या जीवालाही त्या वेळी धोका निर्माण झाला. पण यहोवानं चमत्कारिक रीतीनं त्याचं आणि त्याच्या पत्नीचं संरक्षण केलं. (उत्प. १२:१०-२०; २०:२-७, १०-१२, १७, १८) साहजिकच या गोष्टींमुळे अब्राहामाचा विश्वास आणखी भक्कम झाला असेल.

८. यहोवासोबतची आपली मैत्री बळकट करण्यासाठी लागणारं ज्ञान आणि अनुभव आपण कशा प्रकारे प्राप्त करू शकतो?

आपणही यहोवासोबत अगदी जवळची मैत्री करू शकतो का? हो, नक्कीच! त्यासाठी आपल्यालाही अब्राहामासारखंच यहोवाबद्दल शिकून घेण्याची गरज आहे. आपणही आपल्याला आवश्यक असणारं ज्ञान आणि अनुभव प्राप्त करू शकतो. अब्राहामापेक्षा कैक पटीनं जास्त ज्ञान आणि अनुभव आज आपल्याजवळ उपलब्ध आहे. (दानी. १२:४; रोम. ११:३३) कारण, ‘आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्याविषयी’ असणारं ज्ञान बायबलमध्ये अगदी ठासून भरलेलं आहे. आपण बायबलमधून जे काही शिकतो त्यामुळे यहोवाबद्दल आपल्या मनात प्रेम दाटून येतं आणि त्याच्याप्रती गाढ आदर बाळगण्यास आपल्याला मदत होते. मग याच प्रेमामुळे आणि त्याच्याप्रती असणाऱ्या आदरामुळे आपण त्याची आज्ञा पाळण्यास प्रवृत्त होतो. शिवाय असं केल्यास तो आपल्याला कशा प्रकारे आशीर्वादित करतो आणि आपलं संरक्षण करतो, ते आपल्याला अनुभवायला मिळेल. यामुळे आपला विश्वास आणखी मजबूत होतो. एवढंच नव्हे तर पूर्ण अंतःकरणाने यहोवाची सेवा केल्यामुळे, आपल्याला शांती, समाधान आणि आनंददेखील मिळतो. (स्तो. ३४:८; नीति. १०:२२) जितकं जास्त ज्ञान आणि अनुभव आपल्याला प्राप्त करता येईल, तितकंच यहोवासोबतची आपली मैत्री आणखी बळकट होत जाईल.

अब्राहामाने देवासोबतची आपली मैत्री कशी टिकवली?

९, १०. (क) मैत्रीला आणखी भक्कम करण्यासाठी कशाची गरज असते? (ख) अब्राहामानं यहोवासोबत असणाऱ्या आपल्या मैत्रीला जपलं होतं, हे कशावरून दिसून येतं?

जिवलग मैत्री ही एका अत्यंत बहुमोल अशा संपत्तीसारखी असते. (नीतिसूत्रे १७:१७ वाचा.) केवळ सजावट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्यंत किंमती अशा फुलदाणीसारखी ती नसते. तर मैत्री एका सुंदर फुलासारखी असते, ज्याला फुलण्यासाठी पाणी घालावं लागतं आणि त्याची काळजी घ्यावी लागते. अब्राहामानंदेखील यहोवासोबत असणाऱ्या त्याच्या मैत्रीला असंच जपलं होतं. त्यानं हे कसं केलं?

१० अब्राहामानं त्याच्या अंतःकरणात असणारं ईश्वरी भय आणि आज्ञाधारकता टिकवून ठेवली. उदाहरणार्थ, जेव्हा तो त्याच्या कुटुंबासोबत आणि सेवकांसोबत कनानमध्ये आला, तेव्हा प्रत्येक निर्णय घेताना त्यानं मार्गदर्शनासाठी यहोवाकडे पाहिलं, मग तो अगदी छोटा निर्णय असला तरी. इसहाकाचा जन्म होण्याच्या एक वर्षाआधी, म्हणजे अब्राहाम जेव्हा ९९ वर्षांचा होता तेव्हा यहोवानं त्याला त्याच्या घरातील सर्व पुरुषांची सुंता करण्यास सांगितली. तेव्हा यहोवा हे काय सांगत आहे, असं अब्राहामाला वाटलं का? किंवा ही गोष्ट टाळण्यासाठी त्यानं कोणती सबब यहोवाला सांगितली का? नाही. उलट, त्यानं यहोवावर विश्वास ठेवला आणि अगदी “त्याच दिवशी” त्यानं यहोवाच्या आज्ञेनुसार कार्य केलं.—उत्प. १७:१०-१४, २३.

११. सदोम आणि गमोराबद्दल अब्राहामाला कोणती काळजी लागून होती, आणि यहोवानं त्याला कशी मदत केली?

११ अब्राहाम अगदी छोट्या-छोट्या बाबतीतही यहोवाच्या आज्ञेत राहिला. आणि म्हणूनच यहोवासोबतची त्याची मैत्री आणखी दृढ होत गेली. आपण अगदी कोणत्याही गोष्टीबद्दल यहोवाशी बोलू शकतो, असं त्याला वाटायचं. त्याला पेचात टाकणाऱ्या प्रश्नांबद्दलही त्यानं यहोवाकडे मदत मागितली. उदाहरणार्थ, यहोवानं जेव्हा सदोम आणि गमोरा या शहरांचा नाश करणार असल्याचं अब्राहामाला सांगितलं, तेव्हा त्याला चिंता वाटू लागली. कारण वाईट लोकांसोबत चांगल्या लोकांचाही नाश होईल का, अशी भीती त्याला होती. कदाचित सदोम इथं राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांची, म्हणजे लोट आणि त्याच्या कुटुंबाची त्याला काळजी असावी. पण तरीदेखील “जगाचा न्यायाधीश” असणाऱ्या यहोवावर त्यानं विश्वास ठेवला आणि अगदी नम्रपणे त्यानं यहोवाजवळ आपली काळजी व्यक्त केली. यहोवानंदेखील आपल्या या मित्राला अगदी धीरानं घेतलं आणि तो दयाळू आहे हे त्याला दाखवून दिलं. यहोवानं त्याला समजावलं की न्यायदंड बजावतानाही जर त्याला चांगले लोक दिसले, तर तो नक्की त्यांचा जीव वाचवेल.—उत्प. १८:२२-३३.

१२, १३. (क) यहोवाबद्दलच्या ज्ञानामुळे आणि अनुभवामुळे अब्राहामाला नंतर कशी मदत झाली? (ख) कोणत्या गोष्टीवरून अब्राहामाचा यहोवावर पूर्ण विश्वास असल्याचं दिसून येतं?

१२ यावरून हे स्पष्ट होतं, की यहोवासोबतची आपली मैत्री टिकवून ठेवण्यासाठी अब्राहामाला त्यानं प्राप्त केलेल्या ज्ञानामुळे आणि अनुभवामुळे मदत झाली. त्यामुळे नंतर, जेव्हा यहोवानं त्याला त्याच्या पुत्राचं बलिदान देण्यासाठी सांगितलं, तेव्हा यहोवा सहनशील, दयाळू, भरवशालायक आणि आपल्या सेवकांचं संरक्षण करणारा देव आहे, हे अब्राहामाला माहीत होतं. त्याला याची खात्री होती, की यहोवा असा अचानक बदलणार नाही, तो अचानक क्रूर आणि निर्दयी बनणार नाही. पण आपण असं का म्हणू शकतो?

१३ आपल्या सेवकांना सोडून पुढं जाण्याआधी, अब्राहाम त्यांना म्हणाला: “येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.” (उत्प. २२:५) इथं अब्राहामाला काय म्हणायचं होतं? आपल्याला इसहाकाचं बलिदान द्यायचं आहे हे माहीत असतानाही, मी इसहाकासोबत परत येतो असं तो मुद्दाम खोटं बोलत होता का? नाही. बायबल सांगतं की इसहाकाचा मृत्यू झाला तरी त्याला पुन्हा जिवंत करण्याची ताकद यहोवाकडे आहे हे त्याला माहीत होतं. (इब्री लोकांस ११:१९ वाचा.) शिवाय, यहोवानं आपल्याला वृद्ध असतानाही मुलाला जन्म देण्याची क्षमता दिली होती, हेदेखील तो जाणून होता. (इब्री ११:११, १२, १८) त्यामुळे यहोवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे त्याला चांगलं माहीत होतं. त्या दिवशी नेमकं काय होईल ते अब्राहामाला माहीत नव्हतं. पण आपली अभिवचनं पूर्ण करण्यासाठी, गरज पडली तर यहोवा इसहाकाचं पुनरुत्थानदेखील करू शकतो, यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. म्हणूनच अब्राहामाला ‘विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा बाप’ असं म्हणण्यात आलं!

१४. यहोवाची सेवा करत असताना तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं, आणि याबाबतीत अब्राहामाचं उदाहरण तुम्हाला कशी मदत करू शकतं?

१४ आज यहोवा आपल्याला आपल्या मुलांचं बलिदान देण्यास सांगत नाही. पण आपण त्याच्या आज्ञा पाळाव्यात अशी अपेक्षा मात्र तो करतो. कधीकधी त्याच्या आज्ञा पाळणं आपल्याला कठीण बनतं, तर कधीकधी त्यानं अमुक एखादी आज्ञा का दिली आहे याचं कारण आपल्याला कळत नाही. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का? काही जणांना कदाचित, लाजाळू स्वभावामुळे किंवा अनोळखी लोकांशी बोलण्याचं धाडस होत नसल्यामुळे प्रचारकार्यात सहभाग घेणं खूप कठीण जात असेल. तर काही जणांना कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत इतरांपेक्षा वेगळी भूमिका घेण्यास भीती वाटत असेल. (निर्ग. २३:२; १ थेस्सलनी. २:२) पण एखादी कठीण गोष्ट करण्याची वेळ येते तेव्हा अब्राहामानं दाखवलेल्या असाधारण विश्वासाचा आणि धैर्याचा विचार करा. जेव्हा अशा विश्वासू स्त्री-पुरुषांच्या उदाहरणावर आपण मनन करतो, तेव्हा आपोआपच त्यांचं अनुकरण करण्याची आणि आपला मित्र असणाऱ्या यहोवाच्या आणखी समीप जाण्याची प्रेरणा आपल्याला मिळते.—इब्री १२:१, २.

आशीर्वादित करणारी मैत्री

१५. यहोवाशी आज्ञाधारक राहिल्याबद्दल अब्राहामाला कधीच पस्तावा झाला नाही, हे आपण खात्रीनं का म्हणू शकतो?

१५ यहोवाची आज्ञा पाळल्याबद्दल अब्राहामाला कधी पस्तावा झाला का? बायबल म्हणतं, की त्याला “दीर्घकाळ सुखी व समाधानी जीवन लाभले.” (उत्प. २५:८, ईझी-टू-रीड व्हर्शन) तो १७५ वर्षांचा होता तेव्हा आपल्याला मिळालेल्या दीर्घ आयुष्याकडे तो समाधानाने पाहू शकत होता. कारण यहोवासोबतची त्याची मैत्रीच त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची होती. पण त्याला “दीर्घकाळ सुखी व समाधानी” जीवन मिळालं म्हणून भविष्यात पुन्हा जगण्याची इच्छा त्याला नव्हती, असा याचा मुळीच अर्थ होत नाही.

१६. नंदनवनात कोणत्या गोष्टींमुळे अब्राहामाला आनंद होईल?

१६ अब्राहामाविषयी बायबल म्हणतं, की “पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता.” (इब्री ११:१०) त्याला या गोष्टीवर पक्का विश्वास होता की एक न एक दिवस हे नगर, म्हणजे पृथ्वीवर प्रस्थापित झालेलं देवाचं राज्य त्याला पाहायला मिळेल. आणि तो ते नक्कीच पाहील! विचार करा, यहोवासोबतच्या आपल्या मैत्रीचा अनुभव घेत पृथ्वीवरील नंदनवनात जगताना त्याला किती आनंद होईल! हजारो वर्षं, देवाच्या सेवकांना त्याच्या विश्वासाच्या उदाहरणामुळे मदत झाली आहे हे जाणून त्याला किती समाधान वाटेल! मोरिया पर्वतावर तो देणार असलेलं बलिदान, खरंतर पुढे होणाऱ्या फार मोठ्या गोष्टीला सूचीत करणार होतं हे समजल्यावर त्याला कसं वाटेल? (इब्री ११:१९) शिवाय, आपल्या मुलाचं, इसहाकाचं बलिदान देताना त्याला ज्या यातना होत होत्या, त्यावरून मानवजातीसाठी आपल्या मुलाचं खंडणी बलिदान देताना यहोवाला किती यातना झाल्या असतील, हे समजून घेण्यास लाखो लोकांना मदत झाली हे जेव्हा त्याला समजेल तेव्हा त्याला किती आश्चर्य वाटेल! (योहा. ३:१६) खरंच, अब्राहामाच्या उदाहरणामुळे प्रेमाच्या सर्वोत्तम कृतीबद्दल, खंडणीबद्दल आपली कदर आणखी वाढवण्यास आपल्याला किती मदत होते!

१७. तुम्ही कोणता निर्धार केला आहे, आणि पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

१७ तेव्हा अब्राहामाच्या विश्वासाचं अनुकरण करण्याचा आपण प्रत्येक जण निर्धार करू या. त्याच्याप्रमाणेच आपल्यालाही ज्ञान आणि अनुभवाची गरज आहे. यहोवाबद्दल शिकत असताना आणि त्याला आज्ञाधारक राहताना तो आपल्याला कशा प्रकारे आशीर्वादित करतो आणि आपलं संरक्षण करतो ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. (इब्री लोकांस ६:१०-१२ वाचा.) यहोवासोबतची तुमची मैत्री कायम टिकून राहो! पुढील लेखामध्ये, आपण अशा तीन विश्वासू सेवकांची उदाहरणं पाहू या, ज्यांची यहोवासोबत घनिष्ट मैत्री होती.

^ [१] (परिच्छेद ३) अब्राहाम आणि सारा यांची नावं आधी अब्राम आणि साराय अशी होती. पण या लेखात आपण यहोवानं त्यांना नंतर जी नावं दिली त्यांचाच वापर करू या.