व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांकडून शिका

यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांकडून शिका

“परमेश्वर तुमच्याकडून पुढील गोष्टींची अपेक्षा करतो. दुसऱ्यांशी न्यायाने वागा. दया व निष्ठा यावर प्रेम करा. तुमच्या परमेश्वरापुढे नम्र होऊन राहा.”—मीखा ६:८, ईझी-टू-रीड व्हर्शन.

गीत क्रमांक: १८, ४३

१, २. दाविदानं यहोवाला एकनिष्ठ असल्याचं कसं दाखवलं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

शौल आणि त्याचे ३,००० सैनिक दाविदाला ठार मारण्याकरता यहुदाच्या रानात त्याच्या शोधात होते. पण, एक रात्र अशी येते जेव्हा दाविदाला आणि त्याच्या साथीदारांना, शौल आणि त्याच्या सैनिकांनी जिथं तळ दिला आहे ते ठिकाण सापडतं. ते सर्व गाढ झोपेत आहेत. त्यामुळे, सैनिकांना कोणतीही चाहूल न लागू देता दावीद आणि अबीशय शौलापर्यंत पोचतात. मग, अबीशय दाविदाला अतिशय दबक्या आवाजात म्हणतो: “आता मला त्याच्या भाल्याने त्याजवर एकच असा वार करू द्या की तो त्यास भेदून जमिनीत शिरेल; भाला पुनः मारण्याची जरूरच पडणार नाही.” पण, दावीद त्याला तसं करू देत नाही. तो त्याला म्हणतो: “त्याचा वध करू नको; परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार?” पुढे, तो त्याला असंही म्हणतो की त्यानं यहोवाच्या अभिषिक्तावर हात चालवणं यहोवाच्या दृष्टीनं योग्य नाही.—१ शमु. २६:८-१२.

यहोवाला एकनिष्ठ राहणं म्हणजे काय हे दाविदाला माहीत होतं. त्यामुळे, आपण शौलाचा आदर केला पाहिजे हे तो जाणून होता. त्याला इजा पोचवण्याचा विचारही तो करू शकत नव्हता. कारण, इस्राएलाचा राजा होण्यासाठी देवानं शौलाची निवड केली होती. आजही, यहोवानं त्याच्या काही सेवकांना अधिकार दिले आहेत. अशा वेळी आपण त्यांच्याशी एकनिष्ठ राहावं आणि त्यांचा आदर करावा अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो.—मीखा ६:८ वाचा. [1]

३. अबीशय कशा प्रकारे दाविदाला एकनिष्ठ राहिला?

देवानं दाविदाला राजा म्हणून निवडलं आहे, हे माहीत असल्यामुळे अबीशयानं दाविदाला आदर दाखवला. पण, पुढे राजा बनल्यानंतर दाविदानं गंभीर पाप केले. त्यानं उरीयाच्या पत्नीसोबत व्यभिचार केला. आणि उरीयाला युद्धात ठार मारण्याकरता त्यानं यवाबाला सांगून कट रचला. (२ शमु. ११:२-४, १४, १५; १ इति. २:१६) यवाब हा अबीशयाचा भाऊ असल्यामुळे, दाविदानं काय केलं आहे ते अबीशयाला कदाचित समजलं असेल. पण तरीही तो दाविदाचा आदर करत राहिला. अबीशय सेनापती असल्यामुळे, त्याची इच्छा असती तर तो त्याच्या अधिकाराचा वापर करून स्वतः राजा बनला असता. पण, त्यानं तसं कधीही केलं नाही. याउलट, तो दाविदाची सेवा करत राहिला आणि त्याच्या शत्रूंपासून त्यानं नेहमी त्याचं संरक्षण केलं.—२ शमु. १०:१०; २०:६; २१:१५-१७.

४. (क) दावीद कशा प्रकारे देवाला एकनिष्ठ असण्याचं एक उत्तम उदाहरण होता? (ख) आपण कोणत्या उदाहरणांचा विचार करणार आहोत?

दावीद आपल्या संपूर्ण आयुष्यात यहोवाला एकनिष्ठ होता. तो तरुण होता तेव्हा त्यानं यहोवाची आणि इस्राएली लोकांची निंदा करणाऱ्या महाकाय गल्याथाला ठार मारलं. (१ शमु. १७:२३, २६, ४८-५१) पण, दावीद राजा असताना जेव्हा त्याच्या हातून पाप घडलं, तेव्हा यहोवाचा संदेष्टा नाथान याला त्याची कानउघडणी करावी लागली. दाविदानं लगेचच त्याची चूक कबूल केली आणि पश्‍चात्ताप केला. (२ शमु. १२:१-५, १३) नंतर, जेव्हा दावीद वृद्ध झाला तेव्हा त्यानं यहोवाच्या मंदिराच्या बांधकामासाठी बऱ्याच मौल्यवान गोष्टी दिल्या. (१ इति. २९:१-५) यावरून दिसून येतं की दाविदानं आपल्या जीवनात गंभीर चुका केल्या असल्या, तरी त्यानं यहोवाला एकनिष्ठ राहण्याचं कधीही सोडलं नाही. (स्तो. ५१:४, १०; ८६:२) या लेखात आपण दाविदाच्या आणि त्याच्या काळातील इतर लोकांच्या उदाहरणांवर विचार करणार आहोत. आपण इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा यहोवाला कसं एकनिष्ठ राहू शकतो हे आपल्याला त्यातून शिकायला मिळेल. तसंच, कोणत्या गुणांमुळे आपल्याला एकनिष्ठ राहण्यास मदत होईल हेदेखील आपण पाहणार आहोत.

तुम्ही यहोवाला एकनिष्ठ राहाल का?

५. अबीशयाच्या हातून झालेल्या चुकीवरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

अबीशयाची शौलाला ठार मारण्याची इच्छा होती. तो दाविदाला एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करत होता. पण, “परमेश्वराच्या अभिषिक्तावर” हात उचलणं चुकीचं ठरेल हे माहीत असल्यामुळे दाविदानं अबीशयाला असं करू दिलं नाही. (१ शमु. २६:८-११) यावरून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो: सर्वात आधी कोणाला एकनिष्ठ राहणं महत्त्वाचं आहे हे ठरवण्यासाठी कोणती बायबल तत्त्वं आपल्याला मदत करू शकतात, यावर आपण विचार केला पाहिजे.

६. आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना एकनिष्ठ राहणं साहजिक असलं, तरी आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना एकनिष्ठ राहावं, असं वाटणं साहजिकच आहे. मग ते आपले मित्र असतील किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य. पण, अपरिपूर्ण असल्यामुळे काही वेळा आपली ही भावना आपल्याला चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडू शकते. (यिर्म. १७:९) त्यामुळे, जेव्हा एखादी जवळची व्यक्ती काहीतरी चुकीचं पाऊल उचलते आणि यहोवाला सोडून जाते, तेव्हा इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा यहोवाला एकनिष्ठ राहणं आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे.—मत्तय २२:३७ वाचा.

७. एक बहीण कठीण परिस्थितीतही देवाला कशा प्रकारे एकनिष्ठ राहिली?

तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात येतं, तेव्हासुद्धा तुम्ही यहोवाला एकनिष्ठ असल्याचं दाखवू शकता. अॅनी [2]  नावाच्या एका बहिणीचं उदाहरण लक्षात घ्या. बहिष्कृत झालेल्या तिच्या आईनं एकदा तिला फोन केला आणि मला भेटायचं आहे असं सांगितलं. कुटुंबातील कोणीही तिच्याशी बोलत नसल्यामुळे ती खूप दुःखी आहे असं तिनं अॅनीला सांगितलं. यामुळे अॅनीलाही वाईट वाटलं आणि तिनं पत्राद्वारे उत्तर देईन असं सांगितलं. पत्र लिहिण्याआधी तिनं काही बायबल तत्त्वांवर मनन केलं. (१ करिंथ. ५:११; २ योहा. ९-११) मग, तिनं पत्रात तिला हे प्रेमळपणे समजावून सांगितलं की जेव्हा तिनं पाप केलं आणि पश्‍चात्ताप दाखवला नाही, तेव्हा खरंतर ती स्वतःच कुटुंबाला सोडून गेली होती. आणि आता जर तिला परत एकदा आनंदी जीवन जगायचं असेल तर याचा एकमेव मार्ग म्हणजे तिला यहोवाकडे परत यावं लागेल.—याको. ४:८.

८. देवाला एकनिष्ठ राहण्यासाठी आपल्याला कोणत्या गुणांमुळे मदत होईल?

दाविदाच्या काळातील देवाचे एकनिष्ठ सेवक नम्र, दयाळू आणि धैर्यवान होते. या गुणांमुळे, यहोवाला एकनिष्ठ राहण्यास आपल्याला कशी मदत होते ते आता आपण पाहू या.

आपण नम्र असलं पाहिजे

९. अबनेरानं दाविदाला मारण्याचा प्रयत्न का केला?

दाविदानं जेव्हा गल्याथाचं शिर शौल राजाकडे आणलं, तेव्हा शौलाचा मुलगा योनाथान आणि इस्राएलांचा सेनापती अबनेरदेखील तिथं होता. या घटनेनंतर योनाथानाची दाविदासोबत चांगली मैत्री झाली आणि तो त्याला एकनिष्ठ राहिला. (१ शमु. १७:५७–१८:३) पण, अबनेर मात्र एकनिष्ठ नव्हता. त्यानं तर, दाविदाला मारण्याची इच्छा असलेल्या शौलाला मदत केली. (१ शमु. २६:१-५; स्तो. ५४:३) इस्राएलचा राजा होण्याकरता देवानं दाविदाला निवडलं आहे हे योनाथानाला आणि अबनेरालाही माहीत होतं. पण, शौलाच्या मृत्यूनंतर अबनेरानं दाविदाला साथ दिली नाही. याउलट, त्यानं शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याला राजा बनवण्याचा प्रयत्न केला. नंतर, स्वतः राजा बनण्याची इच्छा असल्यामुळेच कदाचित त्यानं शौल राजाच्या एका पत्नीसोबत संबंध ठेवले. (२ शमु. २:८-१०; ३:६-११) दाविदाविषयी योनाथान आणि अबनेर यांच्या दृष्टिकोनात इतका फरक का होता? कारण, योनाथान यहोवाला एकनिष्ठ होता आणि तो नम्रदेखील होता. पण, अबनेर तसा नव्हता.

१०. कोणत्या कारणामुळे अबशालोम यहोवाला एकनिष्ठ नव्हता?

१० नम्र नसल्यामुळे दावीद राजाचा मुलगा अबशालोमदेखील देवाला एकनिष्ठ नव्हता. त्याला राजा व्हायचं होतं आणि म्हणून त्यानं स्वतःसाठी रथ, घोडे आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसं ठेवली होती. (२ शमु. १५:१) शिवाय, इस्राएली लोकांनी आपल्याला एकनिष्ठ राहावं म्हणून त्यानं अनेकांचं मन स्वतःकडे वळवलं होतं. इतकंच नाही तर यहोवानं दाविदाला राजा म्हणून निवडलं आहे हे माहीत असतानाही, त्यानं आपल्या पित्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.—२ शमु. १५:१३, १४; १७:१-४.

११. अबनेर, अबशालोम आणि बारूख यांच्या उदाहरणातून आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?

११ जेव्हा एक व्यक्ती नम्र नसते आणि तिला जास्त अधिकार प्राप्त करण्याची इच्छा असते, तेव्हा देवाला एकनिष्ठ राहणं तिला कठीण जातं. हे खरं आहे, की यहोवावर आपलं प्रेम आहे. शिवाय, अबनेर आणि अबशालोम यांच्यासारखी स्वार्थी आणि दुष्ट वृत्ती बाळगण्याची आपली मुळीच इच्छा नाही. पण, आपल्या मनात जास्तीत जास्त पैसा कमवण्याची किंवा प्रतिष्ठेची नोकरी मिळवण्याची इच्छा निर्माण झाली तर आपल्या आध्यात्मिकतेला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी सतर्क राहण्याची गरज आहे. आपण असं केलं नाही तर यहोवासोबतचं आपलं नातं धोक्यात येऊ शकतं. काही काळासाठी, यिर्मयाचा सचिव बारूख यालाही त्याच्याजवळ नसणाऱ्या गोष्टींची हाव होती आणि म्हणून देवाच्या सेवेत तो आनंदी नव्हता. तेव्हा, यहोवानं बारूखला सांगितलं: “पाहा, मी जे उभारले ते मोडून टाकेन, मी जे लावले ते उपटून टाकेन; सर्व पृथ्वीची हीच वाट. तू आपणासाठी मोठाल्या गोष्टीची वांच्छा करतोस काय? ती करू नको.” (यिर्म. ४५:४, ५) बारूखनं यहोवाचं म्हणणं ऐकलं. आज आपणही यहोवाचं ऐकलं पाहिजे कारण आपल्याच काळात तो या दुष्ट जगाचा अंत करणार आहे.

१२. स्वार्थी इच्छेमुळे देवाला एकनिष्ठ राहणं शक्य नसतं, असं का म्हणता येईल?

१२ मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या डॅनिएल नावाच्या बांधवासमोरही एकनिष्ठतेच्या बाबतीत निर्णय घेण्याची वेळ आली. त्याला सत्यात नसलेल्या एका मुलीशी लग्न करण्याची इच्छा होती. डॅनिएल म्हणतो: “मी पायनियर म्हणून सेवा करू लागलो तेव्हादेखील मी तिच्याशी पत्रव्यवहार करत होतो.” पण, नंतर त्याला याची जाणीव झाली की तो स्वार्थीपणे स्वतःचीच इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. तो यहोवाला एकनिष्ठ नव्हता. पण नंतर त्यानं एका अनुभवी वडिलांना त्या मुलीबद्दल सांगून नम्रता दाखवली. डॅनिएल म्हणतो: “त्यांनी मला समजावून सांगितलं की मला देवाला एकनिष्ठ राहायचं असेल, तर मी त्या मुलीसोबत पत्रव्यवहार करण्याचं थांबवलं पाहिजे. पण, असं करण्याकरता मला अनेक वेळा प्रार्थना करावी लागली आणि बराच भावनिक त्रास सहन करावा लागला. कधीकधी तर मी खूप रडलोसुद्धा. पण नंतर हळूहळू सेवाकार्यातील माझा आनंद वाढू लागला.” डॅनिएलनं नंतर सत्यात असलेल्या एका मुलीशी लग्न केलं आणि आता तो विभागीय पर्यवेक्षक म्हणून काम करत आहे.

एकनिष्ठेमुळे आपल्याला दया दाखवण्यास मदत होते

एका बांधवानं किंवा बहिणीनं एखादी गंभीर चूक केल्यास, आध्यात्मिक मदत प्राप्त करण्यासाठी तुम्ही एकनिष्ठपणे त्यांना मदत कराल का? (परिच्छेद १४ पाहा)

१३. दाविदानं पाप केलं तेव्हा यहोवा आणि दावीद या दोघांसोबत नाथान कशा प्रकारे एकनिष्ठ राहिला?

१३ आपण जेव्हा यहोवाला एकनिष्ठ राहतो, तेव्हा इतरांनाही एकनिष्ठ राहणं आणि त्यांना आणखी चांगल्या प्रकारे मदत करणं आपल्याला शक्य होतं. नाथान संदेष्टा यहोवा आणि दावीद या दोघांप्रती एकनिष्ठ होता. दाविदानं बथशेबेशी व्यभिचार केला आणि कट रचून तिच्या पतीला युद्धात ठार मारलं, तेव्हा यहोवानं नाथानाला त्याची कानउघडणी करण्यासाठी पाठवलं. आणि त्यानं धैर्य दाखवून यहोवाच्या म्हणण्यानुसार केलं. पण, असं करत असताना त्यानं समजूतदारपणा आणि दयाळूपणा दाखवला. दाविदाच्या हातून घडलेलं पाप किती गंभीर आहे हे त्याला समजावं अशी नाथानाची इच्छा होती. त्यामुळे, त्यानं दाविदाला एका श्रीमंत मनुष्याची गोष्ट सांगितली. हा श्रीमंत मनुष्य एका गरीब माणसाकडे असलेली एकुलती एक मेंढी चोरतो. त्या श्रीमंत माणसानं काय केलं हे ऐकल्यावर दाविदाला खूप राग येतो. तेव्हा नाथान त्याला म्हणतो: “तो मनुष्य तूच आहेस.” हे ऐकल्यावर आपण यहोवाविरुद्ध किती मोठं पाप केलं आहे याची जाणीव दाविदाला होते.—२ शमु. १२:१-७, १३.

१४. तुम्ही यहोवाला आणि त्याच वेळी आपल्या नातेवाइकाला किंवा मित्राला एकनिष्ठ कसं राहू शकता?

१४ सर्वात आधी यहोवाला एकनिष्ठ राहणं जास्त महत्त्वाचं आहे. पण, त्याच वेळी दयाळूपणा दाखवण्याद्वारे आपण इतरांनाही एकनिष्ठ राहू शकतो. उदाहरणार्थ, एका बांधवानं केलेल्या गंभीर पापाबद्दल कदाचित तुम्हाला माहीत झालं असेल किंवा तसे पुरावेही तुमच्याजवळ असतील. पण, तरीसुद्धा ती व्यक्ती तुमची जवळची मित्र किंवा कुटुंबातील सदस्य असल्यामुळे तिला एकनिष्ठ राहावं असं तुम्हाला वाटत असेल. आणि त्याच वेळी यहोवाला एकनिष्ठ राहणं जास्त महत्त्वाचं आहे याची जाणीवही तुम्हाला असेल. तेव्हा अशा परिस्थितीतही तुम्ही नाथानाचं उदाहरण लक्षात ठेवू शकता. त्यानं यहोवाच्या म्हणण्यानुसार केलं आणि त्याच वेळी दाविदावर दयादेखील दाखवली. तुम्हीदेखील तेच करू शकता. त्यानं आपली चूक लवकरात लवकर मंडळीतील वडिलांना सांगावी आणि त्यांची मदत घ्यावी हे त्याला सांगा. पण, त्यानं असं केलं नाही, तर तुम्ही स्वतः वडिलांना त्याच्याबद्दल सांगू शकता. असं केल्यामुळे तुम्ही यहोवाला एकनिष्ठ असल्याचं दाखवत असता. आणि त्याच वेळी तुम्ही तुमच्या बांधवावरही दया दाखवत असता. कारण, वडील त्याला यहोवासोबत पुन्हा एकदा चांगला नातेसंबंध जोडण्यास मदत करू शकतात. ते त्याला सौम्यतेनं आणि प्रेमानं सुधारण्याचा प्रयत्न करतील.—लेवीय ५:१; गलतीकर ६:१ वाचा.

देवाला एकनिष्ठ राहण्यासाठी आपल्याला धैर्य दाखवण्याची गरज आहे

१५, १६. देवाला एकनिष्ठ राहण्यासाठी हूशयाला धैर्याची गरज का होती?

१५ दाविदाच्या एकनिष्ठ मित्रांपैकी हूशय एक होता. जेव्हा अबशालोमाला राजा बनवण्याची लोकांची इच्छा होती, तेव्हा दावीद आणि यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी हूशयाला धैर्याची गरज पडली. अबशालोम आपल्या सैनिकांसोबत यरुशलेमेत आला आहे आणि दाविदानं तिथून पळ काढला आहे हे त्याला माहीत होतं. (२ शमु. १५:१३; १६:१५) पण, नंतर हूशयानं काय केलं? दाविदानं पळ काढला आहे म्हणून त्यानं दाविदाला सोडून अबशालोमाला साथ दिली का? नाही. दावीद वृद्ध झाला होता आणि त्याला मारून टाकण्याची अनेकांची इच्छा होती. पण तरीही हूशय त्याला एकनिष्ठ राहिला. कारण यहोवानं त्याला राजा म्हणून नियुक्त केलं आहे हे त्याला माहीत होतं. त्यामुळे, तो दाविदाला भेटण्यासाठी जैतून पर्वतावर गेला.—२ शमु. १५:३०, ३२.

१६ पण दाविदानं हूशयाला येरुशलेममध्ये पुन्हा जाऊन अबशालोमाचा मित्र असल्याचं नाटक करण्यास सांगितलं. यामुळे, अहिथोफेलऐवजी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी तो अबशालोमाचं मन वळवू शकत होता. हूशय धैर्यवान होता आणि म्हणूनच दाविदाच्या म्हणण्यानुसार करण्यासाठी आणि यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी त्यानं आपला जीव धोक्यात घातला. यहोवानं हूशयाला मदत करावी अशी विनंती दाविदानं यहोवाला केली. यहोवानं त्याची विनंती ऐकली आणि अबशालोमानं अहिथोफेलऐवजी हूशयाचं म्हणणं ऐकलं.—२ शमु. १५:३१; १७:१४.

१७. एकनिष्ठ राहण्यासाठी आपल्याला धैर्याची गरज का आहे?

१७ कुटुंबातील सदस्य, सहकर्मचारी किंवा सरकारी अधिकारी आपल्याला त्यांच्या इच्छेनुसार वागण्याचा दबाव आणतात, तेव्हा यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी आपल्याला धैर्याची गरज असते. जपानमध्ये राहणाऱ्या टारोच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. लहानपणापासूनच तो आपल्या पालकांना खूश करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करायचा. तो नेहमी त्यांच्या आज्ञेत असायचा. शिवाय, केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर आपल्या पालकांवर प्रेम असल्यामुळे तो त्यांना एकनिष्ठ होता. पण, जेव्हा त्यानं यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्यास सुरवात केली, तेव्हा त्याच्या पालकांनी तो थांबवण्यास त्याला सांगितलं. यामुळे, त्याला खूप वाईट वाटलं. शिवाय, तो आता सभांनादेखील जाणार आहे हे सांगणंदेखील त्याला खूप कठीण झालं. टारो म्हणतो: “ते माझ्यावर इतके चिडले होते की त्यांनी कितीतरी वर्षं मला घरी येऊ दिलं नाही. मी माझा निर्णय बदलू नये म्हणून मी यहोवाला धैर्यासाठी प्रार्थना केली. आता त्यांच्यात खूप बदल झाला आहे आणि मी वेळोवेळी त्यांना भेटायलाही जात असतो.”—नीतिसूत्रे २९:२५ वाचा.

१८. या लेखामुळे तुम्हाला कशी मदत झाली आहे?

१८ यहोवाला एकनिष्ठ राहिल्यामुळे मिळणारं समाधान दावीद, योनाथान, नाथान आणि हूशय यांनी अनुभवलं आणि आपणही ते अनुभवू शकतो. अबनेर आणि अबशालोम हे यहोवाला एकनिष्ठ नव्हते. आपणही तसं बनावं अशी आपली मुळीच इच्छा नाही. शिवाय अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्या हातून नेहमी चुका होतात. पण, तरीही यहोवाला एकनिष्ठ राहणं आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे हे आपण दाखवून देऊ या.

^ [१] (परिच्छेद २) मीखा ६:८ (ईझी-टू-रीड व्हर्शन): “हे माणसा, चांगुलपणा म्हणजे काय हे परमेश्वराने तुला सांगितले. परमेश्वर तुमच्याकडून पुढील गोष्टींची अपेक्षा करतो. दुसऱ्यांशी न्यायाने वागा. दया व निष्ठा यावर प्रेम करा. तुमच्या परमेश्वरापुढे नम्र होऊन राहा. भेटी देऊन त्याच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करू नका.”

^ [२] (परिच्छेद ७) काही नावं बदलण्यात आली आहेत.