यहोवाच्या घनिष्ठ मित्रांचं अनुकरण करा
“परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांशी असते.”—स्तो. २५:१४.
१-३. (क) आपणही देवाचे मित्र बनू शकतो, असं का म्हणता येईल? (ख) या लेखात आपण कोणाविषयी पाहणार आहोत?
बायबलमध्ये अब्राहामाला तीन वेळा देवाचा मित्र म्हणण्यात आलं आहे. (२ इति. २०:७; यश. ४१:८; याको. २:२३) तो एकमेव असा होता, ज्याला बायबलमध्ये देवाचा मित्र म्हणण्यात आलं. मग याचा अर्थ असा होतो का की केवळ तोच एकमेव असा मानव होता ज्याची यहोवासोबत मैत्री होती? नक्कीच नाही. बायबल सांगतं की आपल्यापैकी प्रत्येकाला देवाचा मित्र बनण्याचा बहुमान लाभला आहे.
२ बायबलमध्ये आपल्याला अशा बऱ्याच विश्वासू स्त्री-पुरुषांचा अहवाल पाहायला मिळतो, ज्यांनी देवाचं भय धरलं, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते त्याचे जवळचे मित्र बनले. (स्तोत्र २५:१४ वाचा.) पौलानं ज्या ‘मोठ्या साक्षीरूपी मेघाचा’ उल्लेख केला त्यामध्ये या सर्व विश्वासू सेवकांचा समावेश होतो. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या या प्रत्येकाची देवासोबत मैत्री होती.—इब्री १२:१.
३ यहोवासोबत जवळची मैत्री असणाऱ्या तीन व्यक्तींच्या उदाहरणांचं आता आपण बारकाईनं परीक्षण करू या: (१) मवाब देशात राहणारी एकनिष्ठ तरुण विधवा, रूथ (२) यहुदाचा विश्वासू राजा, हिज्कीया आणि (३) येशूची नम्र आई, मरीया. या सर्वांनी ज्या प्रकारे देवासोबत मैत्री केली, त्यावरून आपण काय शिकू शकतो?
तिनं एकनिष्ठ प्रेम दाखवलं
४, ५. रूथला कोणता निर्णय घ्यायचा होता, आणि हा निर्णय घेणं इतकं कठीण का होतं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
४ रूथ आणि अर्पा या आपल्या सुनांसोबत नामी मवाबमधून इस्राएलला जाण्यास निघाली. या लांबच्या प्रवासादरम्यान अर्पानं मवाबातल्या आपल्या घरी जाण्याचं ठरवलं. पण, नामीचा मात्र आपल्या मायदेशी, इस्राएलला जाण्याचा पक्का निर्धार होता. मग, रूथनं काय करायचं ठरवलं? तिला एक अतिशय कठीण निर्णय घ्यायचा होता. एकतर ती मवाबमधील आपल्या घरी, आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा, किंवा आपली सासू नामी हिच्यासोबत बेथलेहेमला जाण्याचा निर्णय घेऊ शकत होती.—रूथ १:१-८, १४.
५ रूथचं कुटुंब मवाबात होतं. ती त्यांच्याकडे गेली असती तर त्यांनी कदाचित तिचा सांभाळ केला असता. तसंच, तिथले लोक, तिथली भाषा आणि तिथली संस्कृतीही तिला माहीत होती. बेथलेहेममध्ये यातली एकतरी गोष्टी रूथला मिळेल का, याची खात्री नामी तिला देऊ शकत नव्हती. शिवाय, तिथं गेल्यानंतर रूथला एक पती आणि एक चांगलं घर मिळेल का, याविषयीदेखील नामीच्या मनात भीती होती. त्यामुळे, नामीनं तिला परत मवाबात जाण्यास आर्जवलं. अर्पा “आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली.” (रूथ १:९-१५) पण, रूथनं मात्र अशा परिस्थितीतही आपल्या लोकांकडे आणि खोट्या देवी-देवतांकडे पुन्हा न जाण्याचा निर्णय घेतला.
६. (क) रूथनं कोणता सुज्ञ निर्णय घेतला? (ख) रूथनं यहोवाच्या पंखांखाली आश्रय घेतला आहे असं बवाजानं का म्हटलं?
६ रूथला कदाचित तिच्या पतीकडून किंवा नामीकडून यहोवाविषयी शिकायला मिळालं असेल. यहोवा मवाबातील देवतांसारखा नाही हे तिला समजलं होतं. तिचं यहोवावर प्रेम होतं आणि तो आपल्या प्रेमासाठी आणि आपल्या भक्तीसाठी पात्र आहे हेदेखील तिला माहीत होतं. त्यामुळे, रूथनं एक अतिशय सुज्ञ निर्णय घेतला. ती नामीला म्हणाली: “तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.” (रूथ १:१६) रूथच्या मनात नामीसाठी असलेल्या प्रेमाबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपलं अंतःकरण भरून येतं. पण, रूथचं यहोवाप्रती असलेलं प्रेम जास्त प्रभावित करणारं आहे. बवाजही यामुळे प्रभावित झाला. आणि यहोवाच्या पंखांखाली तिनं आश्रय घेतला म्हणून त्यानं नंतर तिची प्रशंसा केली. (रूथ २:१२ वाचा.) बवाजानं ज्या शब्दांचा वापर केला त्यावरून एका पक्षाच्या पंखांखाली आश्रय घेणाऱ्या पिल्लांचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. (स्तो. ३६:७; ९१:१-४) यहोवानंही अगदी अशाच प्रकारे रूथचं प्रेमळपणे संरक्षण केलं आणि तिच्या विश्वासाचं तिला प्रतिफळ दिलं. रूथला आपल्या निर्णयाबद्दल कधीच पस्तावा झाला नाही.
७. यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्यासाठी जे लोक कचरतात त्यांना कशामुळे मदत होऊ शकते?
७ अनेक जण यहोवाबद्दल शिकतात खरं, पण त्याच्यामध्ये आश्रय घेण्याची निवड मात्र ते करत नाहीत. आपलं जीवन यहोवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेण्यास ते कचरतात. तुम्हालाही असंच वाटत असेल, तर असं का वाटतं याचं कारण शोधण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? प्रत्येक जण कोणत्या न् कोणत्या देवाची उपासना करत असतो. (यहो. २४:१५) मग, खऱ्या देवाची उपासना करण्याचा निर्णय घेणं सुज्ञपणाचं नाही का? तुम्ही यहोवाला आपलं जीवन समर्पित करता, तेव्हा तो तुमचा नक्की सांभाळ करेल यावर आपला विश्वास असल्याचं तुम्ही दाखवत असता. तुम्हाला कोणतीही समस्या असली तरी त्याची सेवा करत राहण्यास तो तुम्हाला मदत करेल. रूथच्या बाबतीतही यहोवानं अगदी हेच केलं.
“तो परमेश्वराला धरून राहिला”
८. हिज्कीयाच्या पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात सांगा.
८ हिज्कीयाची पार्श्वभूमी रूथपेक्षा खूपच वेगळी होती. देवाला समर्पित असलेल्या राष्ट्रात त्याचा जन्म झाला होता. पण, या समर्पित राष्ट्रातील सर्वच इस्राएली लोक देवाला विश्वासू नव्हते. हिज्कीयाचा पिता, राजा आहाज हा खूप दुष्ट होता. त्यानं देवाच्या मंदिराचा अनादर केला आणि लोकांना इतर देवतांची उपासना करण्यास प्रवृत्त केलं. इतकंच नव्हे तर त्यानं आपल्या काही मुलांना खोट्या देवासमोर अर्पण म्हणून जिवंत जाळलं. हिज्कीयाचं २ राजे १६:२-४, १०-१७; २ इति. २८:१-३.
बालपण खरंच खूप भयानक होतं!—९, १०. (क) कोणत्या कारणामुळे हिज्कीया अगदी सहजपणे यहोवावर नाराज होऊ शकला असता? (ख) यहोवावर “रुष्ट” होणं चुकीचं का आहे? (ग) आपल्या पार्श्वभूमीमुळे आपण चांगले किंवा वाईट बनतो असं का म्हणता येणार नाही?
९ तसं पाहायला गेलं तर आहाजाच्या वाईट उदाहरणाचा परिणाम हिज्कीयावर व्हायला हवा होता. आणि त्यानं पाहिलेल्या वाईट गोष्टींमुळे त्याच्या मनात यहोवाविषयी राग उत्पन्न होऊन त्यानंदेखील यहोवाकडे पाठ फिरवायला हवी होती. हिज्कीयाप्रमाणे आजही काही लोकांना समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या हिज्कीयाला सहन कराव्या लागलेल्या समस्यांपेक्षा कमी असल्या, तरी त्यांना असं वाटतं की यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर “रुष्ट” होण्यासाठी हे पुरेसं कारण आहे. (नीति. १९:३) इतर काही जणांना असं वाटतं की त्यांच्या कुटुंबाच्या वाईट पार्श्वभूमीचा त्यांच्यावर परिणाम होईल आणि तेही त्यांच्या आईवडिलांनी केलेल्या चुका पुन्हा करतील. (यहे. १८:२, ३) असा विचार करणं तुम्हाला तर्कशुद्ध वाटतं का?
१० हिज्कीयाच्या जीवनावरून हे सिद्ध होतं की असा विचार करणं नक्कीच चुकीचं आहे. खरंतर, यहोवावर नाराज होण्यासाठी आपण एकही योग्य कारण पुढे करू शकत नाही. लोकांसोबत होणाऱ्या कोणत्याही वाईट गोष्टीला तो कारणीभूत नाही. (ईयो. ३४:१०) हे खरं आहे की आईवडील आपल्या मुलांना चांगल्या किंवा वाईट गोष्टी शिकवू शकतात. (नीति. २२:६; कलस्सै. ३:२१) पण, म्हणून आपण कोणत्या प्रकारची व्यक्ती बनणार हे आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर ठरत नाही. कारण, यहोवानं आपल्याला इच्छास्वातंत्र्याची देणगी दिली आहे. त्यामुळे, चांगलं करायचं की वाईट हे आपण स्वतःच ठरवू शकतो. (अनु. ३०:१९) पण, या मौल्यवान देणगीचा हिज्कीयानं कसा वापर केला?
११. हिज्कीया सर्वात चांगला राजा का बनला?
११ हिज्कीयाचा पिता यहुदाचा सर्वात वाईट राजा ठरला. पण, हिज्कीया मात्र सर्वात चांगल्या राजांपैकी एक होता. (२ राजे १८:५, ६ वाचा.) त्यानं आपल्या पित्याच्या वाईट उदाहरणाचं अनुकरण केलं नाही. याउलट, यशया, मीखा आणि होशे या यहोवाच्या संदेष्ट्यांचं त्यानं काळजीपूर्वक ऐकलं. त्यांनी दिलेला सल्ला आणि सुधारणा यांकडेही त्यानं लक्ष दिलं. त्यामुळेच, आपल्या पित्यानं निर्माण केलेल्या अनेक समस्यांना सोडवण्यास तो प्रवृत्त झाला. त्यानं देवाचं मंदिर शुद्ध केलं, लोकांच्या पापांसाठी यहोवाकडे क्षमा मागितली आणि देशात असलेल्या मूर्ती नष्ट केल्या. (२ इति. २९:१-११, १८-२४; ३१:१) नंतर, जेव्हा सन्हेरीब या अश्शूरच्या राजानं यरुशलेमवर हल्ला करण्याची धमकी दिली तेव्हा हिज्कीयानं अप्रतिम धैर्य आणि विश्वास दाखवला. यहोवा आपलं संरक्षण करेल असा भरवसा त्याला होता आणि त्यानं आपल्या लोकांचंही धैर्य वाढवलं. (२ इति. ३२:७, ८) पुढे एक वेळ अशी आली जेव्हा हिज्कीयाच्या मनात गर्व आला. पण, यहोवानं त्याची कानउघडणी केली तेव्हा त्यानं नम्रपणे ती स्वीकारली. (२ इति. ३२:२४-२६) खरंच हिज्कीयाचं उदाहरण आपल्यासाठी नक्कीच अनुकरण करण्याजोगं आहे. त्याच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळे त्यानं स्वतःचं जीवन वाया जाऊ दिलं नाही. उलट, तो यहोवाचा मित्र असल्याचं त्यानं दाखवून दिलं.
१२. हिज्कीयाप्रमाणेच अनेकांनी यहोवाचे मित्र असल्याचं कसं दाखवून दिलं आहे?
१२ आजचं जग अगदी क्रूर आणि निष्ठुर बनलं आहे. त्यात मुळीच प्रेम राहिलेलं नाही. शिवाय, कित्येक मुलं अशा कुटुंबात वाढतात जिथं त्यांना आईवडिलांकडून प्रेम मिळत नाही आणि त्यांची काळजी घेतली जात नाही. (२ तीम. ३:१-५) आज बरेच ख्रिस्ती अशाच पार्श्वभूमीतून असले, तरी त्यांनी यहोवासोबत आपली मैत्री दृढ केली आहे. हिज्कीयाप्रमाणे, तेसुद्धा हे दाखवून देतात की आपण कशा प्रकारची व्यक्ती बनणार हे त्यांच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर अवलंबून नाही. देवानं आपल्याला इच्छास्वातंत्र्याची भेट दिली आहे आणि हिज्कीयाप्रमाणे आपणही त्याची सेवा आणि त्याचा आदर करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
“पाहा मी प्रभूची दासी”
१३, १४. मरीयेची जबाबदारी इतकी कठीण का होती, आणि तरीसुद्धा तिची प्रतिक्रिया काय होती?
१३ हिज्कीयाच्या अनेक वर्षांनंतर मरीया नावाची एक नम्र तरुण स्त्री होती जिची यहोवासोबत खास मैत्री होती. शिवाय, तिला देवाकडून मिळालेली एक खास जबाबदारीदेखील पार पाडायची होती. ती म्हणजे, देवाच्या पुत्राला जन्म देऊन त्याला वाढवणं! यहोवानं मरीयेला हा जो विशेष सन्मान दिला होता, त्यावरून कळतं की त्याचं नक्कीच तिच्यावर खूप प्रेम होतं आणि भरवसादेखील होता. पण, या जबाबदारीविषयी तिला पहिल्यांदा कळलं तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती?
१४ आपण बऱ्याचदा मरीयेला जो मोठा सन्मान मिळाला होता त्याविषयी बोलत असतो. पण, तिला जेव्हा ही जबाबादारी सोपवण्यात आली तेव्हा तिच्या मनात काही चिंतादेखील होत्या, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ, गब्रीएल देवदूतानं तिला सांगितलं की ती कोणत्याही पुरुषासोबत शारीरिक संबंध न ठेवता गर्भवती होईल. पण, गब्रीएल देवदूत ही गोष्ट तिच्या कुटुंबातील सदस्यांना आणि शेजाऱ्यांनाही सांगेल असं त्यानं तिला सांगितलं नव्हतं. त्यामुळे, आपल्याविषयी इतर जण कसा विचार करतील? मी अजूनही एकनिष्ठ आहे यावर योसेफ विश्वास ठेवेल का? असे प्रश्न तिच्या मनात घोळत होते. यासोबतच, देवाच्या मुलाला एक मानव या नात्यानं वाढवण्याची भारी जबाबदारीही तिच्यावर येणार होती! मरीयेला नेमकं कोणकोणत्या गोष्टींची काळजी होती ते आपल्याला माहीत नाही. पण, जेव्हा गब्रीएलनं तिला या लूक १:२६-३८.
मोठ्या जबाबादीरविषयी सांगितलं तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती? ती त्याला म्हणाली: “पाहा मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.”—१५. मरीयेचा विश्वास अप्रतिम होता असं आपण का म्हणू शकतो?
१५ मरीयेचा विश्वास खरंच अप्रतिम होता! तिला जे काही सांगण्यात आलं होतं, ते करण्यासाठी ती अगदी एका दासीप्रमाणे तयार होती. यहोवा आपला सांभाळ करेल आणि आपल्याला सुरक्षित ठेवेल असा विश्वास तिला होता. पण, मरीयेला इतका विश्वास का होता? जन्मतःच आपल्यामध्ये विश्वास नसतो. पण, आपण तो विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी यहोवाची मदत मागितली तर आपण नक्कीच तो उत्पन्न करू शकतो. (गलती. ५:२२; इफिस. २:८) मरीयेनंसुद्धा तिचा विश्वास वाढवण्यासाठी नक्कीच खूप मेहनत घेतली असावी. आपण असं का म्हणू शकतो? यासाठी, तिचं ऐकणं कसं होतं आणि ती कशाविषयी बोलायची ते आता आपण पाहू या.
१६. मरीया ऐकण्यास तत्पर होती हे कशावरून दिसून येतं?
१६ मरीयेचं ऐकणं कसं होतं? बायबल म्हणतं की प्रत्येकानं “ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा,” असलं पाहिजे. (याको. १:१९) मरीयादेखील ऐकण्यास तत्पर होती. बायबलमध्ये सांगितलं आहे की तिला जे काही ऐकायला मिळायचं, खासकरून यहोवाबद्दल तिला जे काही शिकायला मिळायचं ते ती अगदी काळजीपूर्वकपणे ऐकायची. आणि ऐकलेल्या या महत्त्वपूर्ण गोष्टींवर ती मनन करायची. उदाहरणार्थ, जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा मेंढपाळांनी तिला देवदूतानं सांगितलेला संदेश कळवला. तसंच, नंतर जेव्हा येशू १२ वर्षांचा होता तेव्हा त्यानं असं काहीतरी सांगितलं ज्यामुळे तिला आश्चर्य वाटलं. या दोन्ही प्रसंगी मरीयेला जे सांगण्यात आलं ते तिनं ऐकलं, लक्षात ठेवलं आणि त्यावर काळजीपूर्वकपणे विचार केला.—लूक २:१६-१९, ४९, ५१ वाचा.
१७. मरीया इतरांशी जे काही बोलली त्यावरून तिच्याबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?
१७ मरीया कशाविषयी बोलायची? मरीयेनं इतरांशी काय संभाषण केलं याविषयी बायबलमध्ये फार कमी माहिती आहे. पण, तिचं सर्वात मोठं संभाषण लूक १:४६-५५ या वचनांमध्ये वाचायला मिळतं. या ठिकाणी मरीयेनं ज्या शब्दांचा वापर केला त्यात आणि शमुवेलाची आई हन्ना हिनं तिच्या प्रार्थनेत वापरलेल्या शब्दांमध्ये बरीच साम्यता दिसते. यावरून दिसून येतं की तिला इब्री शास्त्रवचनांची चांगली माहिती होती. (१ शमु. २:१-१०) मरीयेनं बोलत असताना जवळजवळ २० वेळा वचनांचा उल्लेख केल्याचं दिसतं. यावरून स्पष्टच होतं, की आपला सर्वात चांगला मित्र यहोवा याच्याकडून तिला जे काही शिकायला मिळालं, त्या सत्याबद्दल इतरांशी बोलायला तिला मनापासून आवडायचं.
१८. आपण कोणकोणत्या मार्गानं मरीयेचं अनुकरण करू शकतो?
१८ मरियेप्रमाणे आपल्यालाही कदाचित यहोवाकडून अशी एखादी जबाबदारी मिळू शकते जी पूर्ण करणं कठीण आहे असं आपल्याला वाटेल. अशा वेळी, आपण मरीयेच्या उदाहरणाचं अनुकरण करून, नम्रपणे ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि यहोवा आपल्याला मदत करेल अशी खात्री बाळगली पाहिजे. तसंच, यहोवाचं काळजीपूर्वकपणे ऐकून त्याच्याबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल आपल्याला जे शिकायला मिळतं त्यावर मनन करण्याद्वारेही आपण मरीयेच्या विश्वासाचं अनुकरण करू शकतो. आणि शिकलेल्या गोष्टी इतरांना आनंदानं सांगू शकतो.—स्तो. ७७:११, १२; लूक ८:१८; रोम. १०:१५.
१९. बायबलमध्ये दिलेल्या विश्वासाच्या अप्रतिम उदाहरणांचं अनुकरण करत असताना आपण कोणत्या गोष्टीची खात्री बाळगू शकतो?
१९ आतापर्यंत केलेल्या चर्चेवरून हे स्पष्ट होतं की रूथ, हिज्कीया आणि मरीया या सर्वांची अब्राहामाप्रमाणेच यहोवासोबत जवळची मैत्री होती. ते ‘मोठ्या साक्षीरूपी मेघाचा,’ भाग होते आणि त्यांना देवाचे मित्र बनण्याचा बहुमानही लाभला होता. तेव्हा, विश्वासाच्या बाबतीत असलेल्या या उदाहरणांचं आपण अनुकरण करत राहू या. (इब्री ६:११, १२) आपण असं केलं तर आपल्याला सदासर्वकाळापर्यंत देवाचे मित्र बनण्याचा सन्मान लाभेल!