जीवन कथा
यहोवानं मला त्याच्या सेवेत यश दिलं
युद्धात सहभाग न घेतल्यामुळे मी आधीच शिक्षा भोगली आहे, असं सांगितल्यावर मी त्या अधिकाऱ्याला म्हटलं, “आता मला पुन्हा तुरुंगात टाकण्याचा तुमचा विचार आहे की काय?” अमेरिकेच्या लष्कर सेवेत भरती होण्यासाठी मला ही दुसऱ्यांदा ऑर्डर मिळाली होती.
ओहायो इथल्या क्रुक्सविल या ठिकाणी, १९२६ साली माझा जन्म झाला. माझे आईवडील इतके धार्मिक नव्हते. पण आम्ही आठ बहीण-भावंडांनी चर्चला जावं, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मी मेथडिस्ट चर्चला जाऊ लागलो. आणि मी १४ वर्षांचा होतो, तेव्हा वर्षभर एकही रविवार न चुकवता चर्चला गेल्यामुळे तिथल्या पाळकानं मला बक्षीसही दिलं होतं.
त्या वेळी आमच्या शेजारी राहणारी मार्गारेट वॉकर नावाची एक स्त्री आमच्या घरी येऊन आईसोबत बायबलवर चर्चा करू लागली. ती एक यहोवाची साक्षीदार होती. एके दिवशी, मीही त्यांच्यासोबत चर्चेला बसायचं ठरवलं. पण माझ्यामुळे चर्चा करायला अडथळा नको म्हणून आईनं मला घराबाहेर काढलं. पण तरीही मी त्यांची चर्चा ऐकण्याचा प्रयत्न करत राहिलो. काही दिवस असंच चालत राहिलं. मग एके दिवशी मार्गारेट मला म्हणाल्या: “तुला देवाचं नाव काय आहे, माहीत आहे का?” “ते तर प्रत्येकाला माहीत आहे—देव!” असं मी म्हणालो. यावर त्या म्हणाल्या, “मग तुझं बायबल घे आणि स्तोत्र ८३:१८ मध्ये काय लिहिलंय ते बघ बरं.” मी बघीतलं. आणि देवाचं नाव यहोवा असल्याचं मला कळलं. मी लगेचच माझ्या मित्रांकडे पळत सुटलो, आणि त्यांना सांगितलं, “आज रात्री तुम्ही घरी जाल तेव्हा बायबल घेऊन स्तोत्र ८३:१८ मध्ये देवाचं नाव काय दिलंय ते बघा.” तुम्ही म्हणाल मी लगेचच साक्षकार्याला सुरवात केली की काय? पण तेच तर मी केलं!
त्यानंतर मी बायबल अभ्यास घेतला आणि १९४१ साली
माझा बाप्तिस्मा झाला. नंतर लगेचच, मंडळीचा पुस्तक अभ्यास चालवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. मी माझ्या बहीण-भावंडांना आणि आईलाही सभेला येण्यास सांगितलं. आणि मी चालवत असलेल्या पुस्तक अभ्यासाला ते येऊ लागले. पण माझ्या वडिलांना मात्र त्याच्याशी काहीच घेणं-देणं नव्हतं.घरातून विरोध
मंडळीत मला आणखी जबाबदाऱ्या मिळाल्या, आणि यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेली बरीच पुस्तकंही मी जमा केली. पण एके दिवशी, वडील त्या पुस्तकांकडे बोट दाखवत म्हणाले: “ती रद्दी बघतोयंस ना? ती ताबडतोब घराबाहेर गेली पाहिजे, त्यासोबत तूही गेलास तरी चालेल.” आणि मी घर सोडलं. मी ओहायो झेन्सविल इथं राहायला गेलो. पण माझ्या घरच्यांना प्रोत्साहन देता यावं म्हणून मी नेहमी घरी ये-जा करायचो.
पण वडील, आईला सभेला जाण्यापासून रोखू लागले. कधीकधी तर ती सभेला जायला निघायची, तेव्हा वडील तिला गाठून पुन्हा घरी घेऊन यायचे. पण ती दुसऱ्या दाराने बाहेर पळत यायची आणि सभेला निघून जायची. मी आईला म्हटलं: “काळजी करू नकोस. तुझ्या मागं पळून-पळून शेवटी त्यांनाच दमायला होईल.” आणि खरंच, नंतर वडिलांनी आईला अडवायचं सोडून दिलं. त्यामुळे आईला सभेला जाण्यास कसलाच त्रास उरला नाही.
१९४३ मध्ये, ईश्वरशासित सेवा प्रशालेची सुरवात झाल्यानंतर मी मंडळीत विद्यार्थी भाषणं देऊ लागलो. माझा भाग झाल्यानंतर प्रशालेत मिळणाऱ्या सल्ल्यामुळे मला एक चांगला वक्ता बनण्यासाठी खूप मदत झाली.
युद्धादरम्यान तटस्थ भूमिका
१९४४ साली, दुसऱ्या महायुद्धादरम्यान, मला लष्करात भरती होण्याची ऑर्डर मिळाली. मी ओहायो इथल्या कोलंबसमधील फोर्ट हेज इथं हजर झालो. त्यांनी माझी शारीरिक चाचणी घेतली आणि आवश्यक कागदपत्रंदेखील भरून घेतली. पण तिथल्या अधिकाऱ्यांना मी सैनिक भरतीत दाखल होणार नसल्याचं सांगितलं. त्यांनी मला घरी जाऊ दिलं. पण काही दिवसांतच, एक अधिकारी माझ्या घरी आला आणि म्हणाला, “कॉरविन रॉबिसन, माझ्याकडे तुझ्या नावाचा अटक वॉरंट आहे.”
याच्या दोन आठवड्यांनंतर मला कोर्टात हजर करण्यात आलं, तेव्हा न्यायाधीश म्हणाले: “जर इथं माझी इच्छा चालली असती तर मी तुला थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली असती. तुला काय म्हणायचं आहे का?” मी म्हटलं: “न्यायमूर्ती साहेब, या प्रकरणात एक पाळक म्हणून माझ्याकडे पाहिलं जावं, असं मला वाटतं. प्रत्येक घराचा उंबरठा माझ्यासाठी व्यासपीठासारखा आहे. मी कित्येक लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आहे.” यावर न्यायाधीश पंचांना म्हणाले: “ही व्यक्ती पाळक आहे की नाही हे तुम्हाला ठरवायचं नाही, तर तो सैनिक भरतीच्या वेळी दाखल झाला होता की नाही हे पाहायचं आहे.” त्यानंतर अगदी अर्ध्या तासाच्या आतच, पंचांनी मी दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायाधीशांनी मला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आणि केन्टकी इथल्या अॅशलॅन्डमधील तुरुंगात मला रवाना करण्यात आलं.
तुरुंगात यहोवानं मला सांभाळलं
ओहायो इथल्या कोलंबसमधील तुरुंगात मी दोन आठवडे होतो. तिथल्या कोठडीत पहिला दिवस कसाबसा घालवल्यानंतर मी यहोवाला प्रार्थना केली: “अशा कोठडीत पाच वर्षं जगणं मला मुश्कील होईल! देवा मी काय करू, मला खरंच कळत नाही.”
आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी शिपायानं मला बाहेर काढलं. मी उंच आणि धिप्पाड छातीच्या एका कैद्याला खिडकीत उभं राहून बाहेर पाहत असल्याचं बघीतलं. मीही त्याच्याकडे चालत गेलो आणि खिडकीतून बाहेर पाहत राहिलो. त्यानं विचारलं, “ए छोट्या, तू इथं कसा आलास रे?” मी म्हटलं, “मी एक यहोवाचा साक्षीदार आहे.” यावर तो
म्हणाला, “अच्छा! मग इथं कसं काय?” मी म्हटलं, “यहोवाचे साक्षीदार युद्धात भाग घेत नाहीत आणि लोकांना ठार मारत नाहीत.” तो म्हणाला, “कमालच आहे! तू लोकांना मारत नाहीस म्हणून तुला जेलमध्ये टाकलंय आणि बाकीच्यांनी लोकांना ठार मारलंय म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलंय. याला काही अर्थ आहे का? मी म्हटलं, “नाही. . . पण काय करायचं!”मग तो मला म्हणाला, “१५ वर्षं मी दुसऱ्या जेलमध्ये होतो. तिथं तुमची काही पुस्तकं मी वाचली आहेत.” हे ऐकल्यावर मी पटकन प्रार्थना केली, “यहोवा, कृपा करून या व्यक्तीशी माझी चांगली ओळख होऊ दे.” आणि त्याच क्षणी, पॉल नावाचा तो कैदी मला म्हणाला: “इथं कुणीही तुला नुसता हात जरी लावला ना, तर मला सांग. मग बघतो त्यांचं काय करायचं ते.” मी त्या विभागात ५० कैद्यांसोबत होतो, तरी त्यांच्यापैकी कोणाचाच मला त्रास झाला नाही.
जेव्हा अधिकाऱ्यांनी मला अॅशलॅन्डच्या जेलमध्ये हालवलं, तेव्हा तिथं आधीपासूनच असणाऱ्या काही प्रौढ बांधवांशी माझी भेट झाली. त्यांनी मला आणि इतरांना यहोवाच्या समीप राहण्यास मदत केली. ते आम्हाला आठवड्याचं बायबल वाचन नेमून द्यायचे. शिवाय आमच्या सभांसाठी आम्ही प्रश्न आणि उत्तरंदेखील तयार करायचो. या सभांना आम्ही ‘बायबल बीज्’ म्हणायचो. आम्हाला एका मोठ्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. आणि प्रत्येक भिंतीला लागून बेड टाकण्यात आले होते. आम्हाला क्षेत्र वाटून देण्याचं काम तिथला एक बांधव करायचा. तो मला म्हणायचा: “रॉबिसन, अमुक-अमुक बेडची जबाबदारी तुझी. या बेडवर जे कोणी असतील ते तुझं क्षेत्र म्हणायचं. ते तिथून जाण्याआधी तू त्यांना साक्ष दिली पाहिजेस, म्हणजे झालं.” सुव्यवस्थितपणे प्रचार करण्यासाठी आम्ही हीच पद्धत वापरायचो.
तुरुंगवास संपल्यानंतर
१९४५ ला दुसरं महायुद्ध संपलं. पण त्यानंतरही तुरुंगात काही काळ मला घालवावा लागला. माझे वडील म्हणाले होते, “तू नसलास ना, की बाकींच्यांना ठीक करायला मला वेळ लागणार नाही.” त्यामुळे मला माझ्या घरच्यांची काळजी वाटत होती. पण माझी सुटका झाली तेव्हा मला एक आश्चर्याचा धक्काच बसला. वडिलांचा विरोध असूनही माझ्या कुटुंबातले सात जण सभांना जात होते आणि माझ्या एका बहिणीचा तर बाप्तिस्मासुद्धा झाला होता!
१९५० साली जेव्हा कोरियाचं युद्ध भडकलं, तेव्हा मला पुन्हा एकदा लष्करात भरती होण्याची ऑर्डर आली. मला फोर्ट हेज इथं पुन्हा हजर राहण्यास सांगण्यात आलं. माझ्या शारीरिक क्षमता तपासल्यानंतर, तिथला अधिकारी म्हणाला, “या गटात तुला सर्वात जास्त मार्क मिळाले आहेत.” तेव्हा मी म्हणालो, “हो ते सर्व खरं आहे, पण मला लष्करात भरती व्हायचं नाही.” मग मी २ तीमथ्य २:३ चा संदर्भ घेऊन म्हटलं, “मी आधीच येशूचा शिपाई आहे.” बराच वेळ विचार केल्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, तू जाऊ शकतोस.”
त्यानंतर लगेचच मी ओहायोमधील सिनसिनाटी इथल्या अधिवेशनात बेथेल सभेसाठी उपस्थित राहिलो. बंधू मिल्टन हेन्शेल यांनी सांगितलं, की राज्याच्या कामासाठी कठीण परिश्रम करण्यास तयार असणाऱ्या बांधवांची बेथेलला गरज आहे. तेव्हा मी बेथेल सेवेसाठी अर्ज भरला आणि मला बेथेलमध्ये बोलवण्यात आलं. मी १९४५ च्या ऑगस्ट महिन्यात ब्रुकलिनमध्ये बेथेल सेवा सुरू केली आणि तेव्हापासून मी बेथेल सेवेतच आहे.
बेथेलमध्ये मी नेहमी कामात व्यस्त राहायचो. बरीच वर्षं मी प्रिंटरीमधील व ऑफिस बिल्डिंगमधील बॉयलरवर आणि मशीनवर मेकॅनिक म्हणून काम केलं. शिवाय कुलूपांच्या दुरुस्तीचं कामही मी करत होतो. यासोबतच न्यूयॉर्क इथल्या संमेलन गृहातही मला काम करण्याची संधी मिळाली.
बेथेलमध्ये होणारे आध्यात्मिक कार्यक्रम मला खूप आवडतात. जसं की, सकाळच्या उपासनेचा कार्यक्रम आणि बेथेल कुटुंबाचा टेहळणी बुरूज अभ्यास. तसंच मंडळीसोबत प्रचारकार्य करणंदेखील मला खूप आवडतं. या काही अशा गोष्टी आहेत ज्या केवळ बेथेलमध्येच नाही, तर प्रत्येक साक्षीदाराच्या कुटुंबात न चुकता झाल्या पाहिजेत, असं मला वाटतं. पालक आणि मुलं जेव्हा एकत्र मिळून दैनिक वचनाची चर्चा करतात, नियमितपणे कौटुंबिक उपासना करतात, मंडळीच्या सभांमध्ये सहभाग घेतात आणि आवेशानं प्रचारकार्य करतात तेव्हा कुटुंबातल्या सर्वांनाच यहोवाच्या जवळ जाण्यास मदत होते.
बेथेलमध्ये आणि मंडळीत माझे खूप मित्र आहेत. त्यातले काही जण अभिषिक्त होते आणि आता ते स्वर्गात आहेत. पण आपण सर्वच यहोवाचे सेवक अपरिपूर्ण आहोत. याला बेथेल कुटुंबातले सदस्यही अपवाद नाहीत. जेव्हा कोणाशी तरी माझा वाद होतो, तेव्हा मी नेहमी त्याच्याशी शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आपण वाद कसे मिटवले पाहिजेत याबद्दल मत्तय ५:२३, २४ ही वचनं मी नेहमी आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. “मला माफ कर,” असं म्हणणं सोपं नाही, पण यामुळे बरेच वाद अगदी सहजपणे मिटू शकतात.
माझ्या सेवेचं प्रतिफळ
वय झाल्यामुळे घरोघरच्या साक्षकार्यात सहभाग घेणं आता मला कठीण बनलं आहे. पण अजूनही मी हिंमत सोडलेली नाही. मी थोडीफार मॅन्डरिन चिनी भाषा शिकून घेतली आहे आणि रहदारीच्या ठिकाणी चिनी लोकांना भेटून त्यांच्याशी बोलायला मला आवडतं. कधीकधी तर एकाच दिवशी मी आस्थेवाईक लोकांना ३० ते ४० मासिकंही दिली आहेत.
सांगायचं म्हणजे, चिनमध्ये मला पुनर्भेटही करता आली. एकदा एका छान तरुण मुलीनं फळांच्या स्टँडची जाहिरात वाटताना मला स्मितहास्य दिलं. मीही तिच्याकडे पाहून हसलो आणि चिनी भाषेतलं एक टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिक तिला दिलं. तिनं ती मासिकं घेतली आणि आपलं नाव केटी असल्याचं सांगितलं. त्यानंतर जेव्हा-जेव्हा ती मला बघायची तेव्हा-तेव्हा माझ्याकडे येऊन बोलायची. मी तिला फळं आणि भाज्यांची इंग्रजी नाव शिकवायचो आणि ती माझ्यामागून ती नावं बोलण्याचा प्रयत्न करायची. मी तिला काही बायबल वचनंही समजावून सांगितली. आणि बायबल काय शिकवते, हे पुस्तकही तिनं घेतलं. पण काही आठवड्यांनंतर ती मला पुन्हा दिसली नाही.
काही महिन्यांनंतर, जाहिरात वाटणाऱ्या आणखी एका मुलीला मी काही मासिकं दिली. त्याच्या पुढच्याच आठवडी, तिनं माझ्या हातात तिचा मोबाईल फोन दिला आणि म्हणाली, “यु टॉक टू चायना.” (तू चीनशी बोल) मी तिला म्हटलं, “मला चिनमधलं कोणीही ओळखत नाही.” पण तिनं मला बोलण्याचा आग्रह केला. तेव्हा मी फोन घेतला आणि म्हटलं, “हॅलो, मी रॉबिसन बोलतोय.” तेव्हा फोनवर बोलणारी व्यक्ती म्हणाली, “रॉबी मी केटी बोलतेय. मी पुन्हा चिनमध्ये आले आहे.” मी म्हटलं, “चिनमध्ये?” “हो. रॉबी तुला जिनं फोन दिला, ती कोण आहे माहीत आहे? ती माझी बहीण आहे. तू मला खूप काही चांगल्या गोष्टी शिकवल्यास. तिलाही तू असंच शिकवशील का?” यावर मी म्हटलं, “केटी, मी नक्की तिला शिकवायचा प्रयत्न करेन. तू कुठं आहेस ते सांगितल्याबद्दल थँक्यू.” त्यानंतर, मी तिच्या बहिणीशी बोललो. पण नंतर मात्र तिच्याशी पुन्हा बोलण्याची संधी मला मिळाली नाही. या दोघी मुली आता कुठं आहेत, ते मला माहीत नाही, पण यहोवाबद्दल त्यांनी आणखी शिकावं अशी आशा मी करतो.
मी ७३ वर्षं यहोवाची सेवा केली आहे. तुरुंगात असताना तटस्थ भूमिका टिकवून ठेवण्यासाठी आणि विश्वासू राहण्यासाठी यहोवानं मला नेहमी मदत केली. याबद्दल विचार करताना मला खूप आनंद होतो. काळाच्या ओघात माझ्या आईनं आणि माझ्या सहा बहीण-भावंडांनी बाप्तिस्मा घेतला. वडिलांच्या विरोधाला तोंड देत असताना मी हार मानली नाही, आणि त्यामुळे त्यांनाही प्रोत्साहन मिळालं असं ते म्हणतात. वडिलांच्या स्वभावातही नंतर थोडा बदल झाला. आणि त्यांचा मृत्यू होण्याआधी काही सभांचादेखील त्यांनी अनुभव घेतला.
देवाची इच्छा असेल, तर माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना आणि माझ्या सोबत्यांना नवीन जगात पुन्हा जिवंत केलं जाईल. आपल्या लोकांसोबत कायमस्वरूपी यहोवाची उपासना करणं किती हर्षित करणारं असेल याचा विचार करा! *
^ परि. 32 हा लेख तयार केला जात असतानाच, कॉरविन रॉबिसन यांचा मृत्यू झाला. ते शेवटपर्यंत यहोवाला विश्वासू होते.