व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाला एकनिष्ठ असल्याचं दाखवून द्या

यहोवाला एकनिष्ठ असल्याचं दाखवून द्या

“परमेश्वर तुझ्यामाझ्यामध्ये आणि तुझ्यामाझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो.”—१ शमु. २०:४२.

गीत क्रमांक: ४३, ३१

१, २. योनाथानाची दाविदासोबत असणारी मैत्री, एकनिष्ठेचं अप्रतिम उदाहरण आहे असं का म्हणता येईल?

महाकाय पलिष्टी योद्धा गल्याथ याला ठार मारल्यानंतर, त्याचं शिर हातात घेऊन दावीद इस्राएलचा राजा शौल याच्यासमोर उभा होता. (१ शमु. १७:५७) शौलासोबत असणारा योनाथान, दाविदाचं हे असाधारण धाडस पाहून नक्कीच आश्चर्यचकित झाला असावा. यहोवाचा हात दाविदावर आहे याबद्दल त्याला मुळीच शंका नव्हती. त्या वेळेपासूनच योनाथान आणि दावीद अतिशय जिवलग मित्र बनले आणि त्यांनी एकमेकांना कायम एकनिष्ठ राहण्याचं वचन दिलं. (१ शमु. १८:१-३) त्यानंतर आयुष्यभर योनाथान दाविदाशी एकनिष्ठ राहिला.

शौलानंतर इस्राएलचा राजा म्हणून यहोवानं योनाथानाऐवजी दाविदाला निवडलं. तरीदेखील योनाथान दाविदाशी एकनिष्ठ होता. एवढंच नव्हे तर जेव्हा शौल दाविदाला मारण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा योनाथानाला दाविदाची काळजी होती. दावीद होरेशच्या अरण्यात आहे, हे योनाथानाला माहीत होतं. त्यामुळे तो दाविदाकडे गेला आणि नेहमी यहोवावर भरवसा ठेवण्याचं प्रोत्साहन त्यानं दाविदाला दिलं. त्यानं दाविदाला म्हटलं, की “भिऊ नको; माझा बाप शौल याच्या हाती तू लागावयाचा नाहीस, तू इस्राएलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार.”—१ शमु. २३:१६, १७.

३. दाविदाला एकनिष्ठ राहण्यापेक्षाही कोणती गोष्ट योनाथानासाठी जास्त महत्त्वाची होती, आणि हे आपण कसं समजू शकतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

एकनिष्ठ असणाऱ्या लोकांची आपण नेहमी प्रशंसा करतो. त्यामुळे साहजिकच योनाथानाचंही कौतुक करावंसं आपल्याला वाटतं. पण फक्त दाविदासोबत असणाऱ्या त्याच्या एकनिष्ठेसाठीच आपण त्याचं कौतुक करावं का? नाही. कारण योनाथानासाठी यहोवाला एकनिष्ठ राहणं सर्वात जास्त महत्त्वाचं होतं. खरंतर, या गोष्टीमुळेच तो दाविदाशी एकनिष्ठ होता. आपल्याऐवजी दावीद राजा बनणार आहे, हे माहीत असूनही त्यानं मनात कोणताच द्वेष बाळगला नाही. यहोवावर भरवसा ठेवण्यासही योनाथानानं त्याला मदत केली. ते दोघेही यहोवाला आणि एकमेकांना एकनिष्ठ राहिले. शिवाय, त्यांनी एकमेकांना दिलेलं हे वचनदेखील पाळलं: “परमेश्वर तुझ्यामाझ्यामध्ये आणि तुझ्यामाझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो.”—१ शमु. २०:४२.

४. (क) कोणत्या गोष्टीमुळे आपण खऱ्या अर्थानं आनंदी आणि समाधानी बनू शकतो? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आपणही आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्रांना आणि मंडळीतील आपल्या बंधुभगिनींना एकनिष्ठ असलं पाहिजे. (१ थेस्सलनी. २:१०, ११) पण या सर्वांहून महत्त्वाचं म्हणजे आपण यहोवाला एकनिष्ठ असलं पाहिजे. कारण त्यानंच तर आपल्याला जीवन दिलं आहे! (प्रकटी. ४:११) आपण जेव्हा यहोवाला एकनिष्ठ असतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं आनंदी आणि समाधानी असतो. पण यहोवाला एकनिष्ठ असल्याचं आपल्याला खरंच दाखवून द्यायचं असेल, तर आपल्यावर परीक्षा-प्रसंग येतात तेव्हाही ते दिसून आलं पाहिजे. म्हणूनच यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी योनाथानाचं उदाहरण आपल्याला कशी मदत करू शकतं यावर या लेखात आपण चर्चा करू या. जसं की, (१) जेव्हा जबाबदारीच्या पदावर असणारी व्यक्ती आपला आदर मिळवण्यास पात्र नाही, असं आपल्याला वाटतं, (२) जेव्हा कोणाला एकनिष्ठ राहायचं याबद्दल निवड करावी लागते, (३) जेव्हा पुढाकार घेणाऱ्या बांधवाच्या मनात आपल्याविषयी गैरसमज निर्माण होतो किंवा तो आपल्याशी अन्यायीपणे वागतो, आणि (४) जेव्हा एखाद्याला दिलेलं वचन पाळणं कठीण आहे असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपण काय करू शकतो यावर विचार करू या.

जबाबदारीच्या पदावर असणारी व्यक्ती आदर मिळवण्यास पात्र नाही, असं आपल्याला वाटतं तेव्हा

५. शौल, राजा असताना इस्राएल लोकांना देवाला एकनिष्ठ राहणं कठीण का होतं?

योनाथान आणि इस्राएलमधील लोक कठीण परिस्थितीत होते. योनाथानाचा पिता राजा शौल, यानं यहोवाची आज्ञा मोडली आणि म्हणून यहोवानं त्याचा त्याग केला. (१ शमु. १५:१७-२३) पण तरीसुद्धा देवानं शौलास अनेक वर्षं इस्राएलवर राज्य करू दिलं. त्यामुळे “परमेश्वराच्या सिंहासनावर” बसून राज्य करणारा राजा वाईट गोष्टी करत असताना, देवाला एकनिष्ठ राहणं इस्राएल लोकांना कठीण झालं.—१ इति. २९:२३.

६. योनाथान यहोवाला विश्वासू होता हे कशावरून दिसून येतं?

योनाथान मात्र यहोवाला एकनिष्ठ होता. शौलानं देवाची आज्ञा मोडण्यास सुरवात केली, तेव्हा त्यानं काय केलं त्याचा विचार करा. (१ शमु. १३:१३, १४) त्या वेळी, पलिष्ट्यांची मोठी सेना ३०,००० रथ घेऊन इस्राएलांशी लढण्यासाठी आली. शौलाकडे फक्त ६०० सैनिक होते, आणि केवळ त्याच्याकडे आणि योनाथानाकडेच हत्यारं होती. पण योनाथान घाबरला नाही. शमुवेल संदेष्ट्यानं सांगितलेले शब्द त्याला आठवले: “परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.” (१ शमु. १२:२२) तेव्हा योनाथान आपल्या एका सैनिकास म्हणाला: “परमेश्वर आपले कार्य करेल; परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास हरकत नाही.” तेव्हा त्यानं आणि त्या सैनिकानं पलिष्ट्यांच्या एका गटावर आक्रमण केलं आणि त्यांच्यापैकी जवळपास २० जणांचा त्यांनी वध केला. योनाथानाचा यहोवावर पूर्ण विश्वास होता, आणि यहोवानं त्याला आशीर्वादित केलं. कसं? यहोवानं एक भूकंप आणला. त्यामुळे पलिष्टी लोकांचा थरकाप उडाला. आणि ते आपसातच लढू लागले आणि एकमेकांची कत्तल करू लागले. याचा परिणाम म्हणजे इस्राएलांना युद्धात विजय मिळाला.—१ शमु. १३:५, १५, २२; १४:१, २, ६, १४, १५, २०.

७. योनाथान आपल्या पित्याशी कशा प्रकारे वागला?

पुढे शौलाचा यहोवासोबत असणारा नातेसंबंध बिघडत गेला. पण तरीदेखील जेव्हा शक्य होतं तेव्हा योनाथानानं आपल्या पित्याची आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, यहोवाच्या लोकांसाठी लढताना त्यानं आपल्या पित्याला साथ दिली.—१ शमु. ३१:१, २.

८, ९. ज्यांना अधिकार आहे त्यांच्या अधीन राहण्याद्वारे आपण यहोवाला एकनिष्ठ असतो, असं का म्हणता येईल?

आज आपण राहत असलेल्या देशातील सरकारच्या अधीन राहण्याची अपेक्षा आपल्याकडून केली जाते. तेव्हा आपणही शक्य असेल तेव्हा त्यांच्या अधीन राहून योनाथानासारखंच यहोवाला एकनिष्ठ राहू शकतो. कारण यहोवानं या ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांना’ आपल्यावर अधिकार चालवण्याची अनुमती दिली आहे, आणि आपण त्यांच्या अधीन असावं अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो. (रोमकर १३:१, २ वाचा.) म्हणूनच सरकारी अधिकारी प्रामाणिक नसतात किंवा ते आपल्या आदरास पात्र नाहीत असं आपल्याला वाटतं, तेव्हाही त्यांना मान देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. खरंतर यहोवानं ज्या लोकांना अधिकार दिला आहे, त्यांना आपण आदर दिला पाहिजे.—१ करिंथ. ११:३; इब्री १३:१७.

सत्यात नसलेल्या आपल्या विवाह सोबत्याला आदर दाखवण्याद्वारे आपण यहोवाला एकनिष्ठ राहू शकतो (परिच्छेद ९ पाहा)

दक्षिण अमेरिकेत राहणाऱ्या, ओल्गा [1] नावाच्या एका बहिणीनंही अशाच प्रकारे यहोवाला एकनिष्ठ असल्याचं दाखवलं आहे. तिच्या पतीकडून तिला वाईट वागणूक मिळायची. पण तरीदेखील आपल्या पतीशी ती आदरानं वागली. ती एक यहोवाची साक्षीदार आहे म्हणून कधीकधी तर तो तिच्याशी अतिशय निष्ठुरपणे बोलायचा तर कधीकधी तिच्याशी बोलणंदेखील टाळायचा. एकदा तर त्यानं मुलांना घेऊन तुला सोडून जाईन अशी धमकीसुद्धा तिला दिली. पण ओल्गानं मात्र “वाइटाबद्दल वाईट” अशी परतफेड केली नाही. तर एक चांगली पत्नी या नात्यानं तिला जे काही करता येईल ते करण्याचा तिनं प्रयत्न केला. त्याच्यासाठी जेवण बनवणं, त्याची कपडे धुणं, आणि त्याच्या नातेवाइकांचा पाहुणचार करणं तिनं सोडलं नाही. (रोम. १२:१७) शिवाय, शक्य असेल तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि त्याच्या जवळच्या लोकांना भेटण्यासाठी ती त्याच्यासोबत जायची. उदाहरणार्थ, जेव्हा त्याला त्याच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी दुसऱ्या शहरात जायचं होतं, तेव्हा तिनं त्यांच्या प्रवासाची सर्व तयारी केली. नंतर, अंत्यविधीच्या कार्यक्रमादरम्यान ती चर्चच्या बाहेर त्याची वाट पाहत थांबून राहिली. पुढे बऱ्याच वर्षांनंतर, ती दाखवत असलेल्या आदरामुळे आणि तिच्या सहनशीलतेमुळे, तिचा पती तिच्याशी चांगलं वागू लागला. आता तो स्वतःच तिला सभेला जाण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि तिला सभेला सोडण्यासाठीही जातो. काही वेळा तर तोही तिच्यासोबत काही सभांना उपस्थित राहिला आहे.—१ पेत्र ३:१, २.

कोणाला एकनिष्ठ राहायचं याबद्दल निवड करावी लागते तेव्हा

१०. योनाथानानं दाविदाला एकनिष्ठ राहण्याचा निर्णय का घेतला?

१० जेव्हा शौलानं, तो दाविदाला ठार मारणार असल्याचं सांगितलं, तेव्हा योनाथानाला एक कठीण निर्णय घ्यायचा होता. त्याला त्याच्या वडिलांना तर एकनिष्ठ राहायचंच होतं, पण त्यासोबत त्याला दाविदालाही एकनिष्ठ राहायचं होतं. देवाचा हात शौलावर नाही तर दाविदावर आहे, हे योनाथानाला माहीत होतं. म्हणून त्यानं दाविदाला एकनिष्ठ राहण्याचं ठरवलं. त्यानं दाविदाला लपून राहण्यास सांगितलं आणि त्याला ठार मारणं का योग्य नाही हे शौलाला समजावण्याचा प्रयत्न केला.—१ शमुवेल १९:१-६ वाचा.

११, १२. देवाप्रती असणारं प्रेम आपल्याला त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेण्यास कशी मदत करतं?

११ ऑस्ट्रेलियामधील अॅलीस नावाच्या एका बहिणीलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. तिलाही कोणाला एकनिष्ठ राहायचं हे ठरवावं लागलं. बायबल अभ्यास करत असताना, ती शिकत असलेल्या गोष्टी आपल्या कुटुंबाला सांगायची. एकदा तिनं आपण ख्रिसमस साजरा करणार नसल्याचं आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितलं आणि त्याची कारणंही तिनं स्पष्ट केली. पहिल्यांदा, तिच्या कुटुंबातील सदस्य या गोष्टीमुळे फक्त नाराज झाले, पण नंतर मात्र ते तिच्यावर खूप रागावले. अॅलीसला आपली जराही फिकीर नाही, असं त्यांना वाटलं. नंतर तिच्या आईनं, मला तिचं तोंडही पाहायचं नाही असं सांगितलं. अॅलीस म्हणते: “मला या गोष्टीमुळे खूप मोठा धक्का बसला आणि मला खूप वाईट वाटलं. कारण माझं त्यांच्यावर खरंच खूप प्रेम होतं. पण तरीसुद्धा यहोवा आणि त्याच्या पुत्राला माझ्या अंतःकरणात पहिल्या स्थानी ठेवण्याचा पक्का निर्धार मी केला. आणि त्याच्या पुढच्याच संमेलनामध्ये मी बाप्तिस्मा घेतला.”—मत्त. १०:३७.

१२ कोणत्याही खेळाच्या टिमसोबत, आपल्या शाळेसोबत, किंवा देशासोबत असणाऱ्या आपल्या एकनिष्ठेला आपण यहोवाशी असणाऱ्या आपल्या एकनिष्ठेच्या आड कधीही येऊ देता कामा नये. उदाहरणार्थ, हेन्रीला आपल्या शाळेच्या टिमसोबत बुद्धिबळ खेळायला खूप आवडायचं. शालेय स्पर्धेमध्ये आपल्या शाळेच्या वतीनं स्पर्धेत सहभाग घेऊन बुद्धिबळाची स्पर्धा जिंकावी अशी त्याची इच्छा होती. पण त्यासाठी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी त्याला सरावासाठी जावं लागत असल्यामुळे ख्रिस्ती सभांसाठी आणि प्रचारकार्यासाठी पुरेसा वेळ काढणं त्याला जमत नव्हतं. हेन्री म्हणतो, की शाळेसोबत एकनिष्ठ राहणं त्याच्यासाठी देवाला एकनिष्ठ राहण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं झालं होतं. म्हणूनच त्यानं आपल्या शाळेसाठी बुद्धिबळ खेळायचं सोडून दिलं.—मत्त. ६:३३.

१३. देवाला एकनिष्ठ राहिल्यामुळे कुटुंबातील समस्यांचा सामना करण्यास आपल्याला कशी मदत होऊ शकते?

१३ कधीकधी एकाच वेळी आपल्या कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांसोबत एकनिष्ठ राहणंदेखील कठीण होऊ शकतं. उदाहरणार्थ, केन म्हणतो: “माझ्या वृद्ध आईला वेळोवेळी जाऊन भेटावं आणि अधून-मधून तिला आपल्यासोबत घरी ठेवून घ्यावं अशी माझी इच्छा होती. पण माझ्या आईचं आणि बायकोचं म्हणावं तितकं पटत नव्हतं. आणि त्यामुळे एकाच वेळी या दोघींच्या मनासारखं वागणं मला शक्य नव्हतं.” मग बायबल याबद्दल काय सांगतं हे पाहण्याचा केननं प्रयत्न केला. आणि त्यावर विचार केल्यानंतर, आपण या परिस्थितीत पहिल्यांदा आपल्या पत्नीचा विचार केला पाहिजे आणि तिला एकनिष्ठ राहिलं पाहिजे याची जाणीव त्याला झाली. त्यामुळे यावर त्यानं असा तोडगा काढला ज्यामुळे त्याची पत्नी खूश होती. पण यासोबतच तिनं आपल्या सासूशी प्रेमानं का वागलं पाहिजे, हे त्यानं तिला समजावून सांगितलं. आणि आपल्या आईलाही, तिनं आपल्या सुनेशी आदरानं का वागलं पाहिजे ते समजावण्याचा प्रयत्न केला.—उत्पत्ति २:२४; १ करिंथकर १३:४, ५ वाचा.

एखाद्या बांधवाला आपल्याविषयी गैरसमज असतो किंवा तो आपल्याशी अन्यायीपणे वागतो तेव्हा

१४. शौल योनाथानाशी अयोग्यपणे कसा वागला?

१४ जेव्हा पुढाकार घेणारा एखादा बांधव आपल्याशी अयोग्यपणे वागतो, तेव्हादेखील आपण यहोवाशी एकनिष्ठ असलं पाहिजे. देवानं शौलाला राजा म्हणून नियुक्त केलं होतं, तरी त्यानं स्वतःच्या पुत्राला वाईट रीतीनं वागवलं. योनाथानाची दाविदाशी इतकी जिवलग मैत्री का होती हे तो समजू शकला नाही. त्यामुळे जेव्हा योनाथानानं दाविदाला मदत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शौलाला याचा खूप राग आला. आणि पुष्कळ लोकांच्यादेखत त्यानं योनाथानाला अपमानास्पद वागवलं. तरीदेखील योनाथानानं आपल्या पित्याचा आदर केला. आणि त्याच वेळी ज्याला यहोवानं आता इस्राएलचा राजा म्हणून नियुक्त केलं होतं त्या दाविदासोबत आणि यहोवासोबत तो एकनिष्ठ राहिला.—१ शमु. २०:३०-४१.

१५. जेव्हा एखादा बांधव आपल्याशी अन्यायीपणे वागतो, तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असली पाहिजे?

१५ आज आपल्या मंडळीत पुढाकार घेणारे बांधव सर्वांशीच अपक्षपातीपणे वागण्याचा प्रयत्न करतात. पण हे बांधव अपरिपूर्ण असल्यामुळे, आपण अमुक एखादी गोष्ट का केली, हे कदाचित त्यांना समजणार नाही. (१ शमु. १:१३-१७) त्यामुळे जेव्हा आपल्याबाबती कोणाचा गैरसमज होतो, किंवा आपल्याशी कोणीतरी अन्यायीपणे वागतं, तेव्हादेखील आपण यहोवाला एकनिष्ठ राहू.

एखाद्याला दिलेलं वचन पाळणं कठीण असतं तेव्हा

१६. कोणत्या परिस्थितीत आपण स्वार्थी दृष्टिकोन न बाळगता यहोवाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे?

१६ आपल्यानंतर, दाविदाऐवजी योनाथानानं राजा बनावं अशी शौलाची इच्छा होती. (१ शमु. २०:३१) पण योनाथानाचं यहोवावर प्रेम होतं आणि तो त्याच्याशी एकनिष्ठ होता. त्यामुळे राजा बनण्याची स्वार्थी इच्छा मनात बाळगण्याऐवजी योनाथानानं दाविदाशी मैत्री केली आणि त्याला दिलेलं वचन त्यानं पाळलं. खरंतर, जो कोणी यहोवावर प्रेम करतो आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहतो, तो “आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही.” (स्तो. १५:४.) कारण आपण देवाशी एकनिष्ठ असल्यामुळे, इतरांना दिलेलं वचन पाळतो. उदाहरणार्थ, आपण जर कोणासोबत व्यवसायाशी संबंधित करार केला असेल, आणि नंतर तो पाळणं आपल्याला कठीण झालं असेल तरीसुद्धा आपण नेहमी त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच जेव्हा आपल्या विवाहात काही समस्या येतात, तेव्हासुद्धा आपल्या पतीशी किंवा पत्नीशी एकनिष्ठ राहून आपण यहोवावर आपलं प्रेम असल्याचं दाखवू शकतो.—मलाखी २:१३-१६ वाचा.

यहोवाला एकनिष्ठ असल्यामुळे व्यवसायात झालेल्या करारानुसार वागण्याचा आपण प्रयत्न करू (परिच्छेद १६ पाहा)

१७. या लेखामुळे तुम्हाला कशी मदत झाली आहे?

१७ योनाथानासारखी कठीण परिस्थिती आपल्यावर आली, तरी यहोवाला एकनिष्ठ राहण्याची आपली इच्छा आहे. तेव्हा, आपल्या बंधुभगिनींमुळे आपण जरी निराश झालो, तरी त्यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा आपण नेटानं प्रयत्न करू या. आपण असं केलं तर त्यामुळे यहोवाचं मन आनंदित होईल आणि आपल्या आनंदाला सीमा उरणार नाही. (नीति. २७:११) आपल्यासाठी जे योग्य आहे ते यहोवा आपल्यासाठी करेल आणि आपली काळजी घेईल याची पूर्ण खात्री आपण बाळगू शकतो. पुढील लेखात, एकनिष्ठतेच्या बाबतीत दाविदाच्या काळातील काही चांगल्या आणि वाईट उदाहरणांतून आपल्याला काय शिकता येईल ते पाहू या.

^ [१] (परिच्छेद ९) काही नावं बदलण्यात आली आहेत.