उत्क्रांती की निर्मिती?
पाणमांजरचा फर कोट
अतिशय थंड पाण्यात राहणाऱ्या अनेक सस्तन प्राण्यांच्या त्वचेखाली चरबीचा एक जाड थर असतो. यामुळे त्यांचं शरीर गरम राहण्यास मदत होते. पण, पाणमांजरचं शरीर एका वेगळ्याच माध्यामामुळे गरम राहतं. ते माध्यम म्हणजे फरचा एक जाड कोट.
यावर विचार करा: पाणमांजरच्या शरीरावरचे केस इतर कोणत्याही सस्तन प्राण्याच्या केसांपेक्षा जास्त दाट असतात. त्याच्या शरीराच्या एक चौरस इंचावर अंदाजे दहा लाख केस असतात. (१,५५,००० एक चौरस सेंमी.) पाण्यात पोहताना पाणमांजरच्या केसांमुळे हवा शरीराच्या अगदी जवळ कोंडून राहते. ही हवा थंड पाण्याला प्राण्याच्या शरीराला लागण्यापासून अडवते. त्यामुळे या प्राण्याचं शरीर थंड पडत नाही.
वैज्ञानिकांचं मानणं आहे, की पाणमांजरच्या केसांवरून आपण खूप काही शिकू शकतो. संशोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम फर कोट बनवून बरेच प्रयोग केले आहेत. या कोटवर लावलेल्या केसांची लांबी आणि दाटी यांच्यात त्यांनी फेरबदल करून पाहिले. ते या निष्कर्षावर पोहोचले आहेत की कोटवरचे “केस जितके दाट आणि लांब असतील, तितकाच जास्त तो कोरडा राहतो किंवा जलरोधक बनतो.” दुसऱ्या शब्दांत, पाणमांजरचा फर कोट हाच खरंतर सर्वात जास्त कार्यक्षम आहे.
संशोधकांना आशा आहे, की त्यांच्या अभ्यासामुळे त्यांना तांत्रिक क्षेत्रात आणखी प्रगती करून नवीन व उत्तम प्रकारचं जलरोधक कापड तयार करण्यास मदत होईल. यामुळे, ज्यांना थंड पाण्यात पोहावं लागतं त्यांनासुद्धा पाणमांजरच्या फर कोटसारखाच केसाळ पोशाख घालावा लागेल की काय, असा विचार कदाचित काही लोक करतील.
तुम्हाला काय वाटतं? पाणमांजरचा ऊब देणारा फर कोट उत्क्रांतीमुळे आला? की त्याची रचना करण्यात आली?