मुख्य विषय | बायबल खरोखरच देवाकडून आहे का?
बायबल—प्रत्येक बाबतीत अचूक
वैज्ञानिक रीत्या अचूक
बायबल हे विज्ञानाचं पुस्तक नसलं, तरी त्यात निसर्गाबद्दल जी माहिती देण्यात आली आहे ती अगदी अचूक आहे. हवामानशास्त्र आणि जननशास्त्र या क्षेत्रांतील काही उदाहरणांचा विचार करा.
हवामानशास्त्र—पाऊस कसा तयार होतो?
बायबल म्हणतं: “तो [देव] जलबिंदू आकर्षितो; त्यांची वाफ होऊन ते पर्जन्यरूपाने पडतात; मेघ त्यांची वृष्टी करतात; ते लोकसमूहावर विपुल वर्षाव करतात.”—ईयोब ३६:२७, २८.
बायबलच्या या वचनात जलचक्राचे तीन मुख्य टप्पे सांगण्यात आले आहेत. देव, जो सौर उर्जेचा स्रोत आहे, तो (१) बाष्पीभवनद्वारे “जलबिंदू आकर्षितो.” मग, वर उचलण्यात आलेल्या बाष्पाचं (२) द्रवीकरण होऊन त्याचे ढग तयार होतात. त्यानंतर, (३) पर्जन्य होऊन ढगांतलं पाणी पाऊस किंवा इतर स्वरूपात खाली जमीनीवर पडतं. अजूनही हवामान शास्त्रज्ञांजवळ पाऊसाच्या प्रक्रियेबद्दलची सर्व बारीकसारीक माहिती नाही. आणि खरंतर बायबलमध्येही असा प्रश्न विचारण्यात आला आहे: “मेघांचा पसारा, मेघमंडपातील गडगडाट याचे ज्ञान कोणाला होईल?” (ईयोब ३६:२९) पण, निर्माणकर्त्याला मात्र जलचक्राबद्दल सर्वकाही माहीत आहे. बायबल लिहिणारे या सर्व गोष्टी अचूकपणे बायबलमध्ये लिहितील याची त्याने खात्री करून घेतली. आणि जलचक्राबद्दलच्या मूलभूत प्रक्रिया मानवांनी वैज्ञानिक रीत्या स्पष्ट करण्याच्या कितीतरी काळाआधीच देवाने हे केलं.
जननशास्त्र—मानवी गर्भाची वाढ कशी होते?
बायबल लिहिणाऱ्यांपैकी असलेल्या दावीद राजाने देवाबद्दल असं म्हटलं: “मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते.” (स्तोत्र १३९:१६) गर्भाची वाढ कशी होईल याबद्दलचे निर्देशन आधीच अस्तित्वात असलेल्या एका “वहीत” लिहिलेले असतात किंवा त्याची योजना केलेली असते, असं दावीदने एका कवितेच्या रूपात लिहिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही माहिती जवळजवळ ३,००० वर्षांआधीच लिहिण्यात आली होती!
जननशास्त्राच्या मूलभूत सिद्धांतांचा शोध १८६० च्या आसपास ऑस्ट्रेलियातल्या वनस्पतिशास्त्रज्ञ ग्रेगर मेन्डल यांनी लावला. शोधकर्त्यांनी मानवी जनुके क्रमवार पद्धतीने लावण्याचं काम अलीकडेच, म्हणजे २००३ च्या एप्रिल महिन्यात पूर्ण केलं. मानवाचं शरीर तयार होण्यासाठी लागणारी सर्व माहिती जनुकांमध्ये असते. वैज्ञानिक याची तुलना एका शब्दकोशासोबत करतात. शब्दकोशात अक्षरांची आणि त्यातून जे शब्द तयार होतात त्यांची रचना जशी संघटित रीत्या केली जाते, तसंच मानवी शरीर कसं तयार होईल याचे निर्देशन जनुकांमध्ये व्यवस्थित रीत्या दिलेले असतात. या निर्देशनांच्या आधारावर गर्भाचे वेगवेगळे भाग, जसं की मेंदू, हृदय, फुफ्फुस, आणि हात-पाय तयार होतात. हे सर्व भाग अगदी अचूक क्रमात आणि योग्य वेळेत तयार होतात. वैज्ञानिक मानवी जनुकाला “जीवनाचं पुस्तक” असं जे म्हणतात, ते अगदी योग्यच आहे. मग प्रश्न हा येतो, की बायबल लिहिणारा दावीद ही गोष्ट अगदी अचूकपणे कसं काय लिहू शकला? तो स्वतः ही गोष्ट नम्रपणे कबूल करतो, की “परमेश्वराचा आत्मा माझ्याद्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले.”—२ शमुवेल २३:२.
भविष्याबद्दल अगदी अचूकपणे सांगतं
एखाद्या साम्राज्याचं किंवा शहराचं उदय व पतन कसं होईल, कधी होईल आणि ते कितपत विस्तारित असेल हे सांगणं खूप कठीण आहे. खरंतर, ते जवळजवळ अशक्यच आहे. असं असलं, तरी बायबलमध्ये काही शक्तिशाली साम्राज्यांच्या आणि शहरांच्या विनाशाबद्दल भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या. इतकंच काय, तर विनाश कशा प्रकारे होईल याची बारीकसारीक माहितीही देण्यात आली होती. याची फक्त दोन उदाहरणं आता आपण पाहू या.
बाबेल—पतन होऊन निर्जन झालेलं शहर
प्राचीन बाबेल शहर हे बाबेलच्या शक्तिशाली साम्राज्याचं मुख्य केंद्र होतं. याचा पश्चिम आशियावर कितीतरी दशके जबरदस्त प्रभाव होता. एक वेळ अशीही होती, जेव्हा बाबेल हे जगातलं सर्वात मोठं शहर होतं. असं असलं, तरी या शहराचा नाश होईल अशी भविष्यवाणी करण्यासाठी देवाने यशया नावाच्या बायबल लेखकाला प्रेरित केलं. त्याने जवळजवळ २०० वर्षांआधीच सांगितलं, की कोरेश नावाचा राजा बाबेलवर विजय मिळवेल आणि ते शहर कायमचं ओसाड होईल. (यशया १३:१७-२०; ४४:२७, २८; ४५:१, २) पण, असं खरंच घडलं का?
इ.स.पू. ५३९ च्या ऑक्टोबर महिन्यात, थोर कोरेशने एका रात्रीत बाबेलवर विजय मिळवला. मग त्यानंतर दुर्लक्ष झाल्यामुळे बाबेलच्या सुपीक जमिनीला पाणी पुरवण्याऱ्या कालव्यांचा प्रवाह तुंबला. असं म्हटलं जातं की इ.स. २०० पर्यंत हे ठिकाण ओसाड झालं होतं. आज, बाबेलचे फक्त अवशेष राहिले आहेत. बाबेल “अगदी ओसाड होईल” अशी जी भविष्यवाणी बायबलमध्ये करण्यात आली होती, ती अचूकपणे पूर्ण झाली.—यिर्मया ५०:१३.
बायबल लेखकाला भविष्यात घडणाऱ्या गोष्टीची इतकी अचूक माहिती कशी काय होती? बायबलमध्येच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं. त्यात म्हटलं आहे की बाबेलविषयची ही भविष्यवाणी, “आमोजाचा पुत्र यशया याला दृष्टांतात प्राप्त झालेली देववाणी” होती.—यशया १३:१.
निनवे—“वैराण रानाप्रमाणे रूक्ष” झालेलं शहर
अश्शूरी साम्राज्याची राजधानी, म्हणजे निनवे शहर. या शहराची रचना अतिशय सुंदर होती आणि त्यामुळे ते खूप प्रसिद्ध होतं. या शहरात रुंद रस्ते होते, सार्वजनिक बागा होत्या, मंदिरं होती आणि मोठमोठे राजवाडेसुद्धा होते. असं असलं, तरी सफन्या नावाच्या संदेष्ट्याने भविष्यवाणी केली, की हे भव्य आणि सुंदर शहर “वैराण रानाप्रमाणे रूक्ष” होईल.—सफन्या २:१३-१५.
निनवे शहराचा खरंच पूर्णपणे नाश झाला का? हो. बाबेल आणि मादी यांच्या सैन्याने मिळून इ.स.पू. सातव्या शतकात निनवे शहराचा नाश केला. एका संदर्भानुसार, नाश करण्यात आलेल्या निनवे शहराचा “२,५०० वर्षांपर्यंत पूर्णपणे विसर पडला होता.” निनवे शहर खरोखर अस्तित्वात होतं की नाही, अशी शंकाही काही काळासाठी लोकांना होती. पण, १९ व्या शतकाच्या मध्यात पुरातत्त्व शास्त्रज्ञांना उत्खननामध्ये निनवे शहराचे अवशेष सापडले. आज हे ठिकाण कुजत चाललं आहे आणि त्याची नासाडी होत आहे. यामुळे ग्लोबल हेरिटेज फंड या संस्थेनं अशी चिंता व्यक्त केली आहे, की “निनवे शहराचे प्राचीन अवशेष पुन्हा नाहीसे होण्याची शक्यता आहे.”
मग सफन्याला याबद्दलची माहिती आधीच कशी मिळाली? तो कबूल करतो, की त्याला “परमेश्वराचे वचन प्राप्त झाले.”—सफन्या १:१.
बायबल जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं देतं
जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची समाधानकारक उत्तरं, बायबलमध्ये दिली आहेत. याची काही उदाहरणं पुढे देण्यात आली आहेत.
आज जगात इतकं दुःख आणि दुष्टता का आहे?
बायबलमध्ये दुष्टता आणि दुःख यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बायबल म्हणतं:
-
“एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.”—उपदेशक ८:९.
मानवी राज्य असमर्थ आणि भ्रष्ट असल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर दुःख आणि त्रास सहन करावा लागतो.
-
“समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” —उपदेशक ९:११, पं.र.भा.
अचानक घडणाऱ्या घटना, जसं की गंभीर आजार, अपघात किंवा विपत्ती यांचा कोणालाही, कधीही, आणि कुठेही सामना करावा लागू शकतो.
-
“एका माणसाद्वारे पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले.”—रोमकर ५:१२.
पहिल्या स्त्री आणि पुरुषाला जेव्हा बनवण्यात आलं होतं, तेव्हा ते परिपूर्ण होते. म्हणजे ते कधीही आजारी पडणार नव्हते आणि मरणार नव्हते. पण, जेव्हा त्यांनी जाणूनबुजून त्यांच्या निर्माणकर्त्याची आज्ञा मोडली तेव्हा “पाप जगात आले.” म्हणजेच ते अपरिपूर्ण झाले आणि त्यामुळे मरण आलं.
पण, बायबल फक्त इतकंच सांगत नाही की लोकांना दुःख आणि त्रास का सहन करावा लागतो. तर, त्यात हेसुद्धा सांगितलं आहे, की यहोवा * देव सर्व दुष्टता काढून टाकेल आणि तो लोकांच्या “डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल.”—प्रकटीकरण २१:३, ४.
आपण मरतो तेव्हा आपलं काय होतं?
मृत्यू एक अशी स्थिती आहे, ज्यात आपल्याला काहीच शुद्ध नसते आणि आपण कोणतीही क्रिया करू शकत नाही. उपदेशक ९:५ या बायबलमधल्या वचनात म्हटलं आहे, की “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही.” मृत्यू झाल्यावर आपल्या सर्व “योजनांचा शेवट होतो.” (स्तोत्र १४६:४) म्हणूनच जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा आपल्या मेंदूची सर्व कार्य बंद होतात. आपले ज्ञानेंद्रियंही काम करायचे थांबतात. यामुळे, मृत्यूनंतर आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला कसलीच जाणीव होत नाही किंवा आपण कोणता विचारही करू शकत नाही.
पण, बायबलमध्ये फक्त मृत लोकांच्या स्थितीबद्दलच नाही, तर त्यात एका चांगल्या आशेबद्दलही सांगितलेलं आहे. मृत लोकांचं पुनरुत्थान होईल असं त्यात म्हटलं आहे. म्हणजे, त्यांना पुन्हा जिवंत केलं जाईल आणि ते मृत्यूच्या गाढ झोपेतून उठतील.—होशेय १३:१४; योहान ११:११-१४.
जीवनाचा उद्देश काय आहे?
बायबल म्हणतं की यहोवा देवाने पुरुष आणि स्त्रीची निर्मिती केली. (उत्पत्ति १:२७) म्हणूनच पहिला पुरुष आदाम याला “देवाचा पुत्र,” असं म्हटलं आहे. (लूक ३:३८) मानवाला एका उद्देशाने बनवण्यात आलं होतं. तो उद्देश म्हणजे, या पृथ्वीवर सदासर्वकाळ एक अर्थपूर्ण, आनंदी आणि समाधानी जीवन जगणं आणि आपल्या स्वर्गीय पित्यासोबत मैत्रिपूर्ण नातेसंबंध जोडणं. त्या अर्थी, प्रत्येक मानवात आध्यात्मिक गरज असते आणि म्हणून देवाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असणं हे स्वाभाविक आहे. यामुळेच बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात ते सुखी आहेत, कारण स्वर्गाचं राज्य अशाच लोकांचं आहे.”—मत्तय ५:३.
बायबल पुढे असं म्हणतं: “जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!” (लूक ११:२८) बायबल फक्त देवाविषयी शिकवत नाही, तर ते आपल्याला आनंदाने जीवन जगण्यासाठी मदतही करतं. तसंच, आपल्याला भविष्यासाठी चांगली आशाही देतं.
बायबलच्या लेखकाशी नातं जोडणं
पुराव्यांचं परीक्षण केल्यानंतर लाखो लोक या निष्कर्षावर पोहोचले आहेत, की बायबल हे निव्वळ एक प्राचीन ग्रंथ नाही तर ते देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेलं आहे. ते त्याचं वचन आहे आणि त्याद्वारे तो सर्व मानवांशी संवाद साधतो. त्यात तुमचाही समावेश होतो. बायबलद्वारे तो तुम्हाला त्याची ओळख करून घेण्याचं आणि त्याचे मित्र बनण्याचं आमंत्रण देतो. बायबलमध्ये असं वचन दिलं आहे: “देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.”—याकोब ४:८.
बायबलचं परीक्षण करणं हा एक खूप रोमांचक अनुभव आहे. असं का म्हणता येईल? कारण ज्या प्रकारे एखादं पुस्तक वाचल्याने त्याच्या लेखकाच्या विचारसरणीची तुम्हाला झलक मिळते, अगदी त्याच प्रकारे बायबल वाचल्यामुळे आपण त्याच्या लेखकाचे, म्हणजेच देवाचे विचार आणि त्याच्या भावना समजू शकतो. असं केल्यामुळे तुम्हाला काय फायदा होईल, याचा जरा विचार करा. तुम्ही तुमच्या निर्माणकर्त्याच्या भावना समजू शकता! तसंच, बायबलमध्ये आपल्याला पुढील गोष्टीही वाचायला मिळतात:
-
देवाचं नाव, त्याचा स्वभाव आणि त्याचे अद्भुत गुण.
-
मानवांसाठी देवाचा उद्देश.
-
देवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे.
तुम्हाला याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल का? यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल. तुमच्यासाठी ते एका मोफत बायबल अभ्यासाची व्यवस्था करू शकतात. यामुळे तुम्ही बायबलचा लेखक यहोवा देव, याच्यासोबत एक जवळचा नातेसंबंध जोडू शकाल.
बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं पुस्तक आहे, हे सिद्ध करणाऱ्या फक्त काही पुराव्यांवर आपण या लेखात चर्चा केली. आणखी माहितीसाठी बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातलं अध्याय २ पाहा. हे पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं आहे. ते www.pr418.com/mr या वेबसाईटवर उपलब्ध आहे. किंवा तुम्ही हा कोड स्कॅन करू शकता.
www.pr418.com/mr या वेबसाईटवर उपलब्ध असलेला बायबलचा लेखक कोण आहे? हा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता.
^ परि. 31 बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं दिलं आहे.