मुख्य विषय | बायबल खरोखरच देवाकडून आहे का?
बायबल—खरोखरच “देवाच्या प्रेरणेने लिहिलेले” आहे का?
बायबल हे देवाकडून आलेलं पुस्तक आहे, असं तुम्ही मानता का? की त्यात माणसांचे विचार आहेत, असं तुम्हाला वाटतं?
स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणाऱ्या बऱ्याच लोकांमध्येसुद्धा याविषयावर सतत वादविवाद होत असतो. उदाहरणार्थ, २०१४ साली अमेरिकेत एक सर्वे घेण्यात आला. त्यामध्ये अनेक नामधारी ख्रिश्चनांना बायबलविषयी असलेलं त्यांचं मत विचारण्यात आलं. “बायबलचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे देवाशी संबंध आहे,” या गोष्टीशी बरेच लोक सहमत होते. दुसरीकडे पाहता २० टक्के लोक बायबलला “प्राचीन दंतकथेचं, इतिहास सांगणारं आणि मानवांच्या विचारांनी लिहिलेलं नीती नियमांचं” पुस्तक असल्याचं मानतात. लोकांच्या या वेगवेगळ्या मतांमुळे एक प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे, बायबल “देवाच्या प्रेरणेने लिहिलेले” आहे असं त्याबद्दल जे म्हटलं आहे, त्याचा नेमका अर्थ काय होतो?—२ तीमथ्य ३:१६.
“देवाच्या प्रेरणेने लिहिलेले”—याचा अर्थ काय होतो?
बायबल हे ६६ लहान पुस्तकांनी मिळून बनलेलं आहे. ४० लेखकांनी जवळजवळ १,६०० वर्षांच्या काळादरम्यान ते लिहिलं. पण बायबल जर मानवांनी लिहिलेलं आहे, तर ते “देवाच्या प्रेरणेने लिहिलेले” आहे असं कशावरून म्हणता येईल? सोप्या शब्दांत “देवाच्या प्रेरणेने लिहिलेले” या शब्दांचा अर्थ असा होतो, की त्यातली माहिती पुरवणारा किंवा तिचा स्रोत देव आहे. बायबलमध्ये याविषयी असं म्हटलं आहे: “माणसे देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने बोलली.” (२ पेत्र १:२१) दुसऱ्या शब्दांत, देवाने त्याच्या अदृश्य कार्यकारी शक्तीचा, म्हणजे त्याच्या पवित्र आत्म्याचा वापर करून बायबल लिहिणाऱ्यांपर्यंत त्याचा संदेश पोहोचवला. हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. एक बिझनेसमॅन आपल्या सेक्रेटरीला एक पत्र लिहिण्यास सांगतो. तो आपल्या सेक्रेटरीला पत्राचा मजकूर तोंडी सांगतो आणि सेक्रेटरी तो लिहून काढतो. मग हे पत्र कोणाचं ठरेल? सेक्रेटरीचं की बिझनेसमॅनचं? नक्कीच बिझनेसमॅनचं.
बायबलचं लिखाण करणाऱ्या काही लेखकांना देवाने स्वर्गदूताद्वारे संदेश सांगितला. इतर काहींना देवाने दृष्टान्त दाखवले. तर काही वेळा, देवाने त्याचा संदेश स्वप्नांद्वारे लेखकांपर्यंत पोहोचवला. काही प्रसंगी देवाने लेखकांना स्वतःच्या शब्दांत त्याचा संदेश लिहिण्याची अनुमती दिली. तर इतर वेळी, काय लिहायचं आहे ते त्याने शब्द न् शब्द लेखकांना सांगितलं. पण, या सर्व प्रसंगांमध्ये मानवांनी स्वतःचे नाही तर देवाचेच विचार लिहिले.
बायबल लिहिणाऱ्यांना देवानेच प्रेरणा दिली होती, ही गोष्ट आपण खात्रीने का म्हणू शकतो? आता आपण अशा तीन पुराव्यांवर चर्चा करणार आहोत, ज्यांवरून बायबल हे देवाकडून आलेलं पुस्तक आहे या गोष्टीवर भरवसा ठेवण्यासाठी आपल्याला मदत होईल.