पालकांसाठी
८: उदाहरण
याचा काय अर्थ होतो?
पालक मुलांना जे शिकवतात त्यानुसार त्यांनी स्वतःदेखील वागणं गरजेचं आहे. अशा प्रकारे ते मुलांसमोर एक चांगलं उदाहरण मांडतात. उदाहरणार्थ, घरी आलेल्या व्यक्तीला टाळण्यासाठी “सांग, मी घरी नाहीये” असं तुम्ही बोललात आणि जर तुमच्या मुलाने हे ऐकलं, तर तो नेहमी खरं बोलेल अशी अपेक्षा तुम्ही करू शकता का?
“जर पालक आपल्या बोलण्यानुसार वागत नसतील, तर मुलांनी आपलं ऐकावं अशी अपेक्षा ते करू शकत नाही. मुलं स्पंजसारखी असतात. आपण जे बोलतो, जे करतो ते सर्व ते शोषून घेतात. आपण त्यांना शिकवत असलेली गोष्ट जर आपण स्वतः करत नसलो तर ते त्याबद्दल पटकन सांगतात.”—डेवीड.
बायबल तत्त्व: “‘चोरी करू नका,’ असे सांगणारा तू स्वतः चोरी का करतोस?”—रोमकर २:२१.
हे का महत्त्वाचं?
मुलांवर आणि तरुणांवर त्यांच्या सोबत्यांचा नाही तर पालकांचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. म्हणून मुलांना योग्य मार्गदर्शन देण्याची जबाबदारी मुख्यतः तुमच्यावर आहे. पण यासाठी तुम्ही आपल्या बोलण्यानुसार वागणं गरजेचं आहे.
“आपण एकच गोष्ट शंभरदा सांगू पण आपलं मूल ते ऐकतंय की नाही हा प्रश्न आपल्याला पडतो. पण एकदा जरी आपण स्वतःच्या बोलण्यानुसार वागलो नाही, तर ती गोष्ट ते लगेच आपल्याला दाखवून देईल. आपल्याला जरी वाटत असलं की मुलांचं आपल्याकडे लक्ष नाही, तरी आपल्या वागण्या-बोलण्यावर त्यांचं बारीक लक्ष असतं.”—निकोल.
बायबल तत्त्व: “वरून येणारी बुद्धी ही . . . निष्कपट असते.”—याकोब ३:१७.
तुम्ही काय करू शकता?
स्वतःच्या स्तरांचं परीक्षण करा. तुम्ही कोणत्या प्रकारचं मनोरंजन पाहता? तुम्ही तुमच्या विवाहसोबत्याशी आणि मुलांशी कसं वागता? तुमचे मित्र कोण आहेत? तुम्ही इतरांचा विचार करता का? थोडक्यात सांगायचं तर, आपली मुलं जशी बनावीत अशी तुमची इच्छा आहे तसे तुम्ही स्वतः आहात का?
“ज्या गोष्टी मी आणि माझे पती स्वतः करत नाही, त्या गोष्टी करण्याची अपेक्षा आम्ही आमच्या मुलांकडूनही करत नाही.”—क्रिस्टीना.
माफी मागा. तुम्ही परिपूर्ण नाही हे तुमच्या मुलांना माहीत आहे. चूक झाल्यावर तुमच्या विवाहसोबत्याला किंवा मुलांना “सॉरी” किंवा “मला माफ कर” असं बोलायला कचरू नका. असं करण्याद्वारे तुम्ही मुलांना प्रामाणिकपणाचा आणि नम्रतेचा मौल्यवान धडा शिकवता.
“आपण मुलांसमोर आपली चूक कबूल केली पाहिजे आणि आपल्या चुकीबद्दल सॉरी बोललं पाहिजे. आपण असं केलं नाही तर मुलं स्वतःच्या चुका लपवायला शिकतील.”—रॉबीन.
“पालक या नात्याने मुलांवर सर्वात जास्त आपला प्रभाव असतो. ते नेहमी आपल्याला पाहत असल्यामुळे आपलं उदाहरण हे त्यांना शिकवण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. पालक आपल्या वागण्या-बोलण्यातून सतत आपल्या मुलांना शिकवत असतात.”—विलसन.