शोक करणाऱ्यांसाठी मदत
कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत?
काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की शोक करणाऱ्यांसोबत एका नंतर एक काही विशिष्ट गोष्टी घडतात. पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असल्यामुळे सर्वांची शोक करण्याची पद्धत सारखी नसते. पण यामुळे आपण असा निष्कर्ष काढू शकत नाही, की काही लोकांना कमी दुःख होतं किंवा ते आपल्या भावना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. दुःख व्यक्त केल्यामुळे जरी बरं वाटत असलं तरी शोक करण्याचा कोणताही एकमेव असा “योग्य मार्ग” नाही. बऱ्याच गोष्टी एका व्यक्तीची संस्कृती, व्यक्तिमत्त्व, तिच्या जीवनातले अनुभव आणि तिच्या जवळच्या व्यक्तीला तिने कसं गमावलं यांवर अवलंबून असू शकतात.
परिस्थिती किती वाईट होऊ शकते?
प्रिय व्यक्तीला गमावल्यावर आपल्याला कोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागेल याची शोक करणाऱ्या व्यक्तीला कदाचित जाणीव नसते. पण काही भावना आणि समस्या अशा असतात ज्या अपेक्षित आणि सामान्य असतात. पुढे अशा काहींबद्दल सांगण्यात आलं आहे:
दुःखात पार बुडून गेल्यासारखं वाटणं. अशा वेळी रडू येणं, मृत्यू झालेल्या व्यक्तीची आठवण येणं, अचानक भावना बदलणं या सर्व गोष्टी घडू शकतात. जुन्या आठवणींमुळे किंवा स्वप्नांमुळे दुःख आणखी वाढू शकतं. सुरुवातीला अशा परिस्थितीत एका व्यक्तीला कदाचित धक्काच बसलेला असतो आणि घडलेली गोष्ट तिला खरीच वाटत नाही. टिनाने आपल्या पतीला, टेरीला अचानक गमावलं. त्याबद्दल ती सांगते की “सुरुवातीला मी अगदी बधीर झाले होते. मला रडूच फुटलं नाही. कधीकधी मला एवढी बेचैनी व्हायची की मला श्वास घ्यायलासुद्धा कठीण जायचं. जे घडलं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता.”
अधूनमधून नैराश्य, राग, आणि दोषीपणाची भावना येणंही सामान्य आहे. इवान म्हणतो: “आमचा मुलगा एरीक २४ वर्षांचा असताना आम्हाला सोडून गेला. त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांपर्यंत, मला आणि युनीसला खूप राग आला! आणि याचं आम्हाला आश्चर्य वाटलं कारण आमचा असा रागीट स्वभाव कधीच नव्हता. त्यासोबतच आमच्यात दोषीपणाची भावनाही यायची. वाटायचं की आमच्या मुलाला वाचवण्यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करायला हवे होते.” ॲलनची पत्नी दीर्घकाळाच्या आजारपणानंतर वारली. त्यानेसुद्धा दोषीपणाची भावना अनुभवली. तो म्हणतो: “सुरुवातीला मला वाटलं की जर देव मला इतकं दुःख पाहू देत आहे, तर मी नक्कीच एक वाईट व्यक्ती असेन. मग जे घडलं त्यासाठी मी देवाला दोष देऊ लागलो आणि या विचारामुळेसुद्धा मला दोषी वाटत होतं.” आधीच्या लेखात उल्लेख केलेला केवीन म्हणतो: “कधीकधी तर मला साराचासुद्धा राग यायचा. ती का मला अशी सोडून गेली. नंतर अशा वागण्याबद्दल मलाच वाईट वाटायचं, कारण तिची यात काहीच चूक नव्हती.”
मनात त्रासदायक विचारांचं वादळ उठणं. काही वेळा असंही होऊ शकतं की एखाद्याच्या मनात असे विचार येऊ शकतात ज्याला काहीच अर्थ नाही. जसं की, शोक करणारी व्यक्ती कदाचित म्हणेल की तिला मृत व्यक्ती दिसते, तिचा आवाज ऐकू येतो किंवा तिच्या असण्याचा भास होतो. तसंच, शोक करणाऱ्या व्यक्तीला लक्ष केंद्रित करायला किंवा काही गोष्टी लक्षात ठेवायलाही कदाचित कठीण जाऊ शकतं. टिना म्हणते: “कधीकधी तर असं व्हायचं की समोरची व्यक्ती माझ्याशी बोलतेय, पण माझं तिच्या बोलण्याकडे लक्षच नसायचं. टेरीचा मृत्यू झाला तेव्हा ज्या काही गोष्टी घडल्या त्या सर्व सारख्या माझ्या डोळ्यांसमोर यायच्या. माझं कशातच लक्ष लागत नव्हतं आणि त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा.”
एकटं राहावंसं वाटणं. शोक करणाऱ्या व्यक्तीला कदाचित इतरांसोबत वेळ घालवायला आवडणार नाही किंवा तिला एकटं राहावंसं वाटेल. केवीन म्हणतो: “मी जेव्हा इतर जोडप्यांसोबत असायचो, तेव्हा मी इथे का आहे असा मला प्रश्न पडायचा. आणि जेव्हा मी अविवाहित लोकांसोबत वेळ घालवायचो तेव्हाही मी त्यांच्यात मिसळायचो नाही.” इवानची पत्नी युनीस म्हणते: “त्या वेळी आजूबाजूचे लोक जेव्हा काही गोष्टींबद्दल कुरकुर करायचे तेव्हा वाटायचं हे किती शुल्लक गोष्टींबद्दल नाराज आहेत, यांना आमच्यासारखं तर काही सोसावं लागलेलं नाही! अशा लोकांसोबत वेळ घालवायला आम्हाला कठीण जायचं. मग असेही काही लोक होते जे आपल्या मुलांचं कौतुक करत त्यांच्याबद्दल काहीतरी सांगायचे. मला त्यांच्याबद्दल आनंद व्हायचा, पण त्याच वेळी मला ते सर्व ऐकायला नकोसं वाटायचं. माझ्या पतीला आणि मला कळलं, की जीवनप्रवास चालूच राहतो. पण आमच्यात जगण्याची इच्छा उरली नव्हती आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमच्याकडे धीरही नव्हता.”
शारीरिक समस्या उद्भवणं. अशा परिस्थितीत खाणं-पिणं, झोप किंवा वजन कमी-जास्त होणं सामान्य आहे. एरनचे वडील ज्या वर्षी वारले त्याच्या नंतरच्या अनुभवाबद्दल तो म्हणतो: “मला झोपच यायची नाही. मला रोज रात्री त्याच वेळेला जाग यायची. मी बाबांच्या मृत्यूबद्दल विचार करत राहायचो.”
ॲलनलाही काही शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला. पण त्याला कळत नव्हतं की त्याला नेमकं काय झालं आहे. तो म्हणतो: “बऱ्याच वेळा मी डॉक्टरलाही दाखवलं. पण ते म्हणायचे मला काहीच झालेलं नाही. मग मला कळलं की कदाचित दुःखामुळे माझ्या शरीरावर असे परिणाम होत आहेत.” नंतर तो त्रास हळूहळू कमी झाला. पण ॲलनने डॉक्टरकडे जाऊन योग्यच केलं. दुःखात असल्यामुळे आपली रोगप्रतिरोधक क्षमता मंदावू शकते, एखादा आजार असेल तर तो वाढू शकतो किंवा आपल्याला एखादा नवीन आजार लागू शकतो.
महत्त्वाची कामं करायला कठीण जाणं. इवान म्हणतो: “एरीकच्या मृत्यूची बातमी आम्हाला नातेवाइकांना आणि मित्रांनाच नाही, तर इतरांनाही कळवायची होती. म्हणजे, एरीकच्या बॉसला आणि त्याच्या घरमालकालाही त्याच्याबद्दल सांगायचं होतं. तसंच बरीचशी महत्त्वाची कागदपत्रंही आम्हाला भरायची होती. मग आम्हाला एरीकच्या वस्तूही एकएक करून पाहायच्या होत्या. या सर्व गोष्टींसाठी मन स्थिर असणं खूप गरजेचं होतं. पण आम्ही मानसिक, शारीरिक आणि भावनिक रीत्या पार खचून गेलो होतो.”
काही लोकांसाठी खरी समस्या तेव्हा येते जेव्हा त्यांना घरातली किंवा बाहेरची काही कामं पाहावी लागतात. याआधी कदाचित ती कामं त्यांचे प्रिय जण हाताळत असतील. टिनाला हाच अनुभव आला. ती म्हणते: “बिझनेस आणि बँकेची कामं नेहमी टेरीच पाहायचे. आता ही कामं माझ्यावर पडली आहेत. यामुळे माझा तणाव आणखी वाढला आहे. वाटतं की ही सर्व कामं मला जमतील का?”
वर दिलेल्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांमुळे कदाचित आपल्याला वाटू शकतं की आपण या दुःखातून कधीच सावरू शकत नाही. हे खरं आहे, की आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्यामुळे शब्दात मांडता येणार नाही एवढं दुःख आपल्याला होतं. पण अशा वेळी काय-काय होऊ शकतं हे जर कदाचित शोक करणाऱ्या व्यक्तीला आधीच माहीत असेल, तर दुःखातून सावरायला तिला मदत मिळू शकते. पण हे लक्षात असू द्या, की अपेक्षित असलेल्या दुःखाच्या सर्वच परिणामांना प्रत्येकाला सामोरं जावं लागत नाही. शोक करणाऱ्याला हे जाणूनसुद्धा काही अंशी सांत्वन मिळू शकतं की दुःखाच्या प्रसंगी अशा तीव्र भावना अनुभवणं स्वाभाविक आहे.
मी आयुष्यात पुन्हा कधी आनंदी होईन का?
काय-काय घडण्याची शक्यता आहे? वेळेसोबत आपल्या मनावरचे घाव भरत जातात. पण याचा अर्थ एखादी व्यक्ती पूर्णपणे “सावरली” आहे किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला विसरली आहे असा होत नाही. हळूहळू आपल्या मनातल्या वेदना कमी होत जातात. पण लग्नाचा वाढदिवस किंवा मृत्यूदिन असतो तेव्हा त्या व्यक्तीची खूप आठवण येऊ शकते आणि भावना उफाळून येऊ शकतात. पण काही काळानंतर बरेच लोक सावरतात आणि रोजची कामं करणं त्यांना शक्य होतं. खासकरून कुटुंबातल्या सदस्यांकडून किंवा मित्रांकडून जेव्हा दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत मिळते किंवा ती स्वतः काही व्यावहारिक पावलं उचलते तेव्हा ती दुःखातून सावरू शकते.
सावरायला किती वेळ लागेल? काहींना दुःखातून सावरायला काही महिने लागू शकतात, तर काही जणांना एक किंवा दोन वर्षं. आणि काही लोकांना तर याहीपेक्षा जास्त काळ लागू शकतो. a ॲलन म्हणतो की “मला सावरायला जवळपास तीन वर्षं लागली.”
धीर धरा. उद्याची चिंता करू नका. झेपेल तितकंच काम करा आणि हे लक्षात असू द्या की दुःखाची सावट कायम राहणार नाही. पण असं असलं तरी दुःख हलकं करण्यासाठी तुम्ही आता कोणती पावलं उचलू शकता आणि दीर्घकाळापर्यंत दुःखी राहण्याचं कसं टाळू शकता?
शोक करताना तीव्र भावना अनुभवणं स्वाभाविक आहे
a फार कमी लोकांना बराच काळ राहणाऱ्या आणि तीव्र स्वरूपाच्या दुःखाचा सामना करावा लागतो. अशा प्रकारच्या दुःखाला ‘दीर्घकालीन’ दुःख असंही म्हणतात. अशांना कदाचित मानसिक उपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागू शकते.