प्रिय व्यक्तीला कायमचं गमावतो तेव्हा . . .
तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीला मृत्यूत गमावलं असेल तर तुमच्या मनातही वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आल्या असतील. जसं की दुःख, एकटेपणा आणि अगदी असाहाय्य वाटणं. तसंच तुम्ही राग, दोषीपणा आणि भीती या भावनाही अनुभवल्या असतील. जगण्यात काही अर्थ आहे का असाही विचार तुमच्या मनात आला असेल.
दुःख व्यक्त करणं म्हणजे तुम्ही कमजोर आहात असा याचा अर्थ होत नाही. उलट यावरून समजतं की तुमचं तुमच्या प्रिय व्यक्तीवर किती प्रेम होतं. असं असलं तरी या दुःखातून सावरायला आपल्याला काही प्रमाणात मदत मिळू शकते का?
काहींना सावरायला कशामुळे मदत झाली
आपलं दुःख कदाचित कधीही संपणार नाही, पण खाली दिलेल्या सल्ल्यांमुळे तुम्हाला सांत्वन मिळू शकतं.
दुःख व्यक्त करण्यासाठी हवा तितका वेळ घ्या
प्रत्येक व्यक्ती सारख्याच पद्धतीने दुःख व्यक्त करते आणि सारखाच वेळ घेते असं नाही. तरीसुद्धा रडल्यामुळे आपल्याला दुःखातून सावरण्यासाठी मदत होऊ शकते. आधी उल्लेख करण्यात आलेली वनेसा म्हणते: “मला फक्त रडावसं वाटायचं. मला कसंही करून माझं मन हलकं करायचं होतं.” सोफियाची बहीण अचानक वारली. ती म्हणते: “जे काही झालं त्याबद्दल विचार केल्याने खूपच त्रास व्हायचा. जखमेवरची पट्टी काढून तिला साफ केल्याने जसा त्रास होतो, तसा त्रास मला व्हायचा. दुःख तर माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं, पण जे झालं त्यावर विचार केल्यामुळे मला दुःखातून सावरायला मदत झाली.”
तुमच्या भावना कोणालातरी सांगा
काही वेळा तुम्हाला एकटं रहावंसं वाटेल हे समजण्यासारखं आहे. पण दुःखाचं ओझं एकट्याने वाहणं खरंच खूप कठीण असतं. १७
वर्षांच्या जॅरेडने आपल्या वडिलांना मृत्यूत गमावलं. त्या वेळेबद्दल तो आठवून म्हणतो: “मी माझ्या भावना इतरांना सांगायचो. मला माझ्या भावना कदाचित व्यवस्थित मांडता आल्या नसल्या तरी असं केल्याने मला खूप बरं वाटायचं.” आधीच्या लेखात उल्लेख केलेली जॅनिस म्हणते: “इतरांशी बोलल्याने खरंच खूप दिलासा मिळतो. मला जाणीव झाली की दुसरे मला समजून घेतात आणि त्यामुळे माझा एकटेपणा काही प्रमाणात दूर झाला.”मदत स्वीकारा
एक डॉक्टर असं म्हणतात: “पीडित व्यक्तीने जर [दुःखाच्या धक्क्यातून] सावरण्यासाठी सुरुवातीलाच तिच्या मित्रांची आणि नातेवाइकांची मदत स्वीकारली, तर त्या संपूर्ण काळात ज्या वेगवेगळ्या भावनांचा तिला सामना करावा लागतो त्यातून निभावण्यासाठी तिला सोपं जाईल.” तेव्हा, तुम्हाला कशा प्रकारची मदत हवी आहे ते तुमच्या मित्रांना सांगा. कारण त्यांना तुम्हाला मदत करायची इच्छा असेल पण ती कशी करायची हे कदाचित त्यांना माहीत नसेल.—नीतिसूत्रे १७:१७.
देवासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध जोडा
टीना म्हणते: “माझ्या पतीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. माझ्या भावना, समस्या आणि चिंता ऐकून घेणारं आता माझं कोणीच नव्हतं, म्हणून मग मी देवाजवळ माझ्या भावना व्यक्त करायचे. मला दररोजची कामं करता यावीत म्हणून मी दिवसाच्या सुरुवातीला देवाकडे मदत मागायचे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपलीकडे मदत केली.” तारशा २२ वर्षांची होती तेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला. ती म्हणते: “दररोज बायबल वाचल्याने मला खूप सांत्वन मिळालं. यामुळे मला बऱ्याच प्रोत्साहनदायक गोष्टींवर विचार करता आला.”
प्रिय जणांना पुन्हा जिवंत केलं जाईल त्या काळाची कल्पना करा
टीना पुढे म्हणते: “मृत लोकांना पुन्हा जिवंत केलं जाणार या आशेमुळे मला सुरुवातीला सांत्वन मिळालं नाही, कारण त्या वेळी मला माझ्या पतीची आणि माझ्या मुलांना त्यांच्या बाबांची गरज होती. पण आता चार वर्षं उलटून गेली आहेत आणि माझा या आशेवर पक्का विश्वास आहे. मी आज या आशेवरच जगतेय. माझ्या पतीला मी पुन्हा भेटेन हे दृश्य मी माझ्या डोळ्यांसमोर उभं करण्याचा प्रयत्न करते आणि असं केल्यामुळे मला शांत आणि आनंदी राहायला मदत होते.”
तुम्हाला दुःखातून सावरणं लगेच शक्य होईल असं नाही. पण वनेसाच्या अनुभवामुळे आपल्याला बराच दिलासा मिळतो. ती म्हणते: “तुम्हाला वाटू शकतं की या दुःखातून बाहेर पडणं कधीच शक्य होणार नाही, पण हळूहळू परिस्थिती बदलू लागते.”
तुमच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही हे जरी खरं असलं, तरी लक्षात असू द्या की अजूनही जीवन जगण्याला अर्थ आहे. देवाच्या प्रेमळ मदतीमुळे तुम्ही आताही चांगले मित्र बनवू शकता आणि एक अर्थपूर्ण जीवन जगू शकता. लवकरच देव मरण पावलेल्या लोकांना जिवंत करणार आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला पुन्हा भेटावं अशी देवाची इच्छा आहे आणि मग त्यानंतर तुमच्या मनाला झालेल्या जखमा कायमच्या भरून निघतील!