व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण आजही आनंदी राहू शकतो का?

आपण आजही आनंदी राहू शकतो का?

असा एक दिवस नक्की येईल जेव्हा कोणीही आजारी पडणार नाही, म्हातारे होणार नाही आणि मरणार नाही. अशा प्रकारचं जीवन तुम्हालाही मिळू शकतं! पण आजच्या जीवनाचा प्रवास खूप खडतर आणि बऱ्‍याच समस्यांनी भरलेला आहे. अशा परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? बायबलचे सल्ले आज आपल्याला आनंदी राहण्यासाठी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी मदत करू शकतात. आता आपण काही समस्यांवर चर्चा करू आणि पाहू की बायबल आपल्याला त्या समस्यांचा सामना करण्यासाठी कशी मदत करू शकतं.

समाधानी राहणं

बायबलचा सल्ला: “आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्‍त ठेवा आणि आहे त्यात समाधानी राहा.”इब्री लोकांना १३:५.

आपल्याजवळ बऱ्‍याचशा गोष्टी असाव्यात असं लोक आपल्याला सांगतात. पण बायबल म्हणतं की “आहे त्यात समाधानी राहा.” हे आपण कसं करू शकतो?

“पैशाचे प्रेम” टाळा. लोक पैशासाठी काहीही करायला तयार असतात. ते त्यांचं आरोग्य, कुटुंब, मैत्री आणि नैतिक स्तर धोक्यात घालतात. एवढंच काय तर ते त्यांचा आत्मसन्मानही गहाण ठेवतात. (१ तीमथ्य ६:१०) खरंच, त्यांना किती मोठी किंमत मोजावी लागते! शेवटी धनसंपत्तीवर प्रेम करणाऱ्‍या व्यक्‍तीची कधीच “तृप्ती होत नाही.”—उपदेशक ५:१०.

वस्तूंपेक्षा माणसांना मौल्यवान लेखा. हे खरं आहे की भौतिक गोष्टी उपयोगी असतात. पण त्या आपल्यावर प्रेम किंवा आपली कदर करू शकत नाहीत, फक्‍त माणसं असं करू शकतात. आपल्या जीवनात खरे “मित्र” असल्यामुळे आपल्याला समाधानी राहण्यासाठी मदत होते.—नीतिसूत्रे १७:१७.

बायबलमध्ये असलेल्या मार्गदर्शनाचं पालन केल्यामुळे आपण आजही आनंदी राहू शकतो

आजारपणाचा सामना करणं

बायबलचा सल्ला: “आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय.”नीतिसूत्रे १७:२२.

एक “उत्कृष्ट औषध” आजाराला बरं करतं, त्याच प्रकारे आनंदी राहिल्यामुळे आपल्याला आजारपणाचा धीराने सामना करण्यासाठी मदत होऊ शकते. पण आजारपणाचा सामना करत असताना आपण आनंदी कसं राहू शकतो?

कृतज्ञता बाळगा. आपण फक्‍त आपल्याच समस्यांबद्दल विचार करत राहिलो तर आपल्याला “सर्व दिवस” वाईटच वाटतील. (नीतिसूत्रे १५:१५) याऐवजी बायबल आपल्याला “कृतज्ञता दाखवा” असं सांगतं. (कलस्सैकर ३:१५) आपल्या जीवनातल्या चांगल्या गोष्टींबद्दल कदर बाळगा; अगदी लहानसहान गोष्टींबद्दलही. एक सुंदर सूर्यास्त, मंद वारा आणि आपल्या प्रिय जणांचं स्मितहास्य, यांसारख्या गोष्टींमुळे आपलं जीवन आणखी सुंदर होऊ शकतं.

इतरांसाठी काही गोष्टी करा. आपलं आरोग्य चांगलं नसलं तरी आपण इतरांसाठी काहीतरी करू शकतो. कारण बायबल म्हणतं की “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रेषितांची कार्ये २०:३५) आपण इतरांना मदत केल्याबद्दल ते जेव्हा आपले आभार मानतात तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि यामुळे आपण आपल्या समस्यांबद्दल जास्त विचार करत नाही. इतरांना मदत करण्याद्वारे आपण त्यांचं जीवन सुखी बनवू शकतो आणि यामुळे आपलंही जीवन सुखी बनतं.

विवाह मजबूत करणं

बायबलचा सल्ला: “कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.”फिलिप्पैकर १:१०.

पती-पत्नी एकमेकांसोबत कमी वेळ घालवतात तेव्हा त्यांचं नातं धोक्यात येऊ शकतं. आपलं वैवाहिक जीवन हे महत्त्वपूर्ण गोष्टींपैकी एक आहे असा दृष्टिकोन पती-पत्नीने बाळगला पाहिजे.

सोबत मिळून काही गोष्टी करा. एखादी गोष्ट एकट्यानेच करण्याऐवजी ती सोबत मिळून करण्याचा प्रयत्न करा. बायबल सांगतं: “एकट्यापेक्षा दोघे बरे.” (उपदेशक ४:९) तुम्ही सोबत मिळून जेवण बनवू शकता, फिरायला जाऊ शकता, घरातली कामं करू शकता किंवा एखादा छंदही जोपासू शकता.

आपलं प्रेम व्यक्‍त करा. पती-पत्नीने एकमेकांवर प्रेम करावं आणि एकमेकांचा आदर करावा असं बायबल सांगतं. (इफिसकर ५:२८, ३३) एक सुंदर स्मितहास्य, प्रेमळ मिठी किंवा एखादी छोटीशी भेटवस्तूही तुमचं नातं आणखी मजबूत करू शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पती-पत्नीने फक्‍त एकमेकांसोबतच शारीरिक संबंध ठेवले पाहिजेत.—इब्री लोकांना १३:४.