व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण का म्हातारे होतो आणि मरतो?

आपण का म्हातारे होतो आणि मरतो?

मानवांचा मृत्यू व्हावा हा देवाचा उद्देश नव्हता. देवाने पहिला पुरुष आणि स्त्री, म्हणजे आदाम-हव्वा यांना एक परिपूर्ण मन आणि शरीर दिलं होतं. यामुळे ते आजही जिवंत असते. यहोवाने आदामला एदेन बागेत असलेल्या एका झाडाबद्दल जे सांगितलं त्यावरून हे स्पष्ट होतं.

देवाने आदामला एक आज्ञा दिली: “ज्या दिवशी त्याचे [झाडाचे] फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:१७) आदामने म्हातारं होऊन मरून जावं असा जर देवाचा उद्देश असता तर या आज्ञेला काहीच अर्थ राहिला नसता. आदामला माहीत होतं की त्याने त्या झाडाचं फळ खाल्लं नाही तर तो मरणार नाही.

मानवांचा मृत्यू व्हावा हा देवाचा उद्देश नव्हता

आदाम आणि हव्वाला जिवंत राहण्यासाठी त्या झाडाचं फळ खाणं गरजेचं नव्हतं, कारण एदेन बागेत बरीच फळझाडं होती. (उत्पत्ति २:९) आदाम-हव्वाने त्या झाडाचं फळ खाल्लं नसतं तर त्यांनी दाखवून दिलं असतं की जीवन देणाऱ्‍या देवाची आज्ञा त्यांना पाळायची आहे. तसंच, त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार देवाला आहे हेही त्यांनी दाखवून दिलं असतं.

आदाम आणि हव्वा का मेले?

आदाम-हव्वा का मरण पावले हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एका संभाषणावर लक्ष द्यावं लागेल. त्या संभाषणाचा परिणाम आपल्या सर्वांवर झाला आहे. सैतानाने एका सापाचा उपयोग करून एक भयंकर खोटं पसरवलं. याबद्दल बायबल म्हणतं: “देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. त्या सापाने स्त्रीला असं म्हटलं, ‘तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?’”—उत्पत्ति ३:१.

यावर हव्वाने त्याला म्हटलं: “बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ‘ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल.’” मग साप स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” अशा प्रकारे सैतानाने यहोवाला खोटं ठरवलं आणि तो आदाम-हव्वापासून चांगल्या गोष्टी राखून ठेवत आहे असा दावा केला.—उत्पत्ति ३:२-५.

हव्वाने या गोष्टींवर भरवसा ठेवला. ती त्या झाडाकडे बघत राहिली. तिला त्या झाडाचं फळ खूप सुंदर आणि हवंहवंसं वाटलं. तिने त्या झाडाचं फळ तोडलं आणि ती ते खाऊ लागली. याबद्दल बायबल असं म्हणतं: “तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले; व त्याने ते खाल्ले.”—उत्पत्ति ३:६.

देवाने आदामला म्हटलं: “ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.”​—उत्पत्ति २:१७

देवाला हे जाणून किती दुःख झालं असेल की ज्या आदाम-हव्वावर त्याचं प्रेम आहे त्यांनी त्याची आज्ञा जाणूनबुजून मोडली. यानंतर त्याने काय केलं? यहोवा आदामला म्हणाला: “तू . . . पुनः मातीला जाऊन मिळशील; कारण तिच्यातून तुझी उत्पत्ति आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१७-१९) “आदाम एकंदर नऊशेतीस वर्षे जगला; मग तो मरण पावला.” (उत्पत्ति ५:५) आदामच्या मृत्यूनंतर तो स्वर्गात किंवा त्यासारख्या इतर ठिकाणी गेला नाही. यहोवाने त्याला मातीपासून बनवण्याआधी त्याचं अस्तित्व नव्हतं, म्हणून तो जेव्हा मरण पावला तेव्हा त्याचं जीवन संपलं आणि त्याच्या शरीराची पुन्हा माती झाली. त्याचं अस्तित्व नाहीसं झालं. खरंच, खूप दुःखाची गोष्ट घडली!

आज आपण परिपूर्ण का नाही?

आदाम-हव्वाने जाणूनबुजून देवाची आज्ञा मोडल्यामुळे त्यांना परिपूर्ण आणि सर्वकाळाचं जीवन गमवावं लागलं. त्यांच्या शरीरात बदल झाला; ते अपरिपूर्ण आणि पापी बनले. त्यांनी देवाची आज्ञा मोडून पाप केलं. त्याचा परिणाम फक्‍त त्या दोघांनाच नाही, तर त्यांच्या मुलांनाही भोगावा लागला. त्यांना जी मुलं होणार होती तीदेखील अपरिपूर्ण आणि पापी असणार होती. याबद्दल रोमकर ५:१२ या बायबलमध्ये दिलेल्या वचनात म्हटलं आहे: “एका माणसाच्या [आदामच्या] द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”

बायबल म्हणतं की पाप आणि मृत्यू हे “सर्व लोकांस झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांस आच्छादून टाकणारे आच्छादन” आहेत. (यशया २५:७) पाप आणि मृत्यू यांनी एका विषारी धुराप्रमाणे मानवजातीला पूर्णपणे झाकून टाकलं आहे आणि यातून कोणाचीच सुटका होऊ शकत नाही. खरंच, “आदाममुळे सर्व मरत आहेत.” (१ करिंथकर १५:२२) प्रेषित पौलने म्हटल्याप्रमाणे आपल्यासमोर एक प्रश्‍न उभा राहतो. त्याने म्हटलं: “मरणाच्या अधीन असलेल्या माझ्या या शरीरापासून कोण माझी सुटका करेल?”—रोमकर ७:२४.