व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मानवी जनुकांमध्ये फेरफार केल्यामुळे दीर्घायुष्य जगण्याचं रहस्य उलगडलं आहे का?

आयुष्य वाढण्याचा शोध

आयुष्य वाढण्याचा शोध

“आपआपल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे; त्याने मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे.”—उपदेशक ३:११.

हे शब्द बुद्धिमान राजा शलमोन याचे आहेत. त्याने अगदी योग्य शब्दांत जीवनाविषयी मानवांच्या भावनांचं वर्णन केलं आहे. आज आपलं आयुष्य थोड्याच काळाचं आहे आणि मृत्यू कोणीच टाळू शकत नाही. यांमुळे अनेक शतकांपासून लोकांची नेहमी हीच इच्छा राहिली आहे की त्यांनी जास्त काळ जगावं. इतिहासात डोकावल्यावर आपल्याला अशा पुष्कळ कहाण्या आणि पौराणिक कथा वाचायला मिळतात ज्यात मानवाने आपलं आयुष्य वाढवण्याचं रहस्य शोधण्यासाठी बराच खटाटोप केला आहे.

जसं की सुमेरचा राजा गिल्गामेश. या राजाच्या जीवनाबद्दल अनेक काल्पनिक कथा आहेत. त्यांपैकी एक म्हणजे गिल्गामेशचं महाकाव्य. त्यात असं सांगितलं आहे की मृत्यूला कसं चुकवायचं हे त्याला शिकून घ्यायचं होतं, म्हणून तो एका धोकेदायक प्रवासाला निघाला. पण त्याला काही याचा शोध लावता आला नाही.

इ.स. ५०० ते १५०० या कालावधितला एक रसायनशास्त्रज्ञ

इ.स.पू. चौथ्या शतकात चीनमधल्या रसायनशास्त्रज्ञांनी एक पेय तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटायचं की यामुळे दीर्घायुष्य लाभेल. काही प्रमाणात पारा आणि आर्सेनिक नावाचं द्रव्य यांचं मिश्रण करून हे पेय तयार करण्यात आलं. पण असं मानलं जातं की हे प्यायल्यामुळे अनेक चीनी सम्राटांचा मृत्यू झाला. युरोप इथे इ.स. ५०० ते इ.स. १५०० या कालावधित काही रसायनशास्त्रज्ञांनी, मानव सेवन करू शकतील अशा स्वरूपात सोनं बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांचा असा समज होता, की सोन्यात गंज प्रतिरोधक गुण असतो आणि यामुळे मानवांना जास्त काळ जगता येईल.

सजीव गोष्टी आणि आनुवंशिकशास्त्र या विषयांवर संशोधन करणारे अनेक वैज्ञानिक, आज माणूस म्हातारा का होतो या रहस्याचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नांवरून दिसून येतं, की म्हातारपण आणि मरण यांवर मात करण्याचा उपाय लोकांना आजही शोधायचा आहे. पण या सर्व संशोधनांतून काय समोर आलं आहे?

देवाने आपल्या “मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे.”​—उपदेशक ३:१०

वृद्धपणाची कारणं शोधणं

मानवी पेशींचा अभ्यास करणाऱ्‍या वैज्ञानिकांनी, आपण म्हातारे होऊन का मरतो याबद्दल ३०० पेक्षा जास्त सिद्धांत मांडले आहेत. अलीकडच्या काही वर्षांत वैज्ञानिकांनी असे काही प्रयोग केले आहेत ज्यांमुळे मानवांच्या आणि प्राण्यांच्या पेशींचं आयुष्य वाढवण्यात त्यांना यश मिळालं आहे. यामुळे काही श्रीमंत लोकांनी वैज्ञानिकांना, आपण का मरतो याचा शोध लावण्यासाठी पैसे दिले आहेत. पण या प्रयत्नात त्यांना कितपत यश मिळालं आहे?

आपलं आयुष्यमान वाढवणं. काही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे, की आपण म्हातारे का होतो याचं उत्तर, आपल्या गुणसूत्रांच्या (क्रोमोझोम्सच्या) शेवटच्या भागात म्हणजे टेलोमेरेज नावाच्या एंजाइममध्ये दडलेलं आहे. पेशींचं विभाजन होतं तेव्हा टेलोमेरेज आपल्या आनुवंशिक माहितीचं संरक्षण करतं. ज्या ज्या वेळी पेशींचं विभाजन होतं, त्या त्या वेळी टेलोमेरेज कमी होत जातं. मग हळूहळू पेशींचं विभाजन थांबतं आणि म्हणून आपण म्हातारे होऊ लागतो.

२००९ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित केलेल्या एलीझाबेथ ब्लॅकबर्न आणि त्यांच्या टीमने, एका अशा एंजाइमचा शोध लावला ज्यामुळे टेलोमेरेज कमी होण्याची प्रक्रिया लांबते आणि यामुळे पेशींचं आयुष्य वाढतं. पण त्यांच्या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे, की टेलोमेरेज जरी कमी झाले नाहीत तरी आपण सामान्यपणे जितकं जगतो, म्हणजे ७० किंवा ८० वर्षं त्यापेक्षा जास्त वर्षं जगणार नाही.

पेशींमध्ये फेरफार. वृद्धपणामुळे होणाऱ्‍या दुष्परिणामांवर प्रतिबंध घालण्याचा हा आणखी एक मार्ग आहे. आपल्या पेशी म्हाताऱ्‍या होतात आणि त्यांचं विभाजन थांबतं तेव्हा ते जवळच्या प्रतिकारक पेंशीना काही चुकीचे संदेश पाठवतात. यामुळे सूज येणे, तीव्र वेदना आणि आजारपण या गोष्टी घडतात. अलीकडे फ्रान्समध्ये काही वैज्ञानिकांनी वृद्ध लोकांमधून घेतलेल्या पेशींमध्ये फेरफार केले. त्या वृद्धापैंकी काहींचं वय १०० पेक्षा जास्त होतं. संशोधन करणाऱ्‍या टीमचे अध्यक्ष प्रोफेसर झॅन-मार्क लेमॉट्रे यांनी म्हटलं की त्यांच्या प्रयोगामुळे पेशींमध्ये “वृद्धपणाच्या उलट अशी एक प्रक्रिया” दिसून आली.

विज्ञान आपलं आयुष्य वाढवू शकतं का?

अनेक वैज्ञानिकांचं म्हणणं आहे, की आज विज्ञानाने वृद्धपणा टाळण्याचे पुष्कळसे उपाय शोधून काढले असले तरी मानव जितकं जगतात त्यापेक्षा जास्त जगू शकणार नाहीत. हे खरं आहे, की १९व्या शतकापासून मानवांचं आयुष्यमान हळूहळू वाढलं आहे. पण मुख्यतः लोक स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असल्यामुळे हे घडलं आहे. तसंच, आज अनेक आजार टाळण्यासाठी आणि ते बरे करण्यासाठी बरीच औषधंही उपलब्ध आहेत. काही आनुवंशिकशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की मानवांचं जितकं आयुष्य असायला हवं तितकं ते आज जगत आहेत.

जवळपास ३,५०० वर्षांपूर्वी मोशे नावाच्या बायबल लेखकाने लिहिलं: “आम्हाला सत्तर वर्षांचे आयुष्य दिले आहे; आणि काही जण ऐंशी वर्षांचे होईपर्यंत देखील जगतात. परंतू यांतील उत्तम वर्षंदेखील पुष्कळदा श्रम आणि वेदना यांनीच भरलेली असतात; लवकरच ती सरतात, आणि आम्ही निघून जातो.” (स्तोत्र ९०:१०, सुबोधभाषांतर) मानवांनी आपलं आयुष्य वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली तरी मोशेने उल्लेख केल्याप्रमाणे ते तितकंच राहतं.

पण मानवांच्या तुलनेत पाहिलं, तर काही कासव १५० पेक्षा जास्त वर्षं आणि देवदारसारखी वृक्ष हजारो वर्षं जगतात. आपण आपल्या आयुष्याची तुलना यांच्याशी आणि इतर सजीव सृष्टीशी केली तर आपल्या मनात प्रश्‍न येतो, ‘७० किंवा ८० वर्षं जगणं इतकंच आपलं आयुष्य आहे का?’