व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मृत्यू एक कटू सत्य

मृत्यू एक कटू सत्य

कल्पना करा तुम्ही तुमच्या आवडत्या कलाकाराचा, म्हणजे एखाद्या नावाजलेल्या गायिकेचा एक व्हिडिओ पाहत आहात. त्यात तिचा संपूर्ण जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीला तिच्या बालपणाचे काही दृश्‍यं दाखवली जातात. मग संगीत शिकण्यासाठी तिने गिरवलेले धडे आणि सतत केलेला रियाज या गोष्टीही दाखवल्या जातात. त्यानंतर अनेक देशांत तिने केलेल्या कार्यक्रमांचीही झलक तुम्हाला पाहायला मिळते. तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी कशी मिळाली हेही पुढे दाखवलं जातं. पण शेवटी मात्र तिच्या म्हातारपणातले आणि अंतयात्रेची काही दृश्‍यं दाखवली जातात.

हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला माहीत असतं, की हा व्हिडिओ काल्पनिक नसून एक अशा खऱ्‍याखुऱ्‍या व्यक्‍तीची कहाणी दर्शवतो जी आज अस्तित्वात नाही. एखादी व्यक्‍ती गायक, वैज्ञानिक, खेळाडू किंवा इतर कोणी असो, सर्व कहाण्यांचा शेवट एकंदरीत सारखाच असतो. त्या व्यक्‍तीने जिवंत असताना खूप काही साध्य केलं असतं, पण शेवटी तिचा मृत्यू होतो. समजा त्या व्यक्‍तीला म्हातारपण किंवा मरण या गोष्टी पाहाव्या लागल्या नसत्या, तर तिने त्याही पेक्षा जास्त गोष्टी साध्य केल्या नसत्या का? नक्कीच केल्या असत्या!

पण दुःखाची गोष्ट ही आहे, की आज सर्वांना या कटू सत्याला सामोरं जावंच लागतं. (उपदेशक ९:५) एखाद्याने कितीही प्रयत्न केले तरी म्हातारपण आणि मरण हे कोणालाच चुकलेलं नाही. यात भर म्हणजे, कधीकधी अचानक घडलेला अपघात किंवा आजार यांमुळे आपण पूर्ण आयुष्यही जगत नाही. बायबलमध्ये म्हटलं आहे की आपण धुक्यासारखे आहोत, “जे थोडा वेळ दिसते आणि मग नाहीसे होते.”—याकोब ४:१४.

काही जणांना वाटतं की जीवनाची काही शाश्‍वती नाही आणि ते अर्थहीन आहे. म्हणून मग ते विचार करतात, “चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचे आहे.” (१ करिंथकर १५:३२) पण लोक अशा प्रकारे जीवन जगतात कारण त्यांना वाटतं की आपल्याला मरण कधीही येऊ शकतं. तसंच, त्यांच्याकडे भविष्यासाठी कोणती आशाही नाही. जीवनाच्या एका टप्प्यावर कधी न्‌ कधी, खासकरून कठीण परिस्थितीत एका व्यक्‍तीच्या मनात विचार येऊ शकतो, की ‘यालाच आयुष्य म्हणतात का?’ तुम्हाला या प्रश्‍नाचं उत्तर कुठे सापडेल?

विज्ञान या प्रश्‍नाचं उत्तर शोधून काढेल असं अनेकांना वाटतं. विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाल्यामुळे आज लोक आधीपेक्षा जास्त वर्षं जगतात. काही वैज्ञानिक आजही आपलं आयुष्यमान कसं वाढवता येईल यावर संशोधन करत आहेत. त्यांना यात यश मिळो अथवा न मिळो तरी काही प्रश्‍नं आपल्या मनात येतातच: आपण म्हातारे का होतो आणि का मरतो? आपला शत्रू मृत्यू याचा कधी अंत होईल का? पुढच्या लेखांमध्ये या विषयांवर चर्चा केली जाईल. तसंच, ‘यालाच आयुष्य म्हणतात का?’ या प्रश्‍नाचं उत्तर दिलं जाईल.