व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वकाळ जगण्यासाठी आपली रचना करण्यात आली आहे का?

सर्वकाळ जगण्यासाठी आपली रचना करण्यात आली आहे का?

आज असं कोण आहे ज्याला आनंदी आणि दीर्घायुष्य जगण्याची इच्छा नाही? आपल्या सर्वांचीच अशी इच्छा आहे. जरा कल्पना करा, आपल्याला कधीही न संपणारं, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची संधी मिळाली तर जीवन किती सुंदर असेल! असं खरंच झालं तर आपल्या आवडत्या लोकांसोबत आपल्याला जास्त वेळ घालवता येईल, आपल्याला संपूर्ण जग फिरता येईल. इतकंच काय तर आपल्या आवडीच्या बऱ्‍याचशा गोष्टीही आपल्याला शिकता येतील.

असा विचार करणं चुकीचं आहे का? मुळीच नाही! खरंतर देवानेच आपल्या मनात अशी इच्छा टाकली आहे असं शास्त्रवचनांत सांगितलं आहे. (उपदेशक ३:११) त्यात असंही म्हटलं आहे की “देव प्रेम आहे.” (१ योहान ४:८) मग हे पटण्यासारखं आहे का, की एकीकडे प्रेमळ देव आपल्या मनात सर्वकाळ जगण्याची इच्छा टाकेल पण दुसरीकडे तो आपल्याला कायमस्वरूपी जगू देणार नाही?

आपल्याला मरण यावं अशी कोणाचीही इच्छा नाही. खरंतर, बायबल मृत्यूला आपला “शत्रू” असं म्हणतं. (१ करिंथकर १५:२६) काही जण कमी वयात मरतात तर काही जण बरीच वर्ष जगतात, पण असं असलं तरी मृत्यू कोणालाही चुकत नाही. काही जणांना तर मृत्यूच्या नुसत्या विचारानेही भीती वाटते. मग या शत्रूवर कधी विजय मिळवला जाईल का? हे खरंच शक्य आहे का?

मनुष्य सर्वकाळ जिवंत राहू शकतो याचे पुरावे

मानवांनी मरावं असा देवाचा कधीच उद्देश नव्हता. हे ऐकून आपल्याला कदाचित आश्‍चर्य वाटेल. पण बायबलमधल्या उत्पत्ति नावाच्या पुस्तकातून आपल्याला समजतं की मानवांनी सर्वकाळ पृथ्वीवर जगावं असा देवाचा उद्देश होता. त्यांना पृथ्वीवर आनंदाने सर्वकाळासाठी राहता यावं म्हणून यहोवा * देवाने पृथ्वीवर सर्व गोष्टी बनवल्या. आणि मग त्यानंतर त्याने पहिला मनुष्य आदाम याला बनवलं आणि त्याला नंदनवनात म्हणजेच, एदेन नावाच्या बागेत ठेवलं.”—उत्पत्ति १:२६, ३१.

देवाने आदामला परिपूर्ण बनवलं होतं म्हणजे त्याची बुद्धी आणि शरीर यांत कोणतीच कमतरता नव्हती. (अनुवाद ३२:४) आदामची पत्नी हव्वा हीसुद्धा त्याच्यासारखीच परिपूर्ण होती. यहोवाने त्यांना म्हटलं: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.”—उत्पत्ति १:२८.

आदाम आणि हव्वा यांच्या संततीने संपूर्ण पृथ्वी भरून जाण्यासाठी वेळ लागणार होता. हव्वाला मुलं होणार होती, मग त्या मुलांना पुढे आणखी मुलं होणार होती आणि पृथ्वी देवाच्या उद्देशानुसार व्यापून जात नाही तोपर्यंत हे घडत राहणार होतं. (यशया ४५:१८) देवाने आदाम आणि हव्वा यांना पृथ्वी व्यापून टाकायला सांगितलं होतं. पण फक्‍त काही वर्षं जगून हा उद्देश पूर्ण करणं त्यांना शक्य होणार होतं का? मुळीच नाही. खरंतर संपूर्ण पृथ्वी मानवांनी भरून जाण्यासाठी शेकडो वर्षं लागणार होती.

देवाने त्यांना सर्व प्राण्यांना आपल्या अधिकाराखाली आणण्याचं कामही सोपवलं होतं हे लक्षात घ्या. देवाने आदामला प्राण्यांची नावं ठेवायला सांगितली होती आणि हे करण्यासाठी वेळ लागणार होता. (उत्पत्ति २:१९) पण प्राण्यांवर सत्ता चालवायची म्हटलं तर आदामला आधी त्यांच्याबद्दल शिकून घ्यावं लागणार होतं आणि त्यांची काळजी कशी घ्यायची हेही त्याला समजून घ्यावं लागणार होतं. आणि या सर्व गोष्टींसाठी बराच वेळ लागणार होता.

देवाने आदाम-हव्वाला सर्व पृथ्वी भरून टाकण्याची आणि प्राण्यांवर सत्ता चालवण्याची आज्ञा दिली होती. यावरून कळतं की त्याने त्यांना जास्त काळ राहण्यासाठी बनवलं होतं. आणि खरं पाहिलं तर आदाम खूप वर्षं जगलाही.

मानवांनी नंदनवनात म्हणजे बगीच्यासारख्या परिसरात सर्वकाळासाठी पृथ्वीवर राहावं असा देवाचा उद्देश होता

ते बरीच वर्षं जिवंत राहिले

आदाम ९३० वर्षं

मथुशलह ९६९ वर्षं

नोहा ९५० वर्षं

आज ७०-८० वर्षं

एके काळी लोक आजच्या तुलनेत जास्त वर्षं जगायचे असं बायबलमध्ये सांगितलं आहे. त्यात म्हटलं आहे: “आदाम एकंदर नऊशेतीस वर्षे जगला.” नंतर त्यात अशा सहा जणांचा उल्लेख करण्यात आला आहे जे ९०० पेक्षा जास्त वर्षं जगले. ते म्हणजे शेथ, अनोश, केनान, यारेद, मथुशलह आणि नोहा. हे सर्व जण नोहाच्या दिवसांत आलेल्या जलप्रलयाच्या आधी जगले आणि नोहा जलप्रलय यायच्या आधी ६०० वर्षं जगला. (उत्पत्ति ५:५-२७; ७:६; ९:२९) पण त्या वेळी लोकांना इतकी वर्षं जगणं कसं शक्य होतं?

अगदी सुरुवातीला मानव जेव्हा परिपूर्ण स्थितीत होते त्या काळाच्या जवळपासच हे सर्व लोक जगले. आणि कदाचित याच कारणामुळे ते इतकी वर्षं जगू शकले. पण खूप वर्षं जगण्याचा परिपूर्ण असण्याशी काय संबंध आहे? आणि मृत्यूवर विजय कसा मिळवला जाईल? या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की आपण का म्हातारे होतो आणि मरतो?

^ परि. 6 बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं दिलं आहे.