व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४

आत्मा “अंतःकरणाला” साक्ष देतो

आत्मा “अंतःकरणाला” साक्ष देतो

“आत्मा आपल्या अंत:करणाला अशी साक्ष देतो, की आपण देवाची मुले आहोत.”—रोम. ८:१६.

गीत १४७ एक खास प्रजा

सारांश *

पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहोवाने आश्‍चर्यकारक पद्धतीने त्याचा पवित्र आत्मा सुमारे १२० ख्रिश्‍चनांवर ओतला (परिच्छेद १-२ पाहा)

१-२. इ. स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी कोणती आश्‍चर्यकारक घटना घडली?

इ. स. ३३ चा पेन्टेकॉस्टचा दिवस. त्या रविवारी सकाळी यरुशलेममध्ये एका घरात वरच्या खोलीत सुमारे १२० शिष्य एकत्र जमले होते. (प्रे. कार्ये १:१३-१५; २:१) याच्या काही दिवसांआधी येशूने आपल्या शिष्यांना यरुशलेममध्ये थांबायला सांगितलं होतं, कारण तो त्यांना एक खास देणगी देणार होता. (प्रे. कार्ये १:४, ५) पण यानंतर काय झालं?

बायबल म्हणतं, “अचानक आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्‍यासारख्या आवाज ऐकू आला आणि ते बसले होते त्या सबंध घरात तो आवाज घुमू लागला.” मग प्रत्येक शिष्याच्या डोक्यावर “जणू अग्नीच्या ज्वाला दिसल्या [आणि] त्या जिभेच्या आकाराच्या होत्या.” तिथे जमलेले “सर्व जण पवित्र आत्म्याने” भरून गेले. (प्रे. कार्ये २:२-४) अशा आश्‍चर्यकारक रीतीने यहोवाने तिथे उपस्थित असलेल्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतला. (प्रे. कार्ये १:८) हे पहिले अभिषिक्‍त ख्रिस्ती होते ज्यांच्यावर पवित्र आत्मा * ओतण्यात आला होता आणि त्यांना येशूसोबत स्वर्गात राज्य करण्याची आशा देण्यात आली होती.

एखाद्याला कसं अभिषिक्‍त केलं जातं?

३. आपला पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक झाला आहे अशी पेन्टेकॉस्टच्या दिवशी उपस्थित असलेल्यांना खातरी का होती?

कल्पना करा, त्या दिवशी तुम्ही वरच्या खोलीत जमलेल्या शिष्यांपैकी एक आहात. तुम्ही तिथे असता तर तो दिवस तुम्ही कधीच विसरला नसता. त्या दिवशी तुमच्या डोक्यावर जिभेचा आकार असलेलं अग्नीच्या ज्वालासारखं काहीतरी येऊन थांबलं आणि त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या भाषा बोलायला लागला! (प्रे. कार्ये २:५-१२) पवित्र आत्म्याने तुम्हाला अभिषिक्‍त केलं याबद्दल तुम्हाला जराही शंका नसती. पण प्रश्‍न असा येतो, की ज्यांना पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात येतं त्या सर्वांना अशाच आश्‍चर्यकारक पद्धतीने अभिषिक्‍त करण्यात येतं का? नाही. हे आपण कसं म्हणू शकतो?

४. पहिल्या शतकातल्या सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा एकाच वेळी अभिषेक करण्यात आला होता का? स्पष्ट करा.

पहिल्या शतकात काही ख्रिश्‍चनांना कधी  अभिषिक्‍त करण्यात आलं यावर आता आपण चर्चा करू या. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी फक्‍त १२० ख्रिश्‍चनांचाच नाही, तर इतरांचाही पवित्र आत्म्याने अभिषेक झाला. नंतर त्याच दिवशी जवळपास ३,००० लोकांना पवित्र आत्मा मिळाला आणि त्यांच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्यांना अभिषिक्‍त करण्यात आलं. (प्रे. कार्ये २:३७, ३८, ४१) पण याच्या काही वर्षांनंतर सर्वच अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना त्यांच्या बाप्तिस्म्याच्या वेळी अभिषिक्‍त करण्यात आलं नाही. शोमरोनी लोकांना तर त्यांच्या बाप्तिस्म्याच्या काही काळानंतर अभिषिक्‍त करण्यात आलं. (प्रे. कार्ये ८:१४-१७) आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कर्नेल्य आणि त्याच्या घराण्याला त्यांच्या बाप्तिस्म्याआधीच अभिषिक्‍त करण्यात आलं होतं.—प्रे. कार्ये १०:४४-४८.

५. २ करिंथकर १:२१, २२ या वचनांत सांगितल्यानुसार एखाद्याला पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त केलं जातं तेव्हा काय होतं?

एका व्यक्‍तीला पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात येतं, तेव्हा काय होतं  यावर आता आपण चर्चा करू या. यहोवाने आपल्याला निवडलं आहे हे स्वीकारणं सुरुवातीला काही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कठीण जाऊ शकतं. त्यांना वाटू शकतं की ‘देवाने मला का निवडलं?’ पण काहींना कदाचित तसं वाटणार नाही. याबद्दल अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या भावना वेगवेगळ्या असू शकतात. पण त्या वेळी त्या सर्वांसोबत काय घडतं याविषयी प्रेषित पौलने म्हटलं: “तुम्ही विश्‍वास ठेवल्यानंतर, त्याच्याद्वारे तुमच्यावर पूर्वीच वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा शिक्का * मारण्यात आला. हा पवित्र आत्मा आपल्याला मिळणार असलेल्या वारशाची आधीच दिलेली एक हमी आहे.” (इफिस. १:१३, १४, तळटीप) याचाच अर्थ, यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याचा वापर करून या ख्रिश्‍चनांना अगदी स्पष्ट करून देतो की त्याने त्यांना निवडलं आहे. पवित्र आत्मा ही त्यांना मिळालेली “हमी [आगाऊ रक्कम]” आहे की भविष्यात त्यांना पृथ्वीवर नाही तर स्वर्गात सर्वकाळाचं जीवन मिळेल.—२ करिंथकर १:२१, २२ वाचा.

६. स्वर्गातलं बक्षीस मिळवण्यासाठी एका अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाला काय करणं गरजेचं आहे?

एक ख्रिस्ती व्यक्‍ती अभिषिक्‍त असेल तर ती नक्कीच स्वर्गात जाईल का? नाही. स्वर्गात जाण्यासाठी तिची निवड झाली आहे याची तिला खातरी असते. पण तरी तिने बायबलमध्ये दिलेल्या चेतावणीकडे लक्ष दिलं पाहिजे. ती म्हणजे: “बांधवांनो, बोलावले जाण्याचा आणि निवडले जाण्याचा जो बहुमान तुम्हाला लाभला आहे, तो टिकवून ठेवण्याचा आणखी जास्त प्रयत्न करा; कारण, जर तुम्ही असे करत राहिलात,  तर तुम्ही कधीही अडखळून पडणार नाही.” (२ पेत्र १:१०) याचा अर्थ, एका अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाला स्वर्गात जाण्यासाठी निवडण्यात आलं असलं किंवा बोलवण्यात आलं असलं, तरी शेवटपर्यंत तो विश्‍वासू राहिला तरच त्याला त्याचं बक्षीस मिळेल.—फिलिप्पै. ३:१२-१४; इब्री ३:१; प्रकटी. २:१०.

एखादी व्यक्‍ती अभिषिक्‍त आहे हे तिला कसं कळतं?

७. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कसं कळतं की त्यांना स्वर्गातल्या जीवनासाठी बोलवण्यात आलं आहे?

एखाद्या व्यक्‍तीला कसं कळतं की तिला स्वर्गातल्या जीवनासाठी बोलवण्यात आलं आहे? रोममधल्या ख्रिश्‍चनांना “पवित्र जन होण्याकरता बोलवण्यात” आलं होतं. पौलने त्यांना जे म्हटलं त्यावरून आपल्याला याचं उत्तर मिळतं. त्याने त्यांना म्हटलं: “देवाचा पवित्र आत्मा आपल्याला दास करत नाही, तसेच आपल्या मनात भीतीही उत्पन्‍न करत नाही; उलट या आत्म्याद्वारे आपल्याला पुत्र म्हणून दत्तक घेतले जाते आणि याच पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला ‘अब्बा,  बापा!’ अशी हाक मारण्याची प्रेरणा मिळते. तो आत्मा आपल्या अंतःकरणाला अशी साक्ष देतो, की आपण देवाची मुले आहोत.”  (रोम. १:७; ८:१५, १६) याचाच अर्थ, देव त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त जनांना हे स्पष्ट करून देतो की स्वर्गातल्या जीवनासाठी त्यांना बोलवण्यात आलं आहे.—१ थेस्सलनी. २:१२.

८. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना त्यांच्या स्वर्गीय आशेबद्दल इतरांनी खातरी करून देण्याची गरज नाही हे १ योहान २:२०, २७ या वचनांतून कसं दिसून येतं?

एखाद्याला स्वर्गातल्या जीवनासाठी बोलवण्यात येतं तेव्हा यहोवा त्याच्या मनात याबद्दल तिळमात्रही शंका राहू देत नाही. (१ योहान २:२०, २७ वाचा.) हे खरं आहे की इतरांप्रमाणे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनासुद्धा यहोवाच्या मंडळीद्वारे शिकण्याची गरज आहे. पण ते अभिषिक्‍त आहेत, याची इतरांनी त्यांना खातरी करून देण्याची गरज नाही. यहोवाने या विश्‍वातल्या सर्वात ताकदवान शक्‍तीचा, म्हणजेच पवित्र आत्म्याचा वापर करून त्यांना अगदी स्पष्ट करून दिलं आहे की ते अभिषिक्‍त आहेत.

अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा “नव्याने जन्म” होतो

९. एखाद्याला अभिषिक्‍त केलं जातं तेव्हा इफिसकर १:१८ मध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना कोणते बदल जाणवतात?

देव जेव्हा एखाद्याला अभिषिक्‍त करतो तेव्हा नेमकं त्याच्यासोबत काय घडतं हे आज देवाच्या इतर बऱ्‍याचशा सेवकांना समजून घेणं कठीण वाटतं. आणि हे स्वाभाविक आहे कारण अभिषिक्‍त होणं काय असतं हे त्यांनी स्वतः अनुभवलेलं नसतं. कारण देवाने मानवांना स्वर्गात नाही तर पृथ्वीवर सर्वकाळ राहण्यासाठी बनवलं होतं. (उत्प. १:२८; स्तो. ३७:२९) असं असलं तरी स्वर्गात राहण्यासाठी त्याने काहींना निवडलं आहे. म्हणून जेव्हा देव त्यांना अभिषिक्‍त करतो तेव्हा तो त्यांची आशा आणि विचार करण्याची पद्धत यांत पूर्णपणे बदल करतो आणि यामुळे ते स्वर्गातल्या जीवनाची आतुरतेने वाट पाहतात.—इफिसकर १:१८ वाचा.

१०. “नव्याने जन्म” होण्याचा काय अर्थ होतो? (तळटीपदेखील पाहा.)

१० ख्रिश्‍चनांना जेव्हा पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त करण्यात येतं तेव्हा त्यांचा “नव्याने जन्म” होतो किंवा “वरून जन्म” होतो. * येशूने आधीच सांगितलं होतं की “नव्याने जन्म” होणं किंवा “आत्म्याने जन्म” होणं हा अनुभव नेमका कसा असतो, हे अभिषिक्‍त नसलेल्यांना समजावून सांगणं अशक्य आहे.—योहा. ३:३-८; तळटीप

११. एखाद्याला अभिषिक्‍त करण्यात येतं तेव्हा त्याच्या विचारांत कोणते बदल होतात हे स्पष्ट करा?

११ अभिषिक्‍त करण्यात आल्यावर ख्रिश्‍चनांच्या विचार करण्याच्या पद्धतीत कोणता बदल होतो? अभिषिक्‍त होण्याआधी त्यांना पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची मनापासून इच्छा असते. ते त्या वेळेची आतुरतेने वाट पाहत असतात जेव्हा यहोवा या पृथ्वीवरून सर्व प्रकारचा दुष्टपणा काढून टाकेल आणि या पृथ्वीला नंदनवन बनवेल. ते कदाचित या गोष्टीचाही विचार करत असतील की ते त्यांच्या कुटुंबातल्या मरण पावलेल्या सदस्याला किंवा मित्राला नवीन जगात भेटतील. पण अभिषिक्‍त झाल्यावर ते वेगळ्या प्रकारे विचार करू लागतात. हे का घडतं? यामुळे नाही की त्यांना स्वर्गातलं जीवन पृथ्वीवरच्या जीवनापेक्षा चांगलं वाटू लागतं. किंवा जीवनातल्या समस्यांमुळे, निराशेमुळे ते हताश झाले आहेत. किंवा अचानक त्यांना पृथ्वीवरचं जीवन कंटाळवाणं वाटू लागतं. तर हे यामुळे घडतं, कारण यहोवा पवित्र आत्म्याचा वापर करून त्यांना प्रिय असलेली पृथ्वीवरची आशा बदलतो आणि त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करतो.

१२. १ पेत्र १:३, ४ या वचनांत सांगितल्याप्रमाणे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना त्यांच्या आशेबद्दल कसं वाटतं?

१२ अभिषिक्‍त झालेल्या व्यक्‍तीला वाटू शकतं की हा मौल्यवान आशीर्वाद मिळवण्यासाठी ती योग्य नाही. असं असलं तरी यहोवाने तिला निवडलं आहे याबद्दल तिच्या मनात थोडीपण शंका नसते. खरंतर, भविष्यातल्या आशेबद्दल विचार केल्यावर त्या व्यक्‍तीचं मन आनंदाने भरून जातं आणि तिला यहोवाबद्दल कृतज्ञता वाटते.—१ पेत्र १:३, ४ वाचा.

१३. अभिषिक्‍त जनांना पृथ्वीवरच्या त्यांच्या सध्याच्या जीवनाबद्दल कसं वाटतं?

१३ मग याचा अर्थ असा होतो का की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना मरण्याची इच्छा आहे? प्रेषित पौल या प्रश्‍नाचं उत्तर देतो. त्याने अभिषिक्‍तांच्या शरीराची तुलना एका तंबूसोबत केली. त्याने म्हटलं: “खरे पाहता, या तंबूमध्ये असलेले आपण ओझ्याखाली दबून जातो आणि कण्हतो, कारण आपल्याला हे काढून टाकायचे नाही,  पण ते दुसरे घालायचेही आहे, यासाठी की जे मरणारे आहे त्याला जीवनाने कायमचे गिळून टाकावे.” (२ करिंथ. ५:४) याचा अर्थ असा होत नाही, की या ख्रिश्‍चनांना पृथ्वीवरच्या जीवनाचा कंटाळा आला आहे आणि म्हणून त्यांना लवकरच मरावंसं वाटतं. तर याच्या अगदी उलट ते जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटतात आणि प्रत्येक दिवशी त्यांना आपल्या कुटुंबासोबत व मित्रांसोबत यहोवाची सेवा करण्याची इच्छा असते. आज जरी ते आपल्या जीवनात या सर्व गोष्टी करत असले, तरी ते भविष्यात मिळणाऱ्‍या त्यांच्या सुंदर आशेला नेहमी लक्षात ठेवतात.—१ करिंथ. १५:५३; २ पेत्र १:४; १ योहा. ३:२, ३; प्रकटी. २०:६.

यहोवाने तुम्हाला अभिषिक्‍त केलं आहे का?

१४. कोणत्या गोष्टींवरून हे सिद्ध होत नाही की एखाद्या व्यक्‍तीला पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त करण्यात आलं आहे?

१४ तुम्ही कदाचित विचार कराल की तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे खरंच अभिषिक्‍त करण्यात आलं आहे का? असं असेल तर पुढे दिलेल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर विचार करा: यहोवाची इच्छा पूर्ण करावी असं तुम्हाला मनापासून वाटतं का? प्रचार कार्यासाठी तुमच्यामध्ये खूप आवेश आहे असं तुम्हाला जाणवतं का? यहोवाच्या मदतीमुळे प्रचारकार्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळाले आहेत असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला बायबलमधून “देवाच्या गहन” गोष्टींचा शोध घ्यायला आवडतं का? (१ करिंथ. २:१०) इतरांना यहोवाबद्दल शिकवणं ही तुमची एक महत्त्वाची जबाबदारी आहे असं तुम्हाला वाटतं का? यहोवाने तुम्हाला अनेक विशिष्ट मार्गांनी मदत केली आहे हे तुम्ही अनुभवलं आहे का? जर तुम्ही या सर्व प्रश्‍नांचं उत्तर ‘हो’ असं दिलं असेल, तर याचा अर्थ असा होतो का की तुम्हाला स्वर्गातल्या जीवनासाठी बोलवण्यात आलं आहे? नाही! याचा अर्थ असा होत नाही. असं का म्हणता येईल? कारण एखादी व्यक्‍ती अभिषिक्‍त असो किंवा नसो, देवाच्या सर्वच  सेवकांना असं वाटू शकतं. एखाद्याला कोणतीही आशा असो, यहोवा आपल्या पवित्र आत्म्याचा वापर करून त्याच्या कोणत्याही सेवकाला या गोष्टी करायला मदत करू शकतो. खरंतर, तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त करण्यात आलं आहे की नाही, अशी शंका जर तुमच्या मनात असेल तर या शंकेमुळेच सिद्ध होतं की तुम्हाला अभिषिक्‍त करण्यात आलेलं नाही.  कारण, अभिषिक्‍त जनांना पक्की खातरी असते की यहोवाने त्यांना अभिषिक्‍त केलं आहे!

अब्राहाम, सारा, दावीद, बाप्तिस्मा देणारा योहान यांना आश्‍चर्यकारक कामं करण्यासाठी यहोवाने त्याचा पवित्र आत्मा दिला, पण या पवित्र आत्म्याचा वापर त्याने त्यांना अभिषिक्‍त करण्यासाठी केला नाही. (परिच्छेद १५-१६ पाहा) *

१५. देवाचा पवित्र आत्मा मिळालेल्या सर्वांनाच स्वर्गात जाण्यासाठी निवडण्यात आलं नव्हतं असं आपण का म्हणू शकतो?

१५ बायबलमध्ये अशा अनेक विश्‍वासू सेवकांची उदाहरणं आहेत ज्यांना पवित्र आत्मा मिळाला होता. पण तरीही, त्यांना स्वर्गात जगण्याची आशा नव्हती. दावीदला पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन मिळालं होतं. (१ शमु. १६:१३) यहोवाबद्दल गहन गोष्टी समजण्यासाठी आणि बायबलचे काही भाग लिहिण्यासाठी पवित्र आत्म्याने त्याला मदत केली. (मार्क १२:३६) असं असलं तरी प्रेषित पेत्रने म्हटलं: “दावीद स्वर्गात गेला नाही.” (प्रे. कार्ये २:३४) बाप्तिस्मा देणारा योहानसुद्धा “पवित्र आत्म्याने परिपूर्ण” झाला होता. (लूक १:१३-१६) येशूने म्हटलं की योहानपेक्षा श्रेष्ठ कोणी आलेलं नाही. पण त्याने पुढे असंही म्हटलं की योहान त्याच्यासोबत स्वर्गात राज्य करणार नाही. (मत्त. ११:१०, ११) यहोवाने त्याच्या या सेवकांना आश्‍चर्यकारक कामं करण्यासाठी त्याचा पवित्र आत्मा दिला, पण या पवित्र आत्म्याचा वापर त्याने त्यांना अभिषिक्‍त करण्यासाठी केला नाही. मग याचा अर्थ असा होतो का की हे सेवक अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपेक्षा कमी विश्‍वासू होते? नाही. तर याचा अर्थ असा आहे की यहोवा त्यांना पृथ्वीवर नंदनवनात पुन्हा जिवंत करेल.—योहा. ५:२८, २९; प्रे. कार्ये २४:१५.

१६. देवाचे अनेक सेवक आज कोणत्या आशीर्वादाची वाट पाहत आहेत?

१६ आज पृथ्वीवर राहणाऱ्‍या देवाच्या बहुतेक सेवकांना स्वर्गात राहण्याची आशा नाही. बायबल काळातले सेवक जसं की अब्राहाम, सारा, दावीद, बाप्तिस्मा देणारा योहान आणि इतर विश्‍वासू स्त्री-पुरुष त्या वेळेची वाट पाहत होते जेव्हा ते देवाच्या राज्याच्या अधीन राहून या पृथ्वीवर जगतील. आणि त्यांच्यासारखंच आजही देवाचे सेवक याच गोष्टीची वाट पाहत आहेत.—इब्री ११:१०.

१७. पुढच्या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

१७ काही अभिषिक्‍त जन आजही आपल्यामध्ये आहेत आणि यामुळे साहजिकच आपल्या मनात काही प्रश्‍न येतात. (प्रकटी. १२:१७) जसं की, अभिषिक्‍त जनांनी स्वतःबद्दल कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे? तुमच्या मंडळीत कोणी स्मारकविधीत प्रतीकांचं सेवन करत असेल तर तुम्ही त्या व्यक्‍तीशी कसं वागलं पाहिजे? “आम्ही अभिषिक्‍त आहोत” असं म्हणणाऱ्‍यांच्या संख्येत वाढ होत असेल तर काय? तुम्हाला याबद्दल चिंता करण्याची गरज आहे का? या प्रश्‍नांची उत्तरं आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.

^ परि. 5 इ. स. ३३च्या पेन्टेकॉस्टच्या दिवसापासून यहोवाने काही ख्रिश्‍चनांना त्याच्या मुलासोबत स्वर्गातून राज्य करण्याची सुंदर आशा दिली आहे. पण या ख्रिश्‍चनांना कसं कळतं की त्यांना स्वर्गातल्या जीवनासाठी निवडण्यात आलं आहे आणि एखाद्याची निवड होते तेव्हा काय होतं? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला या लेखातून मिळतील. हा लेख जानेवारी २०१६ च्या टेहळणी बुरूज मध्ये दिलेल्या एका लेखावर आधारित आहे.

^ परि. 2 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त: एखाद्या व्यक्‍तीला येशूसोबत राज्य करायला निवडण्यासाठी यहोवा पवित्र आत्म्याचा वापर करतो. या आत्म्याद्वारे देव निवडलेल्या व्यक्‍तीला भविष्याच्या आशेचं वचन देतो किंवा आधीच “हमी” देतो. (इफिस. १:१३, १४) त्यामुळे हे ख्रिस्ती म्हणू शकतात की पवित्र आत्मा त्यांना “साक्ष” देतो. आणि म्हणून त्यांना स्पष्टपणे कळतं की त्यांना स्वर्गात राहण्याची आशा आहे.—रोम. ८:१६.

^ परि. 5 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: शिक्का. अभिषिक्‍तांवर शिक्का तेव्हाच मारण्यात येतो जेव्हा ते मरेपर्यंत विश्‍वासू राहतात. हा शिक्का एकतर त्यांचा मृत्यू होण्याच्या काही काळाआधी किंवा मोठं संकट येण्याच्या काही काळाआधी मारण्यात येतो.—इफिस. ४:३०; प्रकटी. ७:२-४; एप्रिल २०१६ टेहळणी बुरूज च्या अंकात “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.

^ परि. 10 “नव्याने जन्म” होणं याबद्दल जास्त माहितीसाठी टेहळणी बुरूज-E  १ एप्रिल २००९, पृ. ३-१२ पाहा.

गीत ९ यहोवाचा जयजयकार करा!

^ परि. 57 चित्राचं वर्णन: आपल्या विश्‍वासामुळे आपण तुरुंगात असो किंवा आपल्याला प्रचार करण्याची आणि शिकवण्याची मोकळीक असो, देवाच्या राज्याच्या अधीन राहून या पृथ्वीवर जगण्याची आपण नक्कीच वाट पाहू शकतो.