व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २

तुम्ही इतरांचं चांगल्या प्रकारे “सांत्वन” करू शकता

तुम्ही इतरांचं चांगल्या प्रकारे “सांत्वन” करू शकता

“देवाच्या राज्यासाठी हेच माझे सहकारी आहेत आणि त्यांनी माझ्या मनाला खूप सांत्वन दिले आहे.”—कलस्सै. ४:११.

गीत ५३ ऐक्य जपू या

सारांश *

१. यहोवाच्या बऱ्‍याच विश्‍वासू सेवकांना कोणत्या कठीण परिस्थितींचा सामना करावा लागत आहे?

आज जगभरातल्या बऱ्‍याच यहोवाच्या सेवकांना अतिशय दुःखी आणि निराश करणाऱ्‍या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तुमच्या मंडळीतही अशीच परिस्थिती असल्याचं तुम्हाला जाणवलं आहे का? काही ख्रिश्‍चनांना गंभीर आजारपण किंवा प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर इतर काहींना त्यांच्या कुटुंबातली व्यक्‍ती किंवा जवळचा मित्र सत्य सोडून जाण्याचं दुःख आहे. काही असेही आहेत ज्यांना नैसर्गिक विपत्तीमुळे दुःख सहन करावं लागलं आहे. या सर्व भाऊबहिणींना सांत्वनाची गरज आहे. मग अशा वेळी आपण या भाऊबहिणींना कशा प्रकारे मदत करू शकतो?

२. प्रेषित पौलला काही प्रसंगी सांत्वनाची गरज का पडली?

प्रेषित पौलला त्याच्या जीवनात एकामागोमाग एक अशा बऱ्‍याच समस्यांचा सामना करावा लागला ज्यामुळे त्याचा जीव गेला असता. (२ करिंथ. ११:२३-२८) इतकंच काय तर त्याच्या ‘शरीरातल्या एका काट्याचा’ त्रासही त्याला सहन करावा लागत होता, म्हणजेच त्याला कदाचित काही आरोग्याची समस्या होती. (२ करिंथ. १२:७) तसंच, त्याचा सहकारी देमास याला “जगाच्या व्यवस्थेची ओढ” असल्यामुळे तो पौलला सोडून गेला आणि यामुळे पौल निराश झाला. (२ तीम. ४:१०) पौल एक धैर्यवान अभिषिक्‍त ख्रिस्ती होता ज्याने इतरांना निःस्वार्थपणे मदत केली होती. असं असलं तरी काही प्रसंगी तो निराश झाला.—रोम. ९:१, २.

३. पौलला कोणाकडून सांत्वन आणि मदत मिळाली?

पौलला नक्कीच सांत्वन आणि मदत मिळाली. पण कशा प्रकारे? यहोवाने त्याच्या पवित्र आत्म्याचा वापर करून त्याला बळ दिलं. (२ करिंथ. ४:७; फिलिप्पै. ४:१३) तसंच, त्याने भाऊबहिणींचा वापर करून पौलचं सांत्वनही केलं. कारण त्यातल्या काहींबद्दल पौलने म्हटलं की “त्यांनी माझ्या मनाला खूप सांत्वन” दिलं. (कलस्सै. ४:११) त्यांपैकी काहींच्या नावाचा पौलने उल्लेख केला जसं की अरिस्तार्ख, तुखिक आणि मार्क. त्यांनी पौलची हिंमत वाढवली आणि यामुळे तो धीराने समस्यांचा सामना करू शकला. पण कोणत्या गुणांमुळे हे तीन ख्रिस्ती चांगल्या प्रकारे सांत्वन करणारे बनू शकले? तसंच, आपण इतरांचं सांत्वन करताना आणि एकमेकांना प्रोत्साहन देताना या बांधवांचं अनुकरण कसं करू शकतो?

अरिस्तार्खसारखं एकनिष्ठ राहा

कठीण परिस्थितीत आपल्या भाऊबहिणींसोबत राहून आपण अरिस्तार्खसारखी एकनिष्ठता दाखवू शकतो (परिच्छेद ४-५ पाहा) *

४. अरिस्तार्खने कशा प्रकारे दाखवून दिलं की तो पौलचा एकनिष्ठ मित्र होता?

अरिस्तार्ख मासेदोनियात असलेल्या थेस्सलनीका या शहरातला होता. तो प्रेषित पौलचा एक विश्‍वासू मित्र होता हे त्याने आपल्या कार्यांवरून दाखवून दिलं. पौल तिसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यावर असताना इफिसमध्ये गेला तेव्हा त्याने पहिल्यांदा अरिस्तार्खचा उल्लेख केला. अरिस्तार्ख जेव्हा पौलसोबत होता तेव्हा लोकांच्या एका जमावाने त्याला घेरलं. (प्रे. कार्ये १९:२९) पण नंतर जेव्हा त्यांची सुटका झाली तेव्हा त्याने स्वतःच्या सुरक्षेची चिंता केली नाही. तो खरंतर पौलला सोडून जाऊ शकला असता पण तरी तो त्याच्यासोबत राहिला. मग काही महिन्यांनंतर पौल ग्रीसमध्ये असताना विरोधक त्याला मारण्याची संधी शोधत होते, तेव्हासुद्धा अरिस्तार्ख त्याला सोडून गेला नाही. (प्रे. कार्ये २०:२-४) इ. स. ५८ दरम्यान पौलला कैदी म्हणून रोमला पाठवण्यात आलं तेव्हाही अरिस्तार्ख त्याच्यासोबत होता. या लांबच्या प्रवासादरम्यान त्यांचं जहाज फुटलं तेव्हा त्या दोघांनी या समस्येचा धीराने सामना केला. (प्रे. कार्ये २७:१, २, ४१) रोममध्ये पोहोचल्यावर पौल कैदेत होता तेव्हाही अरिस्तार्ख त्याच्यासोबत काही काळासाठी कैदेत असावा. (कलस्सै. ४:१०) अरिस्तार्ख आपल्यासोबत आहे यामुळे पौलला नक्कीच प्रोत्साहन आणि सांत्वन मिळालं असेल यात काहीच शंका नाही.

५. नीतिसूत्रे १७:१७ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण एकनिष्ठ मित्र असल्याचं कसं दाखवून देऊ शकतो?

आपणही अरिस्तार्खसारखं आपल्या भाऊबहिणींसोबत एकनिष्ठ राहू शकतो. परिस्थिती चांगली असते फक्‍त तेव्हाच नाही तर ‘विपत्काली’ म्हणजेच दुःखाच्या प्रसंगीही आपण त्यांना एकनिष्ठ राहिलं पाहिजे. (नीतिसूत्रे १७:१७ वाचा.) समस्यांचा सामना करून बराच काळ उलटला असला तरी आपल्या भाऊबहिणींना सांत्वनाची गरज पडू शकते. फ्रांसिना * नावाच्या एका बहिणीच्या आईवडिलांना कॅन्सर झाला होता. आधी तिचे वडील वारले आणि त्यानंतर तीन महिन्यांनी तिची आई वारली. फ्रांसिना म्हणते: “मला वाटतं की जीवनात कठीण प्रसंग येतात तेव्हा त्याचा परिणाम बऱ्‍याच काळापर्यंत राहू शकतो. माझ्या आईवडिलांना जाऊन आता तसे बरेच दिवस झाले आहेत; असं असलं तरी माझ्या काही मित्रांना जाणीव आहे की मी अजूनही ते दुःख विसरलेले नाही. आणि या कठीण काळात ते माझ्यासोबत राहिले, या गोष्टीमुळे मला खरंच खूप दिलासा मिळतो.”

६. एकनिष्ठ असल्यामुळे आपल्याला काय करण्याची प्रेरणा मिळेल?

आपल्याला भाऊबहिणींना मदत करता यावी म्हणून एकनिष्ठ मित्र बरेचसे त्याग करतात. उदाहरणार्थ, पिटर नावाच्या बांधवाला समजलं की त्यांना एक असा आजार झाला आहे जो वाढतच जाणार आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होईल. त्यांची पत्नी कॅथरीन म्हणते: “आमच्या मंडळीतल्या एका जोडप्याने आम्हाला डॉक्टरकडे नेलं होतं, तिथेच आम्हाला पीटरच्या या आजारपणाबद्दल कळलं. त्या जोडप्याने तेव्हाच ठरवलं की ते या कठीण परिस्थितीत आम्हाला एकटं सोडणार नाहीत. जेव्हापण आम्हाला त्यांची गरज होती तेव्हा ते आमच्यासोबत होते.” खरंच, परीक्षेच्या काळात खऱ्‍या मित्रांनी आपल्यासोबत असणं किती सांत्वन देणारं आहे!

तुखिकसारखं भरवशालायक राहा

इतरांना जेव्हा समस्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आपण तुखिकसारखं भरवशालायक मित्र असल्याचं दाखवू शकतो (परिच्छेद ७-९ पाहा) *

७-८. कलस्सैकर ४:७-९ या वचनांनुसार तुखिक पौलचा भरवशालायक मित्र होता हे त्याने कशा प्रकारे दाखवून दिलं?

आशियामधल्या रोमी प्रांतातला तुखिक हा पौलचा एकनिष्ठ मित्र होता. (प्रे. कार्ये २०:४) इ. स. ५५ च्या आसपास पौलने जेव्हा यहूदीयामधल्या बांधवांची मदत करण्यासाठी दान गोळा करण्याची व्यवस्था केली, तेव्हा या महत्त्वाच्या कामात मदत करण्यासाठी त्याने तुखिकची निवड केली असावी. (२ करिंथ. ८:१८-२०) नंतर पौलला पहिल्यांदा रोममध्ये कैद करण्यात आलं तेव्हा तुखिकने त्याच्यासाठी संदेश पोहोचवण्याचं काम केलं. पौलने आशियातल्या बांधवांना प्रोत्साहनदायक संदेश आणि पत्रं लिहिली, तेव्हा तुखिकने ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली.—कलस्सै. ४:७-९.

तुखिक नेहमी पौलला विश्‍वासू राहिला. (तीत ३:१२) पण पहिल्या शतकातले सर्वच ख्रिस्ती तुखिकसारखे भरवशालायक नव्हते. इ. स. ६५ च्या दरम्यान पौलला जेव्हा दुसऱ्‍यांदा कैद करण्यात आलं तेव्हा त्याने म्हटलं की आशिया प्रांतातले बरेच ख्रिस्ती बांधव विरोधकांच्या भीतीमुळे त्याच्यासोबत संगती करायचं टाळत होते. (२ तीम. १:१५) पण याच्या अगदी उलट तुखिक हा भरवशालायक मित्र होता आणि म्हणून पौलने त्याला आणखी एक नेमणूक दिली. (२ तीम. ४:१२) खरंच, पौलने नक्कीच या गोष्टीची कदर केली असेल की त्याच्याकडे तुखिकसारखा भरवशालायक मित्र होता!

९. आपण तुखिकचं अनुकरण कसं करू शकतो?

आपण तुखिकचं अनुकरण करून एक भरवशालायक मित्र बनू शकतो. उदाहरणार्थ, आपल्या भाऊबहिणींना गरज असते तेव्हा आपण त्यांना फक्‍त मदत करण्याचं वचन देणार नाही, तर व्यावहारिक मार्गांनी मदतही करू. (मत्त. ५:३७; लूक १६:१०) गरज असलेल्या भाऊबहिणींना जेव्हा कळतं की आपण त्यांना खरंच मदत करायला तयार आहोत तेव्हा त्यांना खूप सांत्वन मिळतं. असं आपण का म्हणू शकतो? याबद्दल एक बहीण म्हणते: “ज्या व्यक्‍तीने तुम्हाला मदत करण्याचं वचन दिलं आहे, ती खरंच वेळेवर तुम्हाला मदत करेल की नाही, या गोष्टीची चिंता करायची तुम्हाला गरज नसते.”

१०. नीतिसूत्रे १८:२४ या वचनात सांगितल्याप्रमाणे परीक्षेचा आणि निराशेचा सामना करणाऱ्‍या लोकांना कोणाकडून सांत्वन मिळू शकतं?

१० परीक्षेचा किंवा निराशेचा सामना करणाऱ्‍या व्यक्‍तीने जर एखाद्या विश्‍वासू मित्राकडे तिचं मन मोकळं केलं तर तिला सांत्वन मिळू शकतं. (नीतिसूत्रे १८:२४ वाचा.) बिजय नावाच्या बांधवाच्या मुलाला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं तेव्हा ते खूप निराश झाले. ते म्हणतात: “मला माझ्या भावना एका अशा व्यक्‍तीला सांगायच्या होत्या जिच्यावर मी भरवसा ठेवू शकेन.” कारलोस नावाच्या बांधवाच्या हातून चूक घडल्यामुळे मंडळीतल्या जबाबदाऱ्‍या त्याने गमावल्या. याबद्दल तो म्हणतो: “मला अशा व्यक्‍तीसमोर माझं मन मोकळं करायचं होतं जी माझ्याबद्दल चुकीचं मत बनवणार नाही.” कारलोसला मंडळीतल्या वडिलांकडून ही मदत मिळाली आणि त्यांनी त्याला त्याच्या समस्येतून बाहेर पडायला मदत केली. वडील त्याच्याशी सुज्ञपणे वागले आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेबद्दल त्यांनी इतरांना सांगितलं नाही. यामुळे कारलोसला खूप दिलासा मिळाला.

११. तुम्ही एक भरवशालायक मित्र कसे बनू शकता?

११ आपण एक भरवशालायक मित्र बनण्यासाठी आणि समोरच्याने त्याचं मन आपल्याजवळ मोकळं करण्यासाठी आपल्याला धीराचा गुण विकसित करणं गरजेचं आहे. झॉना नावाच्या बहिणीचा विचार करा. तिचे पती तिला सोडून गेले तेव्हा तिने तिच्या भावना तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगितल्या. असं केल्यामुळे तिला खूप सांत्वन मिळालं. ती म्हणते: “मी सारखी-सारखी त्यांना एकच गोष्ट सांगायचे, पण प्रत्येक वेळी त्यांनी धीर धरला आणि माझं ऐकून घेतलं.” तुम्हीही एक चांगले मित्र बनू शकता पण त्यासाठी तुम्हाला इतरांचं लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे.

मार्कसारखी स्वेच्छेने सेवा करा

मार्कने केलेल्या मदतीमुळे पौल समस्यांचा धीराने सामना करू शकला, त्याच प्रकारे आपण भाऊबहिणींना कठीण परिस्थितीत मदत करू शकतो (परिच्छेद १२-१४ पाहा) *

१२. मार्क कोण होता आणि त्याने स्वेच्छेने सेवा करण्याची वृत्ती कशी दाखवली?

१२ मार्क हा यरुशलेममध्ये राहणारा यहुदी ख्रिस्ती होता. त्याचा चुलत भाऊ बर्णबा हा मिशनरी होता आणि त्याला अनेक भाऊबहीण ओळखायचे. (कलस्सै. ४:१०) असं दिसून येतं की मार्कच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती, पण तरी त्याने पैसा आणि ऐशआरामाच्या गोष्टींना प्राधान्य दिलं नाही. मार्कने संपूर्ण आयुष्य स्वेच्छेने सेवा करण्याची वृत्ती दाखवली. इतरांची सेवा करण्यात त्याला आनंद मिळायचा. उदाहरणार्थ, प्रेषित पौल आणि प्रेषित पेत्र जेव्हा त्यांची नेमणूक पार पाडत होते, तेव्हा मार्कने अनेक वेळा त्यांच्यासोबत राहून काम केलं. तसंच, त्याने त्यांच्या इतर गरजांसाठी जसं की अन्‍न विकत घेणं, राहण्यासाठी ठिकाण शोधणं आणि इतर गोष्टींसाठी त्यांना मदत केली. (प्रे. कार्ये १३:२-५; १ पेत्र ५:१३) पौलने मार्कबद्दल म्हटलं की देवाच्या सेवेत तो त्याचा “सहकारी” आहे आणि तो त्याच्यासाठी ‘धीर देणारा साहाय्यक’ ठरला.—कलस्सै. ४:१०, ११, तळटीप पाहा.

१३. पौलला मार्कने केलेल्या विश्‍वासू सेवेची कदर होती हे २ तीमथ्य ४:११ या वचनातून कसं कळतं?

१३ मार्क पौलचा जवळचा मित्र बनला. उदाहरणार्थ, इ. स. ६५ मध्ये पौलला शेवटच्या वेळी रोममध्ये कैद करण्यात आलं तेव्हा त्याने तीमथ्यला दुसरं पत्र लिहिलं. त्या पत्रात पौलने तीमथ्यला सांगितलं की त्याने मार्कला त्याच्यासोबत घेऊन यावं. (२ तीम. ४:११) पौलला मार्कने केलेल्या विश्‍वासू सेवेबद्दल कदर होती आणि यामुळे त्याने त्या महत्त्वाच्या प्रसंगी मार्कला बोलवून घेतलं. मार्कने बऱ्‍याच मार्गांनी पौलला मदत केली, जसं की अन्‍न आणून देणं किंवा लिखाणासाठी गुंडाळ्या व शाई आणून देणं. पौलला मिळालेल्या मदतीमुळे आणि प्रोत्साहनामुळे त्याला शेवटच्या श्‍वासापर्यंत, म्हणजे मृत्युदंड मिळणार होता तोपर्यंत धीर धरण्यासाठी मदत झाली.

१४-१५. इतरांना व्यावहारिक मार्गांनी मदत करण्याबद्दल आपल्याला मत्तय ७:१२ या वचनातून काय शिकायला मिळतं?

१४ मत्तय ७:१२ वाचा. आपण जेव्हा कठीण परिस्थितीतून जात असतो तेव्हा इतरांकडून व्यावहारिक मार्गांनी मदत मिळणं ही खरंच खूप दिलासा देणारी गोष्ट असते. रायन नावाच्या बांधवाचा विचार करा. त्याच्या वडिलांचा एका भयानक अपघातात मृत्यू झाला. तो म्हणतो: “आपण कठीण परिस्थितीतून जात असतो तेव्हा दररोजची कामं करणंही अशक्य वाटू लागतं. पण जेव्हा कोणीतरी आपल्याला व्यावहारिक मार्गांनी मदत करतं, मग ती थोड्या प्रमाणात का असेना, त्यामुळे आपल्याला खूप सांत्वन मिळतं.”

१५ आपण आपल्या भाऊबहिणींच्या परिस्थितीवर लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना व्यावहारिक रीतीने मदत करण्याचे आपल्याला बरेच मार्ग सापडतील. उदाहरणार्थ, आधी उल्लेख केलेले पिटर आणि कॅथरीन यांचा विचार करा. त्यांना डॉक्टरांना भेटायचं असायचं तेव्हा एका बहिणीने त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. पिटर आणि कॅथरीन यांना गाडी चालवणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांना येण्याजाण्यासाठी मंडळीतल्या ज्या भाऊबहिणींना मदत करण्याची इच्छा होती त्यांचा त्या बहिणीने आराखडा बनवला. यामुळे खरंच काही फायदा झाला का? कॅथरीन म्हणते: “आम्हाला वाटलं जणू आमच्या खांद्यावरून कोणीतरी खूप मोठं ओझं खाली ठेवलं आहे.” तेव्हा, नेहमी लक्षात असू द्या की आपण जरी लहान गोष्टींद्वारे इतरांना मदत केली तरी त्यांना खूप सांत्वन मिळू शकतं.

१६. इतरांना सांत्वन देण्याबद्दल आपण मार्कच्या उदाहरणावरून कोणता महत्त्वाचा धडा शिकतो?

१६ यात काहीच शंका नाही की पहिल्या शतकातला मार्क हा त्याच्या नेमणुकींमध्ये खूप व्यस्त होता. त्याच्यावर बऱ्‍याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या होत्या, जसं की त्याने त्याचं नाव असलेलं शुभवर्तमानाचं पुस्तक लिहिलं. असं असलं तरी पौलला दिलासा देण्यासाठी मार्कने वेळ काढला. आणि त्यामुळे पौलला माहीत होतं की तो मार्ककडे नि:संकोचपणे मदत मागू शकत होता. अँजेलाच्या परिस्थितीचा विचार करा. तिच्या आजीला क्रूरपणे मारण्यात आलं होतं. त्या वेळी ज्या लोकांनी तिचं सांत्वन केलं त्यांच्याबद्दल तिला खूप कदर वाटते. ती म्हणते: “जेव्हा मित्रांना आपल्याला मनापासून मदत करायची इच्छा असते, तेव्हा त्यांच्याशी बोलणं आपल्याला सोपं जातं. यामुळे कळतं की ते अगदी नि:संकोचपणे आपल्याला मदत करायला तयार आहेत.” आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मी भाऊबहिणींना व्यावहारिक मार्गांनी मदत करायला आणि त्यांना सांत्वन द्यायला तयार असतो असं इतरांचं माझ्याबद्दल मत आहे का?’

इतरांना सांत्वन देण्याचा निश्‍चय करा

१७. २ करिंथकर १:३, ४ या वचनांवर मनन केल्यामुळे आपल्याला इतरांना सांत्वन देण्याची प्रेरणा कशी मिळू शकते?

१७ कोणत्या भाऊबहिणींना मदतीची आणि सांत्वनाची गरज आहे हे ओळखणं इतकं कठीण नाही. आपलं सांत्वन करण्यासाठी इतर भाऊबहिणी आपल्याशी जसं बोलले तसंच आपणही निराश झालेल्यांशी बोलून त्यांचं सांत्वन करू शकतो. निनो नावाच्या बहिणीच्या आजीचा मृत्यू झाला. निनो म्हणते: “आपण जर स्वतःला यहोवाच्या हाती सोपवून दिलं तर इतरांचं सांत्वन करण्यासाठी तो आपला वापर करू शकतो.” (२ करिंथकर १:३, ४ वाचा.) आधी उल्लेख केलेली फ्रांसिना म्हणते: “२ करिंथकर १:४ या वचनात दिलेला शब्द न्‌ शब्द खरा आहे. आपल्याला जसं सांत्वन मिळालं आहे तसं सांत्वन आपण इतरांनाही देऊ शकतो.”

१८. (क) इतरांना सांत्वन देण्याची काहींना भीती का वाटू शकते? (ख) आपण इतरांचं चांगल्या प्रकारे सांत्वन कसं करू शकतो? उदाहरण द्या.

१८ आपल्याला इतरांना मदत करण्याची भीती वाटत असली तरी आपण त्यांना मदत करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजे. उदाहरणार्थ, सांत्वनाची गरज असलेल्या व्यक्‍तीशी काय बोलावं किंवा तिला कशी मदत करावी हे माहीत नसल्यामुळे आपल्याला भीती वाटू शकते. आपण पौल नावाच्या बांधवाचं उदाहरण पाहू या. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा काही जणांनी त्याला सांत्वन देण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्याबद्दल तो म्हणतो: “मी समजू शकतो की त्यांना मला भेटणं आणि माझ्याशी बोलणं खरंच खूप कठीण गेलं असेल. त्या वेळी माझ्याशी नेमकं काय बोलावं हे त्यांना समजत नव्हतं. पण त्यांनी माझं सांत्वन करण्याची आणि मला मदत करण्याची इच्छा दाखवली, याची मी आजही कदर करतो.” ताहोन नावाच्या दुसऱ्‍या एका बांधवाचं आपण उदाहरण पाहू या. तो जिथे राहायचा त्या ठिकाणी एकदा तीव्र भूकंप आला होता. याबद्दल तो आठवून म्हणतो: “भूकंप झाल्यानंतर बऱ्‍याच लोकांनी मला मेसेजेस पाठवले. पण खरं सांगायचं तर ते जे काही बोलले ते सर्वच मला आठवत नाही. पण एक गोष्ट मात्र मला नक्की आठवते की मी सुरक्षित आहे की नाही, याबद्दल त्यांनी माझी विचारपूस केली.” खरंच, आपल्यात जर मदत करण्याची वृत्ती असेल तर आपण इतरांचं चांगल्या प्रकारे सांत्वन करू शकतो.

१९. तुम्ही इतरांना चांगल्या प्रकारे “सांत्वन” देण्याचा निर्धार का केला आहे?

१९ आपण जसजसं जगाच्या अंताच्या जवळ जात आहोत, तसतसं जगाची परिस्थिती आणखी खराब होत जाईल आणि जीवन जगणंही कठीण होत जाईल. (२ तीम. ३:१३) तसंच, वारशाने मिळालेलं पाप आणि अपरिपूर्णता यांमुळे येणाऱ्‍या समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला पुढेही सांत्वनाची गरज असेल. प्रेषित पौल त्याच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत परीक्षांचा धीराने सामना करू शकला. याचं एक कारणं म्हणजे, ख्रिस्ती बांधवांकडून त्याला मिळालेलं सांत्वन. तेव्हा आपण अरिस्तार्खसारखं एकनिष्ठ राहण्याचा, तुखिकसारखं भरवशालायक असण्याचा आणि मार्कसारखी स्वेच्छेने सेवा करण्याचा निश्‍चय करू या. असं केल्यामुळे आपण आपल्या भाऊबहिणींना विश्‍वासात टिकून राहण्यासाठी मदत करत असू.—१ थेस्सलनी. ३:२, ३.

^ परि. 5 प्रेषित पौलने त्याच्या जीवनात बऱ्‍याच समस्यांचा सामना केला. या कठीण काळात काही बांधवांकडून त्याला खूप सांत्वन मिळालं. त्या बांधवांमध्ये कोणते असे तीन विशिष्ट गुण होते ज्यामुळे ते इतरांचं चांगल्या प्रकारे सांत्वन करू शकले, याबद्दल आपण या लेखात चर्चा करणार आहोत. तसंच, आपण त्या बांधवांचं कसं अनुकरण करू शकतो हेही आपण या लेखात पाहणार आहोत.

^ परि. 5 या लेखात काही नावं बदलण्यात आली आहेत.

गीत २८ नवे गीत

^ परि. 56 चित्रांचं वर्णन: जहाज फुटलं तेव्हा अरिस्तार्ख आणि पौल यांनी त्या कठीण परिस्थितीचा सोबत मिळून सामना केला.

^ परि. 58 चित्रांचं वर्णन: पौलने लिहिलेली पत्रं मंडळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुखिकला देण्यात आलं होतं.

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: मार्कने व्यावहारिक मार्गांनी पौलला मदत केली.