व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३

यहोवा तुम्हाला मौल्यवान लेखतो!

यहोवा तुम्हाला मौल्यवान लेखतो!

“ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली.”—स्तो. १३६:२३.

गीत ३८ आपला भार यहोवावर टाक

सारांश *

१-२. यहोवाचे सेवक कोणत्या परिस्थितींचा सामना करतात, आणि त्यामुळे त्यांच्यावर कोणता परिणाम होऊ शकतो?

पुढे दिलेल्या तीन साक्षीदारांच्या परिस्थितीचा विचार करा: १) एका तरुण बांधवाला गंभीर आजार झाला आहे. २) ५० पेक्षा जास्त वय असलेले एक मेहनती बांधव आपली नोकरी गमावतात आणि बरेच प्रयत्न करूनही त्यांना दुसरी नोकरी मिळत नाही. ३) एका विश्‍वासू बहिणीला आपल्या वाढत्या वयामुळे यहोवाच्या सेवेत आधीसारखी जास्त सेवा करता येत नाही.

तुम्ही वर दिलेल्या परिस्थितींपैकी कोणत्या एका परिस्थितीचा सामना करत असाल तर तुम्हाला कदाचित वाटेल की ‘मी आता काहीच कामाचा नाही.’ अशा परिस्थितींमुळे आपण आपला आनंद आणि आत्मसन्मान गमावू शकतो. तसंच, यहोवासोबतचा आणि इतरांसोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो.

३. सैतान आणि त्याच्या प्रभावाखाली असलेल्यांना मानवांच्या जीवनाबद्दल काय वाटतं?

जीवनाबद्दल जगातल्या लोकांचा दृष्टिकोन सैतानासारखा आहे. सैतानाने मानवांना कधीही मौल्यवान लेखलं नाही. सैतान हव्वाशी निर्दयीपणे वागला आणि तिला सांगितलं की देवाची आज्ञा मोडल्यामुळे तिला स्वातंत्र्य मिळेल. पण त्याला माहीत होतं की असं केल्याने तिला मृत्युदंडाची शिक्षा होईल. सैतानाने नेहमी व्यापारी, राजनैतिक आणि धार्मिक संघटनांना आपल्या ताब्यात ठेवलं आहे. म्हणून जेव्हा अनेक व्यापारी, राजनैतिक नेते आणि धार्मिक पुढारी मानवांच्या जीवनाला क्षुल्लक लेखतात आणि त्यांच्या भावनांची कदर करत नाहीत तेव्हा आपल्याला त्याचं आश्‍चर्य वाटत नाही.

४. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

पण याउलट यहोवाची इच्छा आहे की आपण स्वतःला कमी लेखू नये तर मौल्यवान लेखावं. तसंच, तो आपल्याला अशा परिस्थितींचा सामना करायला मदत करतो, ज्यांमुळे आपल्यात कमीपणाची भावना येऊ शकते. (स्तो. १३६:२३; रोम. १२:३) यहोवा आपल्याला पुढे दिलेल्या परिस्थितींचा सामना करण्यासाठी कशी मदत करू शकतो याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. त्या परिस्थिती म्हणजे: (१) आजारपण (२) आर्थिक समस्या आणि (३) वाढत्या वयामुळे यहोवाची सेवा जास्त न करता येणं. पण सर्वात आधी आपण पाहू या की यहोवा आपल्यापैकी प्रत्येकाला मौल्यवान लेखतो याबद्दल आपण खातरी का बाळगू शकतो.

यहोवा आपल्याला मौल्यवान लेखतो

५. यहोवा आपल्याला मौल्यवान लेखतो हे आपण कशावरून म्हणू शकतो?

आपल्याला जरी मातीपासून बनवलं असलं तरी यहोवा आपल्याला क्षुल्लक लेखत नाही, तर त्या मातीपेक्षा कित्येक पटीने मौल्यवान लेखतो. (उत्प. २:७) यहोवा आपल्याला मौल्यवान का लेखतो याची आता आपण काही कारणं पाहू या. त्याने मानवांना अशा प्रकारे निर्माण केलं आहे की आपण त्याचे गुण प्रदर्शित करू शकतो. (उत्प. १:२७) असं करून देवाने पृथ्वीवरच्या इतर सृष्टीपेक्षा आपल्याला श्रेष्ठ बनवलं आहे. तसंच, त्याने पृथ्वीची आणि प्राण्यांची देखरेख करण्याचा अधिकारही आपल्याला दिला आहे.—स्तो. ८:४-८.

६. यहोवा अपरिपूर्ण मानवांना मौल्यवान लेखतो याचा आणखी एक कोणता पुरावा आहे?

आदामने पाप केलं तरी यहोवाने मानवांना नेहमीच मौल्यवान लेखलं. इतकं की त्याने आपल्या पापांसाठी त्याच्या प्रिय पुत्राला, येशूला खंडणी म्हणून पृथ्वीवर पाठवलं. (१ योहा. ४:९, १०) यहोवा आदामच्या पापामुळे मरण पावलेल्या “नीतिमान आणि अनीतिमान” लोकांचं येशूच्या खंडणीच्या आधारावर पुनरुत्थान करेल. (प्रे. कार्ये २४:१५) बायबल सांगतं की आपण देवाच्या नजरेत मौल्यवान आहोत. मग आपण आजारी, गरीब किंवा वयोवृद्ध असलो तरीही.—प्रे. कार्ये १०:३४, ३५.

७. देव आपल्याला मौल्यवान समजतो याचे आपल्याकडे आणखी कोणते पुरावे आहेत?

यहोवाने आपल्याला मौल्यवान लेखण्याची आपल्याकडे बरीचशी कारणं आहेत. ती म्हणजे, त्याने आपल्याला स्वतःकडे आकर्षित केलं आहे आणि आनंदाच्या संदेशाला आपण कसा प्रतिसाद दिला हेही त्याने पाहिलं आहे. (योहा. ६:४४) जसजसं आपण यहोवाच्या जवळ जायला सुरुवात केली, तसतसं तोही आपल्याजवळ येऊ लागला. (याको. ४:८) यहोवा आपल्याला मौल्यवान लेखत असल्यामुळे तो आपल्याला शिकवण्यासाठी वेळ आणि शक्‍ती खर्च करतो. आपलं व्यक्‍तिमत्त्व कसं आहे हे माहीत असण्यासोबतच, आपण स्वतःमध्ये कोणते सुधार करू शकतो हेही त्याला माहीत आहे. तसंच, त्याचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे तो आपल्याला शिस्तसुद्धा लावतो. (नीति. ३:११, १२) खरंच, यहोवा आपल्याला मौल्यवान लेखतो याचे हे किती ठोस पुरावे आहेत!

८. आपण सामना करत असलेल्या समस्यांबद्दल स्तोत्र १८:२७-२९ ही वचनं आपल्याला योग्य दृष्टिकोन ठेवायला कशी मदत करतात?

काही जणांनी दावीद राजाला कमी लेखलं तरी त्याला जाणीव होती की यहोवा त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याला मदतही करतो. यामुळे दावीद योग्य दृष्टिकोन ठेवून समस्यांचा सामना करू शकला. (२ शमु. १६:५-७) जेव्हा आपण निराश होतो किंवा आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो, तेव्हा यहोवा परिस्थितीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी आपल्याला मदत करतो. आणि त्याच्या मदतीने आपण उंच ‘भिंतींसारख्या’ समस्यांना पार करू शकतो. (स्तोत्र १८:२७-२९ वाचा.) * आपल्याला जेव्हा यहोवाचा पाठिंबा असतो तेव्हा त्याची सेवा आनंदाने करण्यापासून कोणीही आपल्याला रोखू शकत नाही. (रोम. ८:३१) यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याला मौल्यवान लेखतो. ही गोष्ट आपण खासकरून कोणत्या तीन विशिष्ट परिस्थितींमध्ये लक्षात ठेवली पाहिजे यावर आता आपण चर्चा करू या.

आपण आजारी पडतो तेव्हा

देवाचं प्रेरित वचन वाचल्याने आपल्याला आजारपणामुळे येणाऱ्‍या नकारात्मक भावनांशी लढायला मदत होईल (परिच्छेद ९-१२ पाहा)

९. आजारामुळे स्वतःकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर कसा परिणाम होतो?

आजारपणामुळे आपण भावनिक रीत्या खचून जाऊ शकतो आणि ‘आपण आता काहीच कामाचे नाही’ असं आपल्याला वाटू शकतं. आपल्या दुर्बलता इतरांच्या लक्षात येतात किंवा मदतीसाठी आपल्याला इतरांवर अवलंबून राहावं लागतं तेव्हा आपल्या दयनीय स्थितीमुळे आपल्याला अवघडल्यासारखं वाटू शकतं. इतरांना जरी आपल्या आजारपणाबद्दल माहीत नसलं तरी आपल्या मनात नकारात्मक भावना येऊ शकतात. कारण आधी ज्या गोष्टी आपण करायचो त्यांपैकी काही गोष्टी आता आपल्याला जमत नसतील. असं असलं तरी अशा दुःखद प्रसंगी यहोवा आपल्याला प्रोत्साहन देतो. हे तो कसं करतो?

१०. नीतिसूत्रे १२:२५ या वचनानुसार आजारपणाचा सामना करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

१० आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा “गोड शब्द” किंवा दिलासा देणारे शब्द आपल्या मनाला उभारी देऊ शकतात. (नीतिसूत्रे १२:२५ वाचा.) यहोवाने बायबलमध्ये दिलासा देणारे शब्द लिहून ठेवले आहेत. यामुळे आपल्याला कळतं की आपण जरी आजारी असलो तरी आपण त्याच्या नजरेत मौल्यवान आहोत. (स्तो. ३१:१९; ४१:३) आपल्याला सांत्वन देणारे देवाचे प्रेरित शब्द आपण जर सतत वाचत राहिलो, तर यहोवा आपल्याला आजारपणामुळे येणाऱ्‍या नकारात्मक भावनांशी लढा द्यायला मदत करेल.

११. एका बांधवाला यहोवाने कशी मदत केली?

११ होर्हे नावाच्या बांधवाच्या अनुभवाचा विचार करा. तरुण असताना त्यांना गंभीर आजार झाला आणि तो पुढे जाऊन वाढतच गेला. यामुळे त्यांना वाटू लागलं की ‘आता मी काहीच कामाचा नाही.’ ते म्हणतात: “आजारामुळे इतरांचं लक्ष माझ्याकडे जायचं आणि मला अवघडल्यासारखं वाटायचं; या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मी तयार नव्हतो.” ते पुढे म्हणतात: “माझी तब्येत आणखी खराब होऊ लागली आणि मला प्रश्‍न पडू लागला की पुढे माझं जीवन कसं असेल. मी पूर्णपणे हादरून गेलो आणि मी कळकळून यहोवाला प्रार्थना केली.” अशा परिस्थितीत यहोवाने त्यांना कशी मदत केली? ते म्हणतात: “मला कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं कठीण जायचं. त्यामुळे मला प्रोत्साहन देण्यात आलं की मी स्तोत्र पुस्तकातले लहान-लहान भाग वाचावेत. स्तोत्र या पुस्तकात यहोवा आपल्या सेवकांची काळजी कशी घेतो याबद्दल सांगितलं आहे. मी प्रत्येक दिवशी त्यातली काही वचनं पुन्हा-पुन्हा वाचायचो आणि त्यामुळे मला सांत्वन मिळालं. काही काळाने इतरांच्या लक्षात आलं की आता माझा चेहरा उदास नाही तर आनंदी दिसतो आणि त्यांना माझ्या या सकारात्मक मनोवृत्तीमुळे प्रोत्साहन मिळालं आहे. यहोवाने माझी प्रार्थना ऐकली याची मला जाणीव झाली! स्वतःकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टिकोनात बदल करायला त्याने मला मदत केली आहे. यहोवाचं वचन वाचत असताना मी खासकरून याकडे लक्ष देऊ लागलो की मी आजारी असलो तरी यहोवा मला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो.”

१२. आजारपणाचा सामना करत असताना आपण यहोवाची मदत कशी अनुभवू शकतो?

१२ तुम्ही आजारपणाचा सामना करत असाल तर तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात हे यहोवाला माहीत आहे याची खातरी बाळगा. तुमच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला योग्य दृष्टिकोन बाळगता यावा यासाठी यहोवाला कळकळून प्रार्थना करा. यहोवाकडून सांत्वन मिळावं यासाठी बायबल वाचा. बायबलमधल्या अशा वचनांवर लक्ष केंद्रित करा, ज्यांवरून आपल्याला कळतं की यहोवा आपल्या सेवकांना मौल्यवान लेखतो. असं करत असताना तुम्हाला दिसून येईल की जे यहोवाला विश्‍वासू राहतात त्यांच्यावर त्याचं प्रेम असतं.—स्तो. ८४:११.

आर्थिक समस्यांचा सामना करतो तेव्हा

प्रयत्न करूनही नोकरी मिळवणं कठीण जातं तेव्हा ‘यहोवा आपल्या गरजा पुरवेल’ हे अभिवचन लक्षात ठेवल्याने आपल्याला धीर धरायला मदत होईल (परिच्छेद १३-१५ पाहा)

१३. नोकरी गमावल्यामुळे एका कुटुंबप्रमुखाला कसं वाटू शकतं?

१३ प्रत्येक कुटुंबप्रमुखाची इच्छा असते की त्याला त्याच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात. एका परिस्थितीचा विचार करा: समजा एका बांधवाची काहीही चूक नसताना त्याला आपली नोकरी गमवावी लागते. तो दुसरी नोकरी मिळवण्यासाठी खूप धडपड करतो, पण त्याला त्यात काही यश मिळत नाही. या परिस्थितीत त्याला वाटू शकतं की ‘आपण काहीच कामाचे नाही.’ मग, अशा वेळी यहोवाच्या अभिवचनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे या बांधवाला कशी मदत होऊ शकते?

१४. यहोवा आपली अभिवचनं कोणत्या कारणांमुळे पूर्ण करतो?

१४ यहोवा नेहमी आपली अभिवचनं पूर्ण करतो. (यहो. २१:४५; २३:१४) आणि याची अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे, तो आपल्या नावासाठी त्याचं अभिवचन पूर्ण करतो. त्याने तसं केलं नाहीतर त्याच्या नावाला दोष लागू शकतो. यहोवाने अभिवचन दिलं आहे की तो आपल्या विश्‍वासू सेवकांची काळजी घेईल आणि असं करणं तो त्याचं कर्तव्य समजतो. (स्तो. ३१:१-३) तसंच, यहोवा आपल्या सेवकांना त्याच्या कुटुंबाचे सदस्य समजतो. जर त्याने आपली काळजी घेतली नाही तर आपल्याला खूप दुःख होईल आणि आपण निराश होऊ हे यहोवाला माहीत आहे. तो आपल्या शारीरिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करेल असं अभिवचन तो आपल्याला देतो. आणि कोणतीही गोष्ट त्याचं अभिवचन पूर्ण करण्यापासून त्याला रोखू शकत नाही!—मत्त. ६:३०-३३; २४:४५.

१५. (क) पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागला? (ख) स्तोत्र ३७:१८, १९ या वचनांतून आपल्याला कोणती खातरी मिळते?

१५ यहोवा आपली अभिवचनं का पूर्ण करतो हे जेव्हा आपण लक्षात ठेवतो तेव्हा आपल्याला आर्थिक समस्यांचा धैर्याने सामना करणं शक्य होतं. पहिल्या शतकाच्या ख्रिश्‍चनांचा विचार करा. यरुशलेमच्या मंडळीला तीव्र छळाचा सामना करावा लागला तेव्हा “प्रेषितांशिवाय बाकी सर्व जण . . . विखुरले गेले.” (प्रे. कार्ये ८:१) विचार करा की त्यामुळे काय झालं असेल! ख्रिश्‍चनांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. त्यांना आपलं घर आणि नोकरीधंदा गमावावा लागला. पण यहोवाने त्यांना सोडलं नाही आणि त्यांनीही आपला आनंद गमावला नाही. (प्रे. कार्ये ८:४; इब्री १३:५, ६; याको. १:२, ३) यहोवाने त्या विश्‍वासू ख्रिश्‍चनांना मदत केली आणि तो आज आपल्यालाही मदत करेल.—स्तोत्र ३७:१८, १९ वाचा.

म्हातारपणामुळे समस्या येतात तेव्हा

आपलं वय वाढत असलं तरी आपण काय करू शकतो यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यामुळे आपल्याला खातरी पटेल की यहोवा आपल्याला आणि आपल्या विश्‍वासू सेवेला मौल्यवान लेखतो (परिच्छेद १६-१८ पाहा)

१६. यहोवा आपल्या सेवेला मौल्यवान लेखत नाही असं कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला वाटू शकतं?

१६ आपलं वय जसजसं वाढत जातं तसतसं आपल्याला वाटू शकतं की आपण यहोवासाठी आता जास्त काही करू शकत नाही. दावीदचं वय वाढत चाललं होतं तेव्हा त्यालाही अशीच चिंता वाटली असावी. (स्तो. ७१:९) पण अशा परिस्थितीत यहोवा आपल्याला कशी मदत करू शकतो?

१७. जेरी नावाच्या बहिणीच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

१७ जेरी नावाच्या वृद्ध बहिणीचा विचार करा. तिला राज्य सभागृहाच्या दुरुस्तीच्या प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं होतं पण तिला तिथे जायची इच्छा नव्हती. ती म्हणते: “माझं वय झालं आहे आणि माझे पती वारले आहेत. माझ्याकडे असं कोणतंच कौशल्य नाही जे मला यहोवासाठी वापरता येईल. खरंतर, माझा काहीच उपयोग नाही.” प्रशिक्षणाला जाण्याच्या आदल्या रात्री तिने तिचं मन प्रार्थनेत यहोवासमोर मोकळं केलं. मग दुसऱ्‍या दिवशी ती जेव्हा राज्य सभागृहात गेली तेव्हाही ती विचार करू लागली की तिने खरंच तिथे यायला हवं होतं का. प्रशिक्षणादरम्यान वक्त्याने एका गोष्टीवर जोर देत म्हटलं, की यहोवाकडून शिकून घेण्याची इच्छा असणं हे आपल्याजवळ असलेलं सर्वात महत्त्वाचं कौशल्य आहे. जेरी म्हणते, “मी विचार केला की ‘माझ्याकडे तर हे कौशल्य आहे!’ यहोवा माझ्या प्रार्थनांचं उत्तर देत होता हे जाणवल्यावर मी रडू लागले. तो मला खातरी करून देत होता की माझ्याजवळ असं काहीतरी आहे जे मी त्याला देऊ शकते आणि तो मला शिकवण्यासाठी तयार आहे.” जीवनात मागे वळून पाहताना जेरी म्हणते: “मी जेव्हा त्या प्रशिक्षणासाठी राज्य सभागृहात गेले तेव्हा मला खूप भीती वाटत होती, निरुत्साही वाटत होतं आणि ‘मी काहीच कामाची नाही’ असंही मला वाटत होतं. पण मी जेव्हा राज्य सभागृहातून बाहेर आले तेव्हा माझा आत्मविश्‍वास वाढला होता, मी प्रोत्साहित झाले होते आणि यहोवा मला मौल्यवान लेखतो हे मला जाणवलं!”

१८. आपलं वय वाढत असलं तरी यहोवा आपल्याला मौल्यवान समजतो हे बायबलमधून कसं कळतं?

१८ आपलं वय वाढत असलं तरी यहोवा त्याच्या कामासाठी आपला उपयोग करून घेईल ही खातरी आपण बाळगू शकतो. (स्तो. ९२:१२-१५) येशूने आपल्याला शिकवलं की आपल्या क्षमता सीमित असल्या किंवा आपण करत असलेली मेहनत आपल्याला खूप कमी वाटत असली तरी आपण यहोवाच्या सेवेत जे काही करतो त्याला तो मौल्यवान लेखतो. (लूक २१:२-४) तेव्हा, तुम्ही काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ, तुम्ही यहोवाबद्दल इतरांना सांगू शकता, बांधवांसाठी प्रार्थना करू शकता आणि त्यांना यहोवाला विश्‍वासू राहण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकता. आपण यहोवाच्या सेवेत खूप काही मिळवलं आहे म्हणून तो आपल्याला त्याचे सहकारी समजतो असं नाही, तर आपल्याला त्याची आज्ञा पाळण्याची इच्छा आहे म्हणून तो आपल्याला त्याचे सहकारी समजतो.—१ करिंथ. ३:५-९.

१९. रोमकर ८:३८, ३९ या वचनांतून आपल्याला कोणती खातरी मिळते?

१९ खरंच, आपण यहोवाचे खूप आभारी आहोत कारण तो त्याची सेवा करणाऱ्‍यांना मौल्यवान लेखतो. त्याने आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बनवलं आहे आणि खऱ्‍या उपासनेमुळे आपल्या जीवनाला अर्थ मिळाला आहे. (प्रकटी. ४:११) हे जग आपल्याला तुच्छ समजत असलं तरी यहोवा आपल्याला मौल्यवान समजतो. (इब्री ११:१६, ३८) आजारपण, आर्थिक समस्या किंवा म्हातारपण यांमुळे आपण निराश होतो, तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की कोणतीही गोष्ट आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही!—रोमकर ८:३८, ३९ वाचा.

^ परि. 5 तुम्ही कधी अशा परिस्थितींचा सामना केला आहे का ज्यांमुळे तुम्हाला कमीपणाची भावना आली? यहोवा तुम्हाला किती मौल्यवान लेखतो याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. तसंच, तुमच्या जीवनात आव्हानात्मक परिस्थिती येते तेव्हा तुम्हाला कमीपणाची भावना येऊ शकते, मग अशा वेळी तुम्ही तुमचा आत्मसन्मान कसा टिकवून ठेवू शकता याबद्दलही या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

^ परि. 8 स्तोत्र १८:२७-२९ (ईजी-टू-रीड-व्हर्शन ): “परमेश्‍वरा, तू दीनांना मदत करतोस पण तू गर्विष्ठांना खाली पाहायला लावतोस. परमेश्‍वरा, तू माझा दिवा लावतोस देव माझ्या भोवतालचा अंधार उजळतो. परमेश्‍वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो. देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो.”

गीत ५१ यहोवाला जडून राहू!