व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परकीय भाषेतील क्षेत्रात सेवा करताना आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवा

परकीय भाषेतील क्षेत्रात सेवा करताना आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवा

“मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे.”—स्तो. ११९:११.

गीत क्रमांक: १८, ४७

१-३. (क) देवाच्या प्रत्येक सेवकानं काय करणं गरजेचं आहे? (ख) नवीन भाषा शिकणाऱ्यांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, आणि त्यामुळे कोणते प्रश्न उभे राहतात? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

बायबलमध्ये अशी भविष्यवाणी करण्यात आली होती, की “प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक” यांना सुवार्ता सांगितली जाईल. (प्रकटी. १४:६) आज हजारो यहोवाचे साक्षीदार ही भविष्यवाणी पूर्ण करण्यात हातभार लावत आहेत. तुम्हीदेखील अशा साक्षीदारांपैकी आहात का जे प्रचारकार्य करण्यासाठी नवीन भाषा शिकून घेत आहेत? आज काही जण मिशनरी म्हणून सेवा करत आहेत, तर काही राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन सेवा करत आहेत. इतर काही असेही आहेत, जे त्यांच्याच क्षेत्रात असलेल्या दुसऱ्या भाषेतील मंडळीमध्ये सेवा करतात.

देवाच्या प्रत्येक सेवकाने आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची आध्यात्मिकता टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. (लूक ११:२८) पण कधीकधी आपण आपल्या कामांमध्ये इतके व्यस्त होऊन जातो, की एक अर्थभरीत वैयक्तिक अभ्यासासाठी वेळ काढणं आपल्याला कठीण जातं. पण, जे परकीय भाषिक मंडळीमध्ये आहेत त्यांना याव्यतिरिक्त इतरही बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो.

परकीय भाषिक मंडळीमध्ये सेवा करणारे नवीन भाषा शिकत असतात. पण, त्याच वेळी त्यांनी ही गोष्टदेखील लक्षात ठेवली पाहिजे, की नियमित रीत्या देवाच्या वचनातील गहन गोष्टींचा अभ्यास करणंही खूप महत्त्वाचं आहे. (१ करिंथ. २:१०) आणि जर मंडळीमध्ये शिकवण्यात येणाऱ्या गोष्टी नवीन भाषेमुळे त्यांना पूर्णपणे कळत नसतील, तर गहन गोष्टी समजून घेणं त्यांना शक्य होईल का? नक्कीच नाही. मग यासाठी ते काय करू शकतात? तसंच, परकीय भाषिक मंडळीमध्ये सेवा करणारे आईवडील, आपल्या मुलांच्या मनात सत्य रुजवण्यासाठी काय करू शकतात? या प्रश्नांची उत्तरं आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

कोणत्या गोष्टींमुळे आपल्या आध्यात्मिकतेला धोका निर्माण होऊ शकतो?

४. कोणत्या गोष्टीमुळे यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो? उदाहरण द्या.

दुसऱ्या भाषेत शिकवल्या जाणाऱ्या बायबलच्या शिकवणी समजून घेणं आपल्याला कठीण जातं, तेव्हा यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. नहेम्याच्या काळात हीच गोष्ट घडली. तो जेव्हा यरुशलेममध्ये आला, तेव्हा त्याने पाहिलं की काही मुलांना इब्री भाषा बोलता येत नाही. (नहेम्या १३:२३, २४ वाचा.) आणि इब्री भाषेत असलेलं देवाचं वचन त्या मुलांना समजत नसल्यामुळे, यहोवासोबत असलेला त्यांचा नातेसंबंध कमजोर झाला आहे.—नहे. ८:२, ८.

५, ६. परकीय भाषिक मंडळीत सेवा करणाऱ्या काही आईवडिलांना काय लक्षात आलं आहे, आणि यामागचं कारण काय आहे?

परकीय भाषिक मंडळीमध्ये सेवा करणाऱ्या काही आईवडिलांच्या लक्षात आलं आहे, की त्यांच्या मुलांचा यहोवासोबत असलेला नातेसंबंध कमजोर झाला आहे. कारण, सभांमध्ये जे शिकवलं जातं ते पूर्णपणे समजत नसल्यामुळे ते कार्य करण्यास प्रवृत्त होत नाहीत. दक्षिण अमेरिकेतील पेड्रो [1] नावाचे बांधव आपल्या कुटुंबाला घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित झाले. ते म्हणतात: “आध्यात्मिक गोष्टींबाबत पाहिलं, तर त्यात आपलं मन आणि भावना याही गोवलेल्या असल्या पाहिजेत.”—लूक २४:३२.

एखादी गोष्ट जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या भाषेत वाचतो, तेव्हा त्यातील माहिती आपल्या हृदयापर्यंत पोचते. पण, हीच गोष्ट इतर भाषेच्या बाबतीत होत नाही. यासोबतच, दुसऱ्या भाषेत संवाद साधणं कठीण जात असल्यामुळे आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. आणि यामुळे आपण इतके थकून जाऊ शकतो की याचा आपल्या उपासनेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे, दुसऱ्या भाषेतील मंडळीत सेवा करण्याची आपली इच्छा कायम ठेवण्यासोबतच, आपण यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध मजबूत ठेवण्याकडेही लक्ष दिलं पाहिजे.—मत्त. ४:४.

त्यांनी यहोवासोबत असलेला त्यांचा नातेसंबंध मजबूत ठेवला

७. बाबेलच्या लोकांनी दानीएलावर त्यांची संस्कृती आणि धर्म स्वीकारण्यासाठी कशा प्रकारे दबाव आणला?

दानीएल आणि त्याच्या मित्रांना जेव्हा बाबेलमध्ये बंदी बनवून नेण्यात आलं, तेव्हा बाबेलच्या लोकांनी त्यांच्यावर तिथली संस्कृती आणि धर्म स्वीकारण्यासाठी खूप दबाव आणला. त्यांनी हे कोणकोणत्या मार्गांनी केलं? त्यांनी त्यांना “खासद्यांची विद्या व भाषा” शिकवली आणि बाबेलमधील नावं दिली. (दानी. १:३-७) बाबेलचा मुख्य देव ‘बेल’ याच्या नावावरून दानीएलाला नाव देण्यात आलं होतं. दानीएलाचा देव यहोवा याच्यापेक्षा बाबेलचा देव बेल जास्त शक्तिशाली आहे, असा दानीएलाने विश्वास ठेवावा हा कदाचित नबुखदनेस्सर राजाचा यामागचा हेतू असावा.—दानी. ४:८.

८. दानीएलाने यहोवासोबत असलेला त्याचा नातेसंबंध मजबूत कसा ठेवला?

दानीएलाला बाबेलमध्ये असताना, राजाला दिल्या जाणाऱ्या मिष्टान्नातून अन्न देण्यात आलं. पण, “दानीएलाने मनाचा निश्चय केला” होता की तो देवाचा नियम मोडणार नाही. (दानी. १:८) यासोबतच, इब्री भाषेत उपलब्ध असलेल्या देवाच्या शास्त्रग्रंथांचा तो नेहमी अभ्यास करायचा. यामुळे परकीय ठिकाणी राहत असूनही यहोवासोबत असलेला त्याचा नातेसंबंध मजबूत ठेवण्यास त्याला मदत झाली. (दानी. ९:२) खरंतर, बाबेलमध्ये येऊन ७० वर्षं झाल्यानंतरही त्याला त्याच्या इब्री नावाने, अर्थात दानीएल या नावानेच ओळखलं जायचं.—दानी. ५:१३.

९. स्तोत्र ११९ च्या लेखकाने देवाच्या वचनाबद्दल कसा दृष्टिकोन बाळगला?

स्तोत्र ११९ च्या लेखकाला विरोधाचा सामना करावा लागला. राजदरबाराचे सदस्य त्याच्या विरोधात बोलत होते. पण, अशा वेळी त्याला देवाच्या वचनांतून हिम्मत मिळाली आणि सगळ्यांपासून वेगळं राहणं त्याला शक्य झालं. (स्तो. ११९:२३, ६१) त्याने देवाचं वचन मनापासून स्वीकारलं आणि त्यामुळे त्याला मदत झाली.—स्तोत्र ११९:११, ४६ वाचा.

यहोवासोबत असलेला तुमचा नातेसंबंध मजबूत ठेवा

१०, ११. (क) देवाच्या वचनांचा अभ्यास करताना आपला हेतू काय असला पाहिजे? (ख) हा हेतू साध्य करणं आपल्याला कशामुळे शक्य होईल? उदाहरण द्या.

१० मंडळीच्या आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात कदाचित आपण खूप व्यस्त होऊन जाऊ शकतो. पण, आपण सर्वांनी वैयक्तिक अभ्यासासाठी आणि कौटुंबिक उपासनेसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. (इफिस. ५:१५, १६) अभ्यास करताना फक्त भरपूर माहिती वाचून काढणं, किंवा सभेमध्ये उत्तरं देण्यासाठी तयारी करणं हा आपला हेतू नसावा. तर, देवाच्या वचनांना मनापासून ग्रहण करून त्याद्वारे आपला विश्वास मजबूत करणं हा आपला हेतू असला पाहिजे.

११ आपल्याला असं करणं शक्य व्हावं म्हणून आपण समतोल राखणंही गरजेचं आहे. आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा फक्त दुसऱ्यांच्याच गरजांबद्दल विचार करू नये, तर आपल्या स्वतःच्या गरजांचाही आपण विचार केला पाहिजे. (फिलिप्पै. १:९, १०) उदाहरणार्थ, जेवण तयार करणारा सहसा इतरांना जेवण वाढण्याआधी स्वतः ते चाखून पाहतो. पण, तो जितकं अन्न चाखून पाहतो, तेवढ्यावरच तो जिवंत राहील का? नक्कीच नाही. जर त्याला आपलं आरोग्य टिकवून ठेवायचं असेल, तर त्याला स्वतःलासुद्धा ते पौष्टिक अन्न खावं लागेल. जेव्हा आपण सेवाकार्याची, सभेची किंवा भाषणाची तयारी करतो तेव्हा आपण जे वाचतो ते बऱ्याच वेळा स्वतःवर लागू करतोच असं नाही. पण जर आपल्याला यहोवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत करायचा असेल, तर आपणही बायबलचा नियमितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण वैयक्तिक रीत्या खोलवर अभ्यास करत असतो तेव्हा आपण स्वतःच्याही गरजा पूर्ण करत असतो.

१२, १३. स्वतःच्या भाषेत बायबलचा अभ्यास करणं जास्त फायद्याचं आहे असं अनेकांना का वाटतं?

१२ परकीय भाषिक मंडळीमध्ये सेवा करणाऱ्या बऱ्याच बंधुभगिनींना असं वाटतं, की स्वतःच्या भाषेत बायबलचा नियमितपणे अभ्यास केल्यास अधिक फायदा होतो. (प्रे. कृत्ये २:८) मिशनरी सेवा करणाऱ्यांनाही हे चांगलं माहीत आहे की दुसऱ्या देशात सेवा करत असताना, स्वतःची आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यासाठी दुसऱ्या भाषेतील सभांमध्ये ते जे ऐकतात फक्त तेवढ्यावरच ते अवलंबून राहू शकत नाहीत.

१३ अॅलन नावाचा बांधव गेल्या आठ वर्षांपासून पर्शियन भाषा शिकत आहे. तो म्हणतो: “मी जेव्हा पर्शियन भाषेत सभांची तयारी करतो तेव्हा सहसा भाषेवर जास्त लक्ष केंद्रित होतं. आणि भाषेवर लक्ष देण्यासाठी डोक्याचा जास्त वापर होतो. पण त्यामुळे त्यातील आध्यात्मिक गोष्टी हृदयापर्यंत पोहचतातच असं नाही. याच कारणामुळे नियमित रीत्या माझ्या स्वतःच्या भाषेत बायबलचा आणि इतर प्रकाशनांचा अभ्यास करण्यासाठी मी वेळ काढतो.”

आपल्या मुलांच्या हृदयापर्यंत पोहचा

१४. आईवडिलांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि का?

१४ आपल्या मुलांच्या हृदयापर्यंत सत्य पोहचत आहे की नाही, याकडे ख्रिस्ती आईवडिलांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. परकीय भाषिक मंडळीमध्ये तीनपेक्षा जास्त वर्षांपर्यंत सेवा केलेल्या सर्ज आणि त्यांची पत्नी म्यूरल यांच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. त्यांनी पाहिलं की १७ वर्षांचा त्यांचा मुलगा सेवाकार्यात आणि सभेत आनंदाने सहभाग घेत नाही. म्यूरल म्हणते: “आधी फ्रेंच भाषेत प्रचार करायला त्याला खूप आवडायचं. पण, आता दुसऱ्या भाषेत सेवाकार्यासाठी जायला त्याला मुळीच आवडत नाही.” सर्ज म्हणतो: “जेव्हा आम्हाला जाणवलं की ही गोष्ट त्याच्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड येत आहे, तेव्हा आम्ही परत आमच्या जुन्या मंडळीत जाण्याचं ठरवलं.”

सत्य तुमच्या मुलांच्या हृदयापर्यंत पोहचत आहे की नाही याकडे लक्ष द्या (परिच्छेद १४, १५ पाहा)

१५. (क) मंडळी बदलावी की नाही हे ठरवण्यासाठी पालकांना कशामुळे मदत होऊ शकते? (ख) अनुवाद ६:५-७ या वचनांत आईवडिलांना कोणतं मार्गदर्शन दिलं आहे?

१५ आपल्या मुलांना जी भाषा चांगली समजते, अशा मंडळीत परत जाण्याची गरज आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी पालकांना कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते? आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करण्याचं शिकवण्यासोबतच, नवीन भाषा शिकवण्यासाठी लागणारा वेळ आणि शक्ती आपल्याकडे आहे का, या गोष्टींचा आईवडिलांनी प्रथम विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, कदाचित त्यांच्या हे लक्षात येईल की मुलांना प्रचार करण्याची, सभांना जाण्याची किंवा दुसऱ्या भाषेतील क्षेत्रात सेवा करण्याची इच्छा नाही. अशा वेळी मुलांना जी भाषा चांगल्या प्रकारे समजते, अशा मंडळीत जाण्याचा निर्णय आईवडील कदाचित घेतील. आणि नंतर जेव्हा मुलांचा यहोवासोबत एक जवळचा व मजबूत नातेसंबंध निर्माण होईल, तेव्हा आईवडील पुन्हा परकीय भाषिक मंडळीत सेवा करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेऊ शकतात.—अनुवाद ६:५-७ वाचा.

१६, १७. आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी काही पालकांना कशामुळे मदत झाली आहे?

१६ काही पालक असेही आहेत, जे दुसऱ्या भाषेतील मंडळीत किंवा गटात सेवा करण्यासोबतच आपल्या मुलांना स्वतःच्या भाषेत यहोवाबद्दल शिकवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करतात. चार्ल्स यांना तीन मुली आहेत. या तिन्ही मुलींची वयं ९ ते १३ या वर्षांदरम्यान आहे. ते लिंगाला भाषेतील एका गटात सभेसाठी उपस्थित राहतात. ते म्हणतात: “आम्ही आमच्या मुलींसोबत आमच्या स्वतःच्या भाषेत अभ्यास करण्याचं आणि कौटुंबिक उपासना करण्याचं ठरवलं. पण, त्यासोबतच आम्ही अभ्यासादरम्यान लिंगाला भाषा शिकण्याचा सराव करण्यासाठी काही खेळही खेळतो. यामुळे मुलींना ही भाषा शिकून घेताना मजा वाटते.”

नवीन भाषा शिकून घेण्यासाठी आणि सभांमध्ये भाग घेण्यासाठी मेहनत घ्या (परिच्छेद १६, १७ पाहा)

१७ केविन नावाच्या बांधवाला दोन मुली आहेत. एक आठ वर्षांची, तर दुसरी पाच वर्षांची. त्याचं कुटुंब दुसऱ्या भाषेतील मंडळीत जात असल्यामुळे मुलींना सभेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी पूर्णपणे समजत नाहीत. त्यामुळे केविन त्यांना सत्य शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतो. तो म्हणतो: “मी आणि माझी पत्नी आमच्या मुलींसोबत आमच्या मातृभाषेत म्हणजे फ्रेंच भाषेत अभ्यास करतो. तसंच, महिन्यातून एकदा फ्रेंच भाषेतील सभेला उपस्थित राहण्याचं ध्येय आम्ही ठेवलं आहे. शिवाय सुट्यांमध्ये आम्ही फ्रेंच भाषेतील अधिवेशनांनाही उपस्थित राहतो.”

१८. (क) रोमकर १५:१, २ या वचनांमुळे मुलांच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्यासाठी पालकांना कशी मदत होते? (ख) इतर पालकांनी याबद्दल कोणता सल्ला दिला आहे? (अंत्यटीप पाहा.)

१८ आपल्या मुलांचा आणि आपला यहोवासोबत असलेला नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी काय करणं योग्य राहील, हे प्रत्येक कुटुंबानं स्वतः ठरवलं पाहिजे. [2] (गलती. ६:५) म्यूरल म्हणते की तिला आणि तिच्या पतीला दुसऱ्या भाषेतील मंडळीत सेवा करण्याची मनापासून इच्छा होती. पण तरी, आपल्या मुलाला यहोवासोबत असलेला त्याचा नातेसंबंध मजबूत करता यावा म्हणून त्यांनी स्वतःच्या भाषेतील मंडळीत जाण्याचं ठरवलं. (रोमकर १५:१, २ वाचा.) सर्ज आणि त्यांची पत्नी म्यूरल यांनी घेतलेल्या निर्णयाचे चांगले परिणाम त्यांना आज पाहायला मिळत आहेत. याबाबतीत सर्ज म्हणतात: “आम्ही फ्रेंच भाषेतील मंडळीत पुन्हा आलो तेव्हापासून त्याची आध्यात्मिक वाढ जोमाने होत गेली आणि त्याने बाप्तिस्मा घेतला. आता तो एक पायनियर म्हणून सेवा करत आहे. शिवाय, आता तो स्वतः दुसऱ्या भाषेतील गटात जाऊन सेवा करण्याचा विचार करत आहे.”

देवाच्या वचनाला तुमच्या हृदयापर्यंत पोहचू द्या

१९, २०. देवाच्या वचनावर आपलं प्रेम आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

१९ यहोवाचं सर्वांवर प्रेम आहे आणि सर्व प्रकारच्या लोकांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं, म्हणून त्याने शेकडो भाषांमध्ये बायबल उपलब्ध करून दिलं आहे. (१ तीम. २:४) त्याला ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत आहे की जर आपण आपल्या स्वतःच्या भाषेत बायबल वाचलं, तर त्याच्यासोबत असलेला आपला नातेसंबंध मजबूत करण्यास आपल्याला मदत होईल.

२० यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध मजबूत करत राहण्यासाठी, आपल्या सर्वांना मेहनत घेण्याची गरज आहे. यासाठी आपल्या भाषेत आपण नियमित रीत्या बायबलचा अभ्यास केल्यास, स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला आध्यात्मिक रीत्या मजबूत ठेवण्यास आपल्याला मदत होईल. यासोबतच, देवाच्या वचनावर आपलं मनापासून प्रेम आहे हेदेखील आपण दाखवून देऊ.—स्तो. ११९:११.

^ [१] (परिच्छेद ५) नावं बदलण्यात आली आहेत.

^ [२] (परिच्छेद १८) १५ ऑक्टोबर २००२ च्या टेहळणी बुरूजमधील विदेशात मुलांचे संगोपन–अडचणी आणि प्रतिफळे” हा लेख पाहा. तुमच्या कुटुंबाला फायदा होईल अशा काही बायबल तत्त्वांवर यात चर्चा करण्यात आली आहे.