व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या न्यायदंडाचं वादळ येण्याआधी लोकांनी इशाऱ्‍याकडे लक्ष देणं गरजेचं आहे!

देवाचा न्यायदंड—त्याआधी तो नेहमीच पुरेसा इशारा देतो का?

देवाचा न्यायदंड—त्याआधी तो नेहमीच पुरेसा इशारा देतो का?

हवामान खात्यात काम करणारी व्यक्‍ती रडार यंत्र दाखवत असलेल्या हवामानाच्या चित्राचं परीक्षण करत आहे. मोठी लोकवस्ती असलेल्या ठिकाणी एक भयानक वादळ येत असल्याचा धोका तिला दिसतो. त्या व्यक्‍तीला लोकांची पर्वा आहे आणि ती वेळ न दवडता त्यांना येणाऱ्‍या वादळाची सूचना देण्यासाठी सर्व प्रयत्न करते.

त्या व्यक्‍तीसारखंच, आज यहोवा पृथ्वीवरच्या सर्व लोकांना येणाऱ्‍या एका भयानक वादळाचा इशारा देत आहे. हवामान खात्याने आजपर्यंत अनेक वादळांचा इशारा दिला असेल पण हे वादळ त्यांपेक्षा खूप भयानक असणार आहे. पण यहोवा याबद्दलची सूचना लोकांना कशी देतो? आणि आपण का म्हणू शकतो की यहोवा लोकांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी पुरेसा वेळ देत आहे? या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्याआधी, यहोवाने पूर्वी लोकांना दिलेल्या काही चेतावण्यांवर आता आपण चर्चा करू या.

यहोवाने लोकांना आगाऊ सूचना दिली

बायबल काळात, यहोवाची आज्ञा जाणूनबुजून मोडणाऱ्‍या लोकांवर तो न्यायदंड किंवा वादळ आणेल असा इशारा त्याने बऱ्‍याचदा दिला. (नीति. १०:२५; यिर्म. ३०:२३) प्रत्येक वेळी, त्याने लोकांना खूप आधी इशारा दिला आणि त्याची आज्ञा पाळण्यासाठी त्यांना काय करणं गरजेचं आहे हेही सांगितलं. (२ राजे १७:१२-१५; नहे. ९:२९, ३०) यहोवाच्या न्यायदंडाची घोषणा करण्यासाठी आणि लोकांनी लवकरात लवकर योग्य बदल करण्यासाठी त्याने अनेकदा त्याच्या विश्‍वासू सेवकांचा वापर केला.—आमो. ३:७.

त्या विश्‍वासू सेवकांपैकी एक होता नोहा. त्याने बरीच वर्षं, न घाबरता त्याच्या काळातल्या अनैतिक आणि हिंसक लोकांना येणाऱ्‍या जलप्रलयाचा इशारा दिला. (उत्प. ६:९-१३, १७) जलप्रलयातून वाचण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हेही त्याने सांगितलं. त्याने इतक्या प्रमाणात प्रचार केला की त्याला नंतर “नीतिमत्त्वाचा प्रचारक” असं म्हटलं गेलं.—२ पेत्र २:५.

नोहाने इशारा देऊनसुद्धा लोकांनी त्याच्या सूचनेकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्यात काहीच विश्‍वास नसल्याचं त्यांनी दाखवलं. म्हणून जेव्हा जलप्रलय आला तेव्हा त्यात ‘ते सर्व वाहून गेले’ आणि त्यांचा मृत्यू झाला. (मत्त. २४:३९; इब्री ११:७) मृत्यू त्यांच्या डोळ्यांसमोर असताना ते असं म्हणू शकत नव्हते की देवाने त्यांना आधी इशारा दिला नव्हता.

इतर वेळी, यहोवाने न्यायदंड आणण्याच्या थोड्या काळाआधी त्याच्या सेवकांना सूचना दिल्या. असं असलं तरी त्याने ही खबरदारी घेतली की ज्या लोकांवर तो न्यायदंड आणणार आहे त्यांना पश्‍चात्ताप करायला पुरेसा वेळ मिळावा. उदाहरणार्थ, इजिप्तच्या लोकांवर आणलेल्या दहा पीडांबद्दल त्याने त्यांना आगाऊ सूचना दिली होती. याचं एक उदाहरण म्हणजे, यहोवाने मोशे आणि अहरोन यांना सातव्या पीडेबद्दल सांगण्यासाठी फारोकडे आणि त्याच्या सेवकांकडे पाठवलं. सातवी पीडा हा गारांचा पाऊस असणार होता आणि यामुळे खूप नुकसान होणार होतं. गारांचा पाऊस दुसऱ्‍या दिवशी पडणार असल्यामुळे, वादळापासून वाचण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी देवाने त्यांना पुरेसा वेळ दिला. याबद्दल बायबल म्हणतं: “फारोच्या सेवकांपैकी ज्याला परमेश्‍वराच्या सांगण्याची भीती वाटली त्याने आपले दास व जनावरे पळवत घरी आणली, आणि ज्याने परमेश्‍वराच्या सांगण्याची पर्वा केली नाही त्याने आपले दास व जनावरे रानात राहू दिली.” (निर्ग. ९:१८-२१) यावरून हे स्पष्टच होतं की यहोवाने लोकांना पुरेसा इशारा दिला होता आणि ज्यांनी लगेच पाऊल उचललं त्यांना इतरांप्रमाणे या पीडेपासून होणारा भयानक त्रास सहन करावा लागला नाही.

फारो आणि त्याच्या सेवकांवर दहा पीडा आणण्याआधी देवाने त्यांना याबद्दल इशारा दिला होता. पण त्यांनी इशारा नाकारून मूर्खपणा केला. (निर्ग. ४:२२, २३) यामुळे त्यांच्या प्रथमपुत्रांचा मृत्यू झाला. खरंच, किती दुःखाची गोष्ट होती! (निर्ग. ११:४-१०; १२:२९) इशाऱ्‍याकडे वेळीच लक्ष देणं त्यांना शक्य होतं का? नक्कीच होतं! कारण मोशेने इस्राएली लोकांना येणाऱ्‍या दहाव्या पीडेबद्दल आधीच इशारा दिला होता आणि आपआपल्या कुटुंबांना वाचवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हेही त्यांना सांगितलं होतं. (निर्ग. १२:२१-२८) मग किती लोकांनी मोशेच्या इशाऱ्‍याकडे लक्ष दिलं? काही अहवालांनुसार, तीस लाख लोकांनी, म्हणजे इस्राएली लोक आणि विदेशी व इजिप्तच्या लोकांचा “मिश्र समुदाय” यांनी या इशाऱ्‍याकडे लक्ष दिलं. यामुळे ते देवाच्या न्यायदंडापासून वाचले आणि ते इजिप्तमधून बाहेर पडले.—निर्ग. १२:३८.

या सर्व उदाहरणांवरून आपल्याला कळतं, की लोकांना इशाऱ्‍याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा याबद्दल यहोवाने नेहमीच खातरी करून घेतली. (अनु. ३२:४) असं करण्यामागे यहोवाचा काय हेतू होता? प्रेषित पेत्रने याबद्दल म्हटलं की “कोणाचाही नाश व्हावा अशी [यहोवाची] इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असे त्याला वाटते.” (२ पेत्र ३:९) खरंच, देवाला लोकांची खूप काळजी होती. त्याची इच्छा होती की न्यायदंड येण्याआधी लोकांनी पश्‍चात्ताप करावा आणि योग्य ते बदल करावेत.—यश. ४८:१७, १८; रोम. २:४.

आज यहोवा देत असलेल्या इशाऱ्‍याकडे लक्ष देणं

आजही संपूर्ण जगभरात एक महत्त्वाचा संदेश सांगितला जात आहे आणि त्याकडे सर्व लोकांनी लवकरात लवकर लक्ष देणं गरजेचं आहे. पृथ्वीवर असताना येशूने इशारा दिला होता, की आजच्या जगाच्या व्यवस्थेचा ‘मोठ्या संकटात’ नाश होईल. (मत्त. २४:२१) भविष्यात त्याच्या शिष्यांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागेल, याबद्दल त्याने भविष्यवाणीत सविस्तर माहिती दिली. आणि येशूने ज्या महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख केला त्या आज आपण स्वतःच्या डोळ्यांनी पूर्ण होताना बघत आहोत.—मत्त. २४:३-१२; लूक २१:१०-१३.

या भविष्यवाणीनुसार यहोवा आज लोकांना त्याच्या प्रेमळ अधिकाराच्या अधीन राहण्याचा आर्जव करत आहे. त्याची इच्छा आहे की आज्ञा पाळणाऱ्‍या लोकांनी चांगलं जीवन जगावं आणि नवीन जगात त्यांना भरपूर आशीर्वाद मिळावेत. (२ पेत्र ३:१३) यहोवाच्या अभिवचनांवर असलेला आपला विश्‍वास वाढावा म्हणून त्याने एक जीवन वाचवणारा संदेश दिला आहे. तो म्हणजे, ‘राज्याचा आनंदाचा संदेश.’ येशूने सांगितलं की “सर्व राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश सर्व जगात घोषित केला जाईल.” (मत्त. २४:१४) या संदेशाची “साक्ष” देण्यासाठी किंवा प्रचार करण्यासाठी यहोवाने त्याच्या खऱ्‍या उपासकांना जवळजवळ २४० देशांत संघटित केलं आहे. यहोवाची इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्याच्या इशाऱ्‍याकडे लक्ष द्यावं आणि पुढे येणाऱ्‍या न्यायदंडाच्या वादळापासून वाचावं.—सफ. १:१४, १५; २:२, ३.

यामुळे यहोवा न्यायदंड आणण्याआधी लोकांना पुरेसा वेळ देतो की नाही हा प्रश्‍न महत्त्वाचा नाही. कारण पुराव्यांवरून हेच कळतं की त्याने लोकांना नेहमीच वेळ दिला आहे. पण महत्त्वाचा प्रश्‍न हा आहे, की वेळ आहे तोपर्यंत लोक देवाच्या इशाऱ्‍याकडे लक्ष देतील का? म्हणूनच हे गरजेचं आहे की देवाचे सेवक या नात्याने आपण जास्तीत जास्त लोकांना या जगाच्या व्यवस्थेच्या अंतापासून वाचवण्यासाठी मदत करत राहू या.