व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४१

मोठ्या संकटादरम्यान विश्‍वासू राहा

मोठ्या संकटादरम्यान विश्‍वासू राहा

“परमेश्‍वर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचे रक्षण करतो.”—स्तो. ३१:२३.

गीत ५१ यहोवाला जडून राहू!

सारांश *

१-२. (क) लवकरच राष्ट्रं कोणती घोषणा करतील? (ख) आपल्याला कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत?

कल्पना करा, बायबलमध्ये भाकीत केलेली “शांती आहे, सुरक्षा आहे!” ही घोषणा राष्ट्रांनी नुकतीच केली आहे. अशा वेळी ते कदाचित गर्वाने म्हणतील, की ‘जगात कधी घडलं नाही ते आता घडलं आहे; संपूर्ण जगात शांतीचं वातावरण प्रस्थापित झालं आहे!’ पण त्यांना माहीत नाही की पुढे जे घडणार आहे ते त्यांना थांबवता येणार नाही. असं का? कारण बायबल म्हणतं की “एकाएकी, . . . त्यांच्यावर अचानक नाश येईल, आणि त्यातून त्यांची सुटका होणारच नाही.”—१ थेस्सलनी. ५:३.

आपल्याला काही महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं मिळवावी लागणार आहेत: “मोठं संकट” येईल तेव्हा कोणत्या गोष्टी घडतील? त्या वेळी यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करेल? आणि मोठ्या संकटादरम्यान विश्‍वासू राहण्यासाठी आज आपण कशी तयारी करू शकतो?—मत्त. २४:२१.

मोठ्या संकटादरम्यान कोणत्या गोष्टी घडतील?

३. प्रकटीकरण १७:५, १५-१८ या वचनांनुसार देव मोठ्या बाबेलचा कसा नाश करेल?

प्रकटीकरण १७:५, १५-१८ वाचा. मोठ्या बाबेलचा नाश हा ठरलेला आहे! आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्या वेळी जे घडेल त्यावर राष्ट्रांचा ताबा नसेल. असं का? कारण देव “आपला विचार  पूर्ण करण्याचं त्यांच्या मनात” घालेल. कोणता विचार असेल तो? खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा नाश करण्याचा विचार. त्यात ख्रिस्ती धर्मजगताचाही * समावेश होतो. देव आपला विचार, “दहा शिंगे” असलेल्या गडद लाल रंगाच्या जंगली पशूच्या मनात घालेल. दहा शिंगे ही सर्व राजकीय सरकारांना सूचित करतात. ती दहा शिंगे “जंगली पशू” म्हणजे संयुक्‍त राष्ट्रसंघाचं समर्थन करतात. (प्रकटी. १७:३, ११-१३; १८:८) राजकीय शक्‍तींनी खोट्या धर्मावर हल्ला करणं हे मोठ्या संकटाची सुरुवात झाल्याचं चिन्ह असेल. खरंच, हे सगळं अचानक घडेल आणि इतकं भयानक असेल की संपूर्ण पृथ्वीवर याचा परिणाम दिसून येईल.

४. (क) राष्ट्रं खोट्या धर्मावर हल्ला करण्याची कदाचित कोणती कारणं देतील? (ख) हल्ला झाल्यावर धार्मिक संघटनांचे सदस्य काय करतील?

राष्ट्रं, मोठ्या बाबेलवर हल्ला करण्याची कोणती कारणं देतील हे आपल्याला माहीत नाही. कदाचित ते म्हणतील की जगातले सर्व धर्म, शांती आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात अडथळे निर्माण करत आहेत आणि सतत राजकीय कारभारात ढवळाढवळ करत आहेत. किंवा ते कदाचित म्हणतील की धार्मिक संघटनांनी अमाप संपत्ती आणि मालमत्ता जमवली आहे. (प्रकटी. १८:३, ७) पण राष्ट्रं जेव्हा खोट्या धर्मांवर हल्ला करतील तेव्हा कदाचित ते त्यांच्या सर्व सदस्यांचा  नाश करणार नाहीत. तर ते खोट्या धर्माच्या संघटनांचा  नाश करतील. एकदा का या संघटनांचा नाश झाला की त्यांच्या सदस्यांना जाणीव होईल की त्यांच्या धार्मिक नेत्यांनी दिलेली सर्व वचनं निष्फळ ठरली आहेत. आणि त्यामुळे ते आपआपल्या धर्मांशी असलेले सर्व संबंध तोडून टाकतील.

५. यहोवाने काय अभिवचन दिलं आहे आणि का?

मोठ्या बाबेलचा नाश होण्यासाठी किती वेळ लागेल याबद्दल बायबलमध्ये काही सांगितलेलं नाही. पण आपल्याला एक गोष्ट मात्र माहीत आहे की यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही. (प्रकटी. १८:१०, २१) यहोवाने अभिवचन दिलं आहे की तो “निवडलेल्या लोकांसाठी” आणि खऱ्‍या धर्माला वाचवण्यासाठी संकटाचे “दिवस कमी” करेल. (मार्क १३:१९, २०) पण मोठ्या संकटाची सुरुवात ते हर्मगिदोनचं युद्ध यादरम्यान यहोवा आपल्याकडून काय करण्याची अपेक्षा करेल?

खरी उपासना करत राहा

६. मोठ्या बाबेलशी संबंध तोडून टाकण्यासोबतच आणखी काय करणं गरजेचं आहे?

आधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे यहोवा आपल्या उपासकांकडून अपेक्षा करतो की त्यांनी मोठ्या बाबेलशी पूर्णपणे संबंध तोडून टाकावा. पण इतकंच करणं पुरेसं नाही, तर आपण यहोवाची सेवा करत राहण्याचा दृढ निश्‍चयही केला पाहिजे. आपण कोणत्या दोन मार्गांनी ही सेवा करत राहू शकतो यावर आता आपण चर्चा करू या.

आपण एकत्र येणं कधी सोडू नये; कठीण काळ असला तरीही (परिच्छेद ७ पाहा) *

७. (क) आपण यहोवाच्या नीतिमान स्तरांचं काटेकोरपणे पालन कसं करू शकतो? (ख) इब्री लोकांना १०:२४, २५ या वचनांत एकत्र भेटण्याच्या महत्त्वाबद्दल काय सांगितलं आहे आणि हे खासकरून आज का महत्त्वाचं आहे?

पहिला मार्ग म्हणजे, यहोवाच्या नैतिक स्तरांना जडून राहणं.  जगातली मूल्यं आणि स्तर आपण कधीच स्वीकारणार नाही. जसं की, कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अनैतिकतेला आपण मान्यता देणार नाही किंवा समलैंगिक विवाह अथवा त्यांसारखी जीवनशैली योग्य आहे असा विचार आपण करणार नाही. (मत्त. १९:४, ५; रोम. १:२६, २७) दुसरा मार्ग म्हणजे, सहविश्‍वासू बांधवांसोबत एकत्र मिळून उपासना करत राहणं.  जिथे कुठे आपल्याला शक्य होईल तिथे आपण एकत्र मिळून उपासना करत राहू. म्हणजे राज्य सभागृहात, गरज पडल्यास साक्षीदारांच्या घरांत किंवा लोकांच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी. पुढे परिस्थिती कशीही निर्माण झाली तरी आपण उपासना करण्यासाठी नियमितपणे एकत्र येण्याचं थांबवणार नाही. याउलट, “तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे आपण पाहतो तसतसे हे आणखी जास्त” करणं गरजेचं आहे.—इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा.

८. भविष्यात कदाचित आपला संदेश कसा बदलेल?

मोठ्या संकटाच्या दरम्यान आपण प्रचार करत असलेल्या संदेशात बदल होईल. आता आपण राज्याच्या आनंदाच्या संदेशाचा प्रचार करत आहोत आणि शिष्य बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्या वेळी आपला संदेश गारांसारखा असेल. गारांचा मार जसा जोरात आणि थेट लागतो तसा आपला संदेश असेल. (प्रकटी. १६:२१) आपण सैतानाच्या जगाचा लवकरच नाश होणार आहे असा कदाचित प्रचार करू. पण आपण तेव्हा नक्की काय प्रचार करू आणि कशा पद्धतीने करू हे आपल्याला कालांतराने कळेल. मग त्या वेळी अनेक शतकांपासून आपण प्रचार करण्यासाठी ज्या पद्धतींचा उपयोग करत आहोत त्याच पद्धतींचा उपयोग करू का, की आणखी दुसऱ्‍या पद्धतींचा? हे आता आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला कोणत्याही पद्धतीने प्रचार करावा लागला तरी एक गोष्ट खातरीने म्हणता येईल. ती म्हणजे आपल्याला यहोवाच्या न्यायदंडाचा संदेश धैर्याने सांगण्याचा बहुमान मिळेल!—यहे. २:३-५.

९. आपल्या संदेशाबद्दल राष्ट्रांची काय प्रतिक्रिया असेल पण आपण कोणती खातरी बाळगू शकतो?

आपल्या संदेशामुळे राष्ट्रं संतापतील आणि आपलं प्रचारकार्य कायमचं बंद करण्याचा प्रयत्न करतील. पण आता जसं आपण सेवाकार्य करताना यहोवावर विसंबून राहतो, तसं आपल्याला त्या वेळीही त्याच्यावर विसंबून राहावं लागेल. देव आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारी ताकद देईल अशी आपण पक्की खातरी बाळगू शकतो.—मीखा ३:८.

देवाच्या लोकांवर हल्ला होईल त्यासाठी तयार राहा

१०. लूक २१:२५-२८ या वचनांत सांगितल्यानुसार मोठ्या संकटादरम्यान ज्या गोष्टी घडतील त्याबद्दल बहुतेक लोकांची प्रतिक्रिया कशी असेल?

१० लूक २१:२५-२८ वाचा. राजकीय व व्यापार क्षेत्र आणि जगातल्या इतर गोष्टी कायम राहतील असा लोकांचा भरवसा होता. पण जेव्हा ते मोठ्या संकटादरम्यान त्यांचा नाश होताना पाहतील तेव्हा त्यांना धक्काच बसेल. त्यांना क्लेश होईल आणि आपलं अस्तित्व नाहीसं होतं की काय अशी भीती त्यांना वाटेल, कारण तो मानव इतिहासातला अगदी वाईट काळ असेल. (सफ. १:१४, १५) त्या वेळी यहोवाच्या लोकांसाठीही जीवन खूप खडतर असेल. जगाचे भाग नसल्यामुळे कदाचित आपल्यालाही काही कठीण परिस्थितींचा सामना करावा लागेल. त्या वेळी कदाचित आपल्या काही मूलभूत गरजाही पूर्ण होणार नाहीत.

११. (क) लोकांचं लक्ष यहोवाच्या साक्षीदारांवर केंद्रित का होईल? (ख) आपल्याला मोठ्या संकटाला घाबरण्याची का गरज नाही?

११ मग एक वेळ अशी येईल जेव्हा लोकांचा राग आपल्यावर भडकेल. त्यांच्या धर्मांचा नाश झाला आहे आणि यहोवाचे साक्षीदार अजूनही आपल्या देवाची उपासना करत आहेत हे समजल्यावर ते खूप संतापतील. आपण फक्‍त कल्पना करू शकतो की त्या वेळी सर्वत्र कसा गोंधळ माजलेला असेल. ते आपला राग कोणत्या न कोणत्या मार्गांनी व्यक्‍त करतील, जसं की इंटरनेटद्वारे. राष्ट्रं आणि त्यांचा शासक सैतान आपला द्वेष करतील, कारण आपलाच धर्म काय तो त्या वेळी शाबूत असेल. या पृथ्वीवरून सर्व धर्मांचा नाश करण्याचं त्यांचं ध्येय ते पूर्ण करू शकले नाहीत हे त्यांच्या लक्षात येईल आणि म्हणून ते त्यांचं सर्व लक्ष आपल्यावर केंद्रित करतील. हीच ती वेळ असेल जेव्हा राष्ट्रं मागोगचा गोग * ही भूमिका घेतील. ती सर्व एकत्र येतील आणि यहोवाच्या लोकांवर हल्ला करायला आपल्या संपूर्ण शक्‍तीचा वापर करतील. (यहे. ३८:२, १४-१६) मोठ्या संकटादरम्यान काय होणार याबद्दल सविस्तर माहिती नसल्यामुळे आपल्याला कदाचित चिंता वाटेल. पण एक गोष्ट आपल्याला नक्कीच माहीत आहे. ती म्हणजे, आपल्याला मोठ्या संकटाला घाबरण्याची गरज नाही, कारण त्या वेळी आपला जीव वाचवण्यासाठी गरजेची असलेली निर्देशनं यहोवा आपल्याला देईल. (स्तो. ३४:१९) त्या वेळी आपण “डोकं वर करून ताठ उभे” राहू, कारण आपल्याला माहीत असेल की आपल्या “सुटकेची वेळ जवळ” आहे. *

१२. “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” भविष्यासाठी आपल्याला कसं तयार करत आहेत?

१२ “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” आपल्याला मोठ्या संकटादरम्यान विश्‍वासू राहण्यासाठी तयार करत आहे. (मत्त. २४:४५) हे अनेक मार्गांद्वारे केलं जात आहे. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर २०१६-२०१८ या वर्षांदरम्यान झालेली अधिवेशनं. या अधिवेशनांमुळे आपल्याला असे गुण विकसित करण्याचं प्रोत्साहन देण्यात आलं आहे जे यहोवाच्या दिवसाचा सामना करण्यासाठी गरजेचे आहेत. त्या गुणांवर आता आपण थोडक्यात चर्चा करू या.

एकनिष्ठता, धीर आणि धैर्य वाढवत राहा

मोठ्या संकटातून वाचण्यासाठी आताच तयारी करा! (परिच्छेद १३-१६ पाहा) *

१३. आपण एकनिष्ठता कशी वाढवू शकतो आणि हे आताच करणं का गरजेचं आहे?

१३ एकनिष्ठता: २०१६ सालच्या अधिवेशनाचा मुख्य विषय “यहोवाला एकनिष्ठ राहा!” हा होता. या अधिवेशनाच्या कार्यक्रमांमुळे आपल्याला शिकायला मिळालं की जर आपलं यहोवासोबत एक घनिष्ठ नातं असेल तरच आपण त्याला एकनिष्ठ राहू. आपल्याला आठवण करून देण्यात आली की यहोवाच्या जवळ जाण्यासाठी आपण मनापासून प्रार्थना करणं आणि त्याच्या वचनाचा लक्षपूर्वक अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. असं केल्यामुळे अगदी कठीण समस्यांचाही सामना करायला आपल्याला बळ मिळेल. मोठं संकट जवळ येत असताना देवाला आणि त्याच्या राज्याला विश्‍वासू राहणाऱ्‍या लोकांना कठीण परीक्षांना तोंड द्यावं लागेल हे अपेक्षित आहे. लोक आपली निंदा करत राहतील. (२ पेत्र ३:३, ४) खासकरून आपण सैतानाच्या जगाचा भाग नाही आणि तटस्थ राहतो यामुळे ते असं करतील. आपण आताच एकनिष्ठता वाढवली पाहिजे म्हणजे मोठं संकट आल्यावर आपल्याला विश्‍वासू राहायला मदत होईल.

१४. (क) पृथ्वीवर पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांविषयी कोणता बदल घडेल? (ख) आपल्याला त्या वेळी एकनिष्ठ राहणं का गरजेचं असेल?

१४ मोठं संकट येईल तेव्हा या पृथ्वीवर पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांविषयी एक बदल होईल. एका विशिष्ट वेळी पृथ्वीवरच्या सर्व अभिषिक्‍त जनांना स्वर्गात नेलं जाईल आणि मग ते हर्मगिदोनच्या युद्धात भाग घेतील. (मत्त. २४:३१; प्रकटी. २:२६, २७) याचा अर्थ त्या वेळी नियमन मंडळ आपल्यासोबत पृथ्वीवर नसेल. असं असलं तरी मोठा लोकसमुदाय हा संघटित असेल. दुसऱ्‍या मेंढरांमधले निपुण बांधव पुढाकार घेतील. आपल्याला त्या वेळी दाखवून द्यावं लागेल की आपण यहोवाला एकनिष्ठ आहोत. हे आपण बांधवांना पाठिंबा देण्याद्वारे आणि देव त्यांच्याद्वारे आपल्याला मार्गदर्शन देईल त्याचं पालन करण्याद्वारे दाखवून देऊ. असं करणं महत्त्वाचं असेल कारण आपला बचाव त्यावरच अवलंबून असेल!

१५. आपण धीर आणखी कसा वाढवू शकतो आणि असं करणं आज का महत्त्वाचं आहे?

१५ धीर: २०१७ च्या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचा विषय होता, “धीर सोडू नका!” या कार्यक्रमामुळे आपल्याला परीक्षांचा सामना करायला बळ मिळालं. आपण शिकलो की आपली परिस्थिती कशीही असो चांगली किंवा वाईट, आपलं धीर धरणं त्यावर अवलंबून नाही. तर यहोवावर निर्भर राहिल्यामुळे आपल्याला धीर धरणं शक्य होतं. (रोम. १२:१२) येशूने दिलेलं अभिवचन आपण कधीही विसरता कामा नये. त्याने म्हटलं: “जो शेवटपर्यंत धीर धरेल  त्यालाच वाचवलं जाईल.” (मत्त. २४:१३) या अभिवचनाचा असा अर्थ होतो, की आपल्याला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावं लागलं तरी आपण विश्‍वासू राहणं गरजेचं आहे. आपण आज धीराने सर्व परीक्षांचा सामना केला तर मोठं संकट येण्याआधी आपला विश्‍वास आणखी मजबूत होईल.

१६. आपण धैर्यवान कशामुळे बनतो आणि आताच आपण धैर्य कसं वाढवू शकतो?

१६ धैर्य:  २०१८ च्या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचा विषय होता, “धैर्यवान व्हा!” या कार्यक्रमातून आपल्याला आठवण करून देण्यात आली की आपण स्वतःच्या क्षमतांमुळे धैर्यवान बनत नाही. धीर धरण्यासाठी जसं आपल्याला यहोवावर अवलंबून राहावं लागतं, तसं धैर्यासाठीही आपण त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. आपण यहोवावर आणखी जास्त विसंबून राहायला कसं शिकू शकतो? देवाच्या वचनाचा दररोज अभ्यास करण्याद्वारे आणि यहोवाने लोकांना प्राचीन काळात कसं वाचवलं यावर मनन करण्याद्वारे आपण असं करू शकतो. (स्तो. ६८:२०; २ पेत्र २:९) मोठ्या संकटादरम्यान राष्ट्रं आपल्यावर हल्ला करतील तेव्हा आपल्याला कधी नव्हे इतकं यहोवावर विसंबून राहावं लागेल आणि धैर्यवान व्हावं लागेल. (स्तो. ११२:७, ८; इब्री १३:६) आज आपण यहोवावर विसंबून राहिलो तर गोगचा हल्ला होईल तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी लागणारं धैर्य आपल्याजवळ असेल. *

आपल्या सुटकेची आतुरतेने वाट पाहा!

येशू आणि त्याचं स्वर्गातलं सैन्य हर्मगिदोनच्या युद्धात देवाच्या शत्रूंचा नाश करायला लवकरच येतील! (परिच्छेद १७ पाहा )

१७. आपण हर्मगिदोनच्या युद्धाला घाबरण्याची गरज का नाही? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)

१७ आधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आपल्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या शेवटच्या दिवसांत काढलं आहे. पण आपल्याला मोठ्या संकटातून वाचून सर्वकाळाचं जीवन मिळण्याची आशा आहे. हर्मगिदोनच्या युद्धाने जगाच्या व्यवस्थेचा शेवट होईल. पण आपल्याला घाबरण्याची गरज नाही. असं का? कारण ही देवाची लढाई असेल आणि आपल्याला लढावं लागणार नाही. (नीति. १:३३; यहे. ३८:१८-२०; जख. १४:३) यहोवाने आज्ञा दिल्यावर येशू लगेच देवाच्या सैन्याला सोबत घेऊन लढायला सज्ज होईल. पुनरुत्थान झालेले अभिषिक्‍त जन आणि लाखो स्वर्गदूत त्याच्यासोबत असतील. ते एकत्र मिळून सैतान, त्याचे दूरात्मे आणि पृथ्वीवरची त्याची सैन्य यांच्या विरुद्ध लढतील.—दानी. १२:१; प्रकटी. ६:२; १७:१४.

१८. (क) यहोवाने काय अभिवचन दिलं आहे? (ख) प्रकटीकरण ७:९, १३-१७ ही वचनं वाचल्यामुळे भविष्याबद्दल आपल्याला खातरी का पटते?

१८ यहोवाने आपल्याला असा भरवसा दिला आहे, की “तुझ्यावर चालवण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही.” (यश. ५४:१७) यहोवाच्या विश्‍वासू उपासकांचा “मोठा लोकसमुदाय” हा सुखरूप “मोठ्या संकटातून बाहेर” येईल. त्यानंतर मोठा लोकसमुदाय त्याची पवित्र सेवा करतच राहील. (प्रकटीकरण ७:९, १३-१७ वाचा.) भविष्यात आपला बचाव नक्की होईल आणि असा विश्‍वास ठेवण्यासाठी बायबलमध्ये बरीच कारणं दिली आहेत. आपल्याला माहीत आहे, की “परमेश्‍वर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचे रक्षण करतो.” (स्तो. ३१:२३) यहोवा आपलं पवित्र नाव उंचावेल तेव्हा त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍यांसाठी आणि त्याची स्तुती करणाऱ्‍यांसाठी हा खूप मोठा आनंदाचा दिवस असेल!—यहे. ३८:२३.

१९. आपल्याला कोणत्या अद्‌भुत भविष्याची आशा आहे?

१९ विचार करा २ तीमथ्य ३:२-५ मधले शब्द जर सैतानाचा प्रभाव नसलेल्या नवीन जगाबद्दल असते तर. (“ लोक तेव्हा कसे असतील” ही चौकट पाहा.) बंधू जॉर्ज गँगस * हे नियमन मंडळाचे सदस्य होते. त्यांनी या परिस्थितीबद्दल म्हटलं: “सर्व ठिकाणी आपलेच भाऊ किंवा बहिणी असतील तेव्हा हे जग किती सुंदर असेल याचा जरा विचार करा! लवकरच तुम्हाला नवीन व्यवस्थेत राहण्याचा बहुमान मिळेल. यहोवाचं जितकं आयुष्य आहे तितकं तुमचंही असेल. आपण सर्वकाळासाठी जगणार. खरंच लवकरच किती अद्‌भुत भविष्य मिळणार आहे आपल्याला!”

गीत ३२ निर्भय व निश्‍चयी राहा!

^ परि. 5 लवकरच मानवजातीला “मोठं संकट” पाहावं लागणार आहे हे आपल्याला माहीत आहे. त्या वेळी यहोवाच्या सेवकांसोबत काय घडेल व तो आपल्याकडून काय अपेक्षा करेल? आणि मोठ्या संकटादरम्यान विश्‍वासू राहण्यासाठी आपल्याला आज कोणते गुण विकसित करण्याची गरज आहे? या सर्व प्रश्‍नांवर आपण या लेखात चर्चा करणार आहोत.

^ परि. 3 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: ख्रिस्ती धर्मजगत हे अशा पंथांनी मिळून बनलेलं आहे ज्यात स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे लोक आहेत. ते इतरांना यहोवाच्या स्तरांनुसार त्याची उपासना करायला शिकवत नाहीत.

^ परि. 11 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: मागोगचा गोग हा वाक्यांश (त्याला गोग असंही म्हणतात) मोठ्या संकटादरम्यान यहोवाच्या उपासकांवर हल्ला करण्यासाठी एकत्र आलेल्या राष्ट्रांच्या समूहाला सूचित करतो.

^ परि. 11 हर्मगिदोनच्या युद्धाआधी कोणत्या घटना घडतील, मागोगचा गोग याचा हल्ला आणि हर्मगिदोनच्या युद्धाच्या वेळी यहोवा आपल्या लोकांना कसं वाचवेल याविषयांवर सविस्तर माहितीसाठी टेहळणी बुरूज१३ ७/१५ पृ. ३-८ आणि टेहळणी बुरूज१५ ७/१५ पृ. १४-१९ पाहा.

^ परि. 16 २०१९ मध्ये झालेल्या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचा विषय होता “प्रेम कधीही नाहीसे होत नाही.” या अधिवेशनामुळे आपल्याला खातरी पटली की यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि तो आपल्याला नेहमी सुरक्षित ठेवेल.—१ करिंथ. १३:८.

^ परि. 19 टेहळणी बुरूज १ डिसेंबर १९९४ च्या अंकातला “त्यांची कृत्ये त्यांच्याबरोबर जातील” हा लेख पाहा.

^ परि. 65 चित्रांचं वर्णन: मोठ्या संकटादरम्यान साक्षीदारांचा एक लहान समूह धैर्य दाखवून एका जंगलात मंडळीची सभा चालवत आहे.

^ परि. 67 चित्रांचं वर्णन: यहोवाच्या विश्‍वासू उपासकांनी मिळून बनलेला मोठा लोकसमुदाय मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर येईल आणि आनंदी असेल!