व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४२

यहोवा तुम्हाला काय बनायला मदत करू शकतो?

यहोवा तुम्हाला काय बनायला मदत करू शकतो?

“देव . . . तुमच्यामध्ये तशी इच्छा निर्माण करतो आणि ते कार्य करण्याची ताकदही देतो.”—फिलिप्पै. २:१३.

गीत ३८ आपला भार यहोवावर टाक

सारांश *

१. यहोवा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी काय करू शकतो?

यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी जे आवश्‍यक आहे ते बनू शकतो. उदाहरणार्थ, यहोवा एक शिक्षक, सांत्वन करणारा आणि सुवार्तिक बनला आहे. तसंच, त्याने अशा इतर भूमिकाही घेतल्या आहेत. (यश. ४८:१७; २ करिंथ. ७:६; गलती. ३:८) असं असलं तरी तो त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी बऱ्‍याचदा मानवांचा उपयोग करतो. (मत्त. २४:१४; २८:१९, २०; २ करिंथ. १:३, ४) यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे काही बनावं लागतं, त्यासाठी तो आपल्याला बुद्धि आणि शक्‍ती देऊ शकतो. अनेक विद्वानांच्या मते यहोवाच्या नावाचा अर्थ असा होतो, की आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवाला जे बनण्याची गरज आहे ते तो बनू शकतो किंवा मानवांना जे बनण्याची गरज आहे ते तो त्यांना बनायला लावू शकतो.

२. (क) यहोवा त्याच्या सेवेत आपला उपयोग करत आहे का याबद्दल कधीकधी आपल्या मनात शंका का येऊ शकते? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

यहोवाच्या सेवेत आपला उपयोग व्हावा अशी आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. पण काहींच्या मनात अशी शंका येऊ शकते की ‘यहोवा आपला उपयोग करत आहे का?’ काहींना वाटू शकतं की वाढतं वय, बदलती परिस्थिती किंवा कौशल्यांची कमतरता यांमुळे सेवेत जितकं करायची इच्छा आहे तितकं आपण करू शकत नाही. पण दुसरीकडे पाहता, यहोवाच्या सेवेत आपण जे करत आहोत तितकं पुरेसं आहे आणि आता आणखी जास्त करण्याची गरज नाही असंही काहींना वाटू शकतं. यहोवा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपला वापर करतो. आणि त्या वेळी आपल्याला गरज असलेल्या गोष्टी तो कशा पुरवतो याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. तसंच, आपण बायबलमध्ये उल्लेख केलेल्या अशा विश्‍वासू स्त्री-पुरुषांबद्दलही चर्चा करणार आहोत ज्यांना यहोवाने वेगवेगळी कार्यं करण्याची इच्छा आणि ताकद दिली. त्यासोबतच, आपण शेवटी पाहणार आहोत की यहोवाने त्याच्या सेवेत आपला उपयोग करावा म्हणून आपण काय करू शकतो?

यहोवा आपल्याला कशा प्रकारे मदत पुरवतो

३. फिलिप्पैकर २:१३ या वचनानुसार यहोवा कार्य करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे इच्छा देऊ शकतो?

फिलिप्पैकर २:१३ वाचा. * यहोवा आपल्याला कार्य करण्याची इच्छा देऊ शकतो. हे तो कसं करू शकतो? आपल्याला कदाचित जाणवेल की मंडळीत एखाद्या व्यक्‍तीला किंवा एखादं काम पूर्ण करायला मदतीची गरज आहे. किंवा वडील शाखा कार्यालयाकडून आलेलं असं एखादं पत्र वाचतील ज्यात इतर ठिकाणी जाऊन मदत करण्यासाठी सांगितलेलं असेल. अशा वेळी आपण स्वतःला प्रश्‍न विचारू शकतो, की ‘मदत करण्यासाठी मी काय करू शकतो?’ किंवा आपल्याला एखादी कठीण नेमणूक मिळाली असेल आणि आपल्या मनात शंका येईल की आपण ती नीट पूर्ण करू का? अथवा बायबलचा काही भाग वाचल्यानंतर आपल्या मनात विचार येऊ शकतो की ‘इतरांना मदत करण्याबाबतीत ही वचनं मी कशी लागू करू शकतो?’ यहोवा आपल्याला एखादं कार्य करण्यासाठी जबरदस्ती करणार नाही. पण जेव्हा तो पाहतो की आपण इतरांना मदत करण्याचा विचार करत आहोत तेव्हा तो आपल्याला कार्य करण्याची इच्छा देऊ शकतो आणि ती पूर्ण करायला मदतही करू शकतो.

४. यहोवा आपल्याला कार्य करायला कशा प्रकारे ताकद देऊ शकतो?

यहोवा आपल्याला कार्य करण्याची ताकदही देऊ शकतो. (यश. ४०:२९) आपल्याकडे जी कौशल्यं आहेत त्यात आणखी निपुण बनण्यासाठी यहोवा आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देऊ शकतो. (निर्ग. ३५:३०-३५) एखादं काम कसं करावं हे यहोवा त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला शिकवू शकतो. एखादी नेमणूक कशी पूर्ण करावी याबद्दल जर मनात शंका असेल तर मदत मागायला कचरू नका. तसंच, आपल्या उदार पित्याजवळ “असाधारण सामर्थ्य” मागण्यासाठीही मनात संकोच बाळगू नका. (२ करिंथ. ४:७; लूक ११:१३) बायबलमध्ये अशा बऱ्‍याच स्त्री-पुरुषांची उदाहरणं दिली आहेत ज्यांना यहोवाने कार्य करण्यासाठी इच्छा आणि ताकद दिली. यांपैकी काही उदाहरणांचं आता आपण परीक्षण करू या. असं करताना विचार करा की यहोवा तुमचाही उपयोग कशा प्रकारे करू शकतो.

यहोवाने विश्‍वासू पुरुषांना काय बनण्यासाठी मदत केली?

५. इस्राएली लोकांना गुलामीतून सोडवण्यासाठी यहोवाने मोशेचा उपयोग ज्या प्रकारे आणि ज्या वेळी केला यावरून आपण काय शिकतो?

इस्राएली लोकांना गुलामीतून सोडवण्यासाठी यहोवाने मोशेचा वापर केला. त्याने त्याला तारणकर्ता बनण्यासाठी मदत केली. पण यहोवाने त्याचा उपयोग कधी केला? मोशेला “मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण” देण्यात आलं आणि आता तो कोणतंही काम करण्यासाठी तयार झाला आहे असं त्याला वाटलं तेव्हा यहोवाने त्याचा उपयोग करून घेतला का? नाही. (प्रे. कार्ये ७:२२-२५) यहोवाने मोशेला आधी एक नम्र व्यक्‍ती बनायला आणि त्याच्या रागावर ताबा मिळवायला मदत केली आणि त्यानंतरच त्याने त्याचा उपयोग केला. (प्रे. कार्ये ७:३०, ३४-३६) यहोवाने मोशेला मिसरच्या शक्‍तिशाली राजाशी बोलायचं धैर्य दिलं. (निर्ग. ९:१३-१९) यहोवाने मोशेचा उपयोग ज्या प्रकारे आणि ज्या वेळी केला त्यावरून आपण काय शिकतो? यहोवा फक्‍त अशा लोकांचाच वापर करतो जे त्याच्या गुणांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि ताकद मिळवण्यासाठी त्याच्यावर अवलंबून राहतात.—फिलिप्पै. ४:१३.

६. यहोवाने दावीद राजाची मदत करण्यासाठी बर्जिल्ल्यचा उपयोग केला त्यावरून आपण काय शिकतो?

अनेक शतकांनंतर, यहोवाने दावीद राजाला मदत करण्यासाठी बर्जिल्ल्यचा उपयोग केला. दावीद आणि त्याचे लोक अबशालोमपासून पळत होते तेव्हा ते “भुकेले” व “तान्हले” होते. अशा वेळी बर्जिल्ल्यने त्यांना मदत केली. तो वृद्ध होता तरी त्याने दावीद आणि त्याच्या सेवकांना मदत करण्यासाठी इतर काही जणांप्रमाणेच स्वतःचा जीव धोक्यात घातला. आता आपलं वय झालं आहे आणि म्हणून आपण यहोवासाठी उपयोगाचे नाही असा विचार बर्जिल्ल्यने केला नाही. याउलट, त्याच्याकडे ज्या गोष्टी होत्या त्यातून त्याने देवाच्या सेवकांना उदारपणे मदत केली. (२ शमु. १७:२७-२९) यावरून आपण काय शिकतो? आपलं वय कितीही असो, यहोवा आपल्या क्षेत्रात किंवा दुसऱ्‍या देशात राहणाऱ्‍या भाऊबहिणींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपला उपयोग करू शकतो. (नीति. ३:२७, २८; १९:१७) आपण प्रत्यक्षपणे त्यांना मदत करू शकत नसलो तरी जगभरात चाललेल्या कामासाठी दान देऊन आपण त्यांना मदत करू शकतो. मग गरजेच्या वेळी आणि ठिकाणी त्या दानाचा उपयोग आपल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी केला जाऊ शकतो.—२ करिंथ. ८:१४, १५; ९:११.

७. यहोवाने शिमोनचा उपयोग कसा केला आणि यामुळे आपल्याला कसं प्रोत्साहन मिळू शकतं?

यहोवाने यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या शिमोन नावाच्या विश्‍वासू वृद्ध माणसाला सांगितलं की मसीहाला पाहण्याआधी त्याचा मृत्यू होणार नाही. या अभिवचनामुळे शिमोनला नक्कीच दिलासा मिळाला असेल कारण तो बऱ्‍याच वर्षांपासून मसीहाची वाट पाहत होता. यहोवाने शिमोनला त्याच्या विश्‍वासाचं आणि धीराचं प्रतिफळ दिलं. एक दिवस देवाच्या “पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो मंदिरात आला” आणि तिथे त्याने बाळ येशूला पाहिलं. ते बाळ पुढे जाऊन ख्रिस्त बनेल अशी भविष्यवाणी करण्यासाठी यहोवाने शिमोनचा उपयोग केला. (लूक २:२५-३५) हे खरं आहे, की येशूने त्याचं सेवाकार्य सुरू केलं तोपर्यंत शिमोन कदाचित जगू शकला नाही, पण तो या गोष्टीसाठी कृतज्ञ होता की यहोवाने त्याचा उपयोग केला. आणि भविष्यातही त्याला भरपूर आशीर्वाद मिळतील. नवीन जगात शिमोन बघू शकेल की येशूच्या राज्यामुळे लोकांना किती फायदा झाला आहे! (उत्प. २२:१८) यहोवा आपलाही उपयोग करून घेतो यासाठी आपण त्याचे खूप आभारी आहोत!

८. यहोवा बर्णबासारखाच आपलाही उपयोग कसा करू शकतो?

पहिल्या शतकात योसेफ नावाच्या उदार व्यक्‍तीने स्वतःला यहोवाच्या सेवेत उपलब्ध करून दिलं. (प्रे. कार्ये ४:३६, ३७) योसेफ इतरांचं चांगल्या प्रकारे सांत्वन करू शकत असावा म्हणून प्रेषितांनी त्याला बर्णबा म्हणजे “सांत्वनाचा पुत्र” असं नाव दिलं. उदाहरणार्थ, शौल ख्रिस्ती बनल्यानंतरही बरेच बांधव त्याला घाबरायचे कारण त्याने आधी ख्रिस्ती मंडळ्यांचा छळ केला होता. पण बर्णबाने शौलचं सांत्वन केलं आणि त्याला मदत केली म्हणून शौलने नक्कीच त्याचे आभार मानले असतील. (प्रे. कार्ये ९:२१, २६-२८) याच्या काही काळानंतर, यरुशलेमच्या वडिलांना दूरवर असलेल्या सूरियातल्या अंत्युखियात राहणाऱ्‍या बांधवांना प्रोत्साहन देण्याची गरज भासली. मग यासाठी त्यांनी कोणाला पाठवलं? त्यांनी इतर कोणाला नाही तर बर्णबाला पाठवलं आणि बांधवांची ही निवड योग्यच होती. आपल्याला माहीत आहे की बर्णबाने “त्या सर्वांना दृढनिश्‍चयाने प्रभूला जडून राहण्याचे प्रोत्साहन दिले.” (प्रे. कार्ये ११:२२-२४) तेव्हासारखंच आजही यहोवा आपल्याला आपल्या भाऊबहिणींसाठी “सांत्वनाचा पुत्र” बनायला मदत करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्या प्रिय व्यक्‍तीला ज्यांनी मृत्यूत गमावलं आहे त्यांना मदत करायला यहोवा आपला उपयोग करू शकतो. किंवा आजारी अथवा निराश झालेल्या व्यक्‍तीला भेटून किंवा त्यांना फोन करून प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठी तो आपल्याला प्रेरित करू शकतो. बर्णबासारखंच तुम्हीही यहोवाला तुमचा उपयोग करू द्याल का?—१ थेस्सलनी. ५:१४.

९. यहोवाने एका बांधवाला निपुण आध्यात्मिक मेंढपाळ बनायला मदत केली त्यावरून आपण काय शिकतो?

यहोवाने वॅसिली नावाच्या बांधवाला मंडळीत एक निपुण आध्यात्मिक मेंढपाळ बनायला मदत केली. वॅसिली २६ वर्षांचा असताना त्याला मंडळीत एक वडील म्हणून नेमण्यात आलं. त्याला भीती वाटत होती की तो मंडळीतल्या भाऊबहिणींना आध्यात्मिक रीत्या मदत करण्यात कमी पडेल, खासकरून जे कठीण परिस्थितीतून जात आहे त्यांना. पण नंतर त्याला अनुभवी वडिलांकडून आणि राज्य सेवा प्रशालेतून प्रशिक्षण मिळालं. वॅसिलीने प्रगती करण्यासाठी खूप मेहनत घेतली. उदाहरणार्थ, त्याने त्याच्या ध्येयांची एक छोटीशी यादी बनवली. जसजसं त्याने प्रत्येक ध्येयं पूर्ण केलं तसतसा त्याचा आत्मविश्‍वास वाढत गेला. याबद्दल आता तो म्हणतो: “तेव्हा मला ज्या गोष्टींची भीती वाटायची आता त्याच गोष्टींमुळे मला आनंद मिळतो. मला भाऊबहिणीला सांत्वन देण्यासाठी यहोवा योग्य वचन शोधायला मदत करतो, तेव्हा मला खूप समाधान वाटतं.” बांधवांनो, तुम्हीही जर वॅसिलीसारखं यहोवाच्या सेवेत स्वतःला उपलब्ध करून दिलं तर तो तुम्हाला मंडळीत आणखी मोठ्या जबाबदाऱ्‍या हाताळायला मदत करेल.

यहोवाने विश्‍वासू स्त्रियांना काय बनण्यासाठी मदत केली?

१०. अबीगईलने काय केलं आणि आपण तिच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो?

१० दावीद आणि त्याच्या सेवकांचा शौल राजा पाठलाग करत होता आणि म्हणून त्यांना मदतीची गरज होती. दावीदच्या माणसांनी एका श्रीमंत इस्राएली माणसाकडून, नाबालकडून मदत मागितली होती. दावीदची माणसं नाबालच्या मेंढरांचं अरण्यात रक्षण करायची, त्यामुळे त्यांना नाबालकडे थोडं अन्‍न मागायला संकोच वाटला नाही. पण स्वार्थी नाबालने त्यांना मदत करायला नकार दिला. ही गोष्ट कळल्यावर दावीदला राग आला आणि त्याने ठरवलं की तो नाबाल आणि त्याच्या घराण्यातल्या सगळ्या पुरुषांना मारून टाकेल. (१ शमु. २५:३-१३, २२) पण नाबालची बायको अबीगईल सुज्ञ होती. ती धैर्याने दावीदकडे गेली आणि त्याच्या पाया पडून त्याला विनंती करू लागली की त्याने नाबाल आणि त्याच्या माणसांचा खून करून सूड घेऊ नये आणि रक्‍तदोषी होऊ नये. तिने समजबुद्धी दाखवत दावीदला सुचवलं की त्याने सर्व गोष्टी यहोवावर सोपवाव्यात. अबीगईल नम्रपणे बोलल्यामुळे आणि तिने समजबुद्धी दाखवल्यामुळे दावीद प्रभावित झाला. त्याला जाणीव झाली की त्याला मदत करायला यहोवानेच तिला पाठवलं आहे. (१ शमु. २५:२३-२८, ३२-३४) अबीगईलने यहोवाला आवडणारे गुण विकसित केल्यामुळे ती यहोवासाठी उपयोगी ठरली. तिच्यासारखंच समजबुद्धी आणि सुज्ञता विकसित करणाऱ्‍या ख्रिस्ती बहिणींचा यहोवा उपयोग करू शकतो. तो त्यांना आपल्या कुटुंबांना आणि मंडळीतल्या इतरांना मजबूत करायला मदत करू शकतो.—नीति. २४:३; तीत २:३-५.

११. शल्लूमच्या मुलींनी काय केलं आणि आज त्यांचं अनुकरण कोण करत आहे?

११ याच्या बऱ्‍याच शतकांनतर, यरुशलेमची भिंत दुरुस्त करण्यात आली तेव्हा यहोवाने त्या कामात इतर लोकांसोबत शल्लूमच्या मुलींचाही उपयोग केला. (नहे. २:२०; ३:१२) त्यांचे वडील अधिकाराच्या पदावर असले, तरी त्या मुली हे कठीण आणि धोक्याचं काम करायला तयार होत्या. (नहे. ४:१५-१८) त्या मुली तकोवाच्या प्रतिष्ठित पुरुषांसारख्या नव्हत्या जे “आपल्या मानेवर . . . कामाचे जू” घ्यायला तयार नव्हते. (नहे. ३:५) यरुशलेमच्या भिंतीचं बांधकाम फक्‍त ५२ दिवसांत पूर्ण झाल्यामुळे शल्लूमच्या मुली किती आनंदित झाल्या असतील याचा जरा विचार करा! (नहे. ६:१५) आज आपल्या काळातही बऱ्‍याच बहिणींना स्वेच्छेने एका खास प्रकारची पवित्र सेवा करण्यात आनंद मिळतो. ती सेवा म्हणजे, यहोवाच्या कामासाठी समर्पित केलेल्या इमारतींचं बांधकाम आणि दुरुस्तीचं काम. या बहिणींचं कौशल्य, उत्साह आणि विश्‍वासूपणा या गोष्टींमुळेच हे काम यशस्वी होऊ शकतं.

१२. यहोवा तबीथासारखा आपलाही उपयोग कसा करू शकतो?

१२ यहोवाने तबीथा हिला खासकरून विधवांसाठी ‘चांगली कामं आणि दान’ करायला प्रेरित केलं. (प्रे. कार्ये ९:३६) तिने मनापासून उदारता आणि दया दाखवल्यामुळे बऱ्‍याच जणांनी तिच्या मृत्यूच्या वेळी शोक केला. पण प्रेषित पेत्रने तिचं पुनरुत्थान केलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. (प्रे. कार्ये ९:३९-४१) आपण तबीथाकडून काय शिकतो? तरुण असो वा वृद्ध, स्त्री असो वा पुरुष, आपण आपल्या भाऊबहिणींना बऱ्‍याच व्यावहारिक मार्गांनी मदत करू शकतो.—इब्री १३:१६.

१३. यहोवाने रूथ नावाच्या लाजाळू बहिणीचा कसा उपयोग केला आणि याबद्दल ती काय म्हणते?

१३ रूथ नावाची बहीण खूप लाजाळू होती. तिला मिशनरी बनायचं होतं. ती लहान असताना प्रचाराला गेल्यावर घरोघरी पटापट पत्रिका द्यायची. ती म्हणते, “मला या कामात खूप आनंद मिळायचा.” असं असलं तरी लोकांच्या घरी जाऊन त्यांना देवाच्या राज्याबद्दल सांगणं हे तिच्यासाठी खरंच एक आव्हान होतं. रूथचा स्वभाव लाजाळू होता तरी अठरा वर्षांची असताना ती पायनियर बनली. १९४६ मध्ये तिला वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि नंतर ती जपान व हवाई या ठिकाणी सेवा करू लागली. त्या देशांमध्ये आनंदाच्या संदेशाचा जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी यहोवाने तिचा उपयोग केला. आता रूथ जवळपास ८० वर्षांपासून प्रचार करत आहे आणि याबद्दल ती म्हणते: “यहोवाने मला नेहमीच शक्‍ती दिली आहे. माझ्या लाजाळू स्वभावावर मात करण्यासाठी त्याने मला मदत केली. आणि मला खातरी आहे की, जो कोणी यहोवावर भरवसा ठेवतो त्याचा तो उपयोग करतो.”

यहोवाला तुमचा उपयोग करू द्या

१४. कलस्सैकर १:२९ या वचनानुसार यहोवाने आपला उपयोग करावा यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१४ प्राचीन काळापासून यहोवाने वेगवेगळ्या मार्गांनी त्याच्या सेवकांचा उपयोग केला आहे. तो तुम्हाला काय बनायला मदत करेल? तुम्ही त्याच्या सेवेत किती मेहनत घ्यायला तयार आहात यावर हे अवलंबून आहे. (कलस्सैकर १:२९ वाचा.) तुम्ही जर स्वतःला उपलब्ध करून दिलं तर यहोवा तुम्हाला एक आवेशी प्रचारक, निपुण शिक्षक, कुशल कारागीर, प्रभावी सांत्वन करणारा, भरवशालायक मित्र किंवा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी जे बनण्याची गरज आहे ते बनायला मदत करू शकतो.

१५. १ तीमथ्य ४:१२, १५ या वचनांनुसार तरुण बांधवांनी कोणत्या गोष्टीसाठी यहोवाला कळकळून प्रार्थना केली पाहिजे?

१५ तारुण्यात पदार्पण करणाऱ्‍या किशोरवयीन बांधवांनो तुमच्याबद्दल काय? मंडळीत सहायक सेवकाची जबाबदारी हाताळू शकणाऱ्‍या आवेशी बांधवांची आज खूप गरज आहे. बऱ्‍याचशा मंडळ्यांमध्ये वडिलांची संख्या सहायक सेवकांपेक्षा जास्त आहे. किशोरवयीन बांधवांनो, तुम्ही मंडळ्यांमध्ये आणखी जास्त जबाबदारी घ्यायची इच्छा विकसित करू शकता का? कधीकधी काही बांधव म्हणतील, “मी एक प्रचारक म्हणून सेवा करत आहे आणि त्यातच मी आनंदी आहे.” तुम्हालाही असंच वाटत असेल तर यहोवाला कळकळून प्रार्थना करा की त्याने तुम्हाला सहायक सेवक बनण्यासाठी मदत करावी आणि त्याच्या सेवेत कोणतंही काम करण्याची क्षमता द्यावी. (उप. १२:१) मंडळ्यांना तुमच्या मदतीची खरंच गरज आहे!—१ तीमथ्य ४:१२, १५ वाचा.

१६. आपण यहोवाकडे कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि का?

१६ यहोवा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे बनण्याची गरज आहे ते बनायला मदत करू शकतो. तेव्हा त्याचं काम करण्याची इच्छा विकसित करण्यासाठी, आणि त्यानंतर ते काम पूर्ण करायला लागणाऱ्‍या ताकदीसाठी त्याच्याकडे प्रार्थना करा. तुम्ही तरुण असाल किंवा वृद्ध, आज यहोवाचा गौरव करण्यासाठी आपल्या वेळेचा, ताकदीचा, कौशल्यांचा आणि संपत्तीचा उपयोग करा. (उप. ९:१०) तुम्हाला यहोवाच्या सेवेत आणखी जास्त करण्याची सुवर्ण संधी मिळते तेव्हा कमीपणाच्या भावनेमुळे किंवा तुम्हाला ती गोष्ट जमणार नाही या विचारामुळे लगेच ‘नाही’ म्हणू नका. आपल्या प्रेमळ पित्याचा गौरव करण्यासाठी आपल्याला एक लहानसा वाटा मिळाला असला, तरी तो आपल्यासाठी एक खूप मोठा बहुमान आहे!

गीत २९ खरेपणाने चालणे

^ परि. 5 तुम्ही यहोवाची सेवा खूप कमी प्रमाणात करत आहात का? किंवा त्याच्या सेवेत तुम्ही आजही उपयोगी आहात का अशी शंका तुमच्या मनात येते का? किंवा यहोवाच्या सेवेत आता तुम्हाला जास्त करण्याची गरज नाही असं तुम्हाला वाटतं का? या लेखात चर्चा करण्यात आली आहे की यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे बनण्याची गरज आहे, त्यासाठी तो आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी इच्छा आणि शक्‍ती देऊ शकतो.

^ परि. 3 पौलने पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांसाठी पत्र लिहिलं असलं तरी त्यातले शब्द आज यहोवाच्या सर्व सेवकांना लागू होतात.