व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३१

“आपण धैर्य सोडत नाही”

“आपण धैर्य सोडत नाही”

“म्हणूनच, आपण धैर्य सोडत नाही.”—२ करिंथ. ४:१६.

गीत २४ ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!

सारांश *

१. जीवनाची शर्यत पूर्ण करण्यासाठी सर्व ख्रिश्‍चनांनी काय करणं गरजेचं आहे?

ख्रिस्ती आज जीवनाच्या शर्यतीत धावत आहेत. आपण नुकतंच धावायला सुरुवात केली असो किंवा बऱ्‍याच वर्षांपासून धावत असू, आपल्याला अंतिम रेषा गाठेपर्यंत धावत राहणं गरजेचं आहे. प्रेषित पौलने फिलिप्पैमध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रामुळे आपल्यालाही शर्यत पूर्ण करण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. पौलने पत्र पाठवलं तेव्हा फिलिप्पैमधल्या मंडळीतले काही लोक बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत होते. ते यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत होते पण तरीही पौलने त्यांना धीराने धावत राहण्याचं प्रोत्साहन दिलं. पौलची इच्छा होती की त्यांनी “बक्षीस मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न” करण्याच्या बाबतीत त्याचं अनुकरण करावं.—फिलिप्पै. ३:१४.

२. पौलने फिलिप्पैकरांना अगदी योग्य वेळी सल्ला दिला असं का म्हणता येईल?

पौलने अगदी योग्य वेळी फिलिप्पैकरांना सल्ला दिला. मंडळीची सुरुवात झाल्यापासूनच तिथल्या बांधवांना विरोधाचा सामना करावा लागला. इ.स. ५० मध्ये पौल आणि सीला यांना देवाकडून “मासेदोनियात” जाण्याचं निर्देशन मिळाल्यामुळे ते आनंदाचा संदेश सांगण्यासाठी फिलिप्पै इथे पोहोचले. (प्रे. कार्ये १६:९) तिथे त्यांना लुदिया नावाची स्त्री भेटली. ती पौलचं बोलणं “लक्ष देऊन ऐकत होती” आणि आनंदाचा संदेश “स्वीकारण्यासाठी यहोवाने तिचे अंतःकरण पूर्णपणे उघडले.” (प्रे. कार्ये १६:१४) त्यानंतर तिने लवकरच आपल्या घराण्यासोबत बाप्तिस्मा घेतला. पण सैतान शांत बसला नाही, त्याने लगेच छळ सुरू केला. शहरातल्या माणसांनी पौल आणि सीला यांना अधिकाऱ्‍यांपुढे नेलं आणि ते गोंधळ माजवत आहेत असा खोटा आरोप त्यांच्यावर लावला. यामुळे मग पौल आणि सीला यांना फटके मारण्यात आले, तुरुंगात टाकण्यात आलं आणि नंतर त्यांना शहर सोडून जाण्यासाठी सांगण्यात आलं. (प्रे. कार्ये १६:१६-४०) इतकं सर्व झाल्यावरही त्यांनी हिंमत हारली का? नाही! आणि नवीनच सुरू झालेल्या तिथल्या मंडळीतल्या भाऊबहिणींबद्दल काय? त्यांनीसुद्धा सर्वकाही अगदी धीराने सहन केलं. खरंच, त्यांचंही उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे! यात काहीच शंका नाही की पौल आणि सीला यांच्या चांगल्या उदाहरणामुळे त्यांना प्रोत्साहन मिळालं होतं.

३. पौलला कशाची जाणीव झाली आणि आता आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

पौलने हार न मानण्याचा निर्धार केला होता. (२ करिंथ. ४:१६) त्याला माहीत होतं की शर्यत पूर्ण करण्यासाठी त्याने ध्येयावर लक्ष केंद्रित करून ठेवायलाच हवं. आपण पौलच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो? आधुनिक काळातल्या विश्‍वासू भाऊबहिणींच्या उदाहरणांवरून कसं कळतं की आपण धीराने समस्यांचा सामना करू शकतो? आणि भविष्यासाठी असलेल्या आशेमुळे कधीही धैर्य न सोडण्याचा आपला निर्धार आणखी पक्का कसा होऊ शकतो?

पौलच्या उदाहरणाचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो

४. पौल कठीण परिस्थितीत असतानाही यहोवाच्या सेवेत व्यस्त कसा राहिला?

पौलने फिलिप्पैकरांना पत्र लिहिलं तेव्हा तो आनंदाच्या संदेश सांगण्यासाठी झटून प्रयत्न करत होता. रोममध्ये त्याला घरात बंदी बनवून ठेवलं होतं. तो बाहेर जाऊन लोकांना प्रचार करू शकत नव्हता. असं असलं तरी त्याला भेटायला येणाऱ्‍या लोकांना तो प्रचार करायचा आणि दूरवर असलेल्या मंडळ्यांना पत्रंही लिहायचा. तसंच, आजही अनेक बंधुभगिनी घरातून बाहेर जाऊ शकत नाहीत. घरी भेटायला येणाऱ्‍या लोकांना ते आनंदाचा संदेश सांगण्याच्या प्रत्येक संधीचं सोनं करतात. तसंच, ते अशा लोकांना पत्रंही लिहितात ज्यांना वैयक्‍तिक रीत्या भेटणं त्यांना शक्य नसतं.

५. फिलिप्पैकर ३:१२-१४ यांत दिलेल्या शब्दांनुसार पौलला त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला कशामुळे मदत झाली?

पौलने पूर्वी मिळालेल्या यशामुळे किंवा आधी केलेल्या चुकांमुळे स्वतःचं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. याउलट, त्याने म्हटलं की “पुढे असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी झटत” राहायचं असेल, म्हणजे शर्यत यशस्वीपणे पूर्ण करायची असेल तर “मागच्या गोष्टी” विसरणं खूप महत्त्वाचं आहे. (फिलिप्पैकर ३:१२-१४ वाचा.) कोणत्या काही गोष्टींमुळे पौलचं लक्ष विचलित होऊ शकत होतं? पहिली गोष्ट, ख्रिस्ती बनण्याआधी त्याने यहुदी लोकांमध्ये खूप नाव कमवलं होतं, तरी त्याने त्या गोष्टींना “केरकचरा” समजलं. (फिलिप्पै. ३:३-८) दुसरी गोष्ट, त्याने सुरुवातीला ख्रिश्‍चनांचा छळ केल्यामुळे त्याच्या मनात दोषीपणाची भावना यायची, पण तरी त्याने यहोवाची सेवा करायची सोडली नाही. आणि तिसरी गोष्ट, त्याने असा विचार केला नाही की यहोवाच्या सेवेत आपण खूपकाही केलं आहे आणि आता आणखी जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. पौलला तुरुंगात टाकण्यात आलं, फटके मारण्यात आले, दगडमार करण्यात आला, त्याचं जहाज फुटलं, त्याला अन्‍न-वस्त्रांची कमतरता होती, तरीही त्याने चांगल्या प्रकारे सेवाकार्य केलं. (२ करिंथ. ११:२३-२७) पौलला पूर्वी यश मिळालं आणि दुःख-त्रासही सहन करावा लागला, तरीदेखील यहोवाची सेवा करत राहणं गरजेचं आहे हे त्याला माहीत होतं. हीच गोष्ट आपल्या बाबतीतही खरी आहे.

६. आपल्याला ‘मागच्या कोणत्या काही गोष्टी’ विसरण्याची गरज पडू शकते?

आपण “मागच्या गोष्टी विसरून” जाण्याच्या बाबतीत पौलचं अनुकरण कसं करू शकतो? पूर्वी केलेल्या पापांमुळे आपल्यापैकी काहींना आजही दोषीपणाची भावना सतावत असेल. यांवर आपण कशी मात करू शकतो? ख्रिस्ताने दिलेलं खंडणी बलिदान याविषयावर वैयक्‍तिक अभ्यास केल्यामुळे आपल्याला मदत होऊ शकते. आपण या प्रोत्साहनदायक विषयाबद्दल अभ्यास, मनन आणि प्रार्थना केली तर अनावश्‍यकपणे येणाऱ्‍या दोषीपणाच्या भावनेवर आपण मात करू शकू. आपल्याला यहोवाने केव्हाच माफ केलं असेल, पण आपण कदाचित स्वतःला अजूनही शिक्षा करत असू. अशा भावनेवरसुद्धा आपल्याला मात करायला मदत होईल. पौलकडून आपण आणखी एक धडा शिकू शकतो. यहोवाची सेवा वाढवण्यासाठी काहींनी अशी नोकरी सोडली ज्यामुळे पुढे जाऊन ते श्रीमंत होऊ शकले असते. आपल्याबाबतीतही जर असं असेल तर आपणही मागे सोडलेल्या गोष्टी विसरल्या पाहिजेत. आपण पैसे कमवण्याची संधी सोडली नसती तर आपल्याकडे आज अनेक गोष्टी असत्या असा विचार करण्याचं आपण टाळलं पाहिजे. (गण. ११:४-६; उप. ७:१०) “मागच्या गोष्टी” यांमध्ये कदाचित अशा गोष्टीही असू शकतात ज्या आपण साध्य केल्या आहेत किंवा अशा परीक्षा ज्यांना आपण यशस्वीपणे तोंड दिलं आहे. हे खरं आहे, की यहोवाने पूर्वी आपल्याला ज्या प्रकारे मदत केली त्यावर विचार केल्यामुळे आपलं त्याच्यासोबतचं नातं घनिष्ठ होऊ शकतं. पण यामुळे आपण असा विचार करू नये की आता यहोवासाठी आपल्याला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही.—१ करिंथ. १५:५८.

जीवनाच्या शर्यतीत आपण लक्ष विचलित होणाऱ्‍या गोष्टींकडे पाहण्याचं टाळलं पाहिजे आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून ठेवलं पाहिजे (परिच्छेद ७ पाहा)

७. १ करिंथकर ९:२४-२७ या वचनांनुसार जीवनाची शर्यत जिंकण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? उदाहरण द्या.

येशूने म्हटलं होतं: “कसोशीने प्रयत्न करा.” या शब्दांचा अर्थ पौलला समजला होता. (लूक १३:२३, २४) ख्रिस्तासारखं शेवटच्या श्‍वासापर्यंत आपल्यालाही कसोशीने प्रयत्न करावा लागेल हे पौलला माहीत होतं. म्हणूनच, त्याने ख्रिश्‍चनांच्या जीवनाची तुलना शर्यतीशी केली. (१ करिंथकर ९:२४-२७ वाचा.) शर्यतीत भाग घेणारा आजूबाजूला न पाहता पूर्णपणे अंतिम रेषेवर लक्ष केंद्रित करतो. उदाहरणार्थ, आज शहरात आयोजित केल्या जाणाऱ्‍या शर्यतीतले धावक कदाचित अशा रस्त्यांवरून धावतील जिथे आजूबाजूला दुकानं किंवा इतर लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टी असतील. कल्पना करा की एखादा धावक शोरूम किंवा दुकानातल्या गोष्टींकडे पाहण्यासाठी मध्येच थांबला तर काय होईल? तो जिंकणार नाही. त्याला जर जिंकायचं असेल तर तो मुळीच थांबणार नाही! त्याच प्रकारे आपणही जीवनाच्या शर्यतीत लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टींकडे पाहण्याचं टाळलं पाहिजे. जर पौलसारखं आपणही ध्येय डोळ्यांपुढे ठेवलं आणि आवेशाने यहोवाची सेवा केली तर आपल्याला बक्षीस नक्कीच मिळेल!

आव्हानं असतानाही यहोवाची सेवा करत राहणं

८. आपण कोणत्या तीन आव्हानांवर चर्चा करणार आहोत?

आता आपण अशा तीन आव्हानांवर चर्चा करू या ज्यांमुळे आपली गती कमी होऊ शकते. ती आव्हानं म्हणजे, अपेक्षा पूर्ण होण्यासाठी वेळ लागणं, तब्येत खालावणं आणि जास्त काळापर्यंत परीक्षांचा सामना करणं. इतरांनी अशा परिस्थितींचा कसा सामना केला याबद्दल जाणून घेतल्याने आपल्याला मदत होऊ शकते.—फिलिप्पै. ३:१७.

९. अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागतो तेव्हा त्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो?

अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागणं. यहोवाने दिलेली अभिवचनं पूर्ण होण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत आणि हे स्वाभाविक आहे. खरंतर, यहोवाचा सेवक हबक्कूक याने आशा धरली की देवाने लवकरच यहूदामध्ये चाललेल्या दुष्टतेचा अंत करावा, तेव्हा यहोवाने त्याला “वाट” पाहायला सांगितलं. (हब. २:३) पण आपल्या अपेक्षा पूर्ण व्हायला उशीर होत आहे असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपला उत्साह कमी होऊ शकतो. इतकंच काय, तर आपण कदाचित निराशही होऊ. (नीति. १३:१२) असंच काहीसं जवळपास १९१४ च्या सुरुवातीला घडलं. त्या वेळी अनेक अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना वाटलं होतं, की ते त्याच वर्षी स्वर्गात जातील. पण असं घडलं नाही तेव्हा या विश्‍वासू सेवकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?

रॉयल आणि पर्ल स्पाट्‌झ यांनी १९१४ मध्ये आपली आशा पूर्ण होताना पाहिली नाही, पण असं असलं तरी ते बरीच दशकं विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत राहिले (परिच्छेद १० पाहा)

१०. अपेक्षा पूर्ण झाली नाही तेव्हा एका जोडप्याने काय केलं?

१० दोन विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी याबाबतीत कसं एक चांगलं उदाहरण मांडलं याकडे लक्ष द्या. बंधू रॉयल स्पाट्‌झ यांचा बाप्तिस्मा १९०८ मध्ये म्हणजे ते २० वर्षांचे होते तेव्हा झाला. त्यांना पक्का भरवसा होता की लवकरच ते स्वर्गात जातील. त्यांनी १९११ मध्ये पर्ल नावाच्या बहिणीला लग्नासाठी मागणी घातली तेव्हा त्यांनी तिला म्हटलं: “१९१४ मध्ये काय होणार आहे हे तर तुला माहीतच आहे. आपल्याला लग्न करायचं आहे तर आपण लवकरच केलं पाहिजे!” या ख्रिस्ती जोडप्याची १९१४ मध्ये स्वर्गात जाण्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही तेव्हा त्यांनी जीवनाच्या शर्यतीत हार मानली का? नाही. कारण त्यांचं लक्ष प्रतिफळ मिळवण्यावर नाही तर विश्‍वासूपणे देवाची इच्छा पूर्ण करण्यावर केंद्रित होतं. त्यांनी धीराने धावत राहण्याचा पक्का निर्धार केला होता. याचा परिणाम म्हणजे, रॉयल आणि पर्ल यांचं पृथ्वीवरचं जीवन संपेपर्यंत ते यहोवाच्या सेवेत सक्रिय आणि विश्‍वासू राहिले. यात काहीच शंका नाही, की आपण त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा यहोवाच्या नावावर लागलेला कलंक मिटेल, राज्य करण्याची त्याचीच पद्धत योग्य आहे हे सिद्ध होईल आणि त्याने दिलेली सर्व अभिवचनं पूर्ण होतील. यहोवाने ठरवलेल्या वेळी हे सगळं नक्कीच पूर्ण होईल याची आपण पक्की खातरी बाळगू शकतो. पण तोपर्यंत अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे या गोष्टीमुळे निराश होऊ नका किंवा आपला आवेश कमी करू नका, तर यहोवाच्या सेवेत व्यस्त राहा.

आपल्या म्हातारपणीही आर्थर सेकॉर्ड (डावीकडे) यांना यहोवाच्या सेवेत आपलं सर्वोत्तम द्यायचं होतं. (परिच्छेद ११ पाहा)

११-१२. आपली तब्येत खालावत चालली असली तरी आपण विश्‍वासूपणे यहोवाची सेवा कशी करत राहू शकतो? एक उदाहरण द्या.

११ तब्येत खालावणं. एका धावकाला शारीरिक बळाची गरज असते, पण आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी आपल्याला शारीरिक बळाची गरज नाही. खरंतर, ज्या लोकांची तब्येत वयामुळे किंवा इतर काही कारणांमुळे खालावली आहे, त्यांची आजही यहोवाच्या सेवेत आपलं सर्वोत्तम देण्याची प्रबळ इच्छा आहे. (२ करिंथ. ४:१६) उदाहरणार्थ, बंधू आर्थर सेकॉर्ड यांनी ५५ वर्षं बेथेल सेवा केली. वाढत्या वयामुळे त्यांची तब्येत खालावली होती. ८८ वर्षांचे असताना त्यांची काळजी घेणाऱ्‍या नर्सने त्यांना एकदा म्हटलं: “ब्रदर सेकॉर्ड तुम्ही यहोवाच्या सेवेत खूप काही केलं आहे.” पण बंधू सेकॉर्ड यांनी पूर्वी साध्य केलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं नाही. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि हसून म्हटलं: “हो, हे खरं आहे. पण आपण आधी जे केलं ते महत्त्वाचं नाही, तर आपण पुढे जे करणार आहोत ते जास्त महत्त्वाचं आहे.”

१२ आपण कदाचित यहोवाची सेवा खूप वर्षांपासून करत असू. पण आता तब्येत खालावत चालल्यामुळे आपल्याला पूर्वीसारखी सेवा करणं शक्य नसेल. जर असं असेल, तर निराश होऊ नका. तुम्ही विश्‍वासूपणे केलेली सेवा यहोवा विसरणार नाही आणि तो त्याची कदर करतो याबद्दल खातरी बाळगा. (इब्री ६:१०) तसंच, आपलं यहोवावर किती प्रेम आहे हे त्याची आपण किती प्रमाणात सेवा करतो यावरून नाही, तर आपली चांगली मनोवृत्ती आणि आपण घेत असलेली मेहनत यांवरून ठरतं. (कलस्सै. ३:२३) यहोवा आपल्या कमतरता जाणतो आणि आपण जितकं करू शकतो त्यापेक्षा जास्तीची अपेक्षा तो आपल्याकडून करत नाही.—मार्क १२:४३, ४४.

ॲनाटोली आणि लिडिया मॅलनिक यांनी अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला तरी ते विश्‍वासू राहिले (परिच्छेद १३ पाहा)

१३. आपण आधी परीक्षांचा सामना केला असेल तरी ॲनाटोली आणि लिडिया यांच्या उदाहरणावरून आपल्याला यहोवाची सेवा पुढेही करत राहण्याचं प्रोत्साहन कसं मिळतं?

१३ जास्त काळापर्यंत राहणाऱ्‍या परीक्षा. यहोवाच्या काही सेवकांनी अनेक दशकं परीक्षांचा आणि छळाचा सामना केला आहे. उदाहरणार्थ, ॲनाटोली मॅलनिक * हे मॉलडोवा इथे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. ते फक्‍त १२ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यांना आपल्या कुटुंबापासून ७,००० किलोमीटर दूर साइबीरियाला पाठवण्यात आलं. याच्या एका वर्षांनंतर ॲनाटोली, त्यांची आई, त्यांचे आजी-आजोबा यांनाही साइबीरियाला पाठवण्यात आलं. मग पुढे, काही काळानंतर ते दुसऱ्‍या गावात असलेल्या सभेला उपस्थित राहू शकले. पण त्यांना यासाठी कडाक्याच्या थंडीत, बर्फातून ३० किलोमीटर चालावं लागायचं. नंतर बंधू ॲनाटोली यांना तीन वर्षं तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांना आपली पत्नी, लिडीया हिच्यापासून आणि त्यांच्या एका वर्षाच्या मुलीपासून दूर राहावं लागलं. इतकी वर्षं त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने कठीण परिस्थितींचा सामना केला तरी ते यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहिले. आज बंधू ॲनाटोली ८२ वर्षांचे आहेत आणि मध्य आशियाच्या शाखा समितीचे सदस्य म्हणून काम करत आहेत. ॲनाटोली आणि लिडिया यांच्यासारखं आपणही यहोवाच्या सेवेत आपल्याला जे काही करता येईल ते करत राहू या आणि आधीसारखा पुढेही धीर दाखवत राहू या.—गलती. ६:९.

भविष्याच्या आशेवर लक्ष केंद्रित करून ठेवा

१४. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पौलला काय करावं लागणार होतं?

१४ पौलला पक्की खातरी होती की तो शर्यत पूर्ण करून आपलं ध्येय गाठेल. एक अभिषिक्‍त ख्रिस्ती या नात्याने त्याला देवाने “दिलेल्या वरील बोलावण्याचे बक्षीस” मिळण्याची आशा होती. पण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला “कसोशीने प्रयत्न” करत राहावं लागेल याची त्याला जाणीव होती. (फिलिप्पै. ३:१४) पौलने एक चांगलं उदाहरण वापरून फिलिप्पैकरांना आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला मदत केली.

१५. पौलने नागरिकत्वाचं उदाहरण वापरून फिलिप्पैमधल्या ख्रिश्‍चनांना “कसोशीने प्रयत्न” करत राहण्यासाठी कसं प्रोत्साहन दिलं?

१५ पौलने फिलिप्पैकरांना त्यांच्या स्वर्गातल्या नागरिकत्वाची आठवण करून दिली. (फिलिप्पै. ३:२०) त्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं का होतं? त्या काळात रोमी नागरिकत्व असणं ही खूप बहुमानाची गोष्ट समजली जायची. * पण अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांकडे त्यापेक्षाही जास्त चांगलं नागरिकत्व होतं आणि त्यामुळे त्यांना बरेच फायदे मिळणार होते. स्वर्गातल्या नागरिकत्वाच्या तुलनेत रोमी नागरिकत्वाचं मोल खूप कमी होतं. यामुळे पौलने फिलिप्पैकरांना प्रोत्साहन दिलं: “ख्रिस्ताविषयीच्या आनंदाच्या संदेशाला शोभेल अशा नागरिकांसारखे आचरण करा.” (फिलिप्पै. १:२७, तळटीप) आज अभिषिक्‍त जण स्वर्गातलं कायमस्वरूपाचं जीवन मिळवण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करताना कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांचं खरंच आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण आहे!

१६. आपली आशा स्वर्गातली असो किंवा पृथ्वीवरची आपण फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनांनुसार काय करत राहिलं पाहिजे?

१६ आपली आशा स्वर्गातली असो किंवा पृथ्वीवरची, आपण आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. आपली परिस्थिती कशीही असो, आपण मागच्या गोष्टींकडे मुळीच पाहणार नाही आणि कोणत्याच गोष्टीला आपल्या प्रगतीच्या आड येऊ देणार नाही. (फिलिप्पै. ३:१६) आपल्या अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे असं आपल्याला वाटत असेल, आपली तब्येत खालावत चालली असेल, किंवा आपण बरीच वर्षं परीक्षांचा व छळाचा सामना केला असेल तरी “कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका.” याउलट, आपल्या विनंत्या आणि याचना देवाला कळवा आणि तो तुम्हाला सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली शांती देईल.—फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा.

१७. आपण पुढच्या लेखात कशावर चर्चा करणार आहोत?

१७ एक धावक शर्यतीच्या अंतिम टप्प्यात आपली सर्व शक्‍ती पणाला लावून प्रयत्न करतो, त्याप्रमाणे आपणही जीवनाची शर्यत पूर्ण करण्याच्या ध्येयावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपल्या शक्‍तीनुसार आणि परिस्थितीनुसार आपण कसोशीने प्रयत्न केला पाहिजे आणि पुढे ठेवलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रगती करत राहिलं पाहिजे. पण कसोशीने योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी आणि योग्य गती राखण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे? कोणत्या गोष्टी जीवनात पहिल्या स्थानी ठेवायच्या आणि “कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत” हे कसं ठरवायचं, हे पुढच्या लेखातून आपल्याला समजायला मदत होईल.—फिलिप्पै. १:९, १०.‏

गीत ७ ख्रिस्ती समर्पण

^ परि. 5 आपण जरी बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो तरी आपल्याला ख्रिस्ती या नात्याने प्रगती आणि सुधार करत राहण्याची गरज आहे. प्रेषित पौलने सहविश्‍वासू जणांना हार न मानण्याचं प्रोत्साहन दिलं. पौलने फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रातून, आपल्याला जीवनाच्या शर्यतीत धीराने धावण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. पौलचे शब्द जीवनात कसे लागू करायचे याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

^ परि. 13 सावध राहा! ८ जानेवारी २००५ यात “देवावर प्रेम करायला मला बालपणापासून शिकवण्यात आलं” ही बंधू ॲनाटोली मॅलनिकची जीवन कथा पाहा.

^ परि. 15 फिलिप्पै शहरात रोमी लोकांची वसाहत होती. एका रोमी नागरिकाकडे असलेल्या अधिकारांपैकी काही अधिकार फिलिप्पै इथल्या नागरिकांकडे होते. म्हणून पौलने दिलेलं उदाहरण फिलिप्पैच्या बांधवांना समजण्यासारखं होतं.