व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३३

“जे तुझे ऐकतात” त्यांना वाचवलं जाईल

“जे तुझे ऐकतात” त्यांना वाचवलं जाईल

“स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे. या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःला आणि जे तुझे ऐकतात त्यांनाही वाचवशील.”—१ तीम. ४:१६.

गीत ४७ सुवार्ता घोषित करा!

सारांश *

१. आपल्या नातेवाइकांबद्दल आपली काय इच्छा असते?

पॉलीन * नावाची एक बहीण म्हणते: “सत्यात आल्यापासून मला नेहमी वाटायचं, की नवीन जगात माझ्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी माझ्यासोबत असावं. माझ्या पतीने, म्हणजे वेनने आणि माझ्या मुलाने माझ्यासोबत यहोवाची सेवा करावी अशी माझी मनापासून इच्छा होती.” तुमचेही असे काही नातेवाईक आहेत का जे अजून सत्यात आलेले नाहीत? मग पॉलीनप्रमाणे कदाचित तुमचीही इच्छा असेल की तुमच्या नातेवाइकांनी यहोवाची सेवा करावी.

२. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

आपण आपल्या नातेवाइकांना आनंदाचा संदेश स्वीकारण्यासाठी बळजबरी करू शकत नाही. पण आपण त्यांना बायबलच्या संदेशाबद्दल विचार करण्याचं आणि त्याला प्रतिसाद देण्याचं प्रोत्साहन मात्र नक्कीच देऊ शकतो. (२ तीम. ३:१४, १५) आपण आपल्या नातेवाइकांना साक्ष का दिली पाहिजे? आपण त्यांच्या भावना समजून घेणं का गरजेचं आहे? नातेवाइकांनी आपल्यासारखं यहोवावर प्रेम करावं यासाठी आपण त्यांना कशी मदत करू शकतो? आपल्या मंडळीतले भाऊबहीण आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतात?

आपल्या नातेवाइकांना साक्ष का द्यावी?

३. २ पेत्र ३:९ या वचनानुसार आपण आपल्या नातेवाइकांना साक्ष का दिली पाहिजे?

लवकरच यहोवा या व्यवस्थेचा नाश करणार आहे. फक्‍त “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असणाऱ्‍या लोकांना वाचवलं जाईल. (प्रे. कार्ये १३:४८) आपल्या क्षेत्रात राहणाऱ्‍या अनोळखी लोकांना प्रचार करण्यासाठी आपण आपला बराच वेळ आणि शक्‍ती खर्च करतो. तर मग आपल्याला असं वाटणं स्वाभाविकच आहे की आपल्या नातेवाइकांनीसुद्धा सत्यात यावं आणि आपल्यासोबत यहोवाची सेवा करावी. आपला प्रेमळ पिता यहोवा याची अशी इच्छा नाही की “कोणाचाही नाश व्हावा . . . तर सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असे त्याला वाटते.”—२ पेत्र ३:९ वाचा.

४. आपल्या नातेवाइकांना प्रचार करताना आपल्या हातून कोणती चूक होण्याची शक्यता आहे?

आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण आनंदाचा संदेश सांगतो तेव्हा एकतर तो योग्य किंवा अयोग्य पद्धतीने सांगितला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, अनोळखी लोकांना प्रचार करताना कदाचित आपण विचारपूर्वक बोलू. पण आपल्या नातेवाइकांना प्रचार करताना आपण कदाचित मागचा पुढचा विचार न करता बोलू.

५. आपल्या नातेवाइकांशी सत्याबद्दल बोलण्याआधी आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

आपण पहिल्यांदा आपल्या नातेवाइकांना ज्या प्रकारे सत्य सांगितलं त्याबद्दल विचार करून आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना वाईट वाटू शकतं. आपण त्यांना त्या वेळी वेगळ्या पद्धतीने सांगितलं असतं, तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटू शकतं. प्रेषित पौलने ख्रिश्‍चनांना सल्ला दिला: “तुमचे बोलणे नेहमी प्रेमळ, मिठाने रुचकर केल्याप्रमाणे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला समजेल.” (कलस्सै. ४:५, ६) आपल्या नातेवाइकांशी बोलताना आपण हा सल्ला लक्षात ठेवला पाहिजे. आपण असं केलं नाही, तर संदेशाबद्दल उत्सुकता निर्माण होण्याऐवजी त्यांचं मन दुखावलं जाईल.

नातेवाइकांना आपण कशी मदत करू शकतो?

कुटुंबातल्या सदस्यांच्या भावना समजून घेतल्यामुळे आणि आपल्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना चांगली साक्ष मिळू शकते (परिच्छेद ६-८ पाहा) *

६-७. सत्यात नसलेल्या विवाहसोबत्याच्या भावना समजून घेणं का गरजेचं आहे? एक उदाहरण द्या.

भावना समजून घ्या. आधी उल्लेख केलेली पॉलीन म्हणते: “सुरुवातीला मला वेनसोबत, देव आणि बायबल या विषयांवरच बोलावंसं वाटायचं. इतर रोजच्या विषयांवर आमचं बोलणंच व्हायचं नाही.” खरंतर, पॉलीनचे पती वेन यांना बायबलबद्दल फार कमी माहिती होती आणि पॉलीन काय म्हणायची ते त्यांना कळायचंच नाही. त्यांना वाटायचं की ती आपल्या धर्माबद्दलच विचार करते. ती एका धोकेदायक पंथाची सदस्य झाली आहे आणि तिची दिशाभूल होत आहे अशी चिंता त्यांना वाटत होती.

पॉलीन मान्य करते की काही काळासाठी ती संध्याकाळचा आणि शनिवार-रविवारचा बराचसा वेळ तिच्या मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत घालवायची. जसं की सभेत, प्रचारात आणि इतर वेळी. पॉलीन म्हणते: “वेन घरी यायचे तेव्हा कधीकधी घरी कोणीच नसायचं आणि यामुळे त्यांना एकटं वाटायचं.” आपण घरी आलो तर आपली पत्नी आणि मुलगा यांनी आपल्यासोबत घरी असावं, असं वेनला वाटणं स्वाभाविक होतं. वेनची पत्नी आणि मुलगा ज्या लोकांसोबत वेळ घालवायचे त्यांना तो ओळखत नव्हता आणि आपल्या पत्नीचे नवीन मित्रमैत्रिणी तिच्यासाठी आपल्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत असं त्याला वाटायचं. यामुळे वेनने पॉलीनला घटस्फोट देण्याची धमकी दिली. तुम्हाला काय वाटतं, पॉलीन आपल्या पतीच्या भावना आणखी चांगल्या प्रकारे कशा समजून घेऊ शकली असती?

८. १ पेत्र ३:१, २ या वचनांनुसार आपल्या नातेवाइकांवर कोणत्या गोष्टीचा जास्त प्रभाव पडू शकतो?

चांगलं उदाहरण मांडा. सहसा आपण जे बोलतो त्याकडे नाही, तर आपण जे करतो त्याकडे आपल्या नातेवाइकांचं जास्त लक्ष असतं. (१ पेत्र ३:१, २ वाचा.) पॉलीनला शेवटी ही गोष्ट समजली. ती म्हणते: “मला माहीत होतं की वेन आमच्यावर प्रेम करतात आणि खरंतर त्यांना घटस्फोट द्यायची इच्छा नाहीये.” ती पुढे म्हणते: “वेन जेव्हा घटस्फोट देण्याबद्दल बोलले तेव्हा मला जाणवलं की यहोवाने विवाहाबद्दल जे काही मार्गदर्शन दिलं आहे त्यानुसार मी वागलं पाहिजे. माझ्या पतीला सत्याबद्दल खूपकाही सांगत राहण्याऐवजी मला माझ्या वागण्यातून त्यांच्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे.” म्हणून पॉलीन सतत वेनशी बायबलबद्दल चर्चा करण्याऐवजी दररोजच्या गोष्टींबद्दल बोलू लागली. वेनच्या लक्षात आलं की पॉलीन आता शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांचा मुलगा सांगितलेल्या गोष्टी ऐकतो आणि आदराने वागतो. (नीति. ३१:१८, २७, २८) बायबलच्या संदेशामुळे आपल्या कुटुंबावर चांगला परिणाम होत आहे हे जेव्हा वेनच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने देवाच्या वचनावर विचार करायला आणि त्याबद्दल चांगला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.—१ करिंथ. ७:१२-१४, १६.

९. आपण आपल्या नातेवाइकांना मदत का करत राहिली पाहिजे?

नातेवाइकांना मदत करत राहा. यहोवाने आपल्यासमोर चांगलं उदाहरण मांडलं आहे. लोकांनी आनंदाच्या संदेशाला प्रतिसाद द्यावा आणि त्यांना जीवन मिळावं यासाठी यहोवा आपल्या लोकांना वारंवार संधी देत आहे. (यिर्म. ४४:४) प्रेषित पौलने तीमथ्यला इतरांना नेहमी मदत करत राहण्यासाठी सांगितलं. असं का? कारण असं केल्याने त्याचा आणि त्याचं ऐकणाऱ्‍यांचा जीव वाचणार होता. (१ तीम. ४:१६) आपलं नातेवाइकांवर प्रेम असल्यामुळे आपली इच्छा असते की त्यांनी बायबलच्या सत्याबद्दल शिकून घ्यावं. पॉलीनच्या शब्दांचा आणि वागणूकीचा कालांतराने तिच्या कुटुंबावर चांगला परिणाम झाला. ती आता आपल्या पतीसोबत आनंदाने यहोवाची सेवा करत आहे. ते दोघेही पायनियर आहेत आणि वेन मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहे.

१०. आपल्याला धीर धरण्याची गरज का आहे?

१० धीर धरा. आपण देवाच्या आज्ञाचं पालन करण्याचा निर्णय घेतो आणि त्यानुसार आपल्या जीवनात व विश्‍वासात बदल करतो, तेव्हा आपल्या नातेवाइकांना आपल्यातले हे बदल स्वीकारणं कठीण जाऊ शकतं. सहसा सर्वात आधी त्यांच्या लक्षात येतं की आता आपण पूर्वीसारखं कोणत्याही धार्मिक सणांमध्ये आणि राजनैतिक कार्यांमध्ये त्यांच्यासोबत भाग घेत नाही. यामुळे सुरुवातीला आपल्या काही नातेवाइकांना आपला राग येऊ शकतो. (मत्त. १०:३५, ३६) आपण त्यांच्याबद्दल असा विचार करू नये की ते कधीच आपल्या संदेशात आवड दाखवणार नाहीत. आपण त्यांना आपल्या विश्‍वासांबद्दल सांगण्याचं बंद केलं, तर एका अर्थी ते सर्वकाळच्या जीवनासाठी योग्य नाहीत असा न्याय आपण त्यांच्याबद्दल करू. पण खरंतर, यहोवाने न्याय करण्याचा अधिकार आपल्याला नाही, तर येशूला दिला आहे. (योहा. ५:२२) आपण जर धीर धरला तर आपले नातेवाईक कालांतराने आपला संदेश ऐकून घेण्यासाठी तयार असतील. —“ आपल्या वेबसाईटचा वापर करा” ही चौकट पाहा.

११-१३. ॲलीस ज्या प्रकारे आपल्या आईवडिलांशी वागली त्यावरून आपण काय शिकतो?

११ निर्णयावर ठाम राहा पण विचारपूर्वक वागा. (नीति. १५:२) ॲलीस नावाच्या बहिणीचा विचार करा. ॲलीस आपल्या घरापासून दूर राहत होती तेव्हा तिने यहोवाबद्दल शिकायला सुरुवात केली. तिचे आईवडील देवाला मानत नव्हते आणि ते राजकारणात सक्रियपणे भाग घ्यायचे. तिला जाणवलं की तिने लवकरात लवकर शिकलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल आपल्या आईवडिलांना सांगितल्या पाहिजेत. याबद्दल ॲलीस म्हणते: “जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला तुमच्या बदललेल्या विश्‍वासाबद्दल आणि कार्यांबद्दल सांगायला उशीर लावला, तर नंतर जेव्हा त्यांना या गोष्टी कळतील तेव्हा त्यांना मोठा धक्का बसेल.” आपल्या आईवडिलांना कोणते विषय आवडतील याबद्दल ॲलीस विचार करू लागली, जसं की प्रेम. मग तिने त्यांना पत्रं लिहिली आणि बायबल या विषयांवर काय सांगतं आणि ते याबद्दल काय विचार करतात हे तिने विचारलं. (१ करिंथ. १३:१-१३) तिच्या आईवडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं आणि तिची काळजी घेतली याबद्दल तिने त्यांचे आभार मानले. तसंच, तिने त्यांना काही भेटवस्तूही पाठवल्या. ती आपल्या आईवडिलांना भेटायला जायची तेव्हा ती आपल्या आईला घरच्या कामांत भरपूर मदत करायची. ॲलीसने आपल्या आईवडिलांना तिच्या नवीन विश्‍वासाबद्दल सांगितलं तेव्हा सुरुवातीला त्यांना ते आवडलं नाही.

१२ ॲलीस आपल्या आईवडिलांच्या घरी गेली तेव्हाही ती दररोज बायबल वाचायची. ॲलीस म्हणते: “यामुळे माझ्या आईला समजायला मदत झाली की बायबल माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.” त्यादरम्यान, आपल्या मुलीमध्ये झालेला हा बदल जाणून घेण्यासाठी ॲलीसच्या वडिलांनी बायबल शिकून घेण्याचा निर्णय घेतला, पण त्यासोबत त्यांना बायबलमध्ये चुकाही काढायच्या होत्या. ॲलीस पुढे म्हणते: “मी त्यांना बायबल दिलं आणि त्यांच्या मनाला भिडतील अशा दोन ओळीही त्यात लिहिल्या.” याचा काय परिणाम झाला? ॲलीसच्या वडिलांना बायबलमध्ये टीका करण्यासारखं काहीच सापडलं नाही, उलट ते त्यात वाचलेल्या गोष्टींमुळे खूप प्रभावित झाले.

१३ आपल्याला परीक्षांचा सामना करावा लागला तरीही आपला निर्णय ठाम असला पाहिजे, पण त्यासोबतच आपण विचारशीलपणाही दाखवला पाहिजे. (१ करिंथ. ४:१२ख) उदाहरणार्थ, ॲलीसला आपल्या आईकडून विरोधाचा सामना करावा लागला. ॲलीस म्हणते: “माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा माझ्या आईने मला म्हटलं की ‘तू खूप वाईट आहेस.’” यावर ॲलीसने काय केलं? ती म्हणते: “विषय टाळण्याऐवजी मी आदराने आणि स्पष्टपणे आईला सांगितलं, की मी एक यहोवाची साक्षीदार बनण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो मी कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. माझं आईवर खूप प्रेम आहे याची मी तिला खातरी पटवून दिली. त्या दिवशी आम्ही दोघी खूप रडलो आणि नंतर मी तिच्यासाठी चांगलं जेवण बनवलं. मग तेव्हापासून माझ्या आईने मान्य केलं की बायबलमुळे माझ्यात चांगले बदल झाले आहेत.”

१४. आपण आपल्या नातेवाइकांच्या दबावामुळे यहोवाची सेवा करण्याचा निर्णय का बदलू नये?

१४ आपल्यासाठी यहोवाची सेवा किती महत्त्वाची आहे, हे पूर्णपणे समजण्यासाठी आपल्या नातेवाइकांना वेळ लागू शकतो. उदाहरणार्थ, ॲलीसच्या आईवडिलांनी तिच्यासाठी ठरवलेलं उच्च शिक्षण पूर्ण करण्याऐवजी तिने पायनियर सेवा करण्याचा निर्णय घेतला. हे पाहून तिची आई खूप रडली पण ॲलीस आपल्या निर्णयावर ठाम राहिली. ती म्हणते: “एखाद्या गोष्टी बाबतीत जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला तुमचे निर्णय बदलू दिलेत, तर ते इतर बाबतीतही तुम्हाला तुमचे निर्णय बदलायला लावतील. जर तुम्ही आपल्या निर्णयावर ठाम राहिलात आणि प्रेमळपणे आपल्या नातेवाइकांशी वागलात तर त्यांच्यातले काही जण कदाचित तुमचं ऐकून घेतील.” ॲलीसच्या बाबतीत हेच घडलं. आता तिचे आईवडील पायनियर आहेत आणि तिचे बाबा मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहेत.

मंडळीतले सर्व जण कशा प्रकारे मदत करू शकतात?

मंडळीतले भाऊबहीण कशा प्रकारे सत्यात नसलेल्या आपल्या कुटुंबातल्या सदस्याला मदत करू शकतात? (परिच्छेद १५-१६ पाहा) *

१५. मत्तय ५:१४-१६ आणि १ पेत्र २:१२ या वचनांनुसार इतरांच्या ‘चांगल्या कार्यांद्वारे’ आपल्या नातेवाइकांना कशी मदत होऊ शकते?

१५ आपल्या सेवकांनी केलेल्या ‘चांगल्या कार्यांद्वारे’ यहोवा लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो. (मत्तय ५:१४-१६; १ पेत्र २:१२ वाचा.) जर तुमचा विवाहसोबती सत्यात नसेल तर तो तुमच्या मंडळीतल्या भाऊबहिणींना भेटला आहे का? आधी उल्लेख केलेल्या पॉलीनने, आपल्या पती वेनची मंडळीतल्या भाऊबहिणींशी ओळख व्हावी म्हणून त्यांना घरी बोलवलं. वेनला एका बांधवाने साक्षीदारांबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी कशा प्रकारे मदत केली त्याबद्दल वेन म्हणतो: “त्या बांधवाने माझ्यासोबत फक्‍त टीव्हीवर मॅच बघण्यासाठी आपल्या कामावरून सुट्टी घेतली! त्यावरून मला समजलं की त्या बांधवाला धर्माव्यतिरिक्‍त इतर गोष्टींमध्येही आवड आहे.”

१६. आपण आपल्या नातेवाइकांना सभांना येण्याचं आमंत्रण का दिलं पाहिजे?

१६ आपल्या नातेवाइकांना मदत करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे त्यांना आपल्यासोबत सभेत येण्याचं आमंत्रण देणं. (१ करिंथ. १४:२४, २५) वेन पहिल्यांदा स्मारक दिवसाच्या सभेला हजर राहिला, कारण ही सभा त्याच्या कामानंतर होती आणि इतर सभांपेक्षा कमी वेळेची होती. वेन म्हणतात: “मला भाषण पूर्णपणे समजलं नाही. पण तिथले सर्व जण मला स्वतः येऊन भेटले आणि माझ्याशी बोलले. हे सगळं पाहून मी म्हणू शकलो की हे लोक खूप चांगले आहेत.” पॉलीन आणि तिच्या मुलाला, मंडळीतला एक बांधव व त्याची पत्नी सभेत आणि प्रचारकार्यात नेहमी मदत करायचे. कालांतराने वेनने पॉलीनच्या विश्‍वांसाबद्दल आणखी जाणून घ्यायचं ठरवलं तेव्हा त्याने त्याचा बायबल अभ्यास घेण्यासाठी त्याच बांधवाला विचारलं.

१७. कोणत्या गोष्टीसाठी आपण स्वतःला दोषी ठरवू नये आणि आपल्या नातेवाइकांना मदत करण्याचं आपण का थांबवू नये?

१७ आपले नातेवाईक एक न्‌ एक दिवस आपल्यासोबत यहोवाची सेवा करतील अशी आशा आपण बाळगतो. पण आपण पुरेपूर प्रयत्न करूनही ते कदाचित सत्यात येणार नाहीत. मग, अशा वेळी त्यांनी घेतलेल्या निर्णयासाठी आपण स्वतःला दोष देऊ नये. खरंतर, आपण कोणालाही सत्य स्वीकारण्यासाठी बळजबरी करू शकत नाही. पण असं असलं तरी यहोवाची सेवा करत असल्यामुळे आपण किती आनंदी आहोत हे जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांच्यावर चांगला प्रभाव पडू शकतो. म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्याशी विचारपूर्वक बोला आणि त्यांना मदत करण्याचं थांबवू नका. (प्रे. कार्ये २०:२०) यहोवा तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल याची खातरी बाळगा. तुमच्या नातेवाइकांनी तुमचं ऐकण्याचा निर्णय घेतला तर त्यांचं जीवन वाचेल!

गीत १८ देवाचे खरे प्रेम

^ परि. 5 आपल्या नातेवाइकांनी यहोवाबद्दल शिकून घ्यावं अशी आपली इच्छा असते. पण यहोवाची सेवा करायची की नाही हा त्यांचा वैयक्‍तिक निर्णय असेल. या लेखात चर्चा केली जाईल की आपल्या नातेवाइकांना सत्याबद्दल ऐकून घेणं सोपं जावं यासाठी आपण काय करू शकतो.

^ परि. 1 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 53 चित्रांचं वर्णन: एक तरुण बांधव त्याच्या सत्यात नसलेल्या वडिलांना कार दुरुस्त करण्यासाठी मदत करतो. नंतर तो योग्य संधी पाहून त्यांना jw.org® या वेबसाईटवरून व्हिडिओ दाखवतो.

^ परि. 55 चित्रांचं वर्णन: एका बहिणीचा सत्यात नसलेला पती दिवसभराच्या कामाबद्दल बोलत असताना ती बहीण त्याचं लक्ष देऊन ऐकते. नंतर ती आपल्या कुटुंबासोबत मनोरंजनाचा आनंद घेते.

^ परि. 57 चित्रांचं वर्णन: त्या बहिणीने तिच्या मंडळीतल्या भाऊबहिणींना घरी बोलवलं आहे. आणि ते तिच्या पतीसोबत ओळख वाढवण्याचा मनापासून प्रयत्न करतात. नंतर तिचा पती आपल्या पत्नीसोबत स्मारकविधीला उपस्थित राहतो.