व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३२

तुमचं प्रेम वाढत राहो

तुमचं प्रेम वाढत राहो

“मी सतत हीच प्रार्थना करतो, की तुमचे प्रेम दिवसेंदिवस आणखी वाढत राहावे.”—फिलिप्पै. १:९.

गीत ३ “देव प्रीती आहे”

सारांश *

१. फिलिप्पैमधली मंडळी सुरू करण्यासाठी कोणी हातभार लावला?

प्रेषित पौल, सीला, लूक आणि तीमथ्य रोमी लोकांची वसाहत असलेल्या फिलिप्पैमध्ये आले तेव्हा त्यांना आनंदाच्या संदेशात आवड असणारे बरेचसे लोक भेटले. या चार आवेशी बांधवांनी मंडळी सुरू करण्यासाठी मेहनत घेतली. मग नवीन शिष्य सभांना येऊ लागले. ते कदाचित आदरातिथ्य दाखवणाऱ्‍या लुदिया नावाच्या बहिणीच्या घरी सभेसाठी भेटू लागले.—प्रे. कार्ये १६:४०.

२. मंडळीला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?

नवीनच सुरू झालेल्या मंडळीला काही काळातच समस्यांचा सामना करावा लागला. सैतानाने सत्याचा द्वेष करणाऱ्‍या लोकांना प्रचार कार्याचा विरोध करायला प्रवृत्त केलं. यामुळे पौल आणि सीला यांना अटक करण्यात आली, काठीने मारण्यात आलं आणि तुरुंगात टाकण्यात आलं. पण तुरुंगातून सुटका झाल्यावर ते नवीन शिष्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. मग पौल, सीला, तीमथ्य यांनी ते शहर सोडलं पण लूक मात्र तिथेच राहिला. अशा परिस्थितीत आता नवीन बंधुभगिनी काय करणार होते? यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने ते देवाची सेवा आवेशाने करत राहिले. (फिलिप्पै. २:१२) यामुळे पौलला त्यांच्याबद्दल नक्कीच अभिमान वाटला असेल.

३. फिलिप्पैकर १:९-११ या वचनांनुसार पौलने कशाबद्दल प्रार्थना केली?

जवळजवळ दहा वर्षांनंतर पौलने फिलिप्पैच्या मंडळीला पत्र लिहिलं. ते पत्र वाचत असताना तुम्हाला लगेच कळेल की पौलला त्या बांधवांविषयी किती प्रेम होतं. त्याने म्हटलं, “ख्रिस्त येशूला तुमच्याविषयी वाटतो तसाच जिव्हाळा मलाही वाटत असल्यामुळे, मी तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी अधीर झालो आहे.” (फिलिप्पै. १:८) पौलने त्यांना पत्रात सांगितलं की त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. यहोवाने त्यांना प्रेम वाढवण्यासाठी, कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व द्यावं हे ठरवण्यासाठी व निर्दोष राहण्यासाठी मदत करावी म्हणून पौलने प्रार्थना केली. तसंच, ते कोणासाठीही अडखळण ठरू नये आणि त्यांना नीतिमत्त्वाचं फळ उत्पन्‍न करण्यासाठी मदत मिळावी यांसाठीही त्याने प्रार्थना केली. आजही आपण पौलने मनापासून व्यक्‍त केलेल्या या शब्दांतून बरंच काही शिकू शकतो. (फिलिप्पैकर १:९-११ वाचा.) या लेखात आपण पौलने उल्लेख केलेल्या काही गोष्टींवर आणि त्या आपण कशा लागू करू शकतो यावर चर्चा करणार आहोत.

प्रेम वाढवत राहा

४. (क) १ योहान ४:९, १० या वचनांनुसार देवाने आपल्यावर असलेलं त्याचं प्रेम कसं व्यक्‍त केलं? (ख) आपण देवावर किती प्रेम केलं पाहिजे?

यहोवाने त्याच्या मुलाला आपल्या पापांसाठी पृथ्वीवर पाठवून त्याचं महान प्रेम व्यक्‍त केलं. (१ योहान ४:९, १० वाचा.) देवाचं नि:स्वार्थ प्रेम आपल्याला त्याच्यावर प्रेम करण्याची प्रेरणा देतं. (रोम. ५:८) पण आपण देवावर किती प्रेम केलं पाहिजे? येशूने एका परूश्‍याला या प्रश्‍नाचं उत्तर दिलं. त्याने म्हटलं: “तू आपला देव यहोवा याच्यावर आपल्या पूर्ण मनाने आणि आपल्या पूर्ण जिवाने आणि आपल्या पूर्ण बुद्धीने प्रेम कर.” (मत्त. २२:३६, ३७) आपल्याला देवाची उपासना अर्धवट मनाने करण्याची इच्छा नाही. याउलट, त्याच्यावर असलेलं आपलं प्रेम दररोज वाढत जावं अशी आपली इच्छा आहे. पौलने फिलिप्पैकरांना म्हटलं की त्यांचे “प्रेम दिवसेंदिवस आणखी वाढत राहावे.” आपण देवावर असलेलं प्रेम कसं वाढवत राहू शकतो?

५. आपण आपलं प्रेम कसं वाढवत राहू शकतो?

देवावर प्रेम करण्यासाठी आपल्याला त्याला ओळखण्याची गरज आहे. बायबल म्हणतं: “जो प्रेम करत नाही, त्याला देवाची ओळख झालेली नाही, कारण देव प्रेम आहे.” (१ योहा. ४:८) पौलने म्हटलं की आपण “सत्याचे अचूक ज्ञान व पूर्ण समज” मिळवली तर देवावर असलेलं आपलं प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल. (फिलिप्पै. १:९) आपण बायबल अभ्यास सुरू केला तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल सर्वच माहीत नव्हतं, तरी आपण त्याच्यावर प्रेम करू लागलो. मग आपण जसजसं यहोवाबद्दल शिकत गेलो, तसतसं आपलं त्याच्यावरचं प्रेम आणखी वाढत गेलं. म्हणून यात काहीच शंका नाही की आपण नियमितपणे बायबल वाचन आणि मनन करणं खूप महत्त्वाचं आहे.—फिलिप्पै. २:१६.

६. १ योहान ४:११, २०, २१ या वचनांतून आपण आपलं प्रेम वाढवत राहण्याबद्दल काय शिकतो?

देवाचं आपल्यावर असलेलं अपार प्रेम आपल्याला बांधवांवर प्रेम करण्याची प्रेरणा देतं. (१ योहान ४:११, २०, २१ वाचा.) आपल्या बंधुभगिनींवर प्रेम करणं खूप सोपं आहे असं कदाचित आपल्याला वाटेल. कारण आपण सगळे एकाच देवाची उपासना करतो आणि त्याच्या गुणांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. येशूचं आपल्यावर अपार प्रेम असल्यामुळे त्याने त्याचं जीवन आपल्यासाठी दिलं. याबाबतीत आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करतो. पण, असं असलं तरी आपल्याला एकमेकांवर प्रेम करण्याची आज्ञा पाळणं कधीकधी कठीण वाटू शकतं. याबाबतीत आपण फिलिप्पै मंडळीतलं एक उदाहरण पाहू या.

७. पौलने युवदीया आणि सुंतुखे यांना दिलेल्या सल्यातून आपण काय शिकतो?

युवदीया आणि सुंतुखे या आवेशी बहिणींनी प्रेषित पौलसोबत यहोवाच्या सेवेत मेहनत घेतली होती. असं असलं तरी त्यांच्यात काही मतभेद झाले आणि दुरावा निर्माण झाला. युवदीया आणि सुंतुखे ज्या मंडळीत होत्या, त्या मंडळीला पत्र लिहिताना पौलने त्यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला आणि त्यांना “एका मनाचे” असण्याचा सल्ला दिला. (फिलिप्पै. ४:२, ३) पौलला संपूर्ण मंडळीलाही पुढील सल्ला देणं गरजेचं वाटलं. त्याने म्हटलं: “कुरकुर व वादविवाद न करता सर्व गोष्टी करत जा.” (फिलिप्पै. २:१४) हे स्पष्टच आहे की त्याने दिलेल्या या थेट सल्ल्याचा फायदा त्या विश्‍वासू बहिणींनाच नाही तर संपूर्ण मंडळीला झाला आणि त्यांच्यातलं प्रेम आणखी वाढत गेलं.

आपण आपल्या बांधवांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं का गरजेचं आहे? (परिच्छेद ८ पाहा) *

८. कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला बंधुभगिनींवर प्रेम करणं कठीण जाऊ शकतं पण आपण यावर कशी मात करू शकतो?

युवदीया आणि सुंतुखे यांच्यासारखं, आपल्या बंधुभगिनींच्या अपरिपूर्णतेकडे लक्ष दिल्यामुळे आपल्याला त्यांच्यावर प्रेम करणं कठीण जाऊ शकतं. आपण सगळेच दररोज चुका करत असतो. आपण जर इतरांच्या कमतरतांबद्दलच विचार करत राहिलो तर आपल्याला त्यांच्यावर प्रेम करणं कठीण जाईल. उदाहरणार्थ, राज्य सभागृहाची साफसफाई करताना एक बांधव आपल्याला मदत करण्यासाठी विसरला तर आपल्याला चीड येऊ शकते. त्यानंतर आपण त्याने केलेल्या इतर चुकांची यादी बनवू लागलो, तर आपल्याला आणखी जास्त चीड येईल आणि त्या बांधवाबद्दल आपलं प्रेम कमी होईल. तुम्ही जर अशा परिस्थितीचा सामना करत असाल तर एका गोष्टीचा विचार करणं योग्य राहील. ती म्हणजे, यहोवाला आपल्या आणि आपल्या बंधुभगिनींच्या कमतरता माहीत आहेत. पण तरी तो आपल्यावर आणि त्यांच्यावर प्रेम करतो. म्हणूनच आपण यहोवाचं अनुकरण करण्याची आणि आपल्या बंधुभगिनींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. आपण आपल्या बंधुभगिनींबद्दल प्रेम वाढवण्यासाठी मेहनत घेतो तेव्हा आपल्यातलं ऐक्य आणखीनच वाढत जातं.—फिलिप्पै. २:१, २.

“जास्त महत्त्वाच्या गोष्टी”

९. पौलने फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रात कोणत्या काही ‘महत्त्वपूर्ण गोष्टींचा’ उल्लेख केला?

पौलने पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन फिलिप्पैमधल्या आणि इतर ख्रिश्‍चनांना “कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी” असं सांगितलं. (फिलिप्पै. १:१०) या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये यहोवाच्या नावाला पवित्र करणं, त्याचा उद्देश पूर्ण होणं आणि मंडळीतली शांती व एकता टिकून ठेवणं या गोष्टी सामील आहेत. (मत्त. ६:९, १०; योहा. १३:३५) या गोष्टी आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाच्या आहेत हे जेव्हा आपण दाखवतो, तेव्हा यहोवावर आपलं प्रेम आहे हे आपण सिद्ध करत असतो.

१०. आपण निर्दोष असावं यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१० पौलने असंही म्हटलं की आपण “निर्दोष” राहिलं पाहिजे. याचा अर्थ आपण परिपूर्ण असावं असा होत नाही. यहोवा जितका निर्दोष आहे तितकं आपण निर्दोष होऊ शकत नाही. पण आपण प्रेम वाढवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत राहिलो आणि महत्त्वपूर्ण गोष्टींची खातरी करत राहिलो तर यहोवा आपल्याला निर्दोष समजेल. इतरांचं यहोवासोबत असलेलं नातं बिघडेल असं काहीही न करण्याचा आपण होताहोईल तितका प्रयत्न करतो, तेव्हा आपण आपलं प्रेम दाखवत असतो.

११. आपण इतरांसाठी अडखळण ठरण्याचं का टाळलं पाहिजे?

११ इतरांसाठी अडखळण न होणं हा सल्ला खरंच आपल्यासाठी एक इशारा आहे. आपण इतरांसाठी कसं अडखळण ठरू शकतो? आपण ज्या प्रकारच्या मनोरंजनाची, कपड्यांची आणि नोकरीची निवड करतो त्यामुळे आपण इतरांसाठी अडखळण ठरू शकतो. आपण करत असलेल्या गोष्टी कदाचित यहोवाच्या नजरेत चुकीच्या नसतील. पण आपल्या निवडीमुळे एखाद्याचा विवेक दुखावला जात असेल किंवा त्याच्यासाठी ती निवड अडखळण ठरत असेल तर ही खूप गंभीर गोष्ट आहे. येशूने म्हटलं की आपण त्याच्या मेंढरासाठी अडखळण ठरण्यापेक्षा, आपल्या गळ्यात जड दगड बांधून खोल समुद्रात टाकून देणं योग्य राहील.—मत्त. १८:६.

१२. एका पायनियर जोडप्याने मांडलेल्या उदाहरणातून आपण काय शिकतो?

१२ एका पायनियर जोडप्याने येशूचा हा सल्ला कसा लागू केला याकडे लक्ष द्या. ते जोडपं ज्या मंडळीत सेवा करत होतं त्या मंडळीत अलीकडेच बाप्तिस्मा झालेलं एक जोडपं होतं. नवीन शिष्य बनलेले हे पती-पत्नी अशा कुटुंबांमध्ये लहानाचे मोठे झाले होते जिथे बऱ्‍याचशा गोष्टी करण्यावर बंदी होती. त्यांना वाटायचं की ख्रिश्‍चनांनी चित्रपट बघणं चुकीचं आहे, मग ते नैतिक दृष्ट्या चांगले असले तरीही. एकदा पायनियर जोडप्याने चित्रपट पाहिल्याचं या पती-पत्नीला कळलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. ही गोष्ट त्या पायनियर जोडप्याला कळली तेव्हा त्यांनी ठरवलं की जोपर्यंत हे नवीन शिष्य आपल्या विवेकाला चांगलं व वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी आणखी चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करत नाही तोपर्यंत ते चित्रपट बघणार नाहीत. (इब्री ५:१४) आपल्या या नि:स्वार्थ कार्यांतून या पायनियर जोडप्याने दाखवून दिलं, की ते फक्‍त शब्दांनीच नाही तर आपल्या कार्यांतूनही त्यांच्या नवीन भाऊबहिणीवर प्रेम करतात.—रोम. १४:१९-२१; १ योहा. ३:१८.

१३. एखादी व्यक्‍ती आपल्यामुळे पाप करण्यासाठी कशी प्रवृत्त होऊ शकते?

१३ एखाद्या व्यक्‍तीला पाप करण्यासाठी प्रवृत्त करण्याद्वारे आपण तिच्यासाठी अडखळण ठरू शकतो. हे कसं होऊ शकतं? पुढे दिलेल्या परिस्थितीची कल्पना करा. एक बायबल विद्यार्थी बरीच मेहनत घेऊन आणि संघर्ष करून आपल्या दारू पिण्याच्या सवयीवर ताबा मिळवतो. त्याला जाणीव होते की त्याने दारू पिण्याचं पूर्णपणे टाळलं पाहिजे. तो आपल्या जीवनात बरेच बदल करतो आणि बाप्तिस्मा घेतो. नंतर एक बांधव त्याला आणि इतर बंधुभगिनींना आपल्या घरी जेवायला बोलवतो. तो त्या बांधवाला दारू पिण्याचा आग्रह करतो. तो म्हणतो: “आता तर तुझा बाप्तिस्मा झालाय. देवाचा पवित्र आत्मा तुझ्यावर आहे. आणि त्याच्या पवित्र आत्म्याचा एक पैलू म्हणजे आत्मसंयम. तुझ्यामध्ये आत्मसंयम असेल तर तुला थोडी घ्यायला काहीच हरकत नाही!” आपण कल्पना करू शकतो की दारू पिण्याच्या सवयीवर ताबा मिळवलेल्या बांधवाने हा चुकीचा सल्ला ऐकला तर त्याला पुन्हा दारू पिण्याचं व्यसन लागू शकतं. आणि ही खरंच खूप दु:खाची गोष्ट ठरेल.

१४. ख्रिस्ती सभा आपल्याला फिलिप्पैकर १:१० मध्ये दिलेला सल्ला लागू करायला कशी मदत करतात?

१४ फिलिप्पैकर १:१० मध्ये दिलेला सल्ला वेगवेगळ्या मार्गांनी लागू करण्यासाठी ख्रिस्ती सभांमुळे आपल्याला मदत होते. पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या सभांमध्ये आपल्याला चांगलं आणि पौष्टिक आध्यात्मिक अन्‍न दिलं जातं, यावरुन यहोवासाठी कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत हे समजतं. दुसरी गोष्ट म्हणजे, निर्दोष राहण्यासाठी शिकलेल्या गोष्टी कशा लागू करायच्या हेही आपण शिकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, “प्रेम आणि चांगली कार्ये” करण्यासाठी आपल्याला उत्तेजन मिळतं. (इब्री १०:२४, २५) आपल्या बांधवांकडून आपल्याला जितकं जास्त उत्तेजन मिळेल तितकं जास्त आपलं देवावर आणि आपल्या बांधवांवर असलेलं प्रेम वाढत जाईल. आपलं देवावर आणि बांधवांवर मनापासून प्रेम असेल, तर आपण कोणासाठीही अडखळण न ठरण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.

“नीतिमत्त्वाच्या फळाने” भरत राहा

१५. “नीतिमत्त्वाच्या फळाने” भरून जाणं याचा काय अर्थ होतो?

१५ पौलने कळकळून प्रार्थना केली की फिलिप्पैकरांनी “नीतिमत्त्वाच्या फळाने” भरून जावं. (फिलिप्पै. १:११) ‘नीतिमत्त्वाचं फळ’ यात त्यांचं देवावर आणि त्याच्या लोकांवर असलेलं प्रेम सामील होतं हे स्पष्टच आहे. तसंच, त्यांनी येशूबद्दल आणि आपल्या आशेबद्दल इतरांना सांगणं हेदेखील यात सामील होतं. फिलिप्पैकर २:१५ या वचनात दुसरं एक उदाहरण वापरलं आहे, ते म्हणजे “जगामध्ये प्रकाशाप्रमाणे चमकत” राहणं. हे उदाहरण अगदी योग्य आहे कारण येशूने त्याच्या शिष्यांना “जगाचा प्रकाश” म्हटलं. (मत्त. ५:१४-१६) त्याने त्याच्या अनुयायांना अशीही आज्ञा दिली की “शिष्य करा” आणि सबंध “पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत . . . साक्ष” द्या. (मत्त. २८:१८-२०; प्रे. कार्ये १:८) आपण जेव्हा या महत्त्वाच्या कामात भरपूर मेहनत घेतो तेव्हा आपण ‘नीतिमत्त्वाचं फळ’ उत्पन्‍न करत असतो.

रोममध्ये एका घरात कैदेत असताना प्रेषित पौल फिलिप्पै मंडळीला पत्र लिहितो. त्या वेळी, पौल संधीचा वापर करून तिथल्या सैनिकांना आणि त्याला भेटायला येणाऱ्‍या लोकांना प्रचार करतो (परिच्छेद १६ पाहा)

१६. आपण कठीण परिस्थितीतही प्रकाशाप्रमाणे चमकत राहू शकतो हे आपल्याला फिलिप्पैकर १:१२-१४ या वचनांतून कसं समजतं? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)

१६ आपली परिस्थिती कशीही असली तरी आपण प्रकाशाप्रमाणे चमकत राहू शकतो. आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी कधीकधी अडखळण वाटतात त्या गोष्टींमुळे आपल्याला प्रचार करण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. उदाहरणार्थ, प्रेषित पौलने रोममध्ये एका घरात कैद असताना फिलिप्पैकरांना पत्र लिहिलं. तो कैदेत होता म्हणून त्याने प्रचारकार्य थांबवलं का? नाही. तो तिथल्या पहारेकऱ्‍यांना आणि त्याला भेटायला येणाऱ्‍या लोकांना प्रचार करत राहिला. पौलने अशा परिस्थितींतही आवेशाने प्रचार केला आणि यामुळे बांधवांना आत्मविश्‍वासाने आणि “निर्भयपणे देवाचे वचन” सांगण्याचं बळ मिळालं.—फिलिप्पैकर १:१२-१४ वाचा; ४:२२.

प्रचार करण्याची संधी नेहमी शोधत राहा (परिच्छेद १७ पाहा) *

१७. कठीण परिस्थितीतही काही बंधुभगिनींना प्रचार करत राहणं कसं शक्य झालं?

१७ आपले बरेचसे बांधव पौलसारखंच धैर्य दाखवतात. ते अशा देशांत राहतात जिथे ते सार्वजनिक रीत्या किंवा घरोघरचं प्रचारकार्य करू शकत नाही. म्हणून ते इतर मार्गांनी आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्याच्या संधी शोधतात. (मत्त. १०:१६-२०) अशाच एका देशामध्ये एका विभागीय पर्यवेक्षकाने प्रचारकांना सल्ला दिला, की प्रत्येकाने त्यांच्या नातेवाइकांना, शेजाऱ्‍यांना, शाळासोबत्यांना, सहकर्मचाऱ्‍यांना आणि ओळखीच्या लोकांना त्यांचं ‘प्रचाराचं क्षेत्र’ समजावं. मग दोन वर्षांच्या आतच त्या विभागातल्या मंडळ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. आपण कदाचित अशा देशात राहत असू जिथे आपण मोकळेपणे प्रचार करू शकतो. असं असलं तरी या आवेशी भाऊबहिणींकडून आपण एक मौल्यवान धडा शिकू शकतो. तो म्हणजे, सेवाकार्यात भाग घेण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेणं. यहोवा तुम्हाला कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी लागणारी शक्‍ती देईल असा भरवसा बाळगा.—फिलिप्पै. २:१३.

१८. आपण कोणता निर्धार केला पाहिजे?

१८ आज कधी नव्हे इतकं जास्त आपल्याला पौलने फिलिप्पैकरांना दिलेला सल्ला लागू करण्याचा निर्धार पक्का करण्याची गरज आहे. आपल्यासाठी जास्त महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत याची आपण खातरी करत राहू या आणि निर्दोष राहू या. तसंच आपण इतरांसाठी अडखळण ठरण्याचं टाळू या आणि नीतिमत्त्वाचं फळही विकसित करत राहू या. असं केल्यामुळे आपलं प्रेम वाढत जाईल आणि आपला प्रेमळ पिता, यहोवा याचा गौरव होईल.

गीत २५ ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह

^ परि. 5 आज आपल्याला कधी नव्हे इतकं बांधवांबद्दल प्रेम वाढवत राहण्याची गरज आहे. फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रातून आपल्याला समजायला मदत होईल की समस्या असतानाही आपण प्रेम कसं वाढवत राहू शकतो.

^ परि. 54 चित्रांचं वर्णन: राज्य सभागृहाची साफसफाई करताना जॉन नावाचा बांधव मध्येच काम थांबवून एका दुसऱ्‍या बांधवाशी आणि त्याच्या मुलाशी बोलू लागतो. माईक नावाचा बांधवही साफसफाई करत आहे, तो जेव्हा हे पाहतो तेव्हा त्याला जॉनची चीड येते. तो विचार करतो, ‘जॉनने गप्पा मारण्यापेक्षा काम केलं पाहिजे.’ नंतर जॉन एका वृद्ध बहिणीला मदत करत असल्याचं माईक बघतो. हे पाहून माईकला जाणीव होते की त्याने आपल्या बांधवाच्या चांगल्या गुणांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.

^ परि. 58 चित्रांचं वर्णन: ज्या देशांमध्ये साक्षीदार मोकळेपणाने प्रचार करू शकत नाही तिथे एक बांधव सावधगिरी बाळगून ओळखीच्या व्यक्‍तीला राज्याचा संदेश सांगतो. नंतर कामाच्या ठिकाणी, मधल्या सुट्टीत तो बांधव सोबत काम करणाऱ्‍याला प्रचार करतो.