व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बाप्तिस्मा देणारा योहान—आनंद टिकून ठेवण्याबाबतीत एक चांगलं उदाहरण

बाप्तिस्मा देणारा योहान—आनंद टिकून ठेवण्याबाबतीत एक चांगलं उदाहरण

तुमच्या मंडळीत असं काही काम आहे का जे तुम्हाला करायची इच्छा आहे, पण सध्या तुम्ही ते करू शकत नाही? कदाचित ते काम किंवा ती जबाबदारी इतर कोणीतरी हाताळत असेल किंवा तुम्ही एके काळी ती नेमणूक हाताळत असाल. पण वय, खालावत चाललेली तब्येत, पैशांची चणचण किंवा कुटुंबाची जबाबदारी यांमुळे कदाचित तुम्हाला आधीसारखी सेवा करता येत नसेल. किंवा संघटनेत होत असलेल्या बदलांमुळे बऱ्‍याच वर्षांपासून असलेली तुमची नेमणूक तुम्हाला सोडून द्यावी लागली असेल. यांपैकी कोणतंही कारण असो, तुम्हाला वाटत असेल की देवाच्या सेवेत तुम्हाला खूप काही करायची इच्छा आहे पण ते सगळं तुम्हाला आता करता येत नाही. मग अशा परिस्थितीत तुम्ही कधीकधी निराश व्हाल हे समजण्यासारखं आहे. पण असं असलं तरी तुम्ही नकारात्मक भावना जसं की नैराश्‍य, कटुता किंवा नाराजी यांना आपल्या मनात मूळ धरू देण्यापासून कसं टाळू शकता? तसंच, तुम्ही आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकता?

बाप्तिस्मा देणारा योहान याच्या उदाहरणावरून आपण आनंद टिकवू ठेवण्याबद्दल महत्त्वपूर्ण धडा शिकू शकतो. योहानला उल्लेखनीय नेमणुकी मिळाल्या तरी त्याच्या जीवनात ज्या गोष्टी घडल्या त्यांची अपेक्षा त्याने कदाचित केली नव्हती. योहानने जवळजवळ एक वर्ष लोकांना येशूबद्दल प्रचार केला. पण त्याला त्यापेक्षा जास्त वेळ तुरुंगात काढावा लागेल असा त्याने विचारही केला नसेल. असं असलं तरी योहानने त्याचा आनंद टिकवून ठेवला आणि आपल्या शेवटच्या श्‍वासापर्यंत त्याने तशीच मनोवृत्ती दाखवली. असं करण्यासाठी त्याला कशामुळे मदत झाली? आपल्याही अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपण आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतो?

एक आनंददायी नेमणूक

जवळपास इ.स. २९ च्या एप्रिल महिन्यात, योहान मसीहासाठी मार्ग तयार करण्याचं काम करू लागला. त्याने म्हटलं: “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे.” (मत्त. ३:२; लूक १:१२-१७) अनेक लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. खरंतर, बरेच लोक दूरचा प्रवास करून त्याचा संदेश ऐकण्यासाठी यायचे. त्याचा संदेश ऐकल्यामुळे त्यांनी पश्‍चात्ताप केला आणि बाप्तिस्मा घेतला. योहानने नीतिमान समजणाऱ्‍या धार्मिक पुढाऱ्‍यांनाही ताकीद दिली की त्यांनी स्वतःत बदल केले नाहीत तर त्यांचा न्याय केला जाईल. (मत्त. ३:५-१२) जवळपास इ.स. २९ च्या ऑक्टोबर महिन्यात योहानने त्याच्या सेवाकार्याच्या शेवटी एक महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे त्याने येशूला बाप्तिस्मा दिला. तेव्हापासून योहानने लोकांना येशूचे, म्हणजेच वचन दिलेल्या मसीहाचे शिष्य बनण्यासाठी सांगितलं.—योहा. १:३२-३७.

योहानची अनोखी भूमिका लक्षात घेता येशूने त्याच्याविषयी म्हटलं: “स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा देणारा योहान याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी आलेला नाही.” (मत्त. ११:११) योहानला मिळालेल्या आशीर्वादांबद्दल त्याला नक्कीच आनंद झाला असेल यात काहीच शंका नाही. योहानप्रमाणेच आजही बऱ्‍याच जणांना देवाकडून भरभरून आशीर्वाद मिळाले आहेत. टेरी नावाच्या बांधवाचं उदाहरण घ्या. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने, सॅन्ड्राने ५० पेक्षा जास्त वर्षं पूर्ण वेळेची सेवा केली आहे. टेरी म्हणतात: “मला बऱ्‍याचशा नेमणुकी मिळाल्या. मी पायनियर, बेथेल सेवा, खास पायनियर, विभागीय पर्यवेक्षक, प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून सेवा केली आणि आता मी पुन्हा एक खास पायनियर म्हणून सेवा करत आहे.” आपल्याला यहोवाच्या सेवेत नेमणुकी मिळतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. पण आपली परिस्थिती बदलते तेव्हा तो आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण कशी मेहनत घेऊ शकतो, याबद्दल आपण योहानच्या उदाहरणावरून शिकू या.

कदर बाळगत राहा

बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानला मिळालेल्या नेमणुकींमुळे त्याला आपला आनंद टिकवून ठेवता आला. एका उदाहरणाचा विचार करा. येशूच्या बाप्तिस्म्यानंतर योहानचं सेवाकार्य कमी होत गेलं आणि येशूचं सेवाकार्य वाढत गेलं. यामुळे योहानचे शिष्य चिंतित झाले आणि ते त्याच्याकडे जाऊन म्हणाले: “तो बाप्तिस्मा देत आहे आणि सर्व लोक त्याच्याकडे जात आहेत.” (योहा. ३:२६) यावर योहानने त्यांना उत्तर दिलं: “ज्याची वधू असते तोच वर असतो. पण वराचा मित्र उभा राहून त्याचं बोलणं ऐकतो, तेव्हा वराचा आवाज ऐकून त्याला खूप आनंद होतो. त्याच प्रकारे माझा आनंद परिपूर्ण झाला आहे.” (योहा. ३:२९) योहानने आपल्या कामाची तुलना येशू करत असलेल्या कामासोबत केली नाही किंवा येशूचं काम जास्त महत्त्वाचं होतं म्हणून आपल्या कामाची काहीच किंमत नाही, असा त्याने विचार केला नाही. याउलट, योहानने “वराचा मित्र” या त्याच्या भूमिकेला मौल्यवान लेखलं आणि यामुळे त्याला आपला आनंद टिकवून ठेवता आला.

योहानची नेमणूक सोपी नव्हती तरी त्याला आपल्या योग्य मनोवृत्तीमुळे आनंदी राहता आलं. उदाहरणार्थ, योहान हा जन्मापासून नाजीर होता आणि त्यामुळे त्याला द्राक्षारस पिण्याची मनाई होती. (लूक १:१५) योहानच्या साध्या राहणीमानामुळे येशूने त्याच्याबद्दल म्हटलं: “योहान खातपीत आला नाही.” याउलट, येशू आणि त्याच्या शिष्यांवर कोणतंच बंधन नव्हतं आणि ते इतर लोकांसारखं सर्वसामान्य जीवन जगायचे. (मत्त. ११:१८, १९) योहानने चमत्कारही केले नाहीत. पण त्याला माहीत होतं की येशूच्या शिष्यांना, ज्यांपैकी काही आधी त्याचे शिष्य होते त्यांना चमत्कार करण्याची शक्‍ती देण्यात आली होती. (मत्त. १०:१; योहा. १०:४१) आपल्या आणि येशूच्या शिष्यांमध्ये बऱ्‍याचशा गोष्टी खूप वेगळ्या आहेत यावर विचार करण्यापेक्षा योहान आपल्या नेमणुकीत व्यस्त राहिला.

आपण जर यहोवाच्या सेवेत सध्या मिळालेल्या नेमणुकीची कदर बाळगली तर आपल्यालाही आपला आनंद टिकवून ठेवता येऊ शकतो. आधी उल्लेख केलेले टेरी म्हणतात: “मला मिळालेल्या प्रत्येक नेमणुकीवर मी त्या-त्या वेळी पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं.” आपल्या जीवनातल्या पूर्ण वेळेच्या सेवेबद्दल ते म्हणतात: “त्यांबद्दल माझ्या मनात खूप सुंदर आठवणी आहेत आणि मला जरादेखील पस्तावा होत नाही.”

यहोवाच्या सेवेत मिळालेली प्रत्येक नेमणूक किंवा जबाबदारी खरंतर कोणत्या गोष्टीमुळे मौल्यवान ठरते याबद्दल विचार केल्याने आपण आणखी आनंदी होऊ शकतो. आणि ती गोष्ट म्हणजे, आपल्याला “देवाचे सहकारी” असण्याचा मिळालेला बहुमान! (१ करिंथ. ३:९) वाडवडिलांकडून मिळालेल्या एखाद्या मौल्यवान वस्तूला पॉलीश केल्यामुळे जशी तिची चमक टिकून राहते, तसंच देवाची सेवा करण्याच्या बहुमानावर मनन केल्यामुळे आपला आनंद टिकून राहील. आपण केलेल्या त्यागांची तुलना आपण इतरांनी केलेल्या त्यागांशी करणार नाही. आपल्याला यहोवाच्या सेवेत जे काम मिळालं आहे ते इतरांना मिळालेल्या कामापेक्षा कमी मोलाचं आहे, असा आपण कधीच विचार करणार नाही.—गलती. ६:४.

यहोवासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्‍या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा

आपल्याला जास्त काळासाठी सेवा करता येणार नाही हे योहानला कदाचित माहीत होतं, पण आपल्या सेवेचा अचानक असा शेवट होईल असा त्याने विचारही केला नसेल. (योहा. ३:३०) येशूला बाप्तिस्मा दिल्याच्या सहा महिन्यांनी म्हणजे इ.स. ३० मध्ये हेरोद राजाने योहानला तुरुंगात टाकलं. असं असलं तरी योहान योग्य तेच सांगत राहिला. (मार्क ६:१७-२०) या बदलत्या परिस्थितींत त्याला आपला आनंद टिकवून ठेवायला कशामुळे मदत होणार होती? त्याने यहोवासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित केलं.

योहान तुरुंगात असताना त्याच्या शिष्यांनी त्याला येशूच्या वाढत्या सेवाकार्याबद्दल सांगितलं. (मत्त. ११:२; लूक ७:१८) येशू हाच मसीहा आहे याची योहानला पक्की खातरी होती. पण मसीहाबद्दल शास्त्रवचनांत सांगितलेल्या सर्व भविष्यवाण्या तो कशा पूर्ण करेल, याबद्दल त्याला कदाचित शंका वाटत होती. मसीहा राजा बनणार असं शास्त्रवचनांत सांगितलं होतं, मग ‘येशू लगेच राज्य करायला सुरुवात करेल का? आणि यामुळे आपली तुरुंगातून सुटका होईल का?’ असे प्रश्‍नं त्याच्या मनात आले असावेत. येशू पुढे काय करणार याबद्दल योहानला आणखी माहिती हवी होती, म्हणून त्याने आपल्या दोन शिष्यांना येशूकडे असं विचारायला पाठवलं: “जो येणार होता तो तूच आहेस का, की आम्ही दुसऱ्‍याची वाट पाहावी?” (लूक ७:१९) मग येशूने त्यांना योहानला असा संदेश द्यायला सांगितलं: “आंधळे आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत, लंगडे चालत आहेत, कुष्ठरोगी शुद्ध केले जात आहेत, बहिऱ्‍यांना ऐकू येत आहे, मेलेल्यांना जिवंत केलं जात आहे आणि गोरगरिबांना आनंदाचा संदेश सांगितला जात आहे.” (लूक ७:२०-२२) शिष्य योहानकडे परत आले आणि त्यांनी त्याला येशूने केलेल्या चमत्कारांबद्दल सांगितलं, तेव्हा योहानने नक्कीच खूप उत्सुकतेने त्यांचं ऐकलं असेल.

योहानच्या शिष्यांनी त्याला जे काही सांगितलं त्यामुळे त्याला नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल. यामुळे त्याला खातरी पटली की मसीहाबद्दल असलेल्या भविष्यवाण्या येशू पूर्ण करत आहे. येशू मसीहा म्हणून प्रकट झाल्यामुळे योहानची सुटका झाली नाही. असं असलं तरी आपली सेवा व्यर्थ ठरली आहे, असा योहानने विचार केला नाही. कठीण परिस्थितीतही तो आनंदी राहिला.

पूर्वी मिशनरी असलेलं एक जोडपं, त्यांच्या आधीच्या मंडळीतल्या भाऊबहिणींचा व्हिडिओ बघताना खूप आनंदित आहेत

योहानसारखं आपणही आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर आपण आनंदाने आणि धीराने यहोवाची सेवा करत राहू शकतो. (कलस्सै. १:९-११) हे आपण बायबलचं वाचन आणि त्यावर मनन करण्याद्वारे करू शकतो. यामुळे आपल्याला नेहमी आठवण होत राहील की यहोवाच्या सेवेत आपण करत असलेलं काम कधीच व्यर्थ ठरणार नाही. (१ करिंथ. १५:५८) सॅन्ड्रा म्हणतात: “दररोज बायबलमधला एक अध्याय वाचल्याने मला यहोवासोबत एक घनिष्ठ नातं जोडायला मदत झाली आहे. यामुळे मला स्वतःवर नाही तर यहोवावर लक्ष केंद्रित करायला मदत झाली आहे.” आपण जगभरात चाललेल्या राज्याच्या कामांसंबंधित अहवालांवरही लक्ष केंद्रित करू शकतो. असं केल्यामुळे आपण फक्‍त स्वतःचाच नाही तर यहोवा साध्य करत असलेल्या गोष्टींचाही विचार करू. सॅन्ड्रा पुढे म्हणतात: “JW ब्रॉडकास्टिंगवर दाखवल्या जाणाऱ्‍या दर महिन्याच्या कार्यक्रमांमुळे मला संघटनेच्या जवळ असल्यासारखं वाटतं आणि यामुळे मला आपली नेमणूक आनंदाने करत राहायला मदत होते.”

बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने थोड्या कालावधीसाठी असलेलं आपलं सेवाकार्य हे एलीयासारखा आवेश व सामर्थ्य दाखवून पूर्ण केलं आणि तोही एलीयाप्रमाणे “आपल्यासारख्याच भावना असलेला मनुष्य होता.” (लूक १:१७; याको. ५:१७) आपण कदर बाळगण्याच्या बाबतीत आणि यहोवाच्या सेवेवर लक्ष केंद्रित करण्याच्या बाबतीत योहानचं अनुकरण केलं, तर परिस्थिती कशीही असली तरी सेवाकार्यातला आपला आनंद आपण टिकवून ठेवू शकू.