वाचकांचे प्रश्न
एखाद्या ख्रिश्चनाने, इतर मानवांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बंदूक किंवा रायफल यासारखं शस्त्र बाळगणं योग्य आहे का?
स्वतःचं संरक्षण आणि बचाव कसा करावा हे ठरवताना खरे ख्रिस्ती बायबलची तत्त्वं विचारात घेतात. बायबलच्या तत्त्वांनुसार, इतर मानवांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ख्रिश्चनांनी बंदूक, रायफल किंवा इतर प्रकारच्या बंदुकांचा उपयोग करणं चुकीचं ठरेल. हे समजण्यासाठी खाली दिलेले मुद्दे विचारात घ्या:
यहोवाच्या नजरेत मानवी जीवन पवित्र आहे. स्तोत्रकर्ता दावीदने यहोवाबद्दल असं लिहिलं: “जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे.” (स्तो. ३६:९) त्यामुळे, स्वतःचं किंवा स्वतःच्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी पुरेशी काळजी घेताना, एक ख्रिस्ती व्यक्ती रक्तदोषी होण्यापासून, म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार होण्यापासून शक्य तितकी दूर राहते.—अनु. २२:८; स्तो. ५१:१४.
हे खरं आहे की, एखाद्या व्यक्तीने स्वतःचा बचाव करण्यासाठी वापरलेल्या कोणत्याही वस्तूमुळे समोरच्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो आणि रक्तदोष ओढवू शकतो. पण, बदुंकीचा वापर केल्यामुळे एखाद्याचा सहज रीतीने खून होऊ शकतो; मग तो नकळत असो अथवा जाणूनबुजून. * त्यासोबतच, हल्ला करणारा माणूस आधीच घाबरलेला असू शकतो आणि त्याने बंदूक पाहिल्यावर परिस्थिती आणखीनच घातक होऊ शकते; त्यामुळे कोणाचाही खून होऊ शकतो.
येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री, शिष्यांना तलवारी बाळगण्यास जे सांगितलं ते स्वसंरक्षणासाठी नाही. (लूक २२:३६, ३८) इथे येशूला आपल्या शिष्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवायचा होता. तो म्हणजे, शस्त्रधारी जमावाचा सामना करावा लागला तरी शिष्यांनी हिंसेच्या मार्गाचं अवलंबन करायचं नव्हत. (लूक २२:५२) पेत्रने आपली तलवार काढून महायाजकाच्या दासावर हल्ला केला, तेव्हा येशूने त्याला आज्ञा दिली: “आपली तलवार जागच्या जागी ठेव.” मग, येशूने एक तत्त्व सांगितलं जे आजसुद्धा ख्रिश्चनांना लागू होतं. त्याने म्हटलं: “जे तलवार हातात घेतात त्यांचा तलवारीने नाश होईल.”—मत्त. २६:५१, ५२.
मीखा ४:३ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे, देवाचे लोक “आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील.” खरे ख्रिस्ती शांतिप्रिय लोक म्हणून ओळखले जातात. “वाइटाबद्दल कोणाचे वाईट करून फेड करू नका” आणि “सर्व माणसांसोबत होईल तितके शांतीने राहा,” अशी जी आज्ञा देवाने प्रेषित पौलद्वारे दिली होती तिचं खरे ख्रिस्ती पालन करतात. (रोम. १२:१७, १८) पौलला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला; अगदी ‘लुटारूंकडूनही संकटे’ सोसावी लागली. पण तरीसुद्धा त्याने या आज्ञेचं पालन केलं. संकटांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याने कधीही बायबलच्या तत्त्वाचं उल्लंघन केलं नाही. (२ करिंथ. ११:२६) याउलट, त्याने यहोवावर भरवसा ठेवला आणि युद्धशस्त्रांपेक्षा बायबलचा सुज्ञ सल्ला श्रेष्ठ आहे याची जाणीव बाळगली.—उप. ९:१८.
ख्रिश्चनांसाठी भौतिक गोष्टींपेक्षा जीवन खूप मौल्यवान आहे. आपल्याला माहीत आहे, की “एखाद्याकडे भरपूर संपत्ती असली, तरी त्याची संपत्ती त्याला जीवन देऊ शकत नाही.” (लूक १२:१५) बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या चोराशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करूनही जर तो ऐकायला तयार नसेल, तर आपण येशूच्या सल्ल्याचं पालन करतो. त्याने म्हटलं: “दुष्ट माणसाचा प्रतिकार करू नका.” याचा अर्थ, चोराला जे काही हवं असेल ते त्याला घेऊ द्यावं, असा होऊ शकतो. (मत्त. ५:३९, ४०; लूक ६:२९) * पण, मुळात अशी वेळच आपल्यावर येऊ नये म्हणून आपण पुरेशी काळजी घेतली पाहिजे. बायबलमध्ये सांगितल्यानुसार जर आपण “आपल्या धनसंपत्तीचा दिखावा” करण्याचं टाळलं आणि शेजार-पाजारच्या लोकांमध्ये शांतिप्रिय लोक म्हणून आपली ओळख असली, तर आपण हिंसक गुन्हेगारांना बळी पडण्याची शक्यता कमी आहे.—१ योहा. २:१६; नीति. १८:१०.
खरे ख्रिस्ती इतरांच्या विवेकाचा आदर करतात. (रोम. १४:२१) आपल्या एखाद्या ख्रिस्ती बांधवाने इतर मानवांपासून स्वतःच संरक्षण करण्यासाठी बंदूक बाळगली आहे, हे समजल्यावर काही बंधुभगिनींना धक्का बसू शकतो किंवा ते विश्वासात अडखळूही शकतात. त्यामुळे कायद्याने जरी आपल्याला बंदूक बाळगण्याचा अधिकार असला, तरी आपल्या बांधवांवर आपलं प्रेम असल्यामुळे आपण अशी कोणतीही गोष्ट करणार नाही ज्यामुळे ते अडखळतील.—१ करिंथ. १०:३२, ३३; १३:४, ५.
इतरांसमोर चांगलं उदाहरण ठेवण्याची ख्रिश्चनांची इच्छा आहे. (२ करिंथ. ४:२; १ पेत्र ५:२, ३) जर एखाद्या ख्रिश्चनाने इतर मानवांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बंदूक बाळगली असेल, तर मंडळीतील वडील त्याला बायबलमधून सल्ला देतील. त्यानंतरही जर त्याने बंदूक बाळगण्याचा निर्णय घेतला, तर तो इतरांसाठी चांगलं उदाहरण ठरणार नाही. त्यामुळे मंडळीत त्याला कोणत्याही जबाबदाऱ्या किंवा खास नेमणुका देण्यात येणार नाहीत. हीच गोष्ट, नोकरीचा भाग म्हणून बंदूक बाळगणाऱ्या ख्रिश्चनालाही लागू होते. अशा ख्रिश्चनाने दुसरी एखादी नोकरी शोधणं अधिक योग्य ठरेल. *
हे खरं आहे, की स्वतःचं, स्वतःच्या कुटुंबाचं आणि मालमत्तेचं संरक्षण कसं करावं, तसंच कोणत्या प्रकारची नोकरी करावी याचे निर्णय एका ख्रिस्ती व्यक्तीने स्वतः घेतले पाहिजेत. पण हे निर्णय बायबलच्या तत्त्वांवर आधारित असले पाहिजेत. आपल्या बुद्धिमान देवाचं, यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे त्याने ही तत्त्वं आपल्याला दिली आहेत. आणि याच कारणामुळे यहोवासोबत चांगला नातेसंबंध असलेले ख्रिस्ती इतर मानवांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कधीही बंदूक बाळगत नाहीत. खऱ्या ख्रिश्चनांना माहीत आहे, की देवावर भरवसा ठेवल्यास आणि जीवनात बायबलच्या तत्त्वांचं पालन केल्यास ते पुढे सर्वकाळासाठी खरी सुरक्षा अनुभवतील.—स्तो. ९७:१०; नीति. १:३३; २:६, ७.
^ परि. 3 एक ख्रिस्ती व्यक्ती, अन्नाकरता प्राण्यांची शिकार करण्यासाठी किंवा जंगली प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, बंदूक बाळगण्याचा कदाचित निर्णय घेईल. पण जेव्हा ती बंदुकीचा वापर करत नाही, तेव्हा तिने बंदुकीतल्या गोळ्या वेगळ्या काढून ठेवल्या पाहिजेत किंवा शक्य असल्यास बदुकीचे भाग वेगळे करून ठेवले पाहिजेत; आणि हे सर्व एका सुरक्षित जागी कुलूप लावून ठेवलं पाहिजे. ज्या ठिकाणी बंदूक बाळगणं बेकायदेशीर आहे किंवा त्यावर सरकारचं नियंत्रण आहे, तिथले ख्रिस्ती कायद्याचं पालन करतात.—रोम. १३:१.
^ परि. 2 आपण बलात्कारापासून स्वतःचा बचाव कसा करू शकतो, हे जाणून घेण्यासाठी सावध राहा! माहितीपत्रक १३/१ पृ. १७-१९ वर दिलेला, “बलात्कार कसा टाळता येईल” हा लेख पाहा.
^ परि. 4 याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रहरीदुर्ग १ नोव्हेंबर २००५ पृ. ३१; आणि वॉचटॉवर १५ जुलै १९८३ पृ. २५-२६ हे अंक पाहा.