व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २९

“जा आणि . . . शिष्य करा”

“जा आणि . . . शिष्य करा”

“जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.”—मत्त. २८:१९.

गीत १० “हा मी आहे, मला पाठीव!”

सारांश *

१-२. (क) मत्तय २८:१८-२० या वचनांत येशूने आज्ञा दिल्याप्रमाणे ख्रिस्ती मंडळीचं मुख्य ध्येय काय आहे? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

येशूचं पुनरुत्थान झाल्यावर त्याने त्याच्या प्रेषितांना गालीलच्या एका डोंगरावर भेटायला बोलवलं. ते जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा येशू काय सांगणार याची त्यांना उत्सुकता लागली होती. (मत्त. २८:१६) हा तोच प्रसंग असावा जेव्हा येशू “एकाच वेळी पाचशेहून अधिक बांधवांना दिसला.” (१ करिंथ. १५:६) येशूने त्याच्या शिष्यांना तिथे का बोलवलं होतं? येशूला त्यांना एक रोमांचक कामगिरी सोपवायची होती. त्याबद्दल त्याने म्हटलं: “जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.”—मत्तय २८:१८-२० वाचा.

येशूच्या ज्या शिष्यांनी त्याचे शब्द ऐकले ते शिष्य नंतर पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती मंडळीचे भाग बनले. त्या मंडळीचं मुख्य ध्येय जास्तीत जास्त लोकांना येशूचे शिष्य बनवणं हे होतं. * आज संपूर्ण जगात खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या बऱ्‍याच मंडळ्या आहेत आणि या मंडळ्यांचं मुख्य ध्येयसुद्धा हेच आहे. या लेखात आपण चार प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत. शिष्य बनवणं इतकं महत्त्वाचं का आहे? त्यात काय सामील आहे? शिष्य बनवण्याच्या कामात सर्व ख्रिश्‍चनांचा वाटा आहे का? हे काम करण्यासाठी धीर धरणं का गरजेचं आहे?

शिष्य बनवणं इतकं महत्त्वाचं का आहे?

३. योहान १४:६ आणि १७:३ या वचनांनुसार शिष्य बनवणं इतकं महत्त्वाचं का आहे?

शिष्य बनवण्याचं काम इतकं महत्त्वाचं का आहे? कारण फक्‍त येशूचे शिष्य देवाचे मित्र बनू शकतात. तसंच, जे लोक ख्रिस्ताचं अनुकरण करतात ते आता चांगलं जीवन जगू शकतात आणि भविष्यात त्यांना अनंतकाळापर्यंत जगण्याचीही आशा आहे. (योहान १४:६; १७:३ वाचा.) येशूने आपल्यावर एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. पण हे काम आपण आपल्या बळावर करत नाही. प्रेषित पौलने स्वतःबद्दल आणि जवळच्या काही सहविश्‍वासू बांधवांबद्दल म्हटलं: “आपण देवाचे सहकारी आहोत.” (१ करिंथ. ३:९) खरंच, यहोवा आणि येशू यांनी अपरिपूर्ण मानवांना किती मोठा बहुमान दिला आहे!

४. इवान आणि मटिल्डा यांच्या अनुभवावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

शिष्य बनवण्याचं काम केल्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळू शकतो. कोलंबियामध्ये राहणारा इवान आणि त्याची पत्नी मटिल्डा यांच्या उदाहरणाचा विचार करा. त्यांनी डॅवियर नावाच्या एका तरुण व्यक्‍तीला प्रचार केला. यावर डॅवियरने त्यांना म्हटलं, “मला माझ्या जीवनात बदल करायचे आहेत, पण मला वाटत नाही की मी ते करू शकेन.” डॅवियर हा एक बॉक्सर होता. तो ड्रग्स घ्यायचा, खूप दारू प्यायचा आणि एरीका नावाच्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहायचा. इवान म्हणतो: “आम्ही त्याच्यासोबत बायबल अभ्यास सुरू केला. त्याचं गाव खूप दूर होतं. तिथे पोहोचायला आम्हाला बरेच तास सायकलने प्रवास करावा लागायचा. त्यातल्या त्यात रस्ताही चांगला नसायचा, खूप चिखल असायचं. डॅवियरच्या वागणुकीत आणि मनोवृत्तीत बदल झालेला पाहून एरीकाही बायबल अभ्यासाला बसू लागली.” कालांतराने डॅवियरने ड्रग्स, दारू आणि बॉक्सिंग सोडून दिलं. त्याने एरीकाशी लग्नही केलं. मटिल्डा म्हणते: “डॅवियर आणि एरीकाचा जेव्हा २०१६ मध्ये बाप्तिस्मा झाला तेव्हा आम्हाला डॅवियरने म्हटलेली ती गोष्ट आठवली. तो म्हणायचा, ‘मला माझ्या जीवनात बदल करायचे आहेत पण मला वाटत नाही की मी ते करू शकेन.’ त्या दिवशी आम्ही आमचे आनंदाश्रू आवरुच शकलो नाही!” यावरून स्पष्टच होतं की आपण लोकांना येशूचे शिष्य बनण्यासाठी मदत करतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो.

शिष्य बनवण्याच्या कामात काय सामील आहे?

५. शिष्य बनवण्यासाठी आपण कोणतं पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे?

आपण जेव्हा चांगली मनोवृत्ती बाळगणाऱ्‍या लोकांना “शोधून” काढतो, तेव्हा आपण शिष्य बनवण्यासाठी पहिलं पाऊल उचलतो. (मत्त. १०:११) आपल्याला प्रचारात भेटणाऱ्‍या सर्व लोकांना आपण साक्ष देतो तेव्हा आपण खऱ्‍या अर्थाने यहोवाचे साक्षीदार असल्याचं दाखवून देतो. येशूने दिलेल्या प्रचार करण्याच्या आज्ञेचं पालन करून आपण खरे ख्रिस्ती असल्याचं सिद्ध करत असतो.

६. सेवाकार्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?

काही लोक बायबलची सत्यं शिकण्यासाठी उत्सुक असतात. पण बरेचसे लोक पहिल्यांदा संदेश ऐकल्यावर तशीच उत्सुकता दाखवत नाहीत. यामुळे आपल्याला त्यांच्या मनात बायबल संदेशाविषयी आवड निर्माण करावी लागेल. सेवाकार्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला चांगली तयारी करणं गरजेचं आहे. लोकांच्या मनात आवड निर्माण होईल असे विशिष्ट विषय निवडा. मग तुम्ही त्या विषयाची सुरुवात कशी कराल हे ठरवा.

७. तुम्ही एखाद्यासोबत कशा प्रकारे संभाषण सुरू करू शकता आणि लक्ष देऊन ऐकणं व आदर करणं या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत?

उदाहरणार्थ, तुम्ही घरमालकाला विचारू शकता, “आम्ही एका विषयावर तुमचं मत जाणून घेऊ शकतो का? आज जगात पाहिलं तर कुटुंबात प्रेम कमी होत चाललं आहे. तुम्हाला काय वाटतं, कुटुंबातली नाती मजबूत कशी होऊ शकतात?” मग तुम्ही मत्तय ७:१२ किंवा कलस्सैकर ३:१८, १९ या वचनांवर त्यांच्याशी चर्चा करू शकता. अथवा तुम्ही एखाद्या व्यक्‍तीला विचारू शकता: “मुलांना चांगल्या सवयी लावण्याचा सर्वात उत्तम मार्ग कुठला आहे, तुम्हाला काय वाटतं?” यानंतर अनुवाद ६:६, ७ या वचनांवर चर्चा करा. तुम्ही कोणताही विषय निवडला तरी तुम्ही ज्या लोकांशी बोलणार आहात त्यांच्याबद्दल विचार करा. बायबल खरंच काय शिकवतं हे जाणून घेतल्यामुळे त्यांना कसा फायदा होऊ शकतो याविषयी कल्पना करा. लोकांशी बोलताना त्यांचं लक्ष देऊन ऐकणं आणि त्यांच्या मताचा आदर करणं महत्त्वाचं आहे. असं केल्यामुळे तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकाल आणि ते आपला संदेश ऐकतील याची शक्यताही जास्त असेल.

८. आपण अनेक वेळा पुनर्भेट घेत राहणं का गरजेचं आहे?

एखाद्याचा बायबल अभ्यास सुरू करण्याआधी तुम्हाला कदाचित त्याच्या पुनर्भेटींसाठी वेळ द्यावा लागेल आणि मेहनत करावी लागेल. असं का? कारण आपण पुनर्भेट करू तेव्हा कदाचित घरमालक घरी नसतील किंवा आपल्याशी बोलायला त्यांना वेळ नसेल. तसंच घरमालक बायबल अभ्यास करायला लगेच तयार होणार नाही, यामुळेही आपल्याला बऱ्‍याच वेळा त्यांची पुनर्भेट घ्यावी लागेल. लक्षात असू द्या, की एका रोपट्याला नियमितपणे पाणी घातलं तर त्याची वाढ लवकर होण्याची शक्यता जास्त असते. त्याच प्रकारे, आपण एका आस्थेवाईक व्यक्‍तीसोबत नियमितपणे देवाच्या वचनावर चर्चा केली तर यहोवा आणि येशूवर असलेलं त्याचं प्रेम आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शिष्य बनवण्याच्या कामात सर्व ख्रिश्‍चनांचा वाटा आहे का?

जगभरातले साक्षीदार प्रामाणिक मनाच्या लोकांना शोधण्याच्या कामात सहभाग घेत आहेत (परिच्छेद ९-१० पाहा) *

९-१०. प्रामाणिक मनाच्या लोकांना शोधण्याच्या कामात प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीचा वाटा आहे असं आपण का म्हणू शकतो?

प्रामाणिक मनाच्या लोकांना शोधण्याच्या कामात प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍ती मदत करत आहे. लोकांना शोधण्याच्या या कामाची तुलना आपण एका हरवलेल्या मुलाला शोधण्याच्या कामाशी करू शकतो. ते कसं? एका सत्य घटनेचा विचार करा. एकदा एक तीन वर्षांचा मुलगा हरवला. जवळजवळ ५०० लोक त्या मुलाला शोधत होते. त्या मुलाला हरवून जवळपास वीस तास झाल्यावर शेवटी एका व्यक्‍तीला तो मक्याच्या शेतात सापडला. लोकांनी त्या व्यक्‍तीचं कौतुक केलं. पण त्या व्यक्‍तीने त्या मुलाला शोधून काढण्याचं श्रेय घेतलं नाही. त्याने म्हटलं: “खरंतर, बऱ्‍याचशा लोकांच्या प्रयत्नांमुळे हा मुलगा सापडला आहे.”

१० आज बरेचसे लोक त्या हरवलेल्या मुलाप्रमाणेच आहेत. त्यांच्याकडे आशा नाही आणि त्यांना मदत हवी आहे. (इफिस. २:१२) ऐंशी लाखांपेक्षा जास्त लोक एकत्र मिळून अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला कदाचित बायबल अभ्यास करायला तयार असणारी व्यक्‍ती इतक्या सहजपणे भेटणार नाही. पण त्याच क्षेत्रात इतर प्रचारकांना कदाचित अशी व्यक्‍ती भेटेल जी देवाच्या वचनातली सत्यं शिकून घ्यायला तयार असेल. एका बांधवाला किंवा बहिणीला जेव्हा अशी एखादी व्यक्‍ती भेटते जी पुढे जाऊन ख्रिस्ताचा शिष्य बनते त्या वेळी आपल्या सर्वांनाच आनंद होतो. कारण आपणही त्या शोधकामात भाग घेतलेला असतो.

११. तुमच्याकडे बायबल अभ्यास नसला तरीही कोणत्या इतर मार्गांनी तुम्ही शिष्य बनवण्याच्या कामात मदत करू शकता?

११ तुम्ही सध्या कोणाचा बायबल अभ्यास घेत नसला तरी तुम्ही इतर मार्गांनी शिष्य बनवण्याच्या कामात मदत करू शकता. उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती पहिल्यांदा राज्य सभागृहात येते तेव्हा तुम्ही तिचं स्वागत करू शकता आणि तिला मदत करू शकता. असं केल्यामुळे लोकांना खात्री पटेल की प्रेम हे खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह आहे. (योहा. १३:३४, ३५) सभांमध्ये उत्तरं देऊन, मग ती कमी शब्दांत का असेना तुम्ही त्या व्यक्‍तीला तिचा विश्‍वास मनापासून व्यक्‍त करायला शिकवाल. तसंच, तुम्ही नवीन प्रचारकाला तुमच्यासोबत सेवाकार्यात घेऊन जाऊ शकता आणि त्याला लोकांसोबत वचनांतून तर्क करायला शिकवू शकता. असं केल्याने तुम्ही त्याला ख्रिस्ताचं अनुकरण करण्यासाठी मदत करत असाल.—लूक १०:२५-२८.

१२. शिष्य बनवण्यासाठी आपल्यात काही खास कौशल्य असणं गरजेचं आहे का? स्पष्ट करा.

१२ येशूचे शिष्य बनण्यासाठी इतरांना मदत करताना आपल्यात काही खास कौशल्यं असायलाच हवीत असा विचार आपण करू नये. का बरं? बोलिव्हियामध्ये राहणाऱ्‍या फॉस्टीना नावाच्या बहिणीचा विचार करा. ती यहोवाच्या साक्षीदारांना जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा तिला वाचता येत नव्हतं. पण आता ती काही प्रमाणात वाचायला शिकली आहे. तिचा बाप्तिस्मा झाला आहे आणि तिला इतरांना शिकवायला आवडतं. दर आठवडी ती पाच बायबल अभ्यास घेते. फॉस्टीनाला तिच्या विद्यार्थ्यांसारखं चांगलं वाचता येत नसलं तरी तिने सहा जणांना बाप्तिस्मा घेण्यापर्यंत प्रगती करण्यासाठी मदत केली आहे.—लूक १०:२१.

१३. आपण व्यस्त असलो तरी शिष्य बनवण्याचं काम केल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळू शकतात?

१३ आज बऱ्‍याच बंधुभगिनींवर अनेक जबाबदाऱ्‍या आहेत आणि यामुळे ते व्यस्त असतात. असं असलं तरी ते बायबल अभ्यास घेण्यासाठी वेळ काढतात आणि यामुळे त्यांना खूप आनंद मिळतो. मेलेनीच्या उदाहरणावर विचार करा. ती अलास्कामध्ये राहते आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलीला एकटीच सांभाळते. तसंच, ती पूर्ण वेळेची नोकरी करते आणि तिला तिच्या कॅन्सरग्रस्त वडिलांची काळजीही घ्यावी लागते. मेलेनी शहरापासून दूर असलेल्या गावात राहते आणि तिथे ती एकटीच साक्षीदार आहे. थंडीच्या दिवसांतही तिला प्रचारात जाण्यासाठी बळ मिळावं म्हणून ती नियमितपणे प्रार्थना करायची. कारण तिला अशा लोकांना शोधायचं होतं ज्यांच्यासोबत तिला बायबल अभ्यास करता येईल. शेवटी तिची भेट साराशी झाली. साराला ऐकून आश्‍चर्य वाटलं की देवाला एक वैयक्‍तिक नाव आहे. कालांतराने सारा बायबल अभ्यास करायला तयार झाली. मेलेनी म्हणते: “शुक्रवारी संध्याकाळी घरी आल्यावर मी पार थकून जायचे. पण मी आणि माझी मुलगी बायबल अभ्यास घेण्यासाठी जायचो आणि त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. साराने विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं देण्यासाठी आम्हाला संशोधन करताना मजा यायची. आणि पुढे जाऊन तिचं यहोवासोबत एक चांगलं नातं तयार झालं, हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला.” साराने धैर्याने विरोधाचा सामना केला, चर्च सोडलं आणि बाप्तिस्मा घेतला.

शिष्य बनवताना धीर दाखवणं का गरजेचं आहे?

१४. (क) शिष्य बनवण्याचं काम कशा प्रकारे मासेमारीच्या कामासारखं आहे? (ख) २ तीमथ्य ४:१, २ या वचनांतल्या पौलच्या शब्दांतून आपल्याला काय करण्याची प्रेरणा मिळते?

१४ सेवाकार्यात तुम्हाला यश मिळत नसेल तरी हार न मानता अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न करा जे भविष्यात येशूचे शिष्य बनू शकतात. लक्षात असू द्या, येशूने शिष्य बनवण्याच्या कामाची तुलना मासेमारीशी केली. मासे पकडणाऱ्‍यांना लगेच मासे मिळत नाहीत तर त्यांना कदाचित बरेच तास मेहनत करावी लागते. बऱ्‍याचदा तर ते रात्री उशीरापर्यंत काम करतात किंवा अगदी पहाटे मासे पकडायला जातात. कधीकधी तर त्यांना समुद्रात दूरवर प्रवास करावा लागतो. (लूक ५:५) त्याच प्रकारे, काही प्रचारक योग्य मनाच्या लोकांना शोधण्यासाठी धीराने बरेच तास खर्च करतात आणि मेहनत घेतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेळी जावं लागतं. असं का? त्यांना जास्तीत जास्त लोक भेटावेत म्हणून ते असं करतात. अशा प्रकारे भरपूर मेहनत घेणाऱ्‍या प्रचारकांना यश मिळतं. त्यांना आपल्या संदेशात आवड दाखवणारे लोक भेटतात. तुम्ही दिवसाच्या अशा वेळी किंवा अशा ठिकाणी प्रचार करू शकता का जेव्हा लोक भेटण्याची शक्यता जास्त असते?—२ तीमथ्य ४:१, २ वाचा.

तुमच्या बायबल विद्यार्थ्यांना आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी मदत करताना धीर दाखवा (परिच्छेद १५-१६ पाहा) *

१५. बायबल अभ्यास घेत असताना धीर धरणं का गरजेचं आहे?

१५ बायबल अभ्यास घेताना धीर दाखवणं का गरजेचं आहे? बायबल विद्यार्थ्याने फक्‍त बायबलच्या शिकवणी जाणून घ्याव्यात आणि त्यांवर प्रेम करावं एवढीच आपली इच्छा नाही. आपण त्याला बायबलच्या लेखकावर, यहोवावर प्रेम करायला शिकवणंही गरजेचं आहे. येशू आपल्या शिष्यांकडून काय अपेक्षा करतो इतकंच आपण बायबल विद्यार्थ्याला शिकवत नाही, तर खरे ख्रिस्ती या नात्याने आपण कसं जगावं हेही त्याला समजण्यासाठी मदत करतो. विद्यार्थी त्याच्या जीवनात बायबल तत्त्वं लागू करण्यासाठी मेहनत करतो, तेव्हा आपण त्याला धीराने मदत केली पाहिजे. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांमध्ये आणि सवयींमध्ये बदल करायला फक्‍त काही महिने लागतात, पण काहींना बदल करायला जास्त वेळ लागतो.

१६. रॉलच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१६ पेरूमध्ये राहणाऱ्‍या मिशनरी बांधवाने धीर दाखवल्यामुळे त्याला फायदा झाला. ते म्हणतात: “मी रॉल नावाच्या व्यक्‍तीचा दोन पुस्तकांतून अभ्यास घेतला. पण त्याच्या जीवनात अजूनही मोठमोठ्या समस्या होत्या. त्याचं वैवाहिक जीवन समस्यांनी भरलेलं होतं, तो शिव्या द्यायचा आणि त्याच्या वाईट वागणुकीमुळे त्याची मुलं त्याचा आदर करत नव्हती. पण तो नियमितपणे सभांना यायचा म्हणून मी त्याची आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेत राहिलो. मग तीनपेक्षा जास्त वर्षं अभ्यास केल्यानंतर त्याने बाप्तिस्मा घेतला.”

१७. पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

१७ येशूने आपल्याला म्हटलं: “जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.” ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी बऱ्‍याचदा आपण अशा लोकांशी बोलतो ज्यांचे विचार आपल्यापेक्षा खूप वेगळे आहेत. यात अशा लोकांचाही समावेश होतो जे कुठल्याच धार्मिक संघटनेशी संबंधित नाहीत किंवा त्यांचा देवाच्या अस्तित्वावर विश्‍वास नाही. पुढच्या लेखात आपण शिकणार आहोत की वेगवेगळे विचार किंवा विश्‍वास असलेल्या लोकांना आपण कशा रीतीने आनंदाचा संदेश सांगू शकतो.

गीत ४४ कापणीत आनंदाने सहभागी व्हा!

^ परि. 5 ख्रिस्ती मंडळीचं एक मुख्य ध्येय आहे. ते म्हणजे लोकांना ख्रिस्ताचे शिष्य बनायला मदत करणं. या लेखात काही व्यावहारिक मार्ग दिले आहेत ज्यांमुळे आपल्याला हे ध्येय पूर्ण करायला मदत होईल.

^ परि. 2 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: येशूचे शिष्य फक्‍त त्याने शिकवलेल्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत तर ते शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्याचाही प्रयत्न करतात. ते येशूच्या उदाहरणाचं होता होईल तितकं जवळून अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.—१ पेत्र २:२१.

^ परि. 52 चित्रांचं वर्णन: एक माणूस सुट्टीसाठी बाहेर जात असताना एअरपोर्टवर साक्षीदारांनी दिलेलं साहित्य स्वीकारतो. नंतर, फिरत असताना त्याला काही साक्षीदार सार्वजनिक साक्षकार्य करताना दिसतात. घरी परतल्यावर, काही प्रचारक त्याच्या घरी आनंदाचा संदेश सांगायला येतात.

^ परि. 54 चित्रांचं वर्णन: नंतर तो माणूस बायबल अभ्यास स्वीकारतो आणि कालांतराने बाप्तिस्मा घेतो.