व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूने खरंच माझ्यासाठी जीव दिला का?

येशूने खरंच माझ्यासाठी जीव दिला का?

आपल्याला बायबलमध्ये “आपल्यासारख्याच भावना” असलेल्या विश्‍वासू सेवकांबद्दल वाचायला मिळतं. (याको. ५:१७) उदाहरणार्थ, रोमकर ७:२१-२४ या वचनांतल्या शब्दांवरून आपल्याला पौलच्या भावना सहज रीत्या समजायला मदत होते. त्याने म्हटलं: “योग्य ते करण्याची माझी इच्छा असते, तेव्हा मला स्वतःमध्ये वाईटच आढळते. . . माझी किती दयनीय स्थिती आहे!” आपल्याला आपल्या अपरिपूर्णतेशी झगडावं लागतं तेव्हा पौलने मनापासून व्यक्‍त केलेल्या या भावनांमुळे आपल्याला दिलासा मिळतो.

पौल त्याच्या इतर भावनांबद्दलही बोलला. त्याने म्हटलं: देवाच्या पुत्राने “माझ्यावर प्रेम केले आणि स्वतःला माझ्यासाठी अर्पण केले.” (गलतीकर २:२०) पौलला याबद्दल पूर्णपणे खातरी होती. तुम्हालाही तसंच वाटतं का? कदाचित नेहमी वाटत नसेल.

आधी केलेल्या पापांमुळे जर आपल्या मनात कमीपणाची भावना येत असेल तर आपल्याला कदाचित असं वाटू शकतं की यहोवाचं आपल्यावर प्रेम नाही आणि त्याने आपल्याला क्षमा केलेली नाही. आणि यामुळे आपल्याला येशूने दिलेल्या खंडणी बलिदानाला व्यक्‍तिगत भेट म्हणून पाहणं कठीण जाऊ शकतं. खंडणीच्या या देणगीला आपण अशा दृष्टिकोनातून बघावं अशी येशूची खरंच इच्छा आहे का? जर आपल्याला असं वाटत असेल तर अशा भावनांवर मात करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? यासाठी आता आपण दोन प्रश्‍नांवर चर्चा करू या.

येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल त्याचा दृष्टिकोन

आपण येशूच्या बलिदानाला एक व्यक्‍तिगत भेट म्हणून पाहावं अशी त्याची इच्छा आहे. हे आपण खातरीने कसं म्हणू शकतो? लूक २३:३९-४३ या वचनांत दिलेला वृत्तांतावर विचार करा. एका माणसाला येशूच्या बाजूला वधस्तंभावर खिळण्यात आलं. त्या माणसाने मान्य केलं की तो अपराधी आहे. त्याने केलेला अपराध गंभीर असावा, कारण अतिशय घोर अपराध करणाऱ्‍यांनाच मृत्यूची शिक्षा म्हणून वधस्तंभावर खिळण्यात यायचं. तो माणूस दुःखामुळे खूप चिंतित होता आणि त्याने येशूला विनंती केली: “तू राजा होशील तेव्हा माझी आठवण ठेव.”

या विनंतीला येशूने कसा प्रतिसाद दिला? येशूने त्या अपराध्याकडे पाहण्यासाठी आपली मान वळवली तेव्हा त्याला किती वेदना झाल्या असतील याचा जरा विचार करा. त्याला अतिशय तीव्र वेदना होत होत्या तरीही त्याने स्मितहास्य करून त्याचं सांत्वन केलं आणि म्हटलं: “आज मी तुला खरं सांगतो, तू माझ्यासोबत नंदनवनात असशील.” येशू त्याला फक्‍त या गोष्टीची आठवण करून देऊ शकत होता की “मनुष्याचा पुत्र . . . अनेकांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला आहे.” (मत्त. २०:२८) पण याउलट त्याने आपलं खंडणी बलिदान त्या माणसासाठी दिलं यावर येशूने जोर दिला. येशूने “तू” आणि “मी” या वैयक्‍तिक सर्वनामांचा वापर करून त्याला प्रेमळपणे संबोधलं. तसंच, त्याने त्या माणसाला नंदनवन पृथ्वीवर राहण्याची आशा स्वतः दिली.

येशू लवकरच आपलं बलिदान देणार होता आणि त्याचा फायदा त्या माणसाला वैयक्‍तिक रीत्या होणार होता, हे त्याला समजावं अशी येशूची इच्छा होती. देवाची सेवा न करण्याची संधी मिळालेल्या अपराध्याबद्दल येशूने असा विचार केला, तर मग बाप्तिस्माप्राप्त व्यक्‍तीबद्दल तो असा विचार करत नसेल का? आपल्या हातूनही आधी पाप झाले असतील. पण येशूच्या बलिदानामुळे आपल्यालाही वैयक्‍तिक रीत्या फायदा होईल असा विश्‍वास करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

पौलला कशामुळे मदत झाली?

येशूने पौलला प्रचार करण्याची नेमणूक दिल्यामुळे पौल समजू शकला की येशूने त्याच्यासाठी जीव दिला आहे. हे कशावरून दिसून येतं? पौल म्हणतो: “मला सामर्थ्य देणाऱ्‍या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचा मी आभारी आहे, कारण त्याने मला विश्‍वासू समजून माझ्यावर एक सेवा सोपवली आहे, खरेतर, मी पूर्वी देवाची निंदा करणारा, त्याच्या लोकांचा छळ करणारा आणि एक उद्धट मनुष्य होतो.” (१ तीम. १:१२-१४) पौलच्या हातून चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या तरीही येशूने त्याला ही नेमणूक दिली. यावरून त्याला खातरी पटली की येशूने त्याच्यावर वैयक्‍तिक रीत्या दया, प्रेम आणि भरवसा दाखवला आहे. त्याचप्रमाणे, येशूने वैयक्‍तिक रीत्या आपल्यावरही प्रचारकार्याचं काम सोपवलं आहे. (मत्त. २८:१९, २०) याचा पौलवर जसा परिणाम झाला तसाच परिणाम आपल्यावरही होऊ शकतो का?

अलबर्ट नावाचे बांधव जवळपास ३४ वर्षं बहिष्कृत होते आणि ते अलीकडेच यहोवाकडे परत आले. ते म्हणतात: “माझ्या हातून घडलेलं पाप सतत माझ्या डोळ्यांपुढे येतं. पण जेव्हा मी प्रचारकार्यात असतो तेव्हा मला प्रेषित पौलसारखंच वाटतं. येशूने त्याच्यासारखंच माझ्यावरही वैयक्‍तिक रीत्या प्रचारकार्याचं काम सोपवलं आहे. यामुळे मला प्रोत्साहन मिळतं आणि मला स्वतःबद्दल, माझ्या जीवनाबद्दल व भविष्याबद्दल सकारात्मक विचार करायला मदत होते.—स्तो. ५१:३.

सर्व प्रकारच्या लोकांसोबत अभ्यास करताना, त्यांना याची खातरी करून द्या की येशू त्यांच्यावर दया आणि प्रेम करतो

ॲलेन नावाच्या बांधवाने सत्यात येण्याआधी खूप गुन्हे केले आणि ते हिंसक होते. ते म्हणतात: “मी लोकांचं किती नुकसान केलं याबद्दल मी अजूनही विचार करतो. कधीकधी तर यामुळे मला खूप नैराश्‍य येतं. पण मी यहोवाचा खूप आभारी आहे की त्याने आनंदाचा संदेश सांगण्यासाठी माझ्यासारख्या पापी व्यक्‍तीला संधी दिली. जेव्हा लोक आनंदाच्या संदेशाला प्रतिसाद देतात तेव्हा यहोवा किती चांगला आणि प्रेमळ आहे याची मला आठवण होते. यहोवा माझा वापर, माझ्यासारख्या परिस्थितीचा सामना करणाऱ्‍या लोकांना मदत करण्यासाठी करत आहे असं मला वाटतं.”

प्रचारकार्यात असताना आपल्याला चांगल्या गोष्टींवर आणि विचारांवर लक्ष केंद्रित करायला मदत होते. आपल्याला येशूच्या प्रेमाची, दयेची आणि आपल्यावर भरवसा असल्याची खातरी पटते.

यहोवा आपल्या मनापेक्षा मोठा आहे

सैतानाच्या जगाचा नाश होत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्वी केलेल्या चुकांबद्दल वाईट वाटू शकतं. अशा भावनांवर आपण कशा प्रकारे मात करू शकतो?

जॅन नावाची बहीण तरुण असताना दुहेरी जीवन जगायची आणि यामुळे तिच्या मनात दोषीपणाची भावना यायची. ती म्हणते: “माझं यहोवावर प्रेम आहे कारण तो ‘आपल्या मनापेक्षा मोठा’ आहे.” (१ योहा. ३:१९, २०) जॅनप्रमाणे आपल्याही दिलासा मिळू शकतो कारण यहोवा आणि येशू यांना जाणीव आहे की आपण पापी आहोत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याने खंडणीची तरतूद परिपूर्ण मानवांसाठी नव्हे तर पश्‍चात्ताप दाखवणाऱ्‍या अपरिपूर्ण मानवांसाठी केली आहे.—१ तीम. १:१५.

येशू अपरिपूर्ण लोकांशी जसा वागला त्यावर जेव्हा आपण मनन करतो आणि सेवाकार्य पूर्ण करण्यासाठी आपलं सर्वोत्तम देतो, तेव्हा आपल्याला खातरी पटते की त्याने खंडणी बलिदान माझ्यासाठी दिलं आहे. असं केल्याने पौलसारखं आपणही म्हणू शकू: येशूने “माझ्यावर प्रेम केले आणि स्वतःला माझ्यासाठी अर्पण केले.”