व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आध्यात्मिक प्रगती करण्याची गरज ओळखा

आध्यात्मिक प्रगती करण्याची गरज ओळखा

“वाचन, बोध व शिक्षण याकडे लक्ष ठेव.”—१ तीम. ४:१३.

गीत क्रमांक: ४५, ४२

१, २. (क) यशया ६०:२२ मधील शब्द आपल्या काळात कसे पूर्ण होत आहेत? (ख) आज यहोवाच्या संघटनेत कोणत्या गोष्टीची गरज आहे?

“जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल.” (यश. ६०:२२) बायबलमधील या भविष्यवाणीची पूर्णता साक्षीदारांच्या संख्येत होणाऱ्या वाढीवरून दिसून येते. २०१५ साली जगभरात सुवार्ता घोषित करणाऱ्या साक्षीदारांची संख्या ८२,२०,१०५ होती. आपल्या सेवकांच्या संख्येत होणाऱ्या वाढीबद्दल यहोवाने सांगितलं होतं: “मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणेन.” या वाढीच्या काळात आपल्या सर्वांनाच बरंच काम करावं लागेल. तर मग, सुवार्ता घोषित करण्यासाठी आणि इतरांना सत्य शिकवण्यासाठी तुम्ही होताहोईल तितके प्रयत्न करत आहात का? आज अनेक बंधुभगिनी सामान्य पायनियरिंग किंवा साहाय्यक पायनियरिंग करत आहेत. काही जण अशा ठिकाणी जाऊन सेवा करत आहेत जिथं राज्य प्रचारकांची जास्त गरज आहे. तर काही जण राज्य सभागृहांच्या बांधकामात आवेशानं सहभाग घेत आहेत.

दरवर्षी जवळजवळ २,००० नवीन मंडळ्या तयार होत आहेत. त्यामुळे, त्यांची देखरेख करण्यासाठी वडिलांची आणि सेवा सेवकांची गरज पडते. आणि इतक्या जास्त प्रमाणात मंडळ्या तयार होत असल्यामुळे, प्रत्येक वर्षी हजारो सेवा सेवकांना वडील म्हणून पात्र होण्याची, तसंच हजारो बांधवांना सेवा सेवक बनण्यास पात्र होण्याची गरज आहे. पण, यासोबतच प्रत्येक बंधुभगिनीने “प्रभूच्या कामात . . . अधिकाधिक” करण्याची गरज आहे.—१ करिंथ. १५:५८.

आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी काय करण्याची गरज आहे?

३, ४. आध्यात्मिक प्रगती करण्याचा काय अर्थ होतो?

पहिले तीमथ्य ३:१ वाचा. जे ‘अध्यक्षाचं काम करू पाहतात’ अशा सर्व बांधवांची पौलाने प्रशंसा केली. या वचनात “काम करू पाहतो” असं जे म्हटलं आहे त्याचा मूळ ग्रीक भाषेतील अर्थ, ‘मनापासून परिश्रम घेणे’ असा होतो. जेव्हा एखादी गोष्ट आपल्यापासून लांब असते, तेव्हा तिला मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, बरीच मेहनत घ्यावी लागते. कल्पना करा, की एका बांधवाला सेवा सेवक बनण्याची इच्छा आहे. त्याला जाणवतं की त्याला परिश्रम घेऊन स्वतःत काही ख्रिस्ती गुण विकसित करण्याची गरज आहे. पण, सेवा सेवक बनल्यानंतरही तो मेहनत घ्यायचं थांबवणार नाही. तर, मंडळीत अध्यक्ष किंवा वडील बनण्यास पात्र होण्यासाठी तो स्वतःमध्ये आणखी सुधारणा करत राहील.

आज बऱ्याच बंधुभगिनींना पायनियरिंग सेवा, बेथेल सेवा किंवा राज्य सभागृह बांधकामात सहभाग घेण्याची इच्छा आहे. राज्याच्या कामांना जास्त वेळ देता यावा यासाठी हे बंधुभगिनी आपल्या जीवनमानात बरेच फेरबदल करत आहेत. पण, आपल्या सर्वांनाच आध्यात्मिक प्रगती करण्याची गरज आहे. यासाठी बायबल आपल्याला कशी मदत करू शकते, हे आपण या लेखात पाहू या.

आध्यात्मिक प्रगती करत राहा

५. तरुण बंधुभगिनी आपल्या शक्तीचा यहोवाच्या सेवेत कसा उपयोग करू शकतात?

तरुणांमध्ये जास्त शक्ती असते आणि त्यांचं आरोग्यही चांगलं असतं. त्यामुळे यहोवाची जास्त प्रमाणात सेवा करणं त्यांना शक्य असतं. (नीतिसूत्रे २०:२९ वाचा.) बेथेलमध्ये काही तरुण बांधव, बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनं छापण्याच्या कामात हातभार लावतात. तसंच, अनेक तरुण बंधुभगिनी राज्य सभागृहाच्या बांधकामात किंवा त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामात सहभाग घेतात. तर काही, एखादी नैसर्गिक विपत्ती आल्यास मदतकार्य करण्यासाठी पुढे येतात. यासोबतच, अनेक तरुण पायनियर नवीन भाषा शिकतात किंवा सुवार्ता घोषित करण्यासाठी दूरवरच्या ठिकाणी प्रवास करतात.

६-८. (क) एरन नावाच्या बांधवाने देवाच्या सेवेबद्दल आपला दृष्टिकोन कसा बदलला आणि यामुळे कोणते परिणाम घडून आले? (ख) “परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव” आपण कसा घेऊ शकतो?

आपलंदेखील यहोवावर खूप प्रेम आहे आणि त्याची अगदी मनापासून सेवा करण्याची आपली इच्छा आहे. असं असलं, तरी एरन नावाच्या बांधवाला जसं वाटायचं तसं कधीकधी आपल्यालाही वाटू शकतं. सत्यात वाढल्यामुळे तो लहानपणापासूनच सभांना आणि प्रचारकार्याला जायचा. त्याला देवाची सेवा आनंदाने करण्याची इच्छा होती, पण त्याला त्यात आनंद मिळत नव्हता. तो म्हणतो: “मला सभा आणि प्रचारकार्य खूप कंटाळवाणं वाटायचं.” मग, सेवेत आनंद मिळवण्यासाठी एरनने काय केलं?

एरनने नियमितपणे बायबल वाचन करण्यासाठी आणि सभांची तयारी करून त्यात सहभाग घेण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. तसंच, प्रार्थना करण्याकडे त्याने विशेष लक्ष दिलं. या सर्व गोष्टींमुळे त्याला आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत झाली. यामुळे, यहोवासोबतचा त्याचा नातेसंबंध जवळचा झाला आणि त्याच्यावरील त्याचं प्रेमही वाढलं. याचा परिणाम म्हणजे त्याला देवाच्या सेवेत आनंद मिळू लागला. त्याने पायनियरिंग केली, नैसर्गिक विपत्तीदरम्यान मदतकार्यात सहभाग घेतला आणि प्रचारकार्य करण्यासाठी तो दुसऱ्या देशातही गेला. आज तो बेथेलमध्ये आहे आणि मंडळीत एक वडील म्हणून सेवा करत आहे. आता त्याला कसं वाटतं? तो म्हणतो: “यहोवा हा किती चांगला आहे हे मी अनुभवलं आहे. त्याने मला जे आशीर्वाद दिले आहेत, त्यामुळे मी स्वतःला त्याचा कर्जदार समजतो. आणि ही गोष्ट मला त्याची आणखी जास्त प्रमाणावर सेवा करण्यास प्रेरित करते. याचा परिणाम म्हणजे माझ्या आनंदात आणखी भर पडत आहे.”

स्तोत्रकर्त्याने लिहिलं: “परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा.” त्याने पुढे असं म्हटलं: “परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.” (स्तोत्र ३४:८-१० वाचा.) जेव्हा आपण आपलं सर्वोत्तम यहोवाला देतो, तेव्हा यहोवाचं मन आनंदित होतं. आणि ही जाणीव असल्यामुळे आपल्यालाही खरा आनंद मिळतो. यहोवादेखील आपल्याला अभिवचन देतो की तो आपला नेहमी सांभाळ करेल.

धीर सोडू नका

९, १०. धीर धरणं इतकं महत्त्वाचं का आहे?

यहोवाच्या सेवेत जास्तीतजास्त करण्याची कदाचित तुमची इच्छा असेल. पण, बऱ्याच वर्षांपासून मेहनत घेऊनही जर तुम्हाला मंडळीत जबाबदारी देण्यात आली नसेल, तर काय? किंवा मग आपल्या परिस्थितीत काही बदल व्हावा याची तुम्ही बऱ्याच वर्षांपासून वाट पाहूनही त्यात काही बदल होत नसेल, तेव्हा काय? अशा वेळी तुम्हाला धीर दाखवण्याची गरज पडू शकते. (मीखा ७:७) यहोवा परिस्थितीमध्ये कदाचित लगेच बदल घडवून आणणार नाही. पण तो तुम्हाला साहाय्य नक्कीच करेल याची खात्री तुम्ही बाळगू शकता. याबाबतीत अब्राहामाचंच उदाहरण घ्या. यहोवाने त्याला अभिवचन दिलं होतं, की त्याला एक मुलगा होईल. पण, यासाठी त्याला बरीच वर्षं वाट पाहावी लागली. मग या काळादरम्यान अब्राहामाने कशी मनोवृत्ती दाखवली? अब्राहामाने धीर धरला आणि यहोवावरील आपला विश्वास कमी होऊ दिला नाही.—उत्प. १५:३, ४; २१:५; इब्री ६:१२-१५.

१० एखाद्या गोष्टीसाठी थांबून राहणं किंवा धीर धरणं खरंच खूप कठीण असू शकतं. (नीति. १३:१२) पण जर, आपण आपल्या परिस्थितीमुळे होणाऱ्या निराशेबद्दलच विचार करत राहिलो, तर आणखी खचून जाऊ. याउलट, आपल्याजवळ असलेल्या वेळेचा उपयोग आपण स्वतःमध्ये काही चांगले गुण विकसित करण्यासाठी करू शकतो. म्हणजे भविष्यात जेव्हा आपल्याला मंडळीत काही जबाबदाऱ्या दिल्या जातील, तेव्हा या गुणांचा आपल्याला फायदा होईल.

११. आपण कोणते आध्यात्मिक गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि ते गुण महत्त्वाचे का आहेत?

११ क्षमता आणि आध्यात्मिक गुण विकसित करा. बायबलचं वाचन केल्यामुळे आणि त्यावर मनन केल्यामुळे तुम्हाला सुज्ञ बनण्यास, तर्क करण्यास आणि चांगले निर्णय घेण्यास मदत होते. खरंतर, मंडळीची देखरेख करणाऱ्या बांधवांमध्ये यांसारखे गुण आणि क्षमता असणं गरजेचं आहे. (नीति. १:१-४; तीत १:७-९) बायबलचा अभ्यास केल्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितींत देवाचा दृष्टिकोन काय आहे हे आपल्याला समजतं. यामुळे मग, दररोजच्या जीवनात शिकलेल्या गोष्टी लागू करून यहोवाचं मन आनंदित होईल असे निर्णय घेण्यास आपल्याला मदत होते. उदाहरणार्थ, इतरांशी आपण कसा व्यवहार करावा, पैशांचा योग्य वापर कसा करावा, तसंच चांगलं मनोरंजन आणि पेहराव कसा निवडावा याबाबतीत आपल्याला मदत होते.

१२. आपण जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्यास पात्र आहोत, हे कशावरून दिसून येईल?

१२ तुमच्यावर सोपवण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करा. यरुशलेममधील मंदिराची पुनर्बांधणी करताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी लोकांची गरज होती. यासाठी नहेम्याने अशा लोकांची निवड केली ज्यांनी इतरांसमोर स्वतःचं चांगलं उदाहरण मांडलं होतं. या लोकांचं यहोवावर प्रेम आहे आणि त्यांना सोपवण्यात आलेली कोणतीही जबाबदारी ते अगदी मन लावून पूर्ण करतील हे त्याला माहीत होतं. (नहे. ७:२; १३:१२, १३) आजही जे बंधुभगिनी विश्वासूपणे व प्रामाणिकपणे काम करतात ते इतरांसमोर चांगलं उदाहरण ठरतात. आणि या कारणामुळे कदाचित त्यांच्यावर जास्त जबाबदाऱ्यादेखील सोपवण्यात येऊ शकतात. (१ करिंथ. ४:२) तर मग आपल्यापैकी प्रत्येकाने, मग तो बांधव असो अथवा बहीण, स्वतःवर सोपवण्यात आलेली कोणतीही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली पाहिजे.—१ तीमथ्य ५:२५ वाचा.

१३. जेव्हा इतर जण आपल्यासोबत अन्यायीपणे वागतात, तेव्हा योसेफाचं उदाहरण आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतं?

१३ नेहमी यहोवावर निर्भर राहा. इतर जण जेव्हा तुमच्यासोबत अन्यायानं वागतात तेव्हा तुम्ही काय करू शकता? अशा वेळी कदाचित तुम्ही त्या व्यक्तीसमोर तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकता. पण, असं करताना तुम्ही स्वतःचीच बाजू मांडत राहिलात आणि तुम्हीच बरोबर आहात हे सांगत राहिलात, तर समस्या आणखी बिकट होऊ शकते. याबाबतीत योसेफाचं आपल्यासमोर चांगलं उदाहरण आहे. त्याचे भाऊ त्याच्याशी खूप वाईट रीतीनं वागले, काही लोकांनी त्याच्यावर खोटा आळ घेतला. इतकंच नाही तर जो अपराध त्याने केला नव्हता त्यासाठी त्याला तुरुंगातदेखील टाकण्यात आलं. पण, योसेफ यहोवावर निर्भर राहिला. यहोवाने दिलेल्या अभिवचनांवर त्याने मनन केलं आणि तो नेहमी यहोवाला विश्वासू राहिला. (स्तो. १०५:१९) त्या कठीण काळादरम्यान त्याने स्वतःत बरेच चांगले गुण विकसित केले. आणि नंतर जेव्हा त्याच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हा या गुणांचा त्याला फायदा झाला. (उत्प. ४१:३७-४४; ४५:४-८) इतर जण तुमच्यासोबत अन्यायीपणे वागले असतील तर समंजसपणासाठी यहोवाकडे प्रार्थना करा. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी जाल, तेव्हा यहोवा तुम्हाला प्रेमळपणे व शांतपणे तिच्यासोबत बोलण्यास मदत करेल.—१ पेत्र ५:१० वाचा.

सेवाकार्यातील आपलं कौशल्य वाढवा

१४, १५. (क) आपल्याला प्रचार करण्याच्या कौशल्यात सुधारणा करण्याची गरज का आहे? (ख) बदललेल्या परिस्थितीशी तुम्ही कसं जुळवून घेऊ शकता? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र आणि “ साक्षकार्य करण्याची एखादी वेगळी पद्धत तुम्ही वापरून पाहाल का?” ही चौकट पाहा.)

१४ वचनांचं स्पष्टीकरण देण्याचं आपलं कौशल्य तीमथ्याने वाढवत राहावं, असं उत्तेजन पौलाने त्याला दिलं. पौल त्याला म्हणाला: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव.” (१ तीम. ४:१३, १६) पण तीमथ्य तर बऱ्याच वर्षांपासून सेवाकार्य करत होता. मग त्याला आपलं शिकवण्याचं कौशल्य आणखी वाढवण्याची गरज का होती? तीमथ्याला माहीत होतं की परिस्थितीत आणि लोकांमध्ये नेहमी बदल होत राहतो. आणि लोकांनी आपलं ऐकावं अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे शिकवण्याच्या पद्धतीत बदल आणि सुधारणा करत राहण्याची त्याला गरज होती. आज जेव्हा आपण प्रचारकार्य करतो, तेव्हा आपल्यालादेखील आपलं कौशल्य वाढवत राहण्याची गरज आहे.

१५ काही ठिकाणी घरोघरचं साक्षकार्य करताना सहसा आपल्याला लोक घरी भेटत नाहीत. तर काही ठिकाणी लोक बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे आपल्याला त्यांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही. तुमच्या क्षेत्रातही अशीच परिस्थिती असेल, तर प्रचार करण्याच्या वेगळ्या पद्धती वापरून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करू शकता का?

१६. सार्वजनिक साक्षकार्य कशा प्रकारे परिणामकारक ठरू शकतं?

१६ अनेक बंधुभगिनी सार्वजनिक साक्षकार्याचा आनंद घेतात. उदाहरणार्थ, ते रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, मार्केट आणि गार्डनमध्ये जाऊन प्रचारकार्य करतात. प्रचारक कदाचित अलीकडील एखाद्या बातमीचा उल्लेख करून लोकांसोबत चर्चा सुरू करू शकतो. किंवा कुटुंबातील मुलांबद्दल काही चांगलं बोलून चर्चा सुरू करू शकतो. तो त्या व्यक्तीला त्याच्या कामाबद्दल एखादा प्रश्न विचारू शकतो. आणि जर त्यांच्यामधील संभाषण पुढे चालू राहिलं तर तो बायबलमधील एखादा मुद्दा सांगून त्या व्यक्तीचं मत जाणून घेऊ शकतो. सहसा बायबलमधील संदेशात लोक आवड दाखवतात आणि त्यांना आणखी जाणून घेण्याची इच्छा असते.

१७, १८. (क) आत्मविश्वासाने सार्वजनिक साक्षकार्य करण्यासाठी आपण काय करू शकतो? (ख) प्रचारकार्य करताना दाविदासारखी मनोवृत्ती बाळगल्यामुळे आपल्याला कशी मदत होईल?

१७ कदाचित रस्त्यावरील साक्षकार्य करताना अनोळखी लोकांशी बोलायला तुम्हाला भीती वाटत असेल. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एडी नावाच्या पायनियर बांधवालाही अशीच भीती वाटायची. पण, एका गोष्टीमुळे त्याला या भीतीवर मात करण्यास मदत झाली. तो म्हणतो: “जेव्हा लोक एखाद्या विषयावर आक्षेप घेतात किंवा आपलं मत वेगळ्या प्रकारे व्यक्त करतात, तेव्हा त्यांना कुशलतेनं उत्तर कसं द्यावं यावर मी आणि माझी पत्नी आमच्या कौटुंबिक उपासनेदरम्यान संशोधन करतो. तसंच, आम्ही इतर बंधुभगिनींनाही विचारतो.” आता एडी अगदी आत्मविश्वासाने सार्वजनिक साक्षकार्यात सहभाग घेतो.

१८ आपण जेव्हा आनंदाने साक्षकार्यात सहभाग घेतो आणि सेवाकार्यातील आपली कौशल्यं वाढवतो, तेव्हा आपली आध्यात्मिक प्रगती इतरांनाही दिसून येते. (१ तीमथ्य ४:१५ वाचा.) तसंच, यामुळे एखाद्याला यहोवाचा सेवक बनण्यासही आपण मदत करू शकतो. दाविदाने म्हटलं: “परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवेल; दीन हे ऐकून हर्ष करतील.”—स्तो. ३४:१, २.

आध्यात्मिक प्रगती करत राहण्याद्वारे यहोवाचा गौरव करा

१९. आपल्या परिस्थितीमुळे यहोवाची जास्त प्रमाणावर सेवा करणं शक्य नसतानाही, यहोवाचे एकनिष्ठ उपासक आनंदी का राहू शकतात?

१९ दाविदाने असंही म्हटलं: “हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात; आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात, आणि तुझा पराक्रम कथन करतात; यासाठी की, तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळावी.” (स्तो. १४५:१०-१२) जे यहोवावर प्रेम करतात आणि त्याला एकनिष्ठ राहतात, त्यांना त्याच्याबद्दल इतरांना सांगण्याची मनापासून इच्छा असते. पण, कदाचित आजारपणामुळे किंवा वाढत्या वयामुळे तुम्हाला घरोघरच्या साक्षकार्यात सहभाग घेता येत नसेल, तेव्हा काय? असं असलं तरी निराश होऊ नका. कारण, जेव्हा-जेव्हा तुम्ही यहोवाविषयी इतरांशी बोलता, तेव्हा-तेव्हा तुम्ही त्याच्या नावाला गौरव देत असता. तुम्ही कदाचित नर्स किंवा डॉक्टरांसोबत बोलू शकता. समजा तुम्हाला तुमच्या विश्वासामुळे तुरुंगात टाकण्यात आलं असेल, तर तिथंही यहोवाबद्दल इतरांना सांगून तुम्ही त्याचं मन आनंदित करू शकता. (नीति. २७:११) तसंच, कुटुंबातील इतर सदस्य सत्यात नसतानाही यहोवाची विश्वासूपणे सेवा करण्याद्वारे तुम्ही त्याचं मन आनंदित करू शकता. (१ पेत्र ३:१-४) तुमची परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही यहोवाच्या नावाला गौरव देऊ शकता, त्याच्यासोबतचं तुमचं नातं आणखी मजबूत करू शकता आणि आध्यात्मिक प्रगती करू शकता.

२०, २१. जेव्हा तुमच्यावर जबाबदाऱ्या सोपवण्यात येतात तेव्हा तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद कसे ठरू शकता?

२० यहोवासोबतचा नातेसंबंध आणखी मजबूत करण्यासाठी आणि त्याला आपलं सर्वोत्तम देण्यासाठी तुम्ही मेहनत घेत राहिलात, तर तो तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल. तुम्ही तुमच्या जीवनमानात किंवा वेळापत्रकात काही फेरबदल करू शकता का? यामुळे तुम्हाला देवाच्या सुंदर अभिवचनांबद्दल इतरांना शिकवण्यासाठी जास्त वेळ मिळेल. इतकंच नाही, तर आपल्या बंधुभगिनींना मदत करण्यासाठी तुम्हाला आणखी संधी मिळेल. तसंच, तुम्ही मंडळीतील जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी घेत असलेली मेहनत पाहून इतरांना आनंद होईल व ते तुमची जास्त कदर करतील.

२१ आपण कितीही वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो, तरी आपण त्याच्या आणखी जवळ जाण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी मेहनत घेत राहिली पाहिजे. पुढच्या लेखात आपण पाहणार आहोत, की आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी इतरांना आपण कशी मदत करू शकतो.