व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतरांना प्रशिक्षित करणं गरजेचं का आहे?

इतरांना प्रशिक्षित करणं गरजेचं का आहे?

“मी तुम्हास उत्तम धर्मोपदेश करतो.”—नीति. ४:२.

गीत क्रमांक: ४५, ४४

१, २. इतरांना प्रशिक्षण देणं महत्त्वाचं का आहे?

राज्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी येशूने बरीच मेहनत घेतली. यासोबतच, त्याने आपल्या शिष्यांना प्रशिक्षण देण्यासाठीही बराच वेळ खर्च केला. इतरांना कसं शिकवायचं आणि देवाच्या लोकांची एका मेंढपाळाप्रमाणे काळजी कशी घ्यायची, हे त्याने आपल्या शिष्यांना शिकवलं. (मत्त. १०:५-७) फिलिपाचंही आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण आहे. सुवार्ता घोषित करण्यात तोदेखील खूप व्यस्त होता. पण, यासोबतच त्याने आपल्या मुलींनाही या कार्यासाठी प्रशिक्षित केलं. (प्रे. कृत्ये २१:८, ९) आज आपल्यालाही इतरांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

कारण, जगभरातील मंडळ्यांमध्ये असे बरेच नवीन लोक आहेत, ज्यांचा अजून बाप्तिस्मा झालेला नाही. वैयक्तिक रीत्या बायबल वाचन करणं आणि त्याचा अभ्यास करणं चांगलं का आहे, हे आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. तसंच, आपण त्यांना प्रचारकार्य करण्याचं आणि बायबल अभ्यास घेण्याचं प्रशिक्षणदेखील दिलं पाहिजे. ज्या बांधवांचा नुकताच बाप्तिस्मा झाला आहे त्यांनादेखील प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यामुळे, पुढे जाऊन सेवा सेवक किंवा वडील या नात्यानं सेवा करण्यास ते पात्र बनू शकतील. नवीन लोकांना मदत करण्यासाठी मंडळीतील प्रत्येकानेच मेहनत घेणं गरजेचं आहे.—नीति. ४:२.

बायबलचा अभ्यास कसा करायचा हे नवीन लोकांना शिकवा

३, ४. (क) शास्त्रवचनांचा अभ्यास केल्यामुळे सेवाकार्यात आणखी कुशल बनण्यास मदत होते, हे पौलाच्या शब्दांवरून कसं दिसून येतं? (ख) विद्यार्थ्यांना वैयक्तिक बायबल अभ्यास करण्याचं प्रोत्साहन देण्यापूर्वी आपण स्वतः काय करणं गरजेचं आहे?

यहोवाची इच्छा काय आहे हे जाणून घेण्यासाठी, त्याच्या प्रत्येक सेवकानं बायबलचं वाचन करणं आणि अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. याविषयी कलस्सैमधील बांधवांना पौलाने असं लिहिलं: “आम्हीही . . . तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या [देवाच्या] इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे.” कलस्सैमधील बांधवांसाठी शास्त्रवचनांचं वाचन करणं आणि त्याचा अभ्यास करणं इतकं महत्त्वाचं का होतं? कारण यामुळे त्यांना ‘प्रभूला संतोषविण्याकरता त्याला शोभेल असे वागण्यासाठी’ काय करणं गरजेचं आहे, हे समजण्यास मदत होणार होती. तसंच, यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करत असलेलं प्रत्येक ‘सत्कार्य’ करण्यासाठी त्यांना मदत मिळणार होती; खासकरून, सुवार्ता घोषित करण्यासाठी. (कलस्सै. १: ९, १०) आज आपणदेखील आपल्या बायबल विद्यार्थ्यांना हे समजण्यास मदत केली पाहिजे, की नियमित रीत्या बायबलचं वाचन आणि त्याचा अभ्यास केल्यामुळे त्यांनाही यहोवाची सेवा करण्यास मदत होऊ शकते.

पण जर, आपल्यालाच नियमित रीत्या बायबलचं वाचन आणि अभ्यास करण्याची सवय नसेल, तर विद्यार्थ्यांना आपण त्याचं महत्त्व पटवून देऊ शकणार नाही. खरंतर, नियमित रीत्या बायबलचं वाचन करून त्यावर मनन केल्यानं आपल्याला आपल्या जीवनात आणि सेवाकार्यात खूप फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ, सेवाकार्य करत असताना एखाद्याने आपल्याला कठीण प्रश्न विचारला, तर त्याचं बायबलमधून उत्तर देणं आपल्याला शक्य होईल. तसंच विरोध होत असताना येशूने, पौलाने आणि इतरांनी आपलं सेवाकार्य कसं चालू ठेवलं याविषयी आपण वाचतो, तेव्हा विरोधाचा सामना करताना आपल्यालाही प्रचारकार्य करत राहण्याची प्रेरणा मिळते. यासोबतच, बायबलमधून शिकलेल्या गोष्टींचा आपल्याला कसा फायदा झाला त्याबद्दल इतरांना सांगितल्याने, त्यांनाही बायबलचा आणखी खोलवर अभ्यास करण्याची प्रेरणा मिळू शकते आणि फायदा होऊ शकतो.

५. नवीन लोकांना नियमितपणे वैयक्तिक बायबल अभ्यास करण्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारे मदत करू शकतो?

पण, बायबल विद्यार्थ्यांना नियमितपणे वैयक्तिक अभ्यास करण्याचं प्रशिक्षण आपण कसं देऊ शकतो? पुढील काही मार्गांनी आपण ते करू शकतो. सर्वात आधी, ज्या प्रकाशनातून त्यांचा अभ्यास चालला आहे त्याची चांगली तयारी कशी करता येईल हे आपण त्यांना शिकवू शकतो. उदाहरणार्थ, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील परिशिष्टांचं वाचन करण्याचं आणि त्यातील वचनं तपासून पाहण्याचं उत्तेजन आपण त्यांना देऊ शकतो. यासोबतच, समजा ते सभांना येत असतील, तर त्यासाठी चांगली तयारी करून ते उत्तरं कशी देऊ शकतात हे आपण त्यांना शिकवू शकतो. तसंच, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकांच्या प्रत्येक अंकाचं वाचन करण्याचं प्रोत्साहन आपण त्यांना देऊ शकतो. वॉचटॉवर लायब्ररी आणि वॉचटॉवर ऑनलाईन लायब्ररी यांचा वापर करून ते बायबल विषयीच्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधू शकतात, हे आपण त्यांना दाखवू शकतो. जेव्हा आपले बायबल विद्यार्थी या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून वैयक्तिक अभ्यास करतील, तेव्हा त्यांना त्यात आणखी आनंद मिळेल आणि जास्त जाणून घेण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण होईल.

६. (क) बायबल किती मौल्यवान आहे हे आपल्या विद्यार्थ्यांना समजण्यास आपण कशी मदत करू शकतो? (ख) बायबलबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात प्रेम वाढल्यास ते काय करण्यास प्रवृत्त होतील?

आपण जेव्हा बायबल अभ्यास घेतो, तेव्हा बायबल हे खूप मौल्यवान आहे याची जाणीव आपल्या विद्यार्थ्याला व्हावी अशी आपली इच्छा असते. कारण, बायबलमुळेच त्याला यहोवा देवाला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास मदत होते. विद्यार्थ्यावर वैयक्तिक बायबल अभ्यास करण्याचा दबाव आणण्याऐवजी, त्यातून आनंद कसा मिळवता येईल हे आपण त्याला दाखवून देऊ शकतो. जितका जास्त तो बायबलचा अभ्यास करेल, तितकंच त्यावरचं त्याचं प्रेम वाढेल आणि त्यालाही स्तोत्रकर्त्यासारखं वाटेल. स्तोत्रकर्त्याने म्हटलं: “देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे; मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे.” (स्तो. ७३:२८) यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्याची मनापासून इच्छा असलेल्यांना त्याचा पवित्र आत्मा नक्कीच साहाय्य करेल.

प्रचार करण्याचं आणि बायबल अभ्यास चालवण्याचं नवीन लोकांना प्रशिक्षण द्या

७. येशूने शिष्यांना प्रचार करण्याचं प्रशिक्षण कसं दिलं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

येशूने आपल्या प्रेषितांना ज्या प्रकारे प्रशिक्षण दिलं त्यावरून आपण बरंच काही शिकू शकतो. येशू जेव्हा प्रचार करण्यासाठी जायचा तेव्हा तो त्यांनाही आपल्या सोबत घेऊन जायचा. यामुळे तो लोकांना कसं शिकवतो हे ते पाहू शकले. यासोबतच, येशूने त्यांना प्रचारकार्य करण्याविषयी काही विशिष्ट सूचनादेखील दिल्या. या सूचना आपल्याला मत्तयच्या १० व्या अध्यायात वाचायला मिळतात. [1] लोकांना सत्य कसं शिकवायचं हे प्रेषित अगदी कमी वेळातच येशूकडून शिकले. (मत्त. ११:१) आपणदेखील आपल्या बायबल विद्यार्थ्यांना चांगले प्रचारक बनण्यास मदत करू शकतो. यासाठी कोणत्या दोन गोष्टी केल्याने त्यांना मदत होईल हे आता आपण पाहू.

८, ९. (क) येशूने लोकांशी व्यक्तिगत रीत्या कसा संवाद साधला? (ख) येशूप्रमाणे लोकांशी संवाद साधण्यासाठी आपण नवीन प्रचारकांना कशी मदत करू शकतो?

लोकांसोबत संवाद साधा. येशू फक्त लोकसमुदायासोबतच बोलला नाही, तर त्याने अनेकांशी व्यक्तिगत रीत्यादेखील मैत्रीपूर्ण संवाद साधला. उदाहरणार्थ, सूखार शहराच्या जवळच असलेल्या एका विहिरीतून जेव्हा शोमरोनी स्त्री पाणी भरण्यासाठी आली, तेव्हा येशूने तिच्याशी अर्थपूर्ण संवाद साधला. (योहा. ४:५-३०) तसंच, जकातदार असलेल्या मत्तय लेवीशीदेखील येशू बोलला आणि आपला शिष्य बनण्याचं आमंत्रण त्याला दिलं. मत्तयाने येशूचं आमंत्रण स्वीकारलं. नंतर त्याने त्याला व त्याच्यासोबत इतरांना आपल्या घरी एका मोठ्या मेजवानीसाठी बोलावलं. त्याच्या घरी जमलेल्या अनेक लोकांसोबतही येशू बोलला.—मत्त. ९:९; लूक ५:२७-३९.

सुरवातीला नथनेल नासरेथमधील लोकांबद्दल नकारात्मक जरी बोलला असला, तरी येशूने मात्र त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण संवाद साधला. अशा मैत्रीपूर्ण संवादामुळे, नासरेथकर असलेल्या येशूबद्दल नथनेलाचा दृष्टिकोन बदलला. आणि येशूविषयी आणखी जाणून घेण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. (योहा. १:४६-५१) येशूच्या उदाहरणावरून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे, जर आपण लोकांशी मैत्रीपूर्ण आणि प्रेमळ रीत्या संवाद साधला, तर ते आपलं ऐकून घेण्याची जास्त शक्यता आहे. [2] आपण जर नवीन प्रचारकांना अशाच प्रकारे संवाद साधण्याचं प्रशिक्षण दिलं, तर त्यांनाही सेवाकार्यातून आणखी जास्त आनंद मिळवणं शक्य होईल.

१०-१२. (क) ज्यांनी सुवार्तेत आस्था दाखवली त्यांना येशूने कशी मदत केली? (ख) नवीन प्रचारकांना सेवाकार्यातील त्यांची कौशल्यं वाढवण्यास आपण कशी मदत करू शकतो?

१० जे ऐकून घेण्यासाठी तयार असतात त्यांना शिकवा. येशू खूप व्यस्त असायचा. पण, जेव्हा लोक त्याचं ऐकून घेण्यासाठी यायचे, तेव्हा तो वेळ काढून त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवायचा. उदाहरणार्थ, एक दिवस लोकांचा मोठा समुदाय येशूचं ऐकण्यासाठी किनाऱ्याजवळ एकत्र जमला. तेव्हा, येशू पेत्रासोबत एका नावेवर चढला आणि तिथून तो त्यांना शिकवू लागला. त्यानंतर त्याला पेत्रालादेखील एक गोष्ट शिकवायची होती. त्याने एक चमत्कार करून पेत्राला मोठ्या प्रमाणावर मासे धरण्यास मदत केली. मग तो पेत्राला म्हणाला: “येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” हे ऐकल्यानंतर पेत्र आणि त्याच्यासोबत असणाऱ्यांनी लगेच आपली नाव किनाऱ्याला लावली. आणि सर्व काही सोडून ते येशूचे अनुयायी झाले.—लूक ५:१-११.

११ न्यायसभेचा सदस्य असलेल्या निकदेम नावाच्या एका व्यक्तीला येशूकडून बरंच काही शिकून घेण्याची इच्छा होती. पण लोकांनी आपल्याला येशूसोबत बोलताना पाहिलं तर ते काय म्हणतील, याची त्याला भीती वाटत होती. म्हणून तो येशूला भेटायला रात्रीच्या वेळी आला. तो रात्री आला असला तरी येशूने त्याला परत पाठवलं नाही. याउलट त्याने त्याच्यासोबत वेळ घालवला आणि त्याला महत्त्वपूर्ण सत्यं समजावून सांगितली. (योहा. ३:१, २) इतरांसाठी वेळ काढून त्यांना सत्य शिकवण्यास आणि त्यांचा विश्वास वाढवण्यास येशू नेहमी तयार असायचा. त्याच प्रकारे, आपणही जेव्हा लोकांकडे वेळ असतो तेव्हा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच, बायबलमधील सत्य चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी आपला वेळ खर्च करण्याचीही आपली तयारी असली पाहिजे.

१२ नवीन प्रचारकांना आपल्यासोबत प्रचारकार्यात घेऊन गेल्यामुळे त्यांना आपली कौशल्यं वाढवण्यास नक्कीच मदत होऊ शकते. थोडीफार आस्था दाखवलेल्या व्यक्तीलादेखील आपण पुन्हा जाऊन भेटण्याची गरज आहे, हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. तसंच, आपण चालवत असलेल्या बायबल अभ्यासासाठी किंवा आपल्याला मिळालेल्या एखाद्या पुनर्भेटीसाठी आपण त्यांना सोबत घेऊन जाऊ शकतो. यामुळे, इतरांना कशा प्रकारे सत्य शिकवलं पाहिजे हे त्यांना पाहायला मिळेल. यासोबतच, यहोवाबद्दल इतरांना शिकवताना जो आनंद मिळतो तो त्यांनाही अनुभवायला मिळेल. आणि आस्थेवाईक लोकांची पुनर्भेट घेऊन त्यांच्यासोबत बायबल अभ्यास करण्याची त्यांची उत्सुकतादेखील वाढेल. तसंच, आस्थेवाईक लोक जर घरी भेटले नाहीत, तर निराश न होता धीर दाखवण्यासही ते शिकतील.—गलती. ५:२२; “ त्याने हार मानली नाही,” ही चौकट पाहा.

आपल्या बंधुभगिनींच्या सेवेसाठी झटण्यास नवीन लोकांना शिकवा

१३, १४. (क) बायबलच्या काळात इतरांना मदत करण्यासाठी जे झटले त्यांच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? (ख) तरुणांना आणि नवीन लोकांना बंधुभगिनींप्रती प्रेम दाखवण्यास शिकवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१३ यहोवाची अशी इच्छा आहे, की त्याच्या सर्व सेवकांनी एकमेकांप्रती खरं प्रेम दाखवलं पाहिजे आणि एकमेकांच्या सेवेसाठी झटलं पाहिजे. (लूक २२:२४-२७; १ पेत्र १:२२ वाचा.) बायबल सांगतं की इतरांना मदत करण्यासाठी येशूने आपलं सर्वस्व दिलं, अगदी आपला जीवही. (मत्त. २०:२८) दुर्कस हीदेखील “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर” होती. (प्रे. कृत्ये ९:३६, ३९) तसंच, मरीयेनेही रोममधील आपल्या बंधुभगिनींना मदत करण्यासाठी “फार श्रम” घेतले. (रोम. १६:६) आजदेखील बंधुभगिनींकरता चांगल्या गोष्टी करणं किती महत्त्वाचं आहे, हे आपण नवीन लोकांना कसं शिकवू शकतो?

नवीन लोकांना बंधुभगिनींप्रती खरं प्रेम दाखवण्यास शिकवा (परिच्छेद १३, १४ पाहा)

१४ आपण जेव्हा मंडळीतील वयोवृद्ध किंवा आजारी असलेल्यांना भेटायला जातो, तेव्हा आपण नवीन लोकांनाही आपल्यासोबत येण्यासाठी सांगू शकतो. पालक जेव्हा अशा बंधुभगिनींना भेटायला जातात, तेव्हा योग्य असल्यास त्यांनी आपल्या मुलांनाही सोबत नेलं पाहिजे. जेव्हा वृद्ध लोकांच्या घराची काही दुरुस्ती करायची असते किंवा मग त्यांना जेवण पुरवायचं असतं, तेव्हा मंडळीतील वडील नवीन लोकांना किंवा तरुणांना आपल्यासोबत नेऊ शकतात. बंधुभगिनी एकमेकांना मदत करण्यासाठी जी मेहनत घेतात ती पाहून तरुणांना आणि नवीन लोकांनाही तसंच करण्याचं उत्तेजन मिळतं. मंडळीतील एका वडिलांच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. ते जेव्हा-जेव्हा एका ग्रामीण भागात प्रचार करण्यासाठी जायचे, तेव्हा-तेव्हा नेहमी तिथल्या बंधुभगिनींना भेटून ते त्यांची विचारपूस करायचे. सहसा त्यांच्यासोबत प्रचारकार्यासाठी तिथं जाणाऱ्या एका तरुण बांधवाला या वडिलांच्या उदाहरणातून बरंच काही शिकायला मिळालं. आपणही आपल्या बंधुभगिनींची कशा प्रकारे मदत करू शकतो, याचा तोही विचार करू लागला.—रोम. १२:१०.

१५. मंडळीतील बांधवांच्या आध्यात्मिक प्रगतीकडे वडिलांनी लक्ष देणं का गरजेचं आहे?

१५ यहोवा देवाने मंडळीमध्ये शिकवण्याची जबाबदारी पुरुषांवर सोपवली आहे. त्यामुळे जेव्हा भाषण दिलं जातं तेव्हा ते प्रभावीपणे व चांगल्या रीतीने कसं दिलं जावं हे बांधवांनी शिकणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही मंडळीमध्ये वडील म्हणून सेवा करत असाल, तर कदाचित तुम्ही एखाद्या सेवा सेवकाला त्याचं भाषण तयार करण्यासाठी मदत करू शकता. जेव्हा सेवा सेवक त्याच्या भाषणाची तयारी करतो, तेव्हा तुम्ही त्याचं भाषण ऐकू शकता व त्यात कुठं सुधारणा करण्याची गरज आहे, हे तुम्ही त्याला शिकवू शकता.—नहे. ८:८. [3]

१६, १७. (क) तीमथ्याच्या आध्यात्मिक प्रगतीकडे पौलाने कसं लक्ष दिलं? (ख) पुढे जाऊन वडील म्हणून सेवा करण्यासाठी बांधवांना मंडळीतील वडील कशा प्रकारे प्रशिक्षित करू शकतात?

१६ आज मंडळीची काळजी घेण्यासाठी अधिकाधिक बांधवांची गरज आहे. त्यामुळे मंडळीत वडील म्हणून सेवा करण्यासाठी पात्र बनण्यास बांधवांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. पौलाने तीमथ्याला प्रशिक्षण दिलं आणि त्यानेही इतरांना प्रशिक्षित करावं असं उत्तेजन त्याला दिलं. पौल म्हणाला: “ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या, त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे.” (२ तीम २:१, २) प्रेषित व वडील म्हणून सेवा करणाऱ्या पौलाकडून तीमथ्याला बरंच काही शिकायला मिळालं. जसं की, प्रचारकार्यातील आपलं कौशल्य कसं वाढवावं आणि मंडळीतील इतरांना आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी कशी मदत करावी.—२ तीम. ३:१०-१२.

१७ तीमथ्याला चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करण्यासाठी पौलाने त्याच्यासोबत बराच वेळ घालवला. त्याला चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याकडे पौलाने लक्ष दिलं. (प्रे. कृत्ये १६:१-५) मंडळीतील वडीलदेखील पौलाच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. जेव्हा ते प्रचारकांना मेंढपाळ भेटी देण्यासाठी जातात, तेव्हा ते योग्यता प्राप्त असलेल्या सेवा सेवकाला आपल्यासोबत काही मेंढपाळ भेटींसाठी घेऊन जाऊ शकतात. यामुळे इतरांना कसं शिकवलं पाहिजे, त्यांच्याशी धीरानं व प्रेमळपणे कसं वागलं पाहिजे आणि कळपाची काळजी घेताना यहोवावर कसं अवलंबून राहिलं पाहिजे, हे सेवा सेवक मंडळीतील वडिलांकडून शिकतील.—१ पेत्र ५:२.

इतरांना प्रशिक्षण देणं महत्त्वाचं का आहे?

१८. यहोवाच्या सेवेकरता जास्तीत जास्त बांधवांना प्रशिक्षित करणं का गरजेचं आहे?

१८ या शेवटल्या काळात, संघटनेत येणाऱ्या नवीन लोकांना प्रचारकार्यात त्यांचं कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण देणं फार गरजेचं आहे. यासोबतच, मंडळीची काळजी घेण्यासाठी आणि जबाबदाऱ्या हाताळण्यासाठीही बांधवांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येक सेवकाला चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळावं अशी यहोवाची इच्छा आहे. आणि नवीन लोकांना प्रशिक्षण देण्याचा बहुमान यहोवाने आपल्याला दिला आहे. त्यामुळे येशू आणि पौलाप्रमाणेच आपणही इतरांना प्रशिक्षण देण्यास मेहनत घेतली पाहिजे. या जगाचा अंत येण्यापूर्वी, अजूनही बरंच प्रचारकार्य करणं बाकी आहे. त्यामुळे अधिकाधिक बांधवांना आपण प्रशिक्षित केलं पाहिजे.

१९. यहोवाची सेवा करण्याकरता तुम्ही इतरांना देत असलेलं प्रशिक्षण परिणामकारक ठरेल, याची तुम्ही खात्री का बाळगू शकता?

१९ हे खरं आहे की, प्रशिक्षण देण्याकरता बराच वेळ खर्च करावा लागतो आणि मेहनत घ्यावी लागते. पण आपण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो, की इतरांना उत्तम प्रकारे प्रशिक्षित करण्यास यहोवा आणि येशू आपल्याला नक्कीच साहाय्य करतील. आपण ज्या व्यक्तीला प्रशिक्षण देतो ती व्यक्ती जेव्हा मंडळीसाठी झटते व प्रचारकार्यात श्रम घेते, तेव्हा आपल्यालाही आनंद होतो. (१ तीम. ४:१०) यासोबतच आपण स्वतःदेखील आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी, ख्रिस्ती गुण विकसित करण्यासाठी आणि यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आणखी मजबूत करण्यासाठी मेहनत घेत राहिली पाहिजे.

^ [१] (परिच्छेद ७) उदाहरणार्थ, येशूने आपल्या शिष्यांना पुढील काही सूचना दिल्या: (१) राज्याची सुवार्ता घोषित करा, (२) आपल्या मूलभूत गरजांकरता यहोवावर निर्भर राहा, (३) लोकांसोबत वाद करण्याचं टाळा, (४) छळाचा सामना करताना यहोवावर भरवसा ठेवा, आणि (५) लोकांची भीती बाळगू नका.

^ [२] (परिच्छेद ९) परमेश्वर की सेवा स्कूल से फायदा उठाइए, या पुस्तकातील पृष्ठं ६२-६४ वर सेवाकार्यात लोकांशी संवाद साधण्याविषयी चांगले सल्ले दिले आहेत.

^ [३] (परिच्छेद १५) परमेश्वर की सेवा स्कूल से फायदा उठाइए, या पुस्तकातील पृष्ठं ५२-६१ वर, बांधव भाषणांची चांगल्या प्रकारे तयारी कशी करू शकतात, याविषयी मार्गदर्शन देण्यात आलं आहे.