व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

आपल्याजवळील मौल्यवान गोष्ट इतरांना देण्यामध्ये जो आनंद आहे, तो मी अनुभवला

आपल्याजवळील मौल्यवान गोष्ट इतरांना देण्यामध्ये जो आनंद आहे, तो मी अनुभवला

इतरांना देण्यासाठी माझ्याजवळ काहीतरी मौल्यवान आहे, या गोष्टीची जाणीव मला १२ वर्षांचा असतानाच झाली. तेव्हा झालेल्या एका संमेलनात एका बांधवाने मला विचारलं, “तुला प्रचार करायला आवडेल का?” मला तसा प्रचार करण्याचा कोणताही अनुभव नव्हता, पण तरी मी त्यांना “हो” म्हटलं. आम्ही प्रचारासाठी एका क्षेत्रात गेलो. तिथं त्यांनी मला काही पुस्तिका दिल्या आणि म्हटलं, “मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं प्रचारकार्य करतो आणि तू दुसऱ्या बाजूने कर.” मी थोडं घाबरत-घाबरतच रस्त्याच्या त्या बाजूला घरोघरचं प्रचारकार्य सुरू केलं. पण आश्चर्य म्हणजे लवकरच माझ्याजवळ असलेलं सगळं साहित्य संपलं. या गोष्टीचा मला फार आनंद झाला. यावरून मला लक्षात आलं की इतरांना देण्यासाठी माझ्याजवळ जी मौल्यवान गोष्ट आहे ती अनेकांना हवी होती.

माझा जन्म १९२३ साली इंग्लंडमध्ये झाला. केंटमधील चॅथम या शहरात मी लहानाचा मोठा झालो. त्या वेळी निराशेनं ग्रासलेल्या अशा लोकांमध्ये मी राहात होतो. जागतिक महायुद्धानंतर जगाची परिस्थिती चांगली होईल ही अनेकांची आशा फोल ठरली होती. शिवाय दुसऱ्यांना धर्मोपदेश करणारे चर्चचे पाळकही स्वतःचाच स्वार्थ पाहत होते. त्यामुळे माझे आईवडीलदेखील निराश झाले होते. साधारणतः नऊ वर्षांचा असताना, माझी आई मला घेऊन इंटरनॅशनल बायबल स्टूडंट्‌स असोसिएशनच्या हॉलवर जाऊ लागली. या बायबल स्टूडंट्‌सनी ‘यहोवाचे साक्षीदार’ हे नाव स्वीकारलं होतं. तिथली एक बहीण आम्हा मुलांना द हार्प ऑफ गॉड या पुस्तकातील धडे शिकवायची. मला त्या पुस्तकातील गोष्टी खूप आवडायच्या.

माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या बांधवांकडून मी शिकलो

माझ्या तारुण्यात मी लोकांना देवाच्या वचनातून मिळणारी आशा देण्याचा आनंद अनुभवला. तेव्हा मी सहसा एकटाच घरोघरी जाऊन प्रचारकार्य करायचो. पण इतरांसोबत प्रचारकार्य करण्याद्वारे देखील मी बरंच काही शिकलो. उदाहरणार्थ, एक दिवस मी आणि माझ्यासोबत आणखी एक बांधव सायकलवर दुसऱ्या ठिकाणी प्रचारासाठी जात होतो. तेव्हा रस्त्यावरून जाताना मला एक चर्चचा पाळक दिसला. त्याला पाहून मी लगेच म्हणालो, “हा शेरडांमधला आहे, मेंढरांमधला नाही.” तेव्हा त्या बांधवानं मला थांबायला सांगितलं. मग आम्ही एका मोठ्या लाकडी ओंडक्यावर बसलो. ते मला म्हणाला, “शेरडं कोण आणि मेंढरं कोण, याचा न्याय करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? आपण फक्त लोकांना सुवार्ता सांगूयात आणि न्याय करणं यहोवावर सोपवूयात.” खरंच, माझ्याकडे असलेली मौल्यवान गोष्ट इतरांना देण्यामध्ये जो आनंद आहे, त्याबद्दल त्या सुरुवातीच्या काळात मी बरंच काही शिकलो.—मत्त. २५:३१-३३; प्रे. कृत्ये २०:३५.

आणखी एका बांधवाने मला हे शिकवलं की इतरांना देण्यामध्ये जो आनंद आहे, तो मिळवण्यासाठी कधीकधी आपल्याला धीर दाखवण्याची गरज पडू शकते. एक दिवस त्या बांधवाने मला त्यांच्या घरी चहा-पाण्यासाठी बोलवलं. पण त्यांच्या पत्नीला यहोवाचे साक्षीदार आवडत नव्हते. ते बांधव प्रचारकार्यासाठी गेल्यामुळे त्यांच्या पत्नीला इतका राग आला होता, की आम्ही त्यांच्या घरी पोहचलो तेव्हा ती आमच्यावर चहाचे पुडे फेकून मारू लागली. पण तिच्यावर रागावण्याऐवजी त्या बांधवाने ते पुडे पुन्हा उचलून जागेवर ठेवले. काही वर्षांनंतर जेव्हा त्यांची पत्नी यहोवाची साक्षीदार झाली, तेव्हा आपल्या पत्नीप्रती दाखवलेल्या धीराचं त्यांना मोठं प्रतिफळ मिळालं.

इतरांना देवाच्या राज्याची आशा देण्याची माझी इच्छा वाढतच गेली, आणि मी व माझ्या आईने मार्च १९४० साली इंग्लंडमधील डोव्हर या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला. सप्टेंबर १९३९ मध्ये ब्रिटनने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं. त्या वेळी मी सोळा वर्षांचा होतो. जून १९४० मध्ये, युद्धामुळे मानसिक धक्का बसलेले हजारो सैनिक ट्रकमधून जाताना मी पाहिले. ते डंकर्क इथं झालेल्या युद्धातून बचावलेले सैनिक होते. आमच्या घरासमोरून जाणाऱ्या त्या सैनिकांच्या डोळ्यांमध्ये आशेचा कोणताही किरण दिसत नव्हता. त्यांची ही दयनीय अवस्था पाहून मला त्यांना देवाच्या राज्याची आशा देण्याची तळमळ लागली. त्याच वर्षी नंतर जर्मनीने ब्रिटनवर वारंवार बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात केली. दररोज रात्री जर्मन विमानांचा ताफा बॉम्बहल्ले करण्यासाठी आमच्या शहरावरून जाताना मी पाहायचो. बॉम्ब खाली पडत असताना एक मोठा आवाज यायचा आणि त्या आवाजाने अधिकच भीती वाटायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही त्या ठिकाणी जायचो, तेव्हा आम्हाला सर्वत्र उद्ध्वस्त झालेली घरं आणि परिसर दिसायचा. भविष्यासाठी देवाच्या राज्याव्यतिरिक्त आणखी कुठलीही आशा नाही, हे दिवसेंदिवस मला अधिकच प्रखरतेनं जाणवत गेलं.

मौल्यवान गोष्ट इतरांना देण्याच्या मार्गावर प्रवास सुरू करताना

तसं पाहायला गेलं तर, मी १९४१ मध्ये आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरुवात केली असं म्हणता येईल. त्या वेळी मी चॅथम शहरातील रॉयल डॉकयार्डमध्ये (जहाज बांधणीचं एक ठिकाण) शिकाऊ कामगार म्हणून काम करायचो. अनेक सुविधा आणि चांगला पगार असल्यामुळे ती एक आकर्षक नोकरी होती. यहोवाच्या साक्षीदारांना हे फार आधीच समजलं होतं, की खऱ्या ख्रिश्चनांनी कोणत्याही युद्धात सहभाग घेऊ नये. आणि १९४१ पर्यंत आम्हाला हेदेखील समजलं होतं, की खऱ्या ख्रिश्चनांनी अशा कुठल्याही क्षेत्रात काम करू नये जिथं युद्धात वापरली जाणारी सामग्री तयार केली जाते. (योहा. १८:३६) मी शिकाऊ कामगार म्हणून काम करत असलेल्या ठिकाणी युद्धासाठी पाणबुड्या तयार केल्या जात होत्या. त्यामुळे, ती नोकरी सोडण्याचा निर्णय मी घेतला आणि पूर्णवेळचं सेवाकार्य सुरू केलं. कोस्टवूडमधील सायरेनसेस्टर या अतिशय सुंदर व निसर्गरम्य ठिकाणी माझी पहिली नेमणूक झाली.

जेव्हा मी १८ वर्षांचा झालो तेव्हा नऊ महिन्यांसाठी मला जेलमध्ये राहावं लागलं. कारण माझ्या विश्वासामुळे मी लष्करी सेवा करण्यास नकार दिला होता. मला तो क्षण अजूनही आठवतो जेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि जेलचा दरवाजा बंद झाला. मी एकटा पडलो होतो. ते सर्व काही माझ्यासाठी खरंच फार भयानक होतं. पण लवकरच जेव्हा तिथले कैदी आणि रखवालदार, मी जेलमध्ये कसा आलो याबद्दल चौकशी करू लागले, तेव्हा मला माझ्या विश्वासाबद्दल त्यांना सांगण्याची संधी मिळाली.

जेलमधून माझी सुटका झाल्यानंतर मला लेनर्ड स्मिथ * यांच्यासोबत केंटमधील वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन प्रचार करण्यासाठी सांगण्यात आलं. १९४४ मध्ये दारूगोळ्याने भरलेली हजारो मानवरहित जेट विमानं केंटवर येऊन धडकू लागली. आम्ही ज्या क्षेत्रात होतो ते क्षेत्र त्या विमानांच्या मार्गात, म्हणजेच नाझी व्याप्त युरोप आणि लंडन शहराच्या मधल्या पट्ट्‌यात येत होतं. त्या मानवरहित विमानांना ‘डूडलबग्ज’ म्हटलं जायचं. जेव्हा विमानाच्या इंजिनचा आवाज बंद व्हायचा, तेव्हा काही वेळाने ते दारूगोळ्यानं भरलेली विमान खाली पडणार आणि त्याचा मोठा स्फोट होणार हे ठरलेलंच होतं. असा प्रकार आम्ही कित्येक वेळा अनुभवला होता. एक प्रकारे दहशत पसरवणारी आणि मोठा विध्वंस करणारी मोहीमच होती ती. त्या वेळी आम्ही पाच जण असलेल्या एका कुटुंबासोबत बायबल अभ्यास चालवायचो. विमानांच्या हल्ल्यात घर कोसळलंच तर त्यापासून बचाव व्हावा म्हणून, कधीकधी आम्ही एका मोठ्या लोखंडी टेबलाखाली बसून अभ्यास करायचो. त्या कुटुंबाने कालांतराने बाप्तिस्मा घेतला.

जगाच्या इतर भागात सुवार्ता घेऊन जाताना

आयर्लंडमधील माझ्या पायनियर सेवेच्या सुरुवातीच्या काळात एका अधिवेशनाची जाहिरात करताना

युद्ध संपल्यानंतर मी दोन वर्षं दक्षिण आयर्लंडमध्ये पायनियर सेवा केली. इंग्लंडपेक्षा आयर्लंड किती वेगळं आहे याची पुसटशीही कल्पना आम्हाला त्या वेळी नव्हती. “आम्ही मिशनरी आहोत,” हे आम्ही दारोदारी जाऊन सांगायचो आणि कुठं राहण्यासाठी जागा मिळते का ते पाहायचो. रस्त्यावरून जाताना लोकांना आम्ही मासिकं वाटायचो. एका कॅथलिक देशात जाऊन या गोष्टी करणं नक्कीच शहाणपणाचं नव्हतं. एकदा प्रचारात एक माणूस आम्हाला धमकी देऊ लागला आणि जोरजबरदस्ती करू लागला. म्हणून मग आम्ही पोलिसांकडे तक्रार करायला गेलो, तर “तुम्हाला काय वाटतं त्यानं आणखी काय करायला हवं?” असं म्हणून त्यांनी आम्हालाच उलटं सुनावलं. तिथल्या लोकांवर कॅथलिक पाळकांचा किती मोठा पगडा आहे हे आम्हाला जाणवलं. आम्ही देत असलेली पुस्तकं ज्यांनी-ज्यांनी घेतली त्यांना कामावरून काढून टाकण्यास या कॅथलिक पाळकांनी त्यांच्या मालकांना सांगितलं, आणि आम्ही जिथं राहायचो ते घरदेखील आम्हाला त्यांच्यामुळे सोडावं लागायचं.

त्यामुळे ज्या क्षेत्रात आम्ही राहायला जायचो तिथून दूरच्या क्षेत्रात जाऊन प्रचार करणंच जास्त योग्य ठरेल, हे आम्ही लवकरच शिकलो. कारण तिथल्या लोकांचा पाळक हा वेगळा असायचा. आणि त्यांना आमची माहिती नसल्यामुळे प्रचार करणं थोडं सोपं जायचं. मग सर्वात शेवटी आम्ही जिथं राहायचो त्या क्षेत्रात प्रचार करायचो. किलकेनी या ठिकाणी आम्ही हिंसक जमावाचा विरोध आणि त्यांच्या धमक्यांना तोंड देत असतानादेखील, एका तरुणासोबत आठवड्यातून तीन वेळा बायबल अभ्यास चालवला. इतरांना बायबलमधील सत्य शिकवण्यात मला खूप आनंद मिळायचा. त्यामुळे मी वॉचटॉवर बायबल स्कूल ऑफ गिलीअडमध्ये मिशनरी ट्रेनिंगसाठी अर्ज केला.

१९४८ ते १९५३ दरम्यान सीबिया नावाचं शिडाचं जहाज हेच आम्हा मिशनरींच घर होतं

न्यूयॉर्कमधील या पाच महिन्यांच्या प्रशालेनंतर, माझ्यासोबत आणखी तीन बांधवांना कॅरिबियन समुद्रातील लहान बेटांवर मिशनरी म्हणून नियुक्त करण्यात आलं. १९४८ सालच्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही न्यूयॉर्क शहर सोडलं, आणि ५९ फूट लांबीच्या ‘सीबिया’ नावाच्या एका छोट्या शिडाच्या जहाजावरून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. यापूर्वी मी कधीही जहाज चालवण्याचा अनुभव घेतला नव्हता, त्यामुळे मी खूप उत्साही होतो. आमच्यापैकी एक बांधव, गस्ट माके हा अनुभवी नाविक होता. त्याने आम्हाला जहाज चालवण्याची काही मूलभूत कौशल्यं शिकवली. जसं की जहाजाचं शीड खाली किंवा वर घेणं, दिशा दाखवणारं यंत्र वापरणं, आणि वाऱ्याची दिशा पाहून परिस्थिती हाताळणं वगैरे. ३० दिवस भयानक वादळांना तोंड देत व त्यातून मार्ग काढत गस्ट माके या बांधवाने मोठ्या कौशल्यानं आमचं जहाज बहामाच्या बेटांवर पोहचवले.

बेटांवर सुवार्ता सांगताना

बहामाच्या लहान-लहान बेटांवर काही महिने प्रचार केल्यानंतर, आम्ही लीवर्ड आणि विंडवर्ड या बेटांकडे वळालो. ही बेटं प्वेर्टोरिकोजवळील व्हर्जिन नावाच्या बेटांपासून ते त्रिनिदादपर्यंत जवळजवळ ८०० किलोमीटरच्या क्षेत्रात पसरली आहेत. पाच वर्षं आम्ही मुख्यतः अशा दुर्गम भागातील बेटांवर प्रचारकार्य केलं, जिथं एकही यहोवाचा साक्षीदार नव्हता. कधीकधी कित्येक आठवडे असे निघून जायचे जेव्हा आम्हाला कोणालाही पत्र पाठवता येत नव्हतं, की कोणाचंही पत्र आम्हाला मिळू शकत नव्हतं. पण तरीही त्या बेटांवरील लोकांना यहोवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्यात आम्हाला खूप आनंद मिळायचा.—यिर्म. ३१:१०.

सीबिया या जहाजावरील आम्ही मिशनरी नावीक (डावीकडून): रॉन पारकिन, डिक रीड, गस्ट माके आणि स्टॅनली कारटर

जेव्हा आम्ही एखाद्या किनाऱ्यावर पोहचायचो, तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांमध्ये एक प्रकारची उत्सुकता निर्माण व्हायची. छोट्या जहाजांसाठी समुद्रात बांधलेल्या लहान बंदरावर, तिथले स्थानिक लोक आम्हाला पाहायला जमा व्हायचे. त्यांच्यापैकी काहींनी कधीही शिडाचं जहाज किंवा आमच्या सारखी परदेशातून आलेली माणसं पाहिली नव्हती. तिथं राहणारी माणसं प्रेमळ व धार्मिक वृत्तीची होती आणि त्यांना बायबलबद्दल बरीच माहिती होती. सहसा ते आम्हाला ताजे मासे, अॅवाकॅडो (एक प्रकारचं फळ) आणि शेंगदाणे द्यायचे. झोपण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी तशी आमच्या जहाजात आधीच फार कमी जागा होती, तरीही आम्ही परिस्थितीशी व्यवस्थित जुळवून घेतलं.

आम्ही जहाजामधून बेटाच्या किनाऱ्याने पुढे जात संपूर्ण दिवस लोकांना प्रचार करायचो. आणि त्यांना बायबलवर आधारित भाषणासाठी आमंत्रण द्यायचो. मग संध्याकाळी भाषणाची वेळ झाल्याचा इशारा देण्यासाठी आम्ही जहाजावरील घंटा वाजवायचो. अंधार पडत असताना डोंगरमाथ्यावरून कंदिलाच्या प्रकाशात खाली येणाऱ्या गावकऱ्यांचं ते चित्र विलक्षण भासायचं. ते जणू लुकलुकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणेच दिसायचे. गावकऱ्यांना येताना पाहून आम्हाला आनंद व्हायचा. कधीकधी तर शंभरएक गावकरी जमा व्हायचे आणि रात्री उशिरापर्यंत बायबलवर चर्चा करत थांबायचे. त्यांना गीतं गायला फार आवडायचं, म्हणून मग आम्ही टाइपराइटरवर त्यांच्यासाठी काही राज्य गीतं छापली आणि त्यांना दिली. जेव्हा आम्ही चौघा बांधवांनी ती गीतं गायली, तेव्हा आमच्या सुरात सूर मिळवून त्या लोकांनीही ती गीतं गायली. ज्या उत्तम प्रकारे ते गात होते, ते पाहण्यासारखं होतं. खरंच किती सुखद क्षण होते ते!

कधीकधी आम्ही एका घरी बायबल अभ्यास घेतल्यानंतर, तिथले काही बायबल विद्यार्थी आमच्यासोबत चालत-चालत दुसऱ्या घरी यायचे. आणि तिथं बायबल अभ्यास करत असलेल्या कुटुंबासोबत पुन्हा बायबल अभ्यासासाठी बसायचे. एका क्षेत्रात काही आठवडे राहिल्यानंतर आम्ही दुसऱ्या क्षेत्रात जायचो. पण जाण्याआधी आम्ही अशा लोकांना प्रोत्साहन द्यायचो जे बायबल सत्यामध्ये जास्त आस्था दाखवायचे. आम्ही परत त्या ठिकाणी येईपर्यंत त्यांनी इतरांसोबत बायबल अभ्यास करत राहावा, असं आम्ही त्यांना सांगायचो. त्यांच्यापैकी काहींनी हे काम खूप गंभीरतेनं घेतलं. हे पाहून आम्हाला फार आनंद झाला.

आज या बेटांवर ठिकठिकाणी हॉटेल्स आणि पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. पण त्या काळी ही बेटं अगदी शांत आणि एकांत अशी ठिकाणं होती. तिथं फक्त निळीशार लगून्स, (समुद्र किनारी असणारे खाऱ्या किंवा गोड पाण्याचे तलाव) सुंदर समुद्र किनारे आणि हिरवीगार झाडं होती. एका बेटावरून दुसऱ्या बेटावर आम्ही सहसा रात्रीचा प्रवास करायचो. पाणी कापत जहाज पुढं जाण्याचा तो मंजूळ आवाज. समुद्रातील डॉल्फिन्सची आमच्या जहाजासोबत चाललेली स्पर्धा आणि चंद्रप्रकाशात क्षितिजाकडे नेणारा तो चंदेरी जलमार्ग. अतिशय विलक्षण प्रवास असायचा तो!

या बेटांवर पाच वर्षं प्रचारकार्य केल्यानंतर, आमचं शिडाचं जहाज विकून इंजिन असलेलं जहाज घेण्यासाठी आम्ही प्वेर्टोरिकोला गेलो. तिथं पोहचल्यावर मी माकसेन बॉइड या एका सुंदर मिशनरी तरुणीला भेटलो आणि तिच्या प्रेमात पडलो. लहानपणापासूनच ती एक अतिशय आवेशी प्रचारक होती. डोमिनिकन रिपब्लीकमध्ये तिने मिशनरी म्हणून सेवा केली होती. परंतु १९५० मध्ये तिथल्या कॅथलिक सरकारने तिला देशातून हद्दपार केलं होतं. एक नाविक म्हणून मला प्वेर्टोरिकोमध्ये फक्त एकच महिना राहण्याची परवानगी होती. लवकरच मला पुन्हा त्या बेटांवर जावं लागणार होतं आणि काही वर्षं तिथंच राहावं लागणार होतं. म्हणून मी स्वतःला म्हटलं, “रोनाल्ड, तुला जर ही मुलगी तुझी जीवनसाथी म्हणून हवी असेल, तर लगेच पावलं उचलली पाहिजेत आणि तिला विचारलं पाहिजे.” मग तीन आठवड्यांनंतर मी तिला लग्नाची मागणी घातली, आणि सहा आठवड्यांनंतर आमचं लग्न झालं. त्यानंतर माकसेन आणि मला प्वेर्टोरिकोमध्ये मिशनरी म्हणून नेमण्यात आलं. त्यामुळे मी त्या नवीन जहाजावर कधी गेलोच नाही.

१९५६ मध्ये मी विभागीय पर्यवेक्षक या नात्यानं सेवा करू लागलो. मी व माझी पत्नी आमच्या विभागातील वेगवेगळ्या मंडळ्यांना भेट द्यायचो. तिथल्या बंधुभगिनींना भेटून आम्हाला खूप आनंद व्हायचा. तसं पाहायला गेलं तर त्या विभागातील अनेक बंधुभगिनी खूप गरीब होते. उदाहरणार्थ, पोटला आणि पास्टिलो या खेड्यांत दोन साक्षीदार कुटुंबं राहायची आणि त्यांना बरीच मुलं होती. कधीकधी मी कुटुंबातील मुलामुलींसाठी बासरी वाजवायचो. त्यातील एका लहान मुलीला, हिलडाला मी एकदा विचारलं, “तुला आमच्यासोबत प्रचाराला यायला आवडेल का?” ती मला म्हणाली, “मला आवडेल, पण मला येता येणार नाही. कारण माझ्याजवळ पायात घालायला काहीही नाही.” आम्ही मग तिच्यासाठी बुटांचा एक जोड घेतला. त्यानंतर ती आमच्यासोबत प्रचाराला येऊ शकली. काही वर्षांनंतर, म्हणजे १९७२ मध्ये जेव्हा माकसेन आणि मी ब्रुकलिन बेथेलला भेट देण्यासाठी गेलो, तेव्हा गिलियड प्रशालेतून पदवीधर झालेली एक बहीण आम्हाला भेटायला आली. ती लवकरच मिशनरी म्हणून इक्वाडोर या देशात जाणार होती. ती आमच्याकडे आली आणि म्हणाली, “मला तुम्ही ओळखलं नाही वाटतं. पास्टिलोमधली मी तीच लहान मुलगी आहे जिला प्रचारासाठी तुम्ही बुटांचा एक जोड आणला होता.” तेव्हा ती हिलडा आहे हे आमच्या लक्षात आलं. तिला भेटून आम्ही इतके आनंदी झालो की आमचे आनंदाश्रू आम्हाला आवरत नव्हते.

१९६० मध्ये आम्हाला प्वेर्टोरिकोच्या शाखा कार्यालयात सेवेसाठी पाठवण्यात आलं. हे शाखा कार्यालय सँटर्स, सॅन वॅन या ठिकाणी एका दोन माळ्याच्या छोट्याशा घरात होतं. सुरुवातीला मी आणि बंधू लेनार्ट जॉनसन तिथलं जवळजवळ सगळं काम पाहायचो. लेनार्ट आणि त्यांची पत्नी, डोमिनिकन रिपब्लीकमधील सर्वात पहिले यहोवाचे साक्षीदार होते. आणि ते १९५७ मध्ये प्वेर्टोरिकोला आले होते. मासिकांसाठी ज्या वर्गण्या यायच्या त्याचं काम माझी पत्नी माकसेन पाहायची. एका आठवड्यात हजारपेक्षा जास्त वर्गण्या यायच्या. तिला हे काम फार आवडायचं, कारण ती नेहमी त्या वर्गणीदारांचा विचार करायची ज्यांना या मासिकांद्वारे आध्यात्मिक अन्न मिळत होतं.

मला बेथेलमध्ये सेवा करणं आवडतं. कारण याद्वारेही माझ्याकडे असलेली मौल्यवान गोष्ट मी इतरांना देऊ शकतो. पण या बेथेल सेवेचीदेखील स्वतःची अशी काही आव्हानं आहेत. एक उदाहरण घ्या, १९६७ साली प्वेर्टोरिकोमध्ये पहिलं आंतरराष्ट्रीय संमेलन झालं. माझ्यावर बऱ्याच गोष्टींच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे मी थोडा तणावाखाली होतो. त्या वेळी बंधू नेथन नॉर यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याचं नेतृत्व करत होते, आणि ते प्वेर्टोरिकोमध्ये आले होते. संमेलनात येणाऱ्या मिशनरींना नेण्या-आणण्याच्या व्यवस्थेची जबाबदारी माझ्यावर होती. आणि मी व्यवस्था चोख राहील याकडे पूर्ण लक्ष दिलं होतं. पण काही गैरसमजांमुळे बंधू नेथन नॉर यांना वाटलं की मी या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे नंतर त्यांनी मला, व्यवस्था का व कशी नीट ठेवावी याबद्दल कडक शब्दांत सल्ला दिला. माझ्या कामावरून ते किती निराश झाले हेदेखील त्यांनी मला सांगितलं. मी व्यवस्था बरोबर केली आहे, आणि त्यांना गैरसमज झाला आहे, हे मी त्यांना सांगितलं नाही. कारण मला त्यांच्यासोबत वाद घालायचा नव्हता. पण परिस्थिती व्यवस्थित हाताळली गेली नाही असं मला वाटलं आणि काही काळासाठी मी निराश झालो. पण पुढच्या वेळी जेव्हा मी आणि माझी पत्नी पुन्हा बंधू नॉरला भेटलो, तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांच्या खोलीमध्ये बोलावलं आणि स्वतः आमच्यासाठी जेवण बनवलं.

प्वेर्टोरिकोमधून आम्ही बऱ्याच वेळा माझ्या कुटुंबाला भेट देण्यासाठी इंग्लंडला जायचो. माझ्या आईने आणि मी सत्य स्वीकारलं होतं, त्या वेळी मात्र माझे वडील या गोष्टीपासून दूर राहिले होते. माझी आई नेहमी बेथेलमधून भाषण देण्यासाठी येणाऱ्या बांधवांना घरी राहण्यासाठी बोलवायची. त्या वेळी चर्चच्या पाळकांपेक्षा यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पुढाकार घेणारे बांधव किती वेगळे व नम्र आहेत हे माझ्या वडिलांना पाहायला मिळालं. बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या वडिलांची चर्चच्या पाळकांकडून खूप निराशा झाली होती. शेवटी १९६२ मध्ये माझ्या वडिलांचा बाप्तिस्मा झाला, आणि तेदेखील एक यहोवाचे साक्षीदार बनले.

लग्न झाल्यानंतर प्वेर्टोरिकोमध्ये मी व माझी पत्नी माकसेन; आणि २००३ मध्ये जेव्हा आमच्या लग्नाला ५० वर्षं पूर्ण झाली तेव्हा

२०११ मध्ये माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. नवीन जगात पुनरुत्थान झाल्यानंतर मी तिला पुन्हा भेटेन त्या वेळेची मी फार आतुरतेनं वाट पाहात आहे. खरंच किती चांगला काळ असेल तो! माझी पत्नी आणि मी ५८ वर्षं सोबत होतो. आणि या वर्षांदरम्यान प्वेर्टोरिकोमधील यहोवाच्या साक्षीदारांची संख्या ६५० पासून २६,००० पर्यंत गेलेली आम्ही पाहिली. त्यानंतर, म्हणजे २०१३ मध्ये प्वेर्टोरिकोतील शाखा कार्यालय युनायटेड स्टेट्‌समधील शाखा कार्यालयाशी जोडण्यात आलं. आणि मला वॉलकिल बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी पाठवलं गेलं. ६० वर्षं मी प्वेर्टोरिकोतील वेगवेगळ्या बेटांवर सेवा केली. हा काळ फार मोठा असल्यामुळे मीदेखील तिथलाच एक स्थानिक रहिवासी असल्यासारखं मला वाटतं. पण जीवनात आता पुढं जाण्याची वेळ होती.

संतोषाने देणारा यहोवाला प्रिय आहे

आता मी ९० वर्षांचा आहे आणि आजही बेथेलमध्ये आनंदानं सेवा करत आहे. बेथेलमधील बंधुभगिनींना आध्यात्मिक मदत पुरवणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे माझं काम आहे. वॉलकिल बेथेलमध्ये सेवा करण्यास सुरुवात केल्यापासून मी ६०० पेक्षा जास्त बंधुभगिनींना आध्यात्मिक रीत्या मदत केली आहे, असं मला नुकतंच सांगण्यात आलं. जे बंधुभगिनी मला भेटायला येतात, त्यांच्यापैकी काहींना त्यांच्या वैयक्तिक जीवनात येणाऱ्या समस्यांवर सल्ला हवा असतो किंवा त्यांच्या कुटुंबातील काही समस्या कशा सोडवाव्यात याबद्दल त्यांना बायबलवर आधारित मार्गदर्शन हवं असतं. काही जण बेथेलमधील त्यांची सेवा आनंदाने कशी सुरू ठेवता येईल याबद्दल विचारतात. तर काही जण, ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे ते वैवाहिक जीवन यशस्वी कसं करता येईल याबद्दल सल्ला मागतात. या बंधुभगिनींपैकी काहींना पुन्हा क्षेत्रात पाठवण्यात आलं आहे. मी या सर्वांचं लक्षपूर्वक ऐकून घेतो, आणि जेव्हा योग्य असेल तेव्हा सहसा त्यांना सांगतो, “‘संतोषाने देणारा देवाला प्रिय’ आहे. म्हणून जे काम तुम्ही करत आहात ते आनंदानं करा. कारण ते यहोवासाठी आहे.”—२ करिंथ. ९:७.

सेवेतील इतर क्षेत्रांमध्ये आपला आनंद टिकवून ठेवणं हे एक आव्हान आहे. आणि हीच गोष्ट बेथेल सेवेबाबत देखील खरी आहे. त्यामुळे तुम्ही जे करत आहात ते इतकं महत्त्वाचं का आहे यावर लक्ष लावणं गरजेचं आहे. बेथेलमध्ये आपण कोणतंही काम करत असलो, तरी ती एक पवित्र सेवा आहे. याद्वारे आपण “विश्वासू व बुद्धिमान दासाला” जगभरातील बांधवांना आध्यात्मिक अन्न पुरवता यावं यासाठी मदत करत असतो. (मत्त. २४:४५) पण आपण बेथेलमध्ये किंवा क्षेत्रामध्ये जिथं-कुठं यहोवाची सेवा करत असू, आपल्याला त्याच्या नावाला महिमा देण्याची संधी मिळते. यहोवाने आपल्यावर सोपवलेली सेवा आपण आनंदानं करत राहू, कारण “संतोषाने देणारा” यहोवाला प्रिय आहे.

^ परि. 13 लेनर्ड स्मिथ यांची जीवन कथा १५ एप्रिल २०१२ च्या टेहळणी बुरूज अंकात देण्यात आली आहे.