विवाह—याची सुरवात आणि उद्देश
“परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करेन.”—उत्प. २:१८.
१, २. (क) विवाहाची सुरवात कशी झाली? (ख) पहिल्या स्त्री-पुरुषाला विवाहाबद्दल कोणत्या गोष्टीची जाणीव झाली असेल? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
विवाह हा जीवनाचा एक भाग आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की विवाहाची सुरवात कशी झाली आणि त्यामागचा उद्देश काय होता? या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेतली तर आपल्याला विवाहाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्यास मदत होईल. आणि यामुळे विवाहातून मिळणारा आनंद आपण आणखी चांगल्या प्रकारे अनुभवू शकू. पहिला पुरुष, आदाम याची निर्मिती यहोवा देवाने केली आणि त्याच्यावर सर्व प्राण्यांना नावं देण्याची जबाबदारी सोपवली. प्रत्येक प्राण्याला एक जोडीदार होता, पण आदामाला “कोणी अनुरूप साहाय्यक” नव्हता. म्हणून मग देवाने आदामाला गाढ झोप आणली आणि आदामाची फासळी काढून त्याची एक स्त्री बनवली. मग यहोवा देवाने त्या स्त्रीला आदामाकडे आणलं आणि ती त्याची पत्नी बनली. (उत्पत्ति २:२०-२४ वाचा.) या अहवालावरून आपल्याला कळतं की विवाह ही यहोवाने मानवजातीला दिलेली एक प्रेमळ भेट आहे.
२ यहोवाने एदेन बागेत जे म्हटलं होतं, त्याची आठवण बऱ्याच वर्षांनंतर येशूने पुन्हा करून दिली. त्याने म्हटलं: “पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.” (मत्त. १९:४, ५) देवाने आदामाच्या फासळीतून पहिल्या स्त्रीची निर्मिती केली. यामुळे आपल्यात किती जवळीक आहे याची जाणीव आदाम आणि हव्वेला झाली असेल. पती-पत्नीने घटस्फोट घ्यावा किंवा विवाह जोडीदार असतानादेखील दुसरा विवाह करावा अशी यहोवाची मुळीच इच्छा नव्हती.
विवाह यहोवाच्या उद्देशाचा एक भाग आहे
३. विवाहाचा एक महत्त्वाचा उद्देश काय होता?
३ आपल्या पत्नीला पाहून आदामाला खूप आनंद झाला आणि त्याने तिचं नाव ‘हव्वा’ ठेवलं. ती आदामाला एक साहाय्यक आणि पूरक ठरणार होती. पती-पत्नी या नात्यानं आदाम आणि हव्वा आनंदाने जीवन जगणार होते. (उत्प. २:१८) संपूर्ण पृथ्वी मानवजातीने व्यापून टाकली जावी हा विवाहामागचा एक महत्त्वपूर्ण उद्देश होता. (उत्प. १:२८) मुलामुलींचं आपल्या आईवडिलांवर असलेलं प्रेम कायम राहणार होतं. पण कालांतरानं ते त्यांच्यापासून वेगळे होऊन लग्न करणार होते आणि स्वतःचं एक वेगळं कुटुंब बनवणार होते. अशा प्रकारे मग मानवजात संपूर्ण पृथ्वीवर पसरली असती आणि पृथ्वी एक नंदनवन बनली असती.
४. पहिल्या विवाहाबाबतीत काय झालं?
४ पण जेव्हा आदाम आणि हव्वेने यहोवाची आज्ञा मोडली तेव्हा त्यांच्या विवाहाचा उद्देश सफल झाला नाही. “जुनाट साप,” सैतान याने हव्वेला बहकवलं. त्याने तिला सांगितलं की “बऱ्यावाइटाचे ज्ञान करून” देणाऱ्या झाडाचं फळ जर तिने खाल्लं, तर तिला विशेष ज्ञान प्राप्त होईल. सैतानाने दावा केला की ते फळ खाल्ल्याने योग्य काय आणि अयोग्य काय हे ती स्वतःच ठरवू शकेल. खरंतर फळ खाण्याआधी हव्वेने याबद्दल आदामाला विचारायला हवं होतं, पण तिने तसं केलं नाही आणि आपल्या मस्तकपदाचा अनादर केला. आदामानेदेखील ते फळ खाल्लं आणि देवाची आज्ञा मोडली.—प्रकटी. १२:९; उत्प. २:९, १६, १७; ३:१-६.
५. आदाम आणि हव्वेने यहोवाला जी उत्तरं दिली त्यातून आपण काय शिकू शकतो?
५ यहोवाने जेव्हा आदामाला जाब विचारला, तेव्हा आदामाने त्यासाठी हव्वेला दोषी ठरवलं. तो म्हणाला: “जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.” आणि हव्वेनेदेखील आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल सर्पाला दोषी ठरवलं. (उत्प. ३:१२, १३) यहोवाची आज्ञा आपण का मोडली यासाठी आदाम आणि हव्वा या दोघांनी फाजील कारणं दिली. मग यहोवाने त्या बंडखोरांना न्यायदंड सुनावला. त्यांच्या उदाहरणातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. तो म्हणजे, आपला विवाह यशस्वी करण्यासाठी पती-पत्नीने यहोवाच्या आज्ञेत राहणं आणि आपल्या कृत्यांसाठी स्वतः जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे.
६. उत्पत्ति ३:१५ मधील भविष्यवाणी समजावून सांगा.
६ एदेन बागेत सैतानाने यहोवाच्या उद्देशात खंड आणण्याचा प्रयत्न केला, पण यहोवाने मात्र मानवजातीला भविष्यासाठी एक आशा दिली. या आशेबद्दल आपल्याला बायबलमधील पहिल्या भविष्यवाणीत वाचायला मिळतं. (उत्पत्ति ३:१५ वाचा.) या भविष्यवाणीत सांगण्यात आलं होतं की स्त्रीची “संतती” सैतानाला नष्ट करेल. ही स्त्री, स्वर्गात यहोवाची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या आत्मिक प्राण्यांना सूचित करते. त्यांचं यहोवासोबत खूप जवळचं नातं आहे. एका अर्थी ते यहोवाला आपल्या पत्नीसारखे आहेत. सैतानाला नष्ट करण्यासाठी यहोवा या आत्मिक प्राण्यांपैकी एकाला पाठवणार होता. आदाम आणि हव्वेने जे गमावलं ते स्त्रीच्या या संततीमुळे यहोवाला विश्वासू राहणाऱ्या लोकांना अनुभवायला मिळणार होतं. त्यांना या पृथ्वीवर अनंतकाळापर्यंत जीवन जगणं शक्य होणार होतं. सुरवातीपासून यहोवाचा हाच उद्देश होता.—योहा. ३:१६.
७. (क) आदाम आणि हव्वेने केलेल्या बंडाचा विवाहावर कसा परिणाम झाला आहे? (ख) यहोवा पती-पत्नीकडून काय अपेक्षा करतो?
७ एदेन बागेत आदाम आणि हव्वेने बंड केल्यामुळे फक्त त्यांच्याच नाही, तर त्यानंतरच्या सर्वच विवाहांवर याचा विपरीत परिणाम झाला. उदाहरणार्थ, हव्वा आणि इतर सर्व स्त्रियांना प्रसववेदना सहन कराव्या लागणार होत्या. स्त्रीची ओढ नेहमी आपल्या पतीकडे राहणार होती, पण तो मात्र तिच्यावर वर्चस्व गाजवणार होता. इतकंच नाही तर आज जगात पाहायला मिळतं त्याप्रमाणे काही जण आपल्या पत्नीचा छळसुद्धा करणार होते. (उत्प. ३:१६) परंतु यहोवा पतींकडून अपेक्षा करतो की त्यांनी मस्तकपदाची जबाबदारी प्रेमळपणे पार पाडावी. आणि तो पत्नींकडूनही अशी अपेक्षा करतो की त्यांनी आपआपल्या पतीच्या अधीन राहावं. (इफिस. ५:३३) ख्रिस्ती पती-पत्नी जेव्हा एकमेकांसोबत मिळून काम करतात, तेव्हा वैवाहिक जीवनातील बऱ्याच समस्या ते टाळू शकतात.
आदामापासून जलप्रलयापर्यंतचे विवाह
८. आदाम ते जलप्रलय या काळातील विवाहांबद्दल काय म्हणता येईल?
८ आदाम आणि हव्वेचा मृत्यू होण्याआधी त्यांना मुलं झाली. (उत्प. ५:४) त्यांचा पहिला मुलगा काईन याने आपल्या नात्यातल्या एका मुलीशी लग्न केलं. काईनाचा वंशज लामेख हा बायबलमध्ये उल्लेख करण्यात आलेला असा पहिला पुरुष आहे, ज्याने दोन विवाह केले. (उत्प. ४:१७, १९) आदामापासून नोहापर्यंत असे फार कमी लोक होते जे यहोवाची उपासना करायचे. त्या विश्वासू सेवकांपैकी काही सेवक म्हणजे हाबेल, हनोख, नोहा आणि त्याचं कुटुंब. बायबल आपल्याला सांगतं की नोहाच्या काळात “मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.” पण हा विवाह अनैसर्गिक असल्यामुळे त्यांना झालेली मुलं महाकाय आणि क्रूर होती. त्यांना बायबलमध्ये नेफिलीम असं म्हटलं आहे. त्या काळात “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार” वाढली होती आणि “त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट” होत्या.—उत्प. ६:१-५.
९. नोहाच्या काळातील दुष्ट लोकांचं यहोवाने काय केलं, आणि त्या काळातील लोकांच्या वृत्तीपासून आपण कोणता धडा घेतला पाहिजे?
९ यहोवाने भाकीत केलं की तो एक मोठा जलप्रलय आणून पृथ्वीवरील सर्व दुष्ट लोकांचा नाश करेल. “नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा” याने हा संदेश लोकांना जाऊन सांगितला. (२ पेत्र २:५) पण त्यांनी नोहाचं ऐकलं नाही. ते सर्व रोजच्या जीवनातील गोष्टींमध्ये, ज्यात लग्नाचाही समावेश होतो, व्यस्त होते. येशूने आपल्या काळाची तुलना नोहाच्या काळाशी केली. (मत्तय २४:३७-३९ वाचा.) या दुष्ट जगाचा नाश होण्याआधी आपण सर्वांना जाऊन देवाच्या राज्याबद्दल प्रचार करत आहोत. पण असं करत असताना बरेच लोक आपलं ऐकून घेत नाहीत. नोहाच्या काळातील लोकांप्रमाणे आपणही आपल्या जीवनात लग्न करण्याला आणि मुलं असण्याच्या इच्छेला इतकं जास्त महत्त्व देऊ नये, की देवाचा दिवस जवळ आला आहे याचं भानच आपल्याला राहणार नाही.
जलप्रलयापासून येशूच्या काळापर्यंतचे विवाह
१०. (क) बऱ्याच संस्कृतींमध्ये कोणत्या गोष्टी सर्वसामान्य झाल्या होत्या? (ख) वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अब्राहाम आणि सारा यांनी उत्तम उदाहरण कसं मांडलं?
१० नोहा आणि त्याच्या तिन्ही मुलांनी फक्त एकच विवाह केला होता. पण जलप्रलयानंतर, बऱ्याच पुरुषांनी एकापेक्षा जास्त विवाह केले. त्या काळातील बऱ्याच संस्कृतींमध्ये विवाहाबाहेर शारीरिक संबंध ठेवणं अगदी सामान्य होतं. इतकंच नाही तर असं करणं त्यांच्या धार्मिक प्रथांचा भागदेखील होता. अब्राहाम आणि सारा जेव्हा कनान देशात गेले, तेव्हा ते अशा लोकांमध्ये राहत होते जे खूप अनैतिकतेनं वागायचे. आणि त्या लोकांना विवाह व्यवस्थेचा मुळीच आदर नव्हता. सदोम आणि गमोरा या शहरांचा यहोवाने याच कारणांमुळे नाश केला. पण अब्राहाम मात्र त्या लोकांपेक्षा खूप वेगळा होता. त्याने कुटुंबप्रमुखाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली. तसंच, सारा हिनेदेखील आपल्या पतीला अधीन राहण्याच्या बाबतीत एक उत्तम उदाहरण मांडलं. (१ पेत्र ३:३-६ वाचा.) अब्राहामाने, इसहाकाचं लग्न यहोवाची उपासना करणाऱ्या मुलीशीच होईल याकडे लक्ष दिलं. इसहाकानेही त्याचा मुलगा याकोब याच्या बाबतीत तसंच केलं. नंतर याकोबाच्या १२ मुलांपासून इस्राएलाची १२ गोत्रं तयार झाली.
११. नियमशास्त्रामुळे इस्राएली लोकांचं संरक्षण कसं झालं?
११ नंतर यहोवाने इस्राएल राष्ट्रासोबत एक करार केला. त्याने इस्राएल राष्ट्राला मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं. यात यहोवाचे उपासक या नात्याने पती-पत्नींसाठी काही नियम देण्यात आले होते. यामुळे वैवाहिक जीवन सुरक्षित ठेवण्यास मदत झाली. उदाहरणार्थ, विवाहासंबंधी रितीरिवाजांबद्दल काही नियम देण्यात आले होते. यात बहुपत्नीत्वाच्या बाबतीत नियम देण्यात आला होता. तसंच, खोटी उपासना करणाऱ्या लोकांशी लग्न करण्यास इस्राएली लोकांना सक्त मनाई करण्यात आली होती. (अनुवाद ७:३, ४ वाचा.) वडील म्हणून नेमण्यात आलेले प्रौढजन, वैवाहिक जीवनात काही गंभीर समस्या आल्यास जोडप्यांना मदत करायचे. यासोबतच विश्वासघात करणं, ईर्ष्या बाळगणं आणि संशय घेणं यांच्याविरुद्ध नियम देण्यात आले होते. नियमशास्त्रात घटस्फोट घेण्यासाठी अनुमती देण्यात आली असली, तरी प्रत्येक जोडीदाराचं संरक्षण होईल यासाठीही नियम घालून देण्यात आले होते. उदाहरणार्थ, जर एखाद्या पुरुषाला वाटलं की त्याच्या पत्नीची “वागणूक अनुचित” आहे, तर तो तिच्यापासून घटस्फोट घेऊ शकत होता. (अनु. २४:१) हे खरं आहे की अनुचित वागणुकीत कोणत्या गोष्टी मोडतात याबद्दल नियमशास्त्रात स्पष्टपणे काही सांगण्यात आलेलं नव्हतं. पण क्षुल्लक कारणांसाठी एका पुरुषाला घटस्फोट घेण्याची परवानगी नव्हती.—लेवी. १९:१८.
आपल्या जोडीदाराशी कधीही विश्वासघात करू नका
१२, १३. (क) मलाखीच्या काळात काही पुरुष आपल्या पत्नीसोबत कसा व्यवहार करत होते? (ख) आज जर एखाद्या बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीने दुसऱ्या एका विवाहित व्यक्तीशी लग्न करण्यासाठी व्यभिचार केला, तर त्याचे काय परिणाम होतील?
१२ मलाखी संदेष्ट्याच्या काळात बरेच यहुदी पुरुष अगदी क्षुल्लक कारणांसाठी आपल्या पत्नीला घटस्फोट देत होते. तरुण स्त्रियांशी किंवा खोट्या दैवतांची उपासना करणाऱ्या स्त्रियांशी लग्न करण्यासाठी ते असं करायचे. येशूच्या काळात तर यहुदी पुरुष आपल्या पत्नीला “कोणत्याही कारणावरून” घटस्फोट द्यायचे. (मत्त. १९:३) अशा प्रकारे नियमशास्त्राविरुद्ध जाऊन घेतलेल्या घटस्फोटांचा यहोवाला वीट होता.—मलाखी २:१३-१६ वाचा.
१३ आज यहोवाच्या लोकांमध्ये वैवाहिक जीवनात विश्वासघाताला कोणतीही जागा नाही. अशा घटना फार क्वचितच घडतात. पण समजा, एखाद्या बाप्तिस्मा झालेल्या विवाहित व्यक्तीने दुसऱ्या एका विवाहित व्यक्तीशी व्यभिचार केला आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी घटस्फोट घेतला, तर काय? जर या व्यक्तीने केलेल्या पापाबद्दल पश्चात्ताप दाखवला नाही, तर तिला मंडळीतून बहिष्कृत करण्यात येईल. कारण मंडळीला शुद्ध ठेवण्यासाठी असं करणं गरजेचं ठरेल. (१ करिंथ. ५:११-१३) पण बहिष्कृत झालेल्या व्यक्तीला मंडळीत जर परत यायचं असेल, तर तिला आधी तिच्या “पश्चात्तापास योग्य अशी फळे” दाखवावी लागतील. (लूक ३:८; २ करिंथ. २:५-१०) अशा व्यक्तीला मंडळीत किती काळानंतर परत घेण्यात यावं हे निश्चितार्थाने सांगता येणार नाही. पण या व्यक्तीला आपला खरा पश्चात्ताप दाखवण्यासाठी कदाचित एक किंवा त्यापेक्षा जास्त वर्षं लागू शकतात. त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने पश्चात्ताप झाला आहे हे स्पष्टपणे दिसून आल्यानंतरच तिला मंडळीत परत घेण्यात येईल. अशा व्यक्तीला मंडळीत परत घेण्यात आलं असलं, तरी तिला “देवाच्या न्यायासनासमोर” उभं राहावं लागेल. कारणं तिचा पश्चात्ताप खरा होता की नाही याचा न्याय फक्त यहोवा देवच करू शकतो.—रोम. १४:१०-१२; टेहळणी बुरूज-E १५ नोव्हेंबर १९७९, पृष्ठं ३१-३२ पाहा.
पहिल्या शतकानंतरचे विवाह
१४. नियमशास्त्राचा उद्देश काय होता?
१४ इस्राएली लोक १,५०० वर्षांपेक्षा जास्त काळ नियमशास्त्राच्या अधीन होते. नियमशास्त्रामुळे देवाच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे फायदा झाला. उदाहरणार्थ, कौटुंबिक समस्या कशा सोडवाव्यात याबद्दल त्यात तत्त्वं देण्यात आली होती. तसंच, मसीहा येईपर्यंत नियमशास्त्राने इस्राएल राष्ट्राचं मार्गदर्शन केलं. (गलती. ३:२३, २४) येशूचा मृत्यू झाला तेव्हा नियमशास्त्र संपुष्टात आलं आणि देवाने एका नवीन व्यवस्थेची सुरवात केली. (इब्री ८:६) नियमशास्त्रात ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आली होती, त्यातील काही गोष्टी करण्यास आता ख्रिश्चनांना मनाई होती.
१५. (क) ख्रिस्ती मंडळीमध्ये विवाहाबद्दल कोणता स्तर असला पाहिजे? (ख) आपल्या जोडीदाराला घटस्फोट देण्याआधी एका ख्रिस्ती व्यक्तीने कोणत्या गोष्टींवर विचार करणं गरजेचं आहे?
१५ एकदा परूशी लोकांनी येशूला घटस्फोट घेण्यासंबंधी एक प्रश्न विचारला. येशूने त्यांना सांगितलं, की देवाने नियमशास्त्रात इस्राएली लोकांना घटस्फोट घेण्याची परवानगी दिली होती हे खरं आहे. पण सुरवातीपासूनच, त्याची तशी इच्छा नव्हती. (मत्त. १९:६-८) येशूने दिलेल्या उत्तरावरून हे स्पष्ट झालं की विवाहाबद्दल यहोवाने सुरवातीपासून जे स्तर ठरवले होते, तेच स्तर आता इथून पुढे ख्रिश्चनांनी पाळणं गरजेचं होतं. (१ तीम. ३:२, १२) “एकदेह” या नात्याने जोडप्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. देवावर आणि एकमेकांवर असलेल्या प्रेमामुळे त्यांना हे शक्य होईल. व्यभिचार सोडून दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी जर एखाद्या व्यक्तीने घटस्फोट घेतला, तर तिला पुन्हा लग्न करण्याची परवानगी नाही. (मत्त. १९:९) समजा एखाद्या व्यक्तीच्या हातून व्यभिचार झाला पण तिने नंतर खरा पश्चात्ताप दाखवला, तर तिचा जोडीदार तिला माफ करू शकतो. उदाहरणार्थ, होशेय संदेष्ट्याची पत्नी गोमर हिने व्यभिचार केला होता. पण त्याने तिला माफ केलं. तसंच, इस्राएल राष्ट्रानेदेखील यहोवाशी अनेक वेळा विश्वासघात केला, पण यहोवाने त्या राष्ट्राला माफ केलं. (होशे. ३:१-५) यासोबतच, जर एखाद्या व्यक्तीला हे माहीत आहे की तिच्या जोडीदाराने व्यभिचार केला आहे आणि हे माहीत असूनदेखील जर तिने आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवले, तर यावरून दिसून येईल की तिने आपल्या जोडीदाराला माफ केलं आहे. त्यानंतर घटस्फोट घेण्यासाठी कोणतंही शास्त्र आधारित कारण तिच्याजवळ उरणार नाही.
१६. येशूने अविवाहित राहण्याबद्दल काय सांगितलं?
१६ येशूने सांगितलं होतं, की खऱ्या ख्रिश्चनांना घटस्फोट घेण्यासाठी फक्त एकच शास्त्र आधारित कारण आहे, ते म्हणजे व्यभिचार. त्यानंतर येशू अविवाहित राहण्याच्या ‘दानाबद्दल’ बोलला. तो म्हणाला: “ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे.” (मत्त. १९:१०-१२) आज बरेच लोक अविवाहित राहण्याचं ठरवतात. कारण कुटुंबाची जबाबदारी नसल्यामुळे ते यहोवाच्या सेवेत इतरांपेक्षा अधिक करू शकतात, हे त्यांना माहीत आहे. आणि अशा लोकांची आपण मनापासून प्रशंसा केली पाहिजे.
१७. लग्न करावं की नाही, हे ठरवताना एका ख्रिस्ती व्यक्तीनं कोणत्या गोष्टीवर विचार केला पाहिजे?
१७ लग्न करावं की नाही, हे ठरवण्यासाठी एका व्यक्तीला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते? लग्नाचा विचार करताना एका व्यक्तीने याचं परीक्षण केलं पाहिजे की तिला अविवाहित राहण्याचं ‘दान’ स्वीकारणं शक्य होईल किंवा नाही. अविवाहित राहणं फायद्याचं आहे असं प्रेषित पौलाने सांगितलं. पण यासोबतच त्याने हेदेखील म्हटलं: “जारकर्मे होत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा.” पौलाने असंही म्हटलं: “तथापि जर त्यांस संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे.” शारीरिक इच्छांमुळे हस्तमैथुनाची किंवा अनैतिक कृत्यं करण्याची सवय लागू नये, म्हणून एक व्यक्ती कदाचित लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकते. (१ करिंथ. ७:२, ९; १ तीम. ४:१-३) पण, असा निर्णय घेण्याआधी तरुणांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की, वैवाहिक जीवनाची जबाबदारी स्वीकारण्याचं त्यांचं वय झालं आहे का, किंवा त्यासाठी ते तयार आहेत का? पौलाने पुढे म्हटलं: “पण अविवाहित राहिल्यामुळे आपण अयोग्य प्रकारे वागत आहोत असे जर कोणाला वाटत असेल आणि त्याच्या ऐन तारुण्याचा काळ ओसरला असेल, तर त्याला जे योग्य वाटते ते त्याने करावे. तो पाप करत नाही. त्यांनी लग्न करावे.” (१ करिंथ. ७:३६, NW) तारुण्यात शारीरिक इच्छा खूप प्रबळ असतात. पण फक्त शारीरिक इच्छा प्रबळ आहेत म्हणून एखाद्याने लग्न करावं, असा सल्ला आपण कधीही देऊ नये. कारण ती व्यक्ती कदाचित विवाहासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याइतकी प्रौढ नसेल.
१८, १९. (क) ख्रिस्ती विवाहासाठी कोणत्या पात्रतेची गरज आहे? (ख) पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?
१८ ख्रिस्ती विवाह अशा दोन व्यक्तींमध्ये झाला पाहिजे, ज्यांचा बाप्तिस्मा झाला आहे आणि जे यहोवावर मनापासून प्रेम करतात. त्यांचं एकमेकांवर देखील प्रेम असलं पाहिजे आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची त्यांची इच्छा असली पाहिजे. “केवळ प्रभूमध्ये लग्न” करा या बायबलमधील सल्ल्याचं पालन केल्यामुळे यहोवा देव त्यांना नक्की आशीर्वादित करेल. (१ करिंथ. ७:३९) आणि जर ते आपल्या वैवाहिक जीवनात बायबलमधील सल्ले लागू करत राहिले, तर त्यांचा विवाह नक्कीच यशस्वी होईल.
१९ आज आपण शेवटल्या दिवसांत जगत आहोत. वैवाहिक जीवनाला यशस्वी करण्यासाठी लागणारे गुण आज बऱ्याच लोकांमध्ये नाहीत. (२ तीम. ३:१-५) ख्रिस्ती जोडप्यांना वैवाहिक जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असं असूनही बायबलमधील तत्त्वांच्या मदतीनं ते आपला विवाह यशस्वी आणि आनंदी कसा बनवू शकतात, हे आपण पुढील लेखात पाहूयात. यामुळे ख्रिस्ती जोडप्यांना सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालत राहण्यास मदत होईल.—मत्त. ७:१३, १४.