सोन्यापेक्षाही उत्तम अशा गोष्टीचा शोध करा
तुम्हाला कधी सोनं सापडलं आहे का? फार कमी लोकांना ते सापडलं आहे. तरी असे लाखो लोक आहेत ज्यांना या सोन्यापेक्षाही उत्तम असं काहीतरी सापडलं आहे. ते म्हणजे देवाकडून मिळणारं ज्ञान, जे उत्कृष्ट सुवर्ण देऊनही मिळत नाही.—ईयो २८:१२, १५.
एका अर्थी बायबल विद्यार्थीदेखील, सोन्यासारख्या मौल्यवान धातूच्या शोधात असणाऱ्यांप्रमाणेच आहेत. या विद्यार्थ्यांनाही वचनांतील मौल्यवान माहिती व ज्ञान शोधून काढण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. तर मग, ज्या प्रकारे सोन्याचा शोध केला जातो त्यातून आपण काय शिकू शकतो, हे आता आपण पाहू या.
तुम्हाला सोन्याचा एक लहान तुकडा सापडतो!
कल्पना करा, तुम्ही एका नदी किनारी फेरफटका मारत आहात. सूर्यप्रकाशामुळे चमकत असलेला एक अगदी लहानसा खडा तुम्हाला तिथं दिसतो. तुम्ही तो उचलता तेव्हा तुम्हाला कळतं की तो सोन्याचा एक लहान तुकडा आहे. तुम्ही आनंदित होता, कारण तो तुकडा अगदी लहान असला, तरी उच्च प्रतीच्या हिऱ्यापेक्षाही दुर्मिळ असा आहे. साहजिकच मग तुम्ही तिथं आणखी काही सोन्याचे तुकडे मिळतात की नाही, याचा शोध करायला सुरवात करता.
अशाच प्रकारे, तो दिवस तुमच्या आठवणीत असेल ज्या दिवशी बायबलमधील आशेचा संदेश घेऊन यहोवाचे साक्षीदार तुमच्या घरी आले होते. त्या वेळी सूर्यप्रकाशात चमकणारा तो पहिला आध्यात्मिक खडा तुम्हाला सापडला होता हे कदाचित तुम्हाला स्पष्टपणे आठवत असेल. तो चमकणारा आध्यात्मिक खडा म्हणजे कदाचित जेव्हा तुम्ही बायबलमध्ये पहिल्यांदाच देवाचं नावं पाहिलं, तो असेल. (स्तो. ८३:१८) किंवा मग तुम्हीही यहोवा देवाचे मित्र बनू शकता हे तुम्हाला समजलं, तो असेल. (याको. २:२३) त्या वेळी तुम्हाला या गोष्टीची खात्री पटली असेल की तुम्हाला सोन्यापेक्षाही उत्तम असं काहीतरी मिळालं आहे. आणि मग तुम्ही आणखी आध्यात्मिक गोष्टी शोधण्यासाठी आतुर झाला असाल.
तुम्हाला आणखी सोन्याचे तुकडे सापडतात
कधीकधी सोन्याचे अगदी बारीक तुकडे ओढ्याच्या किंवा नदीच्या पात्रात साठतात. सोन्याच्या शोधात असणारे व त्यासाठी बरीच मेहनत घेणारे लोक, थोड्या काळातच काही किलो सोनं तिथून मिळवू शकतात. या सोन्याची किंमत लाखोंच्या घरात जाते.
जेव्हा तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केला होता, तेव्हा तुम्हालाही मेहनत घेणाऱ्या त्या लोकांप्रमाणेच वाटलं असेल, जे सोन्याचा मोठा साठा मिळवतात. एकानंतर एक बायबल वचनांवर मनन केल्यामुळे तुमच्या ज्ञानात वाढ झाली, आणि तुम्ही आध्यात्मिक रीत्या समृद्ध बनलात. जसजसं तुम्ही बायबलमधील मौल्यवान सत्याला आपलंसं केलंत, तसतसं तुम्हाला हेही शिकायला मिळालं की यहोवाच्या आणखी जवळ आल्यामुळे आणि स्वतःला त्याच्या प्रेमामध्ये टिकवून ठेवल्यामुळे, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळू शकतं.—याको. ४:८; यहू. २०, २१.
ज्या प्रकारे सोन्याचा शोध करणारा, ओढ्यात किंवा नदीत कसोशीनं सोन्याचा शोध करतो, त्याच प्रकारे तुम्हीही अगदी कसोशीनं मौल्यवान आध्यात्मिक गोष्टींचा शोध केला असेल. मत्त. २८:१९, २०.
बायबलमधील मूलभूत गोष्टी शिकल्यानंतर तुम्ही समर्पणासाठी आणि बाप्तिस्म्यासाठी पाऊल उचलण्यास प्रेरित झाला असाल.—तुमचा शोध सुरू ठेवा
पृथ्वीच्या गर्भात किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेल्या अग्नीजन्य खडकांमध्ये, काही ठिकाणी अगदी लहान सोन्याचे तुकडे आढळतात. तर याच खडकांमध्ये इतर काही ठिकाणी इतक्या जास्त प्रमाणात सोनं आढळून येतं की, तिथं मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून अधिक सोनं मिळवणं शक्य असतं. अशा ठिकाणी वरवर पाहता खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं उपलब्ध आहे हे कदाचित लगेच कळून येणार नाही. का? कारण साधारणतः एक टन वजनाच्या खडकांच्या चुऱ्यातून फक्त १० ग्रॅम एवढंच सोनं मिळू शकतं. अशा उच्च प्रतीच्या एका खडकामध्येही फार कमी प्रमाणात सोनं आढळतं. असं असलं तरी सोनं मिळवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर जी मेहनत घ्यावी लागते ती फायद्याची व मोलाचीच ठरते.
याच प्रकारे, “ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबीसंबंधी” शिकल्यानंतर तुम्हाला आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. (इब्री ६:१, २) बायबल अभ्यासातून व्यवहारोपयोगी आणि नवनवीन माहिती खोदून काढण्यासाठी तुम्हालाही मोठ्या प्रमाणावर मेहनत घेण्याची गरज आहे. तुम्ही कदाचित बऱ्याच वर्षांपासून बायबलचा अभ्यास करणारे असला. पण तरी तुमचा वैयक्तिक बायबल अभ्यास हा तुमच्यासाठी आणखी फायद्याचा व मोलाचा ठरेल यासाठी तुम्ही काय करू शकता?
शिकण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. त्यातील बारकाव्यांकडे लक्ष द्या. जर तुम्ही मेहनत घेत राहिलात तर ‘देवाच्या ज्ञानाच्या’ व मार्गदर्शनाच्या आध्यात्मिक गोष्टी तुम्हाला सापडतील. (रोम. ११:३३) वचनांविषयी तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी व संशोधन करण्यासाठी तुमच्या भाषेत उपलब्ध असलेल्या साहित्यांचा उपयोग करा. तुम्हाला गरजेचं असलेलं मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी धीरानं प्रयत्न करा. इतर बंधुभगिनींना कोणत्या वचनांमुळे किंवा लेखांमुळे उत्तेजन व मदत मिळाली हे विचारा. आणि देवाच्या वचनांचा अभ्यास करताना तुम्हाला एखादी नवीन गोष्ट समजली किंवा एखादा मुद्दा आवडला तर तो इतरांनाही सांगा.
हे खरं आहे की, फक्त ज्ञान किंवा माहिती वाढवण्याचा तुमचा उद्देश नसला पाहिजे. कारण “ज्ञान फुगवते” असा इशारा प्रेषित पौलाने आपल्याला दिला आहे. (१ करिंथ. ८:१) त्यामुळे, नम्र होण्यासाठी आणि विश्वासात स्थिर राहण्यासाठी मेहनत घ्या. यहोवाच्या स्तरांनुसार चालण्यासाठी, नियमित रीत्या होणारी कौटुंबिक उपासना आणि वैयक्तिक बायबल अभ्यास फायद्याचा ठरेल. तसंच त्यामुळे इतरांनाही आध्यात्मिक बाबतींत मदत करण्यास तुम्ही प्रेरित व्हाल. पण या सर्वांहूनही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आनंदी व्हाल, कारण सोन्यापेक्षाही जे उत्तम ते तुम्हाला मिळालेलं असेल.—नीति. ३:१३, १४.