व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

येशूच्या विरोधकांनी हात धुण्याच्या बाबतीत वादविषय का निर्माण केला?

येशूमध्ये आणि त्याच्या शिष्यांमध्ये दोष शोधण्यासाठी त्याचे विरोधक ज्या विषयांवर वाद घालायचे त्यांपैकी हा एक वादविषय होता. मोशेच्या नियमशास्त्रात विधीपूर्वक शुद्धतेसाठी बरेच नियम देण्यात आले होते. यात, शरीरातून वाहणाऱ्या अशुद्ध स्रावासंबंधी, कुष्ठरोगासंबंधी, मानवांच्या आणि प्राण्यांच्या मृतदेहासंबंधी असलेल्या नियमांचाही समावेश होता. तसंच, शुद्धीकरणासाठी काय करण्याची गरज होती यासंबंधीदेखील त्यात मार्गदर्शन देण्यात आलं होतं. जसं की, बलिदान चढवणं, अशुद्ध वस्तू धुणं किंवा रक्त शिंपडणं यांसारख्या गोष्टींचा त्यात समावेश होता.—लेवी., अध्याय ११-१५; गण., अध्याय १९.

यहुदी धर्मगुरू नियमशास्त्रात दिलेल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा गरज नसताना तपशील काढण्याचा प्रयत्न करायचे. एका संदर्भानुसार, अशुद्धतेच्या प्रत्येक कारणाची वेगवेगळ्या गोष्टींनी शहानिशा केली जायची. जसं की, “कोणत्या परिस्थितीत अशुद्धता निर्माण झाली असावी, ती कशा प्रकारे आणि कितपत इतरांमध्ये पसरली असावी, कोणती पात्रे आणि वस्तू अशुद्ध किंवा शुद्ध म्हणून ठरवल्या जाऊ शकतात, आणि शेवटी शुद्धीकरणासाठी कोणती साधनं आणि कोणते विधी वापरले जावेत, यांविषयी प्रश्न उपस्थित केले जायचे.”

येशूच्या विरोधकांनी त्याला एकदा असं विचारलं: “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत?” (मार्क ७:५) या ठिकाणी हे धार्मिक पुढारी हात न धुता जेवणं आरोग्यासाठी हानीकारक आहे, याविषयी बोलत नव्हते. उलट, जेवणाआधी हात धुण्याच्या बाबतीत त्यांनी लावलेल्या विधीविषयी ते बोलत होते. या विधीनुसार जेवणापूर्वी त्यांच्या हातांवर कोणीतरी पाणी ओतण्याची गरज होती. वर उल्लेखण्यात आलेला संदर्भ पुढे असं म्हणतो, की “पाणी ओतण्यासाठी कोणत्या पात्रांचा वापर करावा, कोणत्या प्रकारचं पाणी त्यासाठी योग्य राहील, ते पाणी कोणी ओतलं पाहिजे आणि हात कुठपर्यंत ओले झाले पाहिजेत, यासारख्या गोष्टींवरदेखील त्यांच्यात वादविवाद व्हायचा.”

या सर्व मानवनिर्मित नियमांप्रती येशूची प्रतिक्रिया कशी होती? पहिल्या शतकातील त्या यहुदी धर्मपुढाऱ्यांना त्याने अगदी सरळसरळ उत्तर दिलं. त्याने म्हटलं: “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा: ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून [देवापासून] दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, ते असतात मनुष्याचे नियम.’ तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता.”—मार्क ७:६-८.