व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

गर्भधारणा टाळण्यासाठी विवाहित ख्रिश्‍चनांनी आययूडी (IUD) * साधनांचा उपयोग करणं योग्य ठरेल का?

या बाबतीत, प्रत्येक ख्रिस्ती जोडप्याने असा निर्णय घेतला पाहिजे ज्यामुळे त्यांना शुद्ध विवेक राखता येईल. त्यासाठी, त्यांनी आययूडी कशा प्रकारे कार्य करतात याचा आणि बायबलच्या तत्त्वांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

यहोवाने आदाम आणि हव्वाला, तसंच पुढे नोहा आणि त्याच्या कुटुंबाला अशी आज्ञा दिली होती, की “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.” (उत्प. १:२८; ९:१) पण, ही आज्ञा ख्रिश्‍चनांना लागू होते असं बायबलमध्ये सांगितलेलं नाही. त्यामुळे, आपल्याला किती मुलं असावीत किंवा मूल केव्हा होऊ द्यायचं हे ठरवण्यासाठी कोणत्या गर्भनिरोधक पद्धतींचा उपयोग करावा हे प्रत्येक जोडप्याने स्वतः ठरवलं पाहिजे. पण, हा निर्णय घेताना त्यांनी कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत?

एका ख्रिस्ती जोडप्याने, गर्भधारणा टाळण्यासाठी घेतलेला निर्णय बायबलच्या तत्त्वांवर आधारित असला पाहिजे. म्हणूनच मुलं होऊ देण्याचं टाळण्यासाठी ते कधीही गर्भपाताचा पर्याय निवडत नाहीत. मुद्दाम केलेल्या गर्भपातामुळे गर्भ नष्ट होतो. तोच गर्भ जर वाढू दिला असता, तर शेवटी एका बाळाचा जन्म झाला असता. आणि म्हणूनच, गर्भपात करणं हे जीवनाबद्दल आदर दाखवण्याच्या बाबतीत बायबलमध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्या अगदी विरोधात आहे. (निर्ग. २०:१३; २१:२२, २३; स्तो. १३९:१६; यिर्म. १:५) पण, आययूडी वापरण्याच्या बाबतीत काय म्हणता येईल?

टेहळणी बुरूज (इंग्रजी) १५ मे, १९७९ च्या अंकात पृष्ठं ३०-३१ वर या विषयावर चर्चा करण्यात आली होती. त्या वेळी, उपलब्ध असलेली बरीच आययूडी साधनं प्लास्टिकची असून गर्भधारणा टाळण्यासाठी ती गर्भाशयात बसवली जायची. ही आययूडी साधनं नेमकी कशा प्रकारे कार्य करतात हे अद्याप पूर्णपणे माहीत नाही, असं त्या अंकात सांगण्यात आलं होतं. अनेक वैज्ञानिकांचं असं म्हणणं होतं, की या आययूडीमुळे पुरुषबीज स्त्रीबिजापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे स्त्रीबिजाचं फलन होत नाही. आणि बीज फलित झालं नाही, तर एका नव्या जिवाची सुरुवातच होणार नाही.

पण मग असंही दिसून आलं, की काही वेळा बीज फलित होऊ शकतं. फलित झालेलं हे नवीन बीज एकतर बीज-नलिकेत (फॅलोपियन ट्यूबमध्ये) वाढू शकतं किंवा गर्भाशयात जाऊ शकतं. आणि जेव्हा ते गर्भाशयात जातं, तेव्हा आययूडी त्याला गर्भाशयाच्या अस्तरावर वाढू देत नाही आणि यामुळे तो गर्भ नष्ट होतो. हे खरंतर गर्भपात करण्यासारखंच ठरेल. त्यामुळे त्या लेखाच्या शेवटी म्हटलं होतं: “आययूडीचा उपयोग करणं योग्य आहे की नाही हे ठरवताना एका प्रामाणिक अंतःकरणाच्या ख्रिश्‍चनाने, संबंधित माहितीचा आणि जीवनाच्या आदराबद्दल व पावित्र्याबद्दल बायबलमध्ये दिलेल्या माहितीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.”—स्तो. ३६:९.

पण, १९७९ मध्ये तो लेख प्रकाशित करण्यात आला तेव्हापासून आतापर्यंत वैद्यकीय आणि वैज्ञानिक क्षेत्रात बरीच वाढ झाली आहे.

आता आययूडीचे आणखी दोन प्रकार उपलब्ध झाले आहेत. त्यांपैकी एकात, तांब्याचा वापर केलेला असून, काही दशकांपूर्वी तो सर्वत्र उपलब्ध झाला. तर आयूडीच्या दुसऱ्‍या प्रकारात, हॉर्मोन (संप्रेरके) असून तो काही वर्षांपूर्वी बाजारात आला. हे दोन्ही प्रकारचे आययूडी कशा प्रकारे कार्य करतात?

तांबी: आधी सांगितल्याप्रमाणे, आययूडीमुळे पुरुषबिजाला गर्भाशयातून सुरक्षितपणे प्रवास करून स्त्रीबिजापर्यंत पोहोचणं कठीण जातं. शिवाय, आययूडीमध्ये जर तांबं असेल तर पुरुषबिजाला स्त्रीबिजापर्यंत पोहोचणं आणखीनच कठीण जातं. कारण, तांबं हे पुरुषबिजासाठी नाशक असल्याचं दिसतं. * तसंच, अशा आययूडीमुळे गर्भाशयाच्या अस्तरात काही बदलही होतात.

हॉर्मोन: आयूडीच्या दुसऱ्‍या प्रकारात, गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असतात तसे हॉमोन (संप्रेरके) असतात. हे आययूडी गर्भाशयात हॉर्मोन सोडतात. त्यामुळे, काही स्त्रियांमध्ये बीजकोषातून स्त्रीबीज बाहेर येत नाही. स्त्रीबीज जर बाहेरच आलं नाही, तर साहजिकच ते फलित होणार नाही. तसंच, अशा प्रकारच्या आययूडीमुळे गर्भाशयाचं अस्तरही पातळ होतं. * शिवाय, ते योनिमार्गातला स्राव घट्ट करतो आणि त्यामुळे पुरुषबीज योनिमार्गातून गर्भाशयात जाऊ शकत नाही.

आधी सांगितल्याप्रमाणे, दोन्ही प्रकारच्या आयूडीमुळे गर्भाशयाच्या अस्तरात बदल होत असल्याचं दिसून येतं. याचा अर्थ, स्त्रीबीज फलित झालं, तर एक वेळ ते गर्भाशयात जाऊही शकतं. पण, गर्भाशयाचं अस्तर तयार नसल्यामुळे ते तिथं वाढू शकत नाही. त्यामुळे, गर्भाची वाढ सुरुवातीलाच थांबते. पण, वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे, की असं होण्याची शक्यता फारच कमी आहे; शिवाय, काही वेळा गर्भनिरोधक गोळ्यांमुळेही असं घडू शकतं.

त्यामुळे तांबं किंवा हॉर्मोन असलेल्या आययूडीमुळे बीज कधीच फलित होणार नाही, असं खात्रीने म्हणता येणार नाही. पण वर उल्लेख केलेल्या अनेक कारणांमुळे वैज्ञानिक संशोधन दाखवून देतं, की असे आययूडी वापरल्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी असते.

आययूडीचा उपयोग करण्याची इच्छा असलेल्या ख्रिस्ती जोडप्याने याविषयी आपल्या डॉक्टरांसोबत चर्चा करणं योग्य ठरेल. बाजारात कोणत्या प्रकारचे आययूडी उपलब्ध आहेत याबद्दलची माहिती डॉक्टर त्यांना देऊ शकतील. तसंच, आययूडीचा उपयोग केल्याने कोणते फायदे होऊ शकतात आणि कोणते धोके संभवू शकतात, हेही डॉक्टर त्यांना समजावून सांगतील. पण, या बाबतीत कोणता निर्णय घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार ख्रिस्ती जोडप्याने दुसऱ्‍या कोणालाही, अगदी आपल्या डॉक्टरलाही देऊ नये. (रोम. १४:१२; गलती. ६:४, ५) हा सर्वस्वी त्या दोघांचा निर्णय असून तो केवळ त्यांनीच घेतला पाहिजे. आणि निर्णय घेताना देवाला संतुष्ट करण्याचा, तसंच शुद्ध विवेक राखण्याचा त्यांचा उद्देश असला पाहिजे.—१ तीमथ्य १:१८, १९ आणि २ तीमथ्य १:३ पडताळून पाहा.

^ परि. 2 इन्ट्रायूटरीन डिव्हाईस (intrauterine device), हे एक छोटंसं उपकरण आहे जे गर्भाशयात बसवलं जातं.

^ परि. 4 इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा मार्गदर्शिकेचा अहवाल म्हणतो: “ज्या आययूडीमध्ये तांब्याचा जास्त वापर केलेला असतो त्या ९९ टक्क्यांपेक्षा जास्त परिणामकारक असतात. याचाच अर्थ, या आययूडीचा उपयोग करणाऱ्‍या स्त्रियांची गरोदर राहण्याची शक्यता १ टक्क्याहून कमी आहे. ज्या आयूडीमध्ये तांब्याचा वापर कमी प्रमाणात केलेला असतो ते कमी परिणामकारक असतात.”

^ परि. 5 हॉर्मोन असलेल्या आयूडीमुळे गर्भाशयाचं अस्तर पातळ होतं. त्यामुळे, मासिक पाळीच्या वेळी होणारा जास्त रक्‍तस्राव नियंत्रित करण्यासाठी, डॉक्टर काही वेळा विवाहित व अविवाहित स्त्रियांना हा पर्याय सुचवतात.