जीवन कथा
ख्रिस्तासाठी सर्वकाही मागे सोडून दिलं
मी १६ वर्षांचा होतो तेव्हा माझे वडील मला म्हणाले: “प्रचार करायला गेलास, तर परत या घरात पाऊल ठेवू नकोस. आणि जर परत आलास तर मी तुझे पायच तोडून टाकीन.” मग मी घर सोडून जाण्याचं ठरवलं. येशू ख्रिस्ताच्या मागे चालत राहण्यासाठी सर्वकाही सोडून देण्याची ही केवळ एक सुरुवात होती.
माझ्या वडिलांना इतका राग का आला होता? ते सांगण्याआधी मी स्वतःविषयी थोडं सांगतो. माझा जन्म २९ जुलै, १९२९ मध्ये झाला; आणि फिलिपीन्झच्या बूलाकन प्रदेशातल्या एका छोट्याशा गावात माझं बालपण गेलं. आमच्या घरची परिस्थिती बेताचीच होती आणि आम्ही साधं जीवन जगायचो. मी लहान असताना जपानच्या सैन्याने फिलिपीन्झवर आक्रमण केलं आणि युद्धाला तोंड फुटलं. पण, आमचं गावं दुर्गम भागात असल्यामुळे युद्धाचा आमच्यावर थेट परिणाम झाला नाही. त्या वेळी गावात रेडिओ, टिव्ही किंवा वृत्तपत्रं नसायची. त्यामुळे युद्धाविषयी आम्हाला इतर लोकांकडूनच ऐकायला मिळायचं.
मला सात भाऊ-बहीण होते. मी आठ वर्षांचा असताना माझे आजी-आजोबा मला त्यांच्यासोबत राहायला घेऊन गेले. आम्ही कॅथलिक असलो, तरी आजोबांना धर्म या विषयावर बोलायला आवडायचं. आणि मित्रांनी दिलेली धर्मावरची पुस्तकंही ते स्वीकारायचे. मला आठवतं, त्यांनी मला खोट्या शिकवणींचा पर्दाफाश करणारी तगालोग भाषेतली काही पुस्तकं आणि एक बायबल दाखवलं होतं. मी ते बायबल वाचायला लागलो, तेव्हा मला ते आवडू लागलं; खासकरून शुभवर्तमानाची चार पुस्तकं. त्यामुळे माझ्या मनात, येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करण्याची इच्छा निर्माण झाली.—योहा. १०:२७.
मी ख्रिस्ताच्या मागे चालायला शिकलो
१९४५ मध्ये जपानचं सैन्यं फिलिपीन्झमधून निघून गेलं. त्यादरम्यान माझ्या आईवडिलांनी मला पुन्हा घरी बोलवलं. आजोबांनी मला जाण्यासाठी आर्जवलं, त्यामुळे मी पुन्हा घरी गेलो.
१९४५ च्या डिसेंबर महिन्यात, अन्गात या छोट्याशा शहरातले काही यहोवाचे साक्षीदार आमच्या गावात प्रचार करायला आले होते. त्यांतले एक वृद्ध साक्षीदार आमच्याकडे आले, आणि ‘शेवटल्या दिवसांबद्दल’ बायबल काय सांगतं हे त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. (२ तीम. ३:१-५) तसंच, त्यांनी आम्हाला जवळच्या गावात होणाऱ्या बायबल अभ्यासाला यायचं आमंत्रणही दिलं. माझे आईवडील गेले नाहीत, पण मी मात्र गेलो. तिथे जवळपास २० लोक जमले होते, आणि काहींनी बायबलविषयी प्रश्नेही विचारले.
ते काय बोलत होते ते मला पूर्णपणे समजत नव्हतं. त्यामुळे मी निघून जाण्याचा विचार केला. पण तेवढ्यात त्यांनी राज्यगीत गायला सुरुवात केली. मला ते गीत खूप आवडलं. म्हणून मग मी थांबायचं ठरवलं. गीत आणि प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी सर्वांना पुढच्या रविवारी अन्गातमध्ये होणाऱ्या सभेला यायला सांगितलं.
ती सभा क्रूझ कुटुंबाच्या घरात होती. तिथे पोहोचण्यासाठी आमच्यापैकी काही जण तर आठ किलोमीटरचा पायी प्रवास करून आले होते. त्या सभेला जवळपास ५० लोक जमले होते. त्यांच्यातली लहान मुलंही बायबलच्या अवघड प्रश्नांची उत्तरं देत आहेत, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं! त्यानंतरही मी काही सभांना उपस्थित राहिलो. एकदा डॅमियन सॅन्टोस या एका वृद्ध पायनियर बांधवाने त्या रात्री मला त्यांच्याकडे मुक्काम करायला बोलवलं. हे बांधव एके काळी नगराध्यक्ष होते. त्या रात्री आम्ही बराच वेळ बायबलवर चर्चा केली.
त्या काळी, बायबलच्या मूलभूत शिकवणी शिकल्यानंतर लगेचच बाप्तिस्मा दिला जायचा. त्यामुळे केवळ काही सभांना हजर राहिल्यानंतर बांधवांनी मला आणि इतरांना विचारलं: “तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायला आवडेल का?” त्यावर मी त्यांना लगेच “हो” म्हणालो. ‘आपला मालक, ख्रिस्त याचा दास होऊन’ सेवा करण्याची माझी इच्छा होती. (कलस्सै. ३:२४) त्यानंतर, बाप्तिस्मा घेण्यासाठी आम्ही जवळच्या नदीवर गेलो. आणि १५ फेब्रुवारी, १९४६ ला माझा आणि आणखी एकाचा बाप्तिस्मा झाला.
त्यानंतर मला जाणवलं, की बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक ख्रिश्चनाने येशूप्रमाणेच नियमितपणे प्रचारकार्य केलं पाहिजे. पण, प्रचारकार्य करण्यासाठी मी अजूनही लहान आहे असं वडिलांना वाटत होतं. शिवाय, बाप्तिस्मा घेतल्यानंतर कोणी लगेच प्रचारक बनत नाही, असंही त्यांचं मत होतं. त्यावर मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, की राज्याचा संदेश घोषित केला जावा अशी देवाची इच्छा आहे. (मत्त. २४:१४) मी त्यांना हेही सांगण्याचा प्रयत्न केला, की मी देवाला वचन दिलं आहे व मी ते पाळलं पाहिजे. आणि त्यामुळे, वडील माझ्यावर रागावले आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला धमकावलं. मला प्रचारकार्य करू न देण्याचं त्यांनी ठरवूनच टाकलं होतं. आणि अशा रीतीने, यहोवाची सेवा करण्यासाठी सर्व गोष्टी मागे सोडून देण्याची किंवा त्यांचा त्याग करण्याची सुरुवात माझ्या आयुष्यात झाली.
अन्गातमध्ये राहणाऱ्या क्रूझ कुटुंबाने मला त्यांच्याकडे राहण्यासाठी बोलावलं. त्यांनी मला आणि त्यांच्या धाकट्या मुलीला, नोराला पायनियर सेवा करण्याचं उत्तेजनही दिलं. आम्ही दोघांनी १ नोव्हेंबर, १९४७ ला पायनियर सेवा सुरू केली. नोरा दुसऱ्या शहरात पायनियर सेवा करू लागली, पण मी मात्र अन्गात शहरातच पायनियर सेवा करत राहिलो.
सर्व काही मागे सोडण्याची आणखी एक संधी
पुढे दोन वर्षांनंतर, बेथेलमध्ये काम करणाऱ्या अर्ल स्टुअर्ट या बांधवाने अन्गात शहराच्या एका चौकात ५०० पेक्षा जास्त लोकांच्या जमावासमोर भाषण दिलं. त्यांनी ते भाषण इंग्रजीत दिलं, आणि त्यानंतर मी तगालोग भाषेत त्यांच्या भाषणाचा सारांश सांगितला. हे माझं पहिलं भाषांतर होतं. त्यानंतर अनेक वर्षं मी भाषणांचं भाषांतर केलं. मी हे कशामुळे करू शकलो? खरंतर, मी फक्त सातच वर्षं शाळेत गेलो होतो. पण माझे शिक्षक नेहमी इंग्रजीतूनच बोलायचे. तसंच, आपली बरीचशी प्रकाशने मी इंग्रजीतूनच वाचली होती. कारण, त्या काळी तगालोग भाषेत फार कमी प्रकाशने उपलब्ध होती. या सगळ्या गोष्टींमुळे भाषांतर करण्यासाठी मदत होईल एवढी इंग्रजी भाषा मी शिकलो.
बंधू स्टुअर्ट यांनी स्थानिक मंडळीला सांगितलं, की मिशनरी सेवा करणारे बांधव थियॉक्रसीज इन्क्रीज (१९५० मध्ये झालेल्या) संमेलनासाठी न्यूयॉर्कला चालले आहेत. त्यामुळे बेथेलमध्ये कामात मदत करण्यासाठी एक-दोन पायनियरांची गरज आहे. मदतीसाठी बोलवण्यात आलेल्या बांधवांपैकी मीही एक होतो. त्यामुळे बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी मी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा सर्व काही मागे सोडून दिलं.
१९ जून, १९५० मध्ये मी बेथेल सेवा सुरू केली. त्या वेळी बेथेलचं काम एका मोठ्या जुन्या घरात चालायचं. बेथेलचा परिसर २.५ एकरवर पसरलेला होता; आणि तिथे मोठमोठी झाडं होती. बेथेलमध्ये त्या वेळी जवळपास १२ अविवाहित बांधव सेवा करायचे. पहाटे मी किचनमध्ये बांधवांना मदत करायचो; मग, साधारण ९ वाजता लॉन्ड्रीमध्ये कपडे इस्त्री करायचो. दुपारनंतरही मी तेच काम करायचो. संमेलन संपल्यावर मिशनरी न्यूयॉर्कहून परत आले, पण त्यानंतरही मी बेथेलमध्येच राहिलो. बांधव मला जे काही काम सांगायचे ते मी करायचो. पोस्टाने पाठवण्यासाठी मी मासिकांचं पॅकिंग करायचो, सबस्क्रिपशनच्या कामात मदत करायचो आणि बेथेलमध्ये रिसेप्शनीस्टचंही काम करायचो.
गिलियड प्रशालेसाठी फिलिपीन्झ सोडलं
१९५२ मध्ये फिलिपीन्झमधून मला आणि आणखी सहा बांधवांना २० व्या गिलियड प्रशालेसाठी आमंत्रित करण्यात आलं. हा माझ्यासाठी एक सुखद धक्काच होता! प्रशालेसाठी अमेरिकेत असताना आम्ही अनेक नवनवीन गोष्टी पाहिल्या आणि अनुभवल्या. ते सगळं आमच्यासाठी खूप वेगळं होतं. तिथलं जीवन आमच्या छोट्या गावातल्या जीवनापेक्षा फारच निराळं होतं.
उदाहरणार्थ, पूर्वी कधीही न पाहिलेली घरातली उपकरणं आणि स्वयंपाकाची भांडी कशी वापरायची हे आम्हाला शिकावं लागलं. तिथलं हवामानही खूपच वेगळं होतं! एकदा सकाळी मी उठलो तेव्हा पाहिलं की बाहेर पांढरंशुभ्र झालं होतं. आयुष्यात पहिल्यांदाच मी सगळीकडे बर्फ पडलेला पाहिला. ते दृश्य खूप सुंदर होतं. पण थंडीसुद्धा फार आहे हे लवकरच मला जाणवलं.
गिलियड प्रशालेचं प्रशिक्षण इतकं उत्तम होतं, की इतर गोष्टींशी जुळवून घेणं आम्हाला फारसं अवघड गेलं नाही. शिवाय, आमचे प्रशिक्षकही खूप चांगलं शिकवायचे. त्यांनी आम्हाला अभ्यास आणि संशोधन कसं करायचं हे शिकवलं. गिलियड प्रशालेत मिळालेल्या प्रशिक्षणामुळे यहोवासोबतचा नातेसंबंध आणखी मजबूत करण्यासाठी मला मदत मिळाली.
प्रशाला पूर्ण केल्यानंतर, मला न्यूयॉर्क शहरातल्या ब्राँक्स या ठिकाणी काही काळासाठी खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. त्यामुळे जुलै १९५३ मध्ये ब्राँक्समध्ये झालेल्या न्यू वर्ल्ड सोसायटी या संमेलनाला मला हजर राहता आलं. त्या संमेलनानंतर माझी नेमणूक पुन्हा फिलिपीन्झमध्ये करण्यात आली.
शहरातलं आरामदायी जीवन मागे सोडलं
बेथेलमधल्या बांधवांनी माझी नेमणूक विभागीय कार्य करण्यासाठी केली. या नेमणुकीमुळे मला येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करण्याची संधी मिळाली. तो यहोवाच्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक गावांत आणि शहरांत फिरला होता आणि त्याने कितीतरी मैल प्रवास केला होता. (१ पेत्र २:२१) माझी नेमणूक ज्या विभागात करण्यात आली होती, त्या विभागात लूझॉनचा मोठा भाग यायचा. लूझॉन हे फिलिपीन्झमधलं सगळ्यात मोठं बेट आहे. त्यात बूलाकन, न्यूएवा एसिजा, टारलाक आणि झाम्बालास हे प्रदेश येतात. काही ठिकाणांना भेट देण्यासाठी मला सियेरा माद्रे या खडकाळ पर्वतरांगा पार करून जावं लागायचं. त्या ठिकाणी कोणतीही बस किंवा ट्रेन नव्हती. त्यामुळे लाकडाचे ओंडके वाहून नेणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला मला मदत मागावी लागायची; आणि अनेक वेळा ते मदत करायचेही. पण, ट्रकच्या मागे लाकडांच्या ओंडक्यांवर बसून प्रवास करणं काही सोपं नव्हतं.
त्या ठिकाणी, नवीनच तयार झालेल्या बऱ्याच लहान मंडळ्या होत्या. त्यामुळे बांधवांना मंडळीच्या आणि क्षेत्र सेवेच्या सभा अधिक चांगल्या प्रकारे घेण्यासाठी मी मदत केली, तेव्हा त्यांना आनंद झाला.
नंतर माझी नेमणूक अशा एका विभागात केली गेली, ज्यात संपूर्ण बेकॉल प्रदेश यायचा. त्या प्रदेशातल्या दुर्गम भागांमध्ये अनेक लहान-लहान गट होते; आणि बरेचसे खास पायनियर प्रचार न झालेल्या क्षेत्रांत सेवा करत होते. अशाच दुर्गम भागातल्या एका घरातलं टॉयलेट म्हणजे, एक मोठा खड्डा आणि त्यावर ठेवलेली दोन मोठी लाकडं, एवढंच! त्या लाकडांवर मी जेव्हा उभा राहिलो, तेव्हा ती दोन्ही खाली खड्ड्यात पडली, आणि मीही त्यात पडलो! त्यानंतर स्वतःला साफ करण्यासाठी आणि दिवसाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी मला बराच वेळ लागला.
त्या विभागात कार्य करत असताना, माझ्यासोबत पायनियर सेवा सुरू केलेल्या नोराचा मी विचार करू लागलो. त्या वेळी ती डुमागाटा या शहरात खास पायनियर म्हणून सेवा करत होती. मी तिला भेटायला गेलो आणि त्यानंतर काही काळ आम्ही एकमेकांना पत्रं लिहिली. मग, १९५६ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या पहिल्याच आठवड्यात आम्ही रापु रापु या बेटावरच्या मंडळीला भेट द्यायला गेलो. तिथे आम्हाला डोंगरांवर चढावं लागलं आणि खूप चालावं लागलं. पण, एकमेकांच्या सहवासामुळे आणि दुर्गम भागातल्या बंधुभगिनींना मदत करता येत असल्यामुळे आम्ही आनंदी होतो.
पुन्हा बेथेलला येण्याचं आमंत्रण
जवळपास चार वर्षं विभागीय कार्यात सेवा केल्यानंतर आम्हाला पुन्हा बेथेल सेवेसाठी बोलवण्यात आलं. त्यामुळे जानेवारी १९६० मध्ये आम्ही बेथेल सेवा सुरू केली. बेथेल सेवेदरम्यान, संघटनेत मोठमोठ्या जबाबदाऱ्या हाताळणाऱ्या बांधवांसोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळालं. नोरानेही बेथेलमध्ये वेगवेगळी कामं करण्याचा आनंद घेतला.
फिलिपीन्झमध्ये यहोवाची सेवा करणाऱ्या लोकांमध्ये होणारी वाढ पाहणं, हा आमच्यासाठी खरोखरच एक मोठा आशीर्वाद आहे. मी अविवाहित असताना पहिल्यांदा बेथेलमध्ये सेवेसाठी आलो होतो, तेव्हा संपूर्ण फिलिपीन्झमध्ये जवळपास १०,००० प्रचारक होते. आज तिथे २,००,००० पेक्षा जास्त प्रचारक आहेत. तसंच, अनेक बंधुभगिनी बेथेलमध्ये सेवा करत आहेत आणि प्रचारकार्याला हातभार लावत आहेत.
प्रचारकार्यात वाढ होत गेली, तशी बेथेलसाठी आणखी मोठ्या जागेची गरज वाटू लागली. त्यामुळे नियमन मंडळाने आम्हाला मोठं शाखा कार्यालय बांधण्यासाठी जागा पाहायला सांगितलं. मी आणि प्रिंटरीची जबाबदारी हाताळणारे बांधव, बेथेलच्या आसपास राहणाऱ्या लोकांना भेटून ते आपली जागा विकायला तयार आहेत का, अशी विचारपूस करू लागलो. पण कोणीही तयार नव्हतं. एका चीनी व्यक्तीने तर म्हटलं: “आम्ही विकत नाही; तर विकत घेतो.”
पण, एक दिवस आम्ही अपेक्षाही केली नव्हती अशा काही गोष्टी घडू लागल्या. बेथेलच्या जवळ राहणारा एक मनुष्य अमेरिकेला कायमचा राहायला जाणार होता. त्यामुळे, आम्हाला त्याची जागा विकत घ्यायला आवडेल का, असं त्याने आम्हाला विचारलं. त्यानंतर आणखी एकाने त्याची जागा आम्हाला विकण्याचा निर्णय घेतला. आणि त्याने इतरांनाही तेच करण्याचं उत्तेजन दिलं. ज्या चीनी व्यक्तीने आम्हाला म्हटलं होतं, की “आम्ही विकत नाही,” अगदी त्यानेसुद्धा आम्हाला त्याची जागा विकली. त्यानंतर लवकरच शाखा कार्यालयाचा विस्तार तीन पटींनी वाढला. या सर्व गोष्टींच्या मागे यहोवाचाच हात होता, याची मला खात्री आहे.
१९५० मध्ये, बेथेलमध्ये सेवा करणाऱ्यांमध्ये मी सर्वात लहान होतो. आता मी आणि माझी पत्नी तिथे सेवा करणाऱ्यांमध्ये सर्वांत वयस्कर आहोत. आजपर्यंत ख्रिस्ताने जिथे कुठे जाण्याचं मला मार्गदर्शन दिलं, तिथे मी गेलो आणि या गोष्टीचा मला जराही पस्तावा नाही. माझ्या आईवडिलांनी मला घराबाहेर काढलं, पण यहोवाने मला त्याच्यावर प्रेम करणारं आणखी मोठं कुटुंब दिलं आहे. मला या गोष्टीची पक्की खात्री आहे, की आपल्याला कोणतीही नेमणूक मिळाली, तरी गरज असलेल्या सर्व गोष्टी यहोवा आपल्याला पुरवतो. यहोवाने आजवर पुरवलेल्या सर्व गोष्टींसाठी नोरा आणि मी त्याचे फार आभारी आहोत. आणि आम्ही इतरांनाही यहोवाची “प्रतीती” पाहण्याचं उत्तेजन देतो.—मला. ३:१०.
येशूने एकदा कर गोळा करणाऱ्या मत्तय म्हणजेच लेवीला त्याच्यामागे येण्याचं आमंत्रण दिलं. मग मत्तयने काय केलं? बायबल म्हणतं: “तो उठला आणि सर्वकाही सोडून त्याच्यामागे चालू लागला.” (लूक ५:२७, २८) मत्तयप्रमाणेच मलाही येशूच्या मागे जाण्यासाठी सर्व काही मागे सोडण्याची संधी मिळाली. आणि मी इतरांनाही तेच करण्याचं आणि यहोवाकडून मिळणारे आशीर्वाद अनुभवण्याचं उत्तेजन देतो.