व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांनो, “आपले तारण मिळवून घेण्याचा प्रयत्न करत राहा”

तरुणांनो, “आपले तारण मिळवून घेण्याचा प्रयत्न करत राहा”

“तुम्ही नेहमीच आज्ञा पाळत आला आहात. त्याच प्रकारे . . . भीतभीत व थरथर कापत आपले तारण मिळवून घेण्याचा प्रयत्न करत राहा.” —फिलिप्पै. २:१२.

गीत क्रमांक: ४१, ११

१. बाप्तिस्मा घेणं महत्त्वाचं का आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

दरवर्षी हजारो बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा घेतात. यांपैकी बरेच जण तरुण किंवा लहान मुलं असतात. ही मुलं कदाचित ख्रिस्ती कुटुंबात वाढलेली असतात. तुम्हीही अशा मुलांपैकी एक आहात का? असल्यास, तुम्ही नक्कीच एक चांगलं पाऊल उचललं आहे. कारण, तारण आणि सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीचा बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे.—मत्त. २८:१९, २०; १ पेत्र ३:२१.

२. समर्पणाचं पाऊल उचलण्याची तुम्हाला भीती का वाटू नये? हे पाऊल उचलण्याचं टाळणं योग्य का ठरणार नाही?

तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हापासून यहोवा तुम्हाला अनेक नवीन मार्गांनी आशीर्वाद देऊ लागला. पण त्यासोबतच काही नवीन जबाबदाऱ्‍याही तुमच्यावर आल्या. कोणत्या अर्थाने? तुमच्या बाप्तिस्म्याच्या दिवशी ज्या बांधवाने बाप्तिस्म्याचं भाषण दिलं, त्याने तुम्हाला असा प्रश्‍न विचारला: “येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधारावर तुम्ही, तुमच्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करून यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचं जीवन त्याला समर्पित केलं आहे का?” आणि तुम्ही “हो” असं उत्तर दिलं होतं. तेव्हा, तुम्ही यहोवावर प्रेम करत राहण्याचं आणि तुमच्या जीवनात त्याच्या सेवेला नेहमी पहिल्या स्थानी ठेवण्याचं एक गंभीर वचन दिलं होतं. मग तुम्हाला याचा पस्तावा झाला पाहिजे का? कधीच नाही! तुमच्या जीवनात यहोवाला मार्गदर्शक म्हणून स्वीकारण्याचा तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही. ज्यांना यहोवाची ओळख नाही ते सैतानाच्या जगाचा भाग आहेत. आणि त्याला अशा लोकांची आणि तुमची जराही काळजी नाही. उलट, यहोवाला नाकारून तुम्ही जर सैतानाची बाजू घेतली आणि आपली सर्वकाळ जगण्याची आशा सोडून दिलीत, तर त्याला आनंदच होईल.

३. तुम्ही यहोवाला सर्मपण केल्यामुळे त्याने तुम्हाला कसं आशीर्वादित केलं आहे?

समर्पण करून बाप्तिस्मा घेतल्यामुळे यहोवाने तुम्हाला कसं आशीर्वादित केलं आहे, याचा विचार करा. तुम्ही तुमचं जीवन यहोवाला दिल्यामुळे तुम्ही खात्रीने असं म्हणाल: “परमेश्‍वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” (स्तो. ११८:६) खरंच, यहोवाच्या बाजूने असणं आणि त्याला आपला अभिमान आहे ही जाणीव असणं यापेक्षा मोठा बहुमान कोणताच असू शकत नाही!

एक वैयक्‍तिक जबाबदारी

४, ५. (क) समर्पण ही एक वैयक्‍तिक जबाबदारी आहे असं आपण का म्हणू शकतो? (ख) तरुण असो वा मोठे, सर्वच ख्रिश्‍चनांपुढे कोणत्या समस्या येतात?

यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध, म्हणजे वारशाने मिळालेली जमीन किंवा मालमत्ता नाही. तुम्ही जरी तुमच्या आईवडिलांसोबत राहत असाल, तरी हे लक्षात ठेवा की यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध ही तुमची वैयक्‍तिक जबाबदारी आहे. हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण भविष्यात आपल्या विश्‍वासाची परीक्षा कशी होईल, हे आपल्यापैकी कोणालाच माहीत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही कदाचित लहान असताना बाप्तिस्मा घेतला असेल. पण आता तुम्ही तरुण झाला आहात आणि नव्या भावना, नव्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागत आहे. एका तरुण मुलीने म्हटलं: “एक लहान मूल शाळेत वाढदिवसाचा केक खायला मिळाला नाही, म्हणून यहोवाचा साक्षीदार असल्याबद्दल सहसा वाईट वाटून घेणार नाही. पण मोठं झाल्यावर जेव्हा लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा तीव्र होते, तेव्हा त्याला याबद्दल पक्की खात्री असणं आवश्‍यक आहे, की यहोवाच्या नियमांचं पालन करणंच योग्य आहे.”

पण तरुणांनाच नवीन समस्यांचा सामना करावा लागतो, असं नाही. जे मोठेपणी बाप्तिस्मा घेतात अशांच्याही विश्‍वासाची परीक्षा होते. त्यांनी अपेक्षाही केली नव्हती, अशा समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. मग त्या समस्या कदाचित विवाहात असू शकतात किंवा आरोग्य व नोकरी यांबद्दल असू शकतात. आपण लहान असो वा मोठे, आपल्यापैकी प्रत्येकाने सर्व परिस्थितींत यहोवाला विश्‍वासू राहिलं पाहिजे.—याको. १:१२-१४.

६. (क) कोणतीही अट न ठेवता यहोवाला तुम्ही समर्पण केलं आहे याचा काय अर्थ होतो? (ख) फिलिप्पैकर ४:११-१३ या वचनांतून आपल्याला काय शिकायला मिळतं?

तुम्ही कोणतीही अट न ठेवता यहोवाला वचन दिलं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे, तुम्हाला विश्‍वासू राहायला मदत होईल. याचा अर्थ, तुम्ही सर्वात महान देवाला असं वचन दिलं होतं, की काहीही झालं तरी तुम्ही त्याची सेवा करण्याचं सोडणार नाही; अगदी तुमच्या मित्रांनी किंवा आईवडिलांनी देवाची सेवा करण्याचं सोडून दिलं तरीही. (स्तो. २७:१०) तुमचं वचन तुम्हाला पाळता यावं, म्हणून सर्व परिस्थितींत यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा.—फिलिप्पैकर ४:११-१३ वाचा.

७. “भीतभीत व थरथर कापत” आपले तारण मिळवून घेण्याचा प्रयत्न करणं, याचा काय अर्थ होतो?

तुम्ही यहोवाचे मित्र बनावं अशी त्याची इच्छा आहे. पण यहोवाशी मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आणि तारण मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत घेणं गरजेचं आहे. फिलिप्पैकर २:१२ मध्ये असं सांगितलं आहे: “तुम्ही भीतभीत व थरथर कापत आपले तारण मिळवून घेण्याचा प्रयत्न करत राहा.” त्यामुळे यहोवाशी असलेला नातेसंबंध आपण कसा टिकवून ठेवू शकतो आणि सर्व परिस्थितींत त्याला विश्‍वासू कसं राहू शकतो, यांबद्दल आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. यहोवाला विश्‍वासू राहणं सोपं आहे, असा विचार आपण करू नये. कारण अनेक वर्षांपासून देवाची सेवा करणारे काही सेवक त्याला विश्‍वासू राहिले नाहीत. मग तारण मिळवण्यासाठी कोणत्या व्यावहारिक गोष्टी तुमची मदत करू शकतात?

बायबलचा अभ्यास महत्त्वाचा

८. वैयक्‍तिक अभ्यास म्हणजे काय? आणि तो महत्त्वाचा का आहे?

यहोवाचे मित्र बनण्यासाठी आपण त्याचं ऐकलं पाहिजे आणि त्याच्यासोबत बोललंही पाहिजे. यहोवाचं ऐकण्याचा मुख्य मार्ग म्हणजे बायबलचा अभ्यास करणं. यात बायबल व त्यावर आधारित असलेलं साहित्य वाचणं आणि त्यावर खोलवर विचार करणं सामील आहे. शाळेतल्या परीक्षेसाठी तयारी करताना कदाचित तुम्ही उत्तरं तोंडपाठ करत असाल. पण बायबलचा अभ्यास करण्यात बऱ्‍याच गोष्टींचा समावेश होतो. बायबलचा अभ्यास करणं, म्हणजे यहोवाबद्दल नव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी जणू एका प्रवासाला निघणं. असं केल्यामुळे, तुम्ही देवाच्या जवळ जाल आणि तोही तुमच्या जवळ येईल.—याको. ४:८.

तुम्ही यहोवासोबत चांगल्या प्रकारे संभाषण करत आहात का? (परिच्छेद ८-११ पाहा)

९. वैयक्‍तिक अभ्यास करताना तुम्हाला कोणत्या साधनांमुळे मदत झाली आहे?

बायबलचा अभ्यास करण्यासाठी यहोवाच्या संघटनेने अनेक साधनं दिली आहेत. उदाहरणार्थ, jw.org/hi वर “नौजवानों के लिए” या टॅबखाली “पढो, समझो और करो” असं नाव असलेली शृंखला, बायबल अहवालांतून शिकलेल्या गोष्टी लागू करण्यासाठी मदतीची ठरू शकेल. तसंच, “अभ्यास” या भागात “बायबल असल में क्या सिखाती है?” या पुस्तकावर आधारित असलेली शृंखला, तुम्हाला तुमचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी आणि इतरांना आपल्या विश्‍वासाबद्दल समजवण्यासाठी मदत करेल.  ” या पुस्तकावर आधारित असलेली शृंखला, तुम्हाला तुमचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी आणि इतरांना आपल्या विश्‍वासाबद्दल समजवण्यासाठी मदत करेल. वैयक्‍तिक अभ्यास कसा करावा याबद्दलचे काही उपयुक्‍त सल्ले, तुम्हाला टेहळणी बुरूज क्र. १ २०१७ याच्या पृ. ४-६ वर वाचायला मिळतील. तारण मिळवण्यासाठी अभ्यास करणं आणि खोलवर विचार करणं खूप महत्त्वाचं आहे.—स्तोत्र ११९:१०५ वाचा.

प्रार्थना महत्त्वाची

१०. बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्‍चनाने प्रार्थना करणं का गरजेचं आहे?

१० आपण बायबल वाचतो तेव्हा यहोवाचं ऐकत असतो आणि प्रार्थना करतो तेव्हा देवासोबत बोलत असतो. त्यामुळे प्रार्थना करणं ही फक्‍त एक सवय नाही किंवा काही लोक यशस्वी होण्यासाठी जसं जप करतात त्यालाही प्रार्थना म्हणता येणार नाही. मग प्रार्थना करणं म्हणजे नेमकं काय? प्रार्थना करणं म्हणजे आपल्या निर्माणकर्त्याशी बोलणं. जरा विचार करा, यहोवाला तुमचं ऐकण्याची इच्छा आहे! (फिलिप्पैकर ४:६ वाचा.) कोणत्याही गोष्टीमुळे जर तुम्ही चिंतित असाल तर बायबल सांगतं, “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक.” (स्तो. ५५:२२) लाखो बंधुभगिनी त्यांच्या अनुभवावरून सांगू शकतात, की या सल्ल्यामुळे त्यांना खूप फायदा झाला आहे. आणि या सल्ल्याचा तुम्हालाही नक्कीच फायदा होईल!

११. आपण नेहमी यहोवाचे आभार का मानले पाहिजेत?

११ पण आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज असते, फक्‍त तेव्हाच आपण प्रार्थना करू नये. बायबल आपल्याला “कृतज्ञता दाखवा” असं सांगतं. (कलस्सै. ३:१५) कधीकधी आपण आपल्या समस्यांबद्दल इतकी काळजी करू लागतो, की आपल्याजवळ असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी आपण विसरून जातो. असं होऊ नये म्हणून तुम्ही एक गोष्ट करू शकता. ती म्हणजे: रोज कमीत कमी अशा तीन गोष्टींचा विचार करा, ज्यांबद्दल तुम्ही यहोवाचे आभारी आहात. मग प्रार्थनेत यहोवाचे त्याबद्दल आभार माना. वयाच्या १२ व्या वर्षी बाप्तिस्मा घेतलेल्या, अबीगेल नावाच्या तरुण बहिणीने म्हटलं: “या विश्‍वात सर्वात जास्त जर कोणाचे आभार मानायचे असतील, तर तो यहोवाच आहे. त्याने आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी दिल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीबद्दल, आपण त्याचे आभार मानले पाहिजेत.” म्हणून अबीगेल कधीकधी स्वतःला आठवण करून देते, की तिच्याकडे जे काही आहे ते खरंतर यहोवानेच दिलं आहे आणि त्यासाठी तिने त्याचे नेहमी आभार मानले पाहिजेत. *

व्यक्‍तिगत अनुभव मोलाचा

१२, १३. यहोवाच्या चांगुलपणाचा कोणता व्यक्‍तिगत अनुभव तुम्हाला आला आहे? यहोवाने तुमची मदत कशी केली याबद्दल विचार करणं गरजेचं का आहे?

१२ अनेक कठीण समस्यांचा सामना करण्यासाठी यहोवाने दावीद राजाला मदत केली. त्यामुळेच आपल्या व्यक्‍तिगत अनुभवावरून दावीद हे म्हणू शकला, की “परमेश्‍वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य!” (स्तो. ३४:८) या वचनावरून आपल्याला हे समजतं, की यहोवा किती चांगला आहे याचा अनुभव आपण स्वतः घेणं गरजेचं आहे. आपण बायबल व आपली प्रकाशने वाचतो, तसंच सभांना उपस्थित राहतो तेव्हा इतरांना विश्‍वासू राहायला यहोवाने कशी मदत केली आहे हे आपण शिकतो. पण तुमचं यहोवाशी नातं जसजसं मजबूत होत जातं, तसतसं यहोवाने तुम्हाला कशी मदत केली, हे पाहणं गरजेचं आहे. यहोवा किती चांगला आहे याचा व्यक्‍तिगत अनुभव तुम्हाला कधी आला आहे का?

१३ यहोवा किती चांगला आहे, हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने एका खास पद्धतीने अनुभवलं आहे. त्याने आपल्या प्रत्येकाला त्याच्या आणि त्याच्या मुलासोबत नातं जोडण्याचं आमंत्रण दिलं आहे. येशूने म्हटलं: “ज्याने मला पाठवलं त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहा. ६:४४) यहोवाने तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित केलं आहे असं तुम्हाला वाटतं का, की ‘यहोवाने माझ्या आईवडिलांनाच त्याच्याकडे आकर्षित केलं आहे आणि मी त्यांच्या मागे आलो,’ असं तुम्हाला वाटतं? हे लक्षात ठेवा, की तुम्ही यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेतला तेव्हापासून तुमचं स्वतःचं त्याच्याशी एक खास नातं जुळलं आहे. बायबल आपल्याला म्हणतं: “जर कोणी देवावर प्रेम करत असेल, तर देव त्याला ओळखतो.” (१ करिंथ. ८:३) त्यामुळे यहोवाच्या संघटनेत तुमचं जे स्थान आहे, त्याची नेहमी कदर बाळगा.

१४, १५. तुमचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी सेवाकार्य तुमची कशी मदत करू शकतं?

१४ तुम्ही शाळेत किंवा सेवाकार्यात तुमच्या विश्‍वासाबद्दल इतरांशी बोलता, तेव्हा यहोवा तुम्हाला धैर्य देतो. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा त्याचा चांगुलपणा अनुभवता. शाळेतल्या इतर मुलांना साक्ष देणं कदाचित तुम्हाला अवघड वाटू शकतं. ते कशी प्रतिक्रिया देतील याबद्दल कदाचित तुम्हाला चिंता वाटेल. खासकरून, जास्त लोकांसमोर आपल्या विश्‍वासाबद्दल बोलताना तुम्हाला भीती वाटेल. अशा वेळी कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत मिळेल?

१५ तुमच्या विश्‍वासांबद्दल तुम्हाला खात्री का पटली होती याचा विचार करा. jw.org या वेबसाइटवर ‘स्टडीगाईड’ दिलं आहे आणि हे हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. तुमचा विश्‍वास काय आहे, त्यावर तुमचा भरवसा का आहे, हे समजायला तुम्हाला या साधनामुळे मदत होईल. तसंच, इतरांना तुमच्या विश्‍वासांबद्दल समजावून सांगायलासुद्धा मदत होईल. जेव्हा तुमच्या विश्‍वासांबद्दल तुम्हाला पूर्ण खात्री असते आणि तुम्ही चांगली तयारी करता, तेव्हा यहोवाबद्दल सांगण्यासाठी तुम्ही उत्सुक असता.—यिर्म. २०:८, ९.

१६. तुमच्या विश्‍वासाबद्दल साक्ष देण्यासाठी तुम्हाला कशामुळे धैर्य मिळेल?

१६ तुम्ही जरी चांगली तयारी केली असली, तरी इतरांना तुमच्या विश्‍वासाबद्दल समजवताना कदाचित तुम्हाला भीती वाटेल. एका बहिणीचा बाप्तिस्मा वयाच्या १३ व्या वर्षी झाला होता. आता ती १८ वर्षांची आहे, ती म्हणते: “माझा विश्‍वास काय आहे हे मला माहीत आहे. पण माझे विचार शब्दात मांडणं कधीकधी मला जमत नाही.” म्हणून मग ती साक्ष देताना सहज आणि शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते: “माझे वर्गसोबती जे काही करतात त्याबद्दल ते अगदी सहज बोलतात, मी पण तसंच करायला हवं. त्यामुळे मग त्यांच्याशी बोलता बोलता मी असं म्हणते, ‘त्या दिवशी मी बायबलबद्दल शिकवत होते तेव्हा . . . ’ मग मी पुढे काय झाले ते सांगते. मी जरी त्यांच्याशी बायबलबद्दल बोलत नसले, तरी इतरांना मग ही उत्सुकता असते, की मी बायबल शिकवताना नेमकं काय करते. कधीकधी तर ते मला त्याबद्दल प्रश्‍नही विचारतात. मी जेव्हा जेव्हा या पद्धतीने बोलते, तेव्हा तेव्हा साक्ष देणं मला सोपं जातं आणि त्यानंतर मला अगदी छान वाटतं!”

१७. इतरांना साक्ष देताना तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?

१७ इतर जण जेव्हा हे पाहतात की तुम्हाला त्यांची काळजी आहे आणि तुम्ही त्यांचा आदर करता, तेव्हा तुमच्याबद्दल व तुमच्या विश्‍वासाबद्दल आदर दाखवायला त्यांना सोपं जाईल. १७ वर्षांची ऑलिव्या, जिचा लहान असताना बाप्तिस्मा झाला होता, असं म्हणते: “मला नेहमी या गोष्टीची भीती वाटायची, की लोकांशी बोलताना जर मी बायबलचा विषय काढला तर ते मला धर्माचं वेड लागलं आहे असं म्हणतील.” पण नंतर तिचा दृष्टिकोन बदलू लागला. आपल्या भीतीविषयी खूप जास्त विचार करण्याऐवजी, तिने असा विचार केला: “अनेक तरुणांना यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काहीच माहीत नाही. ते आम्हालाच ओळखतात. त्यामुळे आम्ही ज्या प्रकारे वागू, त्यावरून ते कशी प्रतिक्रिया देतील हे ठरेल. जर आम्हाला सत्याबद्दल सांगायला संकोच वाटत असेल, अवघड जात असेल किंवा साक्ष देताना आम्ही अडखळत असू, तर आम्हाला यहोवाचे साक्षीदार असण्याचा जराही अभिमान नाही असं त्यांना वाटेल. आम्ही धैर्याने त्यांच्याशी बोलू शकलो नाही, तर त्यामुळे ते कदाचित चांगली प्रतिक्रिया देणार नाहीत. पण याउलट, जर आम्ही पूर्ण विश्‍वासाने व सहजपणे त्यांच्याशी आमच्या विश्‍वासांबद्दल बोललो जणू तो विषय आमच्या दररोजच्या संभाषणाचा एक भाग आहे, तर ते आमचा आदर करण्याची शक्यता जास्त आहे.”

आपले तारण मिळवून घेण्याचा प्रयत्न करत राहा

१८. तारण मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे?

१८ आपण पाहिलं की तारण मिळवून घेण्याचा प्रयत्न करणं ही एक गंभीर जबाबदारी आहे. असं करण्यासाठी आपण बायबलचं वाचन केलं पाहिजे आणि त्यावर खोलवर विचार केला पाहिजे. तसंच, यहोवाला प्रार्थना केली पाहिजे व त्याने तुम्हाला व्यक्‍तिगत रीत्या सर्व बाबतीत कशी मदत केली, याबद्दल विचार केला पाहिजे. या सर्व गोष्टी केल्यामुळे यहोवा तुमचा मित्र आहे, याची तुम्हाला पक्की खात्री पटेल. यामुळे आपल्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगण्यासाठी तुम्ही प्रेरित व्हाल.—स्तोत्र ७३:२८ वाचा.

१९. तारण मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली तरी ती व्यर्थ का जाणार नाही?

१९ येशूने म्हटलं: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल तर त्याने स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ उचलून माझ्यामागे चालत राहावं.” (मत्त. १६:२४) येशूचं अनुकरण करण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने यहोवाला समर्पण करणं आणि बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. पण ही खरंतर एका सुंदर जीवनाची फक्‍त सुरुवात आहे. त्यानंतर देवाच्या नवीन जगात सर्वकाळाचं जीवन आपल्याला मिळेल. त्यामुळे तारण मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत राहा.

^ परि. 11 या विषयावर आणखी माहितीसाठी jw.org या वेबसाइटवर, “यंग पीपल आस्क—वाय शुड आय प्रे” आणि त्याच्याशी संबंधित असलेली वर्कशीट पाहा.