व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी “देवाकडे आशा बाळगतो”

मी “देवाकडे आशा बाळगतो”

“शेवटला आदाम जीवन देणारा आत्मा बनला.”—१ करिंथ. १५:४५.

गीत क्रमांक: १२, २४

१-३. (क) आपल्या मुख्य शिकवणींमध्ये आपण कोणत्या शिकवणीचा समावेश केला पाहिजे? (ख) पुनरुत्थानाची शिकवण महत्त्वाची का आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

“तुमच्या मुख्य शिकवणी काय आहेत?” असा प्रश्‍न जर कोणी तुम्हाला विचारला, तर तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही नक्कीच म्हणाल, की यहोवा या विश्‍वाचा निर्माणकर्ता आहे आणि त्यानेच आपल्याला जीवन दिलं आहे असा आमचा विश्‍वास आहे. तसंच ज्याने आपल्यासाठी खंडणी बलिदान दिलं, त्या येशू ख्रिस्तावरही आमचा विश्‍वास आहे. याशिवाय लवकरच या पृथ्वीचं रूपांतर नंदनवनात होऊन देवाचे लोक त्यात राहतील असंही तुम्ही म्हणाल. पण या यादीत तुम्ही पुनरुत्थानाच्या शिकवणीचाही समावेश कराल का? ही शिकवण तुमच्यासाठी वैयक्‍तिक रीत्या खूप महत्त्वाची आहे, असं तुम्ही म्हणाल का?

आपण मोठ्या संकटातून बचावून पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन जगण्याची आशा बाळगत असलो, तरीसुद्धा पुनरुत्थानाची शिकवण ही एक मुख्य शिकवण आहे असं मानण्याची अनेक कारणं आपल्याकडे आहेत. ही शिकवण इतकी महत्त्वाची का आहे, याचं एक कारण प्रेषित पौलने दिलं. तो म्हणाला: “जर मेलेल्यांचे पुनरुत्थान होणार नसेल, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही.” खरंच, येशूचं पुनरुत्थान झालं नसतं, तर आज तो स्वर्गात राज्य करत नसता आणि आपल्या प्रचारकार्यालाही अर्थ राहिला नसता. (१ करिंथकर १५:१२-१९ वाचा.) पण येशूचं पुनरुत्थान झालं हे आपल्याला माहीत आहे. पुनरुत्थानावर विश्‍वास न ठेवणाऱ्‍या सदुकी लोकांसारखे आपण नाहीत. येशूच्या पुनरुत्थानावर आपला पक्का विश्‍वास आहे. इतरांनी आपली थट्टा केली, तरी देव मृत लोकांचं पुनरुत्थान करू शकतो यावरचा आपला विश्‍वास कमी होत नाही.—मार्क १२:१८; प्रे. कार्ये ४:२, ३; १७:३२; २३:६-८.

पौलने म्हटलं, की पुनरुत्थानाची शिकवण ही “ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक” शिकवणींचा भाग आहे. (इब्री ६:१, २) आणि पुनरुत्थानावर त्याचा स्वतःचाही विश्‍वास आहे, असं तो ठामपणे म्हणाला. (प्रे. कार्ये २४:१०, १५, २४, २५) पुनरुत्थान ही जरी “प्राथमिक” शिकवण, म्हणजेच देवाच्या वचनातल्या मूलभूत शिकवणींपैकी एक असली, तरी आपण तिचा खोलवर अभ्यास केला पाहिजे. (इब्री ५:१२) असं करणं का गरजेचं आहे?

४. पुनरुत्थानाबद्दल लोक कोणते प्रश्‍न विचारू शकतात?

बायबलचा अभ्यास करताना लोक सहसा पूर्वी होऊन गेलेल्या पुनरुत्थानाच्या घटनांविषयी शिकतात; जसं की लाजरचं पुनरुत्थान. तसंच, भविष्यात मृत लोक पुन्हा जिवंत होतील असा विश्‍वास बाळगणाऱ्‍या अब्राहाम, ईयोब आणि दानीएल यांच्याबद्दलही ते शिकतात. पण समजा तुम्हाला पुढे दिलेले प्रश्‍न कोणी विचारले, तर तुम्ही काय उत्तर द्याल: ‘शेकडो वर्षांपूर्वी दिलेलं पुनरुत्थानाचं अभिवचन भविष्यात नक्की पूर्ण होईल, हे तुम्ही बायबलमधून सिद्ध करू शकता का?’ ‘भविष्यात पुनरुत्थान नक्की केव्हा होईल?’ या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेतल्यामुळे आपलाही विश्‍वास नक्कीच मजबूत होईल.

शेकडो वर्षांपूर्वी भाकीत केलेलं पुनरुत्थान

५. आपण आधी कशाची चर्चा करणार आहोत?

एखाद्याच्या मृत्यूनंतर लगेच त्याचं पुनरुत्थान झाल्याची कल्पना करणं, कदाचित आपल्याला सोपं जाईल. (योहा. ११:११; प्रे. कार्ये २०:९, १०) पण समजा कोणी असं अभिवचन दिलं, की एखाद्या व्यक्‍तीचं पुनरुत्थान शेकडो वर्षांनंतर होईल; मग त्या व्यक्‍तीचा मृत्यू काही काळापूर्वी झालेला असो किंवा अनेक वर्षांपूर्वी. अशा अभिवचनावर विश्‍वास ठेवणं तुम्हाला सोपं जाईल का? खरंतर, पुनरुत्थानाच्या अशा एका अभिवचनावर तुम्ही आधीपासूनच विश्‍वास ठेवत आहात. अभिवचन दिल्याच्या शेकडो वर्षांनंतर हे पुनरुत्थान घडलं. ते पुनरुत्थान कोणतं होतं? आणि भविष्यात होणाऱ्‍या पुनरुत्थानाच्या तुमच्या आशेसोबत त्याचा काही संबंध आहे का?

६. स्तोत्र ११८ मधील भविष्यवाणीचा येशूसोबत कसा संबंध आहे?

अनेक वर्षांआधी भाकीत करण्यात आलेल्या त्या पुनरुत्थानाबद्दल आता आपण चर्चा करू या. त्याबद्दल, ११८ व्या स्तोत्रात सांगण्यात आलं आहे. हे स्तोत्र कदाचित दावीदने लिहिलं असावं. त्यात म्हटलं आहे: “हे परमेश्‍वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचे तारण कर.” आणि “परमेश्‍वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो.” येशू, आपल्या मृत्यूच्या काही दिवसांआधी, म्हणजेच निसान ९ ला यरुशलेममध्ये गाढवीच्या पिल्लावर बसून आला, तेव्हा लोकांनी मसीहाबद्दल असलेल्या या भविष्यवाणीचा उल्लेख केला होता. (स्तो. ११८:२५, २६; मत्त. २१:७-९) पण स्तोत्र ११८ मध्ये, अनेक वर्षांनंतर होणाऱ्‍या पुनरुत्थानाचा कसा काय उल्लेख करण्यात आला? या स्तोत्रात पुढे आणखी काय म्हटलं आहे त्याकडेही लक्ष द्या. तिथं म्हटलं आहे: “बांधणाऱ्‍यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे.”—स्तो. ११८:२२.

“बांधणाऱ्‍यांनी” मसीहाला नाकारलं (परिच्छेद ७ पाहा)

७. यहुद्यांनी येशूला कशा प्रकारे नाकारलं?

ज्या “बांधणाऱ्‍यांनी” मसीहाला नाकारलं, ते यहुदी धर्मपुढारी होते. त्यांनी फक्‍त येशूकडे पाठ फिरवली किंवा तो ख्रिस्त असल्याचं नाकारलं असं नाही, तर त्याचा वध करण्यात यावा अशी मागणीही पिलातकडे केली. (लूक २३:१८-२३) त्यामुळे येशूच्या मृत्यूसाठी तेही जबाबदार होते.

“कोपऱ्‍याचा मुख्य दगड” बनण्यासाठी येशूचं पुनरुत्थान करण्यात आलं (परिच्छेद ८ व ९ पाहा)

८. येशू कोनशिला अर्थात “कोपऱ्‍याचा मुख्य दगड” कसा बनला?

येशूला जर नाकारण्यात आलं होतं आणि त्याचा वध करण्यात आला होता, तर मग तो “कोनशिला” * कसा बनणार होता? हे केवळ येशूच्या पुनरुत्थानामुळेच शक्य होणार होतं. ही गोष्ट, येशूने दिलेल्या द्राक्षमळ्याच्या मालकाच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. त्या उदाहरणात, द्राक्षमळ्याचा मालक त्याच्यासाठी काम करणाऱ्‍या माळ्यांकडे आपल्या दासांना पाठवतो. पण, ते माळी दासांना वाईट वागणूक देतात. मग मालक असा विचार करतो, की ते कदाचित आपल्या मुलाचं ऐकतील. आणि म्हणून तो आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवतो. पण माळी त्यालाही ठार मारतात. हे उदाहरण सांगितल्यानंतर येशूने स्तोत्र ११८:२२ मधल्या भविष्यवाणीचा उल्लेख केला. (लूक २०:९-१७) प्रेषित पेत्रनेही, यरुशलेममध्ये जमलेले “अधिकारी, वडील जन आणि शास्त्री” यांच्याशी बोलताना याच वचनाचा उल्लेख केला. तो त्यांना म्हणाला की नासरेथच्या येशूला “तुम्ही वधस्तंभावर खिळून ठार मारलं,” पण त्याला “देवाने मेलेल्यांतून उठवलं.” मग पेत्र म्हणाला, “‘बांधकाम करणाऱ्‍यांनी, म्हणजे तुम्ही जो दगड तुच्छ लेखला व जो कोपऱ्‍याचा मुख्य दगड बनला आहे,’ तोच हा आहे.”—प्रे. कार्ये ३:१५; ४:५-११; १ पेत्र २:५-७.

९. स्तोत्र ११८:२२ मध्ये कोणत्या उल्लेखनीय घटनेबद्दल भाकीत करण्यात आलं होतं?

तर मग हे स्पष्टच आहे की स्तोत्र ११८:२२ मधल्या भविष्यवाणीत, शेकडो वर्षांनंतर पूर्ण होणाऱ्‍या एका पुनरुत्थानाबद्दल सांगण्यात आलं होतं. मसीहाला नाकारलं जाणार होतं आणि त्याचा वध केला जाणार होता. पण, त्याला पुन्हा जिवंतही केलं जाणार होतं आणि तो कोपऱ्‍याचा मुख्य दगड अर्थात कोनशिला बनणार होता. पुनरुत्थान झाल्यानंतर येशू एक अशी व्यक्‍ती बनली जिच्याद्वारे सर्वांचं तारण होऊ शकेल. कारण, तारणासाठी त्याच्या नावाशिवाय “माणसांमध्ये दुसरं कोणतंही नाव देण्यात आलेलं नाही.”—प्रे. कार्ये ४:१२; इफिस. १:२०.

१०. (क) स्तोत्र १६:१० मध्ये कोणती भविष्यवाणी करण्यात आली होती? (ख) स्तोत्र १६:१० मध्ये दावीद स्वतःबद्दल बोलत नव्हता हे कशावरून म्हणता येईल?

१० पुनरुत्थानाबद्दल भविष्यवाणी करण्यात आलेल्या आणखी एका वचनावर आपण विचार करू. ते पुनरुत्थान हजारपेक्षा जास्त वर्षांनंतर झालं. यामुळे भाकीत केलेलं पुनरुत्थान अनेक वर्षांनंतर होऊ शकतं, याची खात्री आपल्याला पटते. दावीदने १६ व्या स्तोत्रात लिहिलं: “तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्‍तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.” (स्तो. १६:१०) इथे दावीद असं म्हणत होता का, की तो कधीही मरणार नाही आणि कबरेत जाणार नाही? दावीद असं म्हणत नव्हता. कारण, बायबल स्पष्टपणे सांगतं, की दावीद वृद्ध होऊन “आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्यास दावीदपुरात मूठमाती” देण्यात आली. (१ राजे २:१, १०) मग १६ व्या स्तोत्रात कोणाबद्दल सांगण्यात आलं आहे?

११. पेत्रने स्तोत्र १६:१० या वचनाचं स्पष्टीकरण केव्हा दिलं?

११ दावीदने स्तोत्र १६:१० मधले शब्द लिहिले त्याच्या एक हजारपेक्षा जास्त वर्षांनंतर, पेत्रने या वचनाचं स्पष्टीकरण दिलं. येशूचं पुनरुत्थान झालं त्याच्या काही आठवड्यांनंतर यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेल्या हजारो लोकांशी पेत्र बोलत होता. (प्रेषितांची कार्ये २:२९-३२ वाचा.) पेत्रने त्यांना या गोष्टीची आठवण करून दिली, की दावीद मरण पावला आणि त्याला पुरण्यात आलं. त्यानंतर जेव्हा पेत्रने म्हटलं, की दावीदला “ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल आधीच माहीत होतं” तेव्हा त्याच्या या बोलण्यावर कोणी आक्षेप घेतला असं बायबलमध्ये सांगण्यात आलेलं नाही.

१२. स्तोत्र १६:१० या वचनाची पूर्णता कशी झाली? आणि त्यावरून आपल्याला कोणती खात्री पटते?

१२ पेत्रने आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी स्तोत्र ११०:१ मधल्या दावीदच्या शब्दांचा उल्लेख केला. (प्रेषितांची कार्ये २:३३-३६ वाचा.) त्याने शास्त्रवचनांवर ज्या प्रकारे तर्कवाद केला, त्यामुळे तिथे जमलेल्या मोठ्या जमावाला याची खात्री पटली, की येशूच “प्रभू व ख्रिस्त” होता. आणि येशूचं पुनरुत्थान झालं त्या वेळी स्तोत्र १६:१० मधली भविष्यवाणी पूर्ण झाली हे त्यांच्या लक्षात आलं. पुढे, प्रेषित पौल पिसिदियातल्या अंत्युखिया शहरातील यहुद्यांशी बोलत होता, तेव्हा त्यानेही हा विषय स्पष्ट करण्यासाठी शास्त्रवचनांवर चांगला तर्कवाद केला. त्यामुळे तिथे जमलेले लोक खूप प्रभावित झाले आणि आणखी जाणून घेण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण झाली. (प्रेषितांची कार्ये १३:३२-३७, ४२ वाचा.) येशूच्या पुनरुत्थानाबद्दल बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्या शेकडो वर्षांनंतर पूर्ण झाल्या. त्यामुळे आपल्याला खात्री पटते, की त्या भरवशालायक होत्या.

पुनरुत्थान नक्की केव्हा होईल?

१३. पुनरुत्थानाबद्दल कोणते काही प्रश्‍न कदाचित आपल्या मनात येतील?

१३ पुनरुत्थानाचं अभिवचन शेकडो वर्षांनंतर पूर्ण होऊ शकतं, हे जाणून खरंच खूप दिलासा मिळतो. पण कदाचित काही जण असं विचारतील: ‘याचा अर्थ असा होतो का, की माझ्या प्रियजनांना पुन्हा भेटण्यासाठी मला खूप काळ थांबावं लागेल?’ ‘पुनरुत्थान नक्की केव्हा होईल?’ येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं होतं, की काही गोष्टी त्यांना माहीत नाहीत आणि त्या माहीत करून घेणं अशक्य आहे. कारण, असे काही ‘काळ व समय’ आहेत जे पित्याने त्याच्या “इच्छेनुसार ठरवले आहेत” आणि ते त्याच्या अधिकारात आहेत. (प्रे. कार्ये १:६, ७; योहा. १६:१२) पण, पुनरुत्थान केव्हा होईल याची थोडीफार माहिती आपल्याकडे आहे.

१४. येशूचं पुनरुत्थान, हे त्याच्याआधी झालेल्या पुनरुत्थानांपेक्षा वेगळं कसं होतं?

१४ बायबलमध्ये पुनरुत्थानाचे जे अहवाल देण्यात आले आहेत, त्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचं पुनरुत्थान येशूचं आहे. कारण, जर येशूचं पुनरुत्थान झालं नसतं, तर आपल्या मृत प्रियजनांना भेटण्याची आशा आपल्याला कधीच मिळाली नसती. येशूच्या आधी ज्यांचं पुनरुत्थान झालं ते काही सदासर्वकाळ जिवंत राहिले नाहीत. जसं की, एलीया आणि अलीशा यांनी ज्या लोकांचं पुनरुत्थान केलं ते कालांतराने पुन्हा मेले आणि मातीत मिळाले. पण, येशूला मात्र “मेलेल्यांतून उठवण्यात आले असल्यामुळे तो पुन्हा कधीही मरणार नाही; मरणाचा आता त्याच्यावर अधिकार राहिला नाही.” उलट स्वर्गात तो “सदासर्वकाळ” जिवंत राहील.—रोम. ६:९; प्रकटी. १:५, १८; कलस्सै. १:१८; १ पेत्र ३:१८.

१५. येशूला “प्रथमफळ” असं का म्हणण्यात आलं आहे?

१५ येशूचं आत्मिक स्वरूपात पुनरुत्थान झालं. आणि अशा प्रकारचं हे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पुनरुत्थान होतं. (प्रे. कार्ये २६:२३) पण फक्‍त येशूचंच स्वर्गात जाण्यासाठी पुनरुत्थान झालं असं नाही. त्याने आपल्या विश्‍वासू प्रेषितांना वचन दिलं होतं, की तेही स्वर्गात त्याच्यासोबत राज्य करतील. (लूक २२:२८-३०) अर्थात, हे बक्षीस त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांना मिळणार होतं. ख्रिस्ताप्रमाणेच त्यांचंही आत्मिक शरीरात पुनरुत्थान होणार होतं. याबद्दल पौलने लिहिलं: “ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आले आहे; तो मरण पावलेल्यांपैकी प्रथमफळ आहे.” त्याने सांगितलं की स्वर्गात जाण्यासाठी इतर काहींचंही पुनरुत्थान केलं जाईल. पुढे तो म्हणाला: “प्रत्येक जण आपल्या उचित क्रमानुसार: प्रथमफळ असलेला ख्रिस्त, आणि त्यानंतर जे ख्रिस्ताचे आहेत त्यांना त्याच्या उपस्थितीदरम्यान जिवंत केले जाईल.”—१ करिंथ. १५:२०, २३.

१६. स्वर्गीय पुनरुत्थान केव्हा होईल याची कल्पना आपल्याला कशावरून येते?

१६ स्वर्गीय पुनरुत्थान केव्हा होणार होतं, याची थोडीफार कल्पना आपल्याला पौलच्या शब्दांवरून येते. ते पुनरुत्थान ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान होणार होतं. ख्रिस्ताची उपस्थिती कधी सुरू झाली? यहोवाच्या साक्षीदारांनी अनेक वर्षांपूर्वी बायबलच्या आधारे हे सिद्ध केलं आहे, की ख्रिस्ताची उपस्थिती १९१४ मध्ये सुरू झाली. आज आपण त्याच्या ‘उपस्थितीच्या’ काळात जगत आहोत आणि या दुष्ट जगाचा अंत खूप जवळ आला आहे.

१७, १८. ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान अभिषिक्‍त जणांच्या बाबतीत काय होईल?

१७ स्वर्गीय पुनरुत्थानाबद्दल बायबलमध्ये आणखी माहिती दिली आहे. त्यात म्हटलं आहे: “जे मरण पावले आहेत त्यांच्याविषयी तुम्ही अंधारात असावे अशी आमची इच्छा नाही, . . . कारण येशू मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला या गोष्टीवर जर आपला विश्‍वास असेल, तर मग जे येशूद्वारे मरण पावले आहेत, त्यांनाही देव त्याच्यासोबत असण्याकरता जिवंत करेल. . . . जिवंत असलेल्यांपैकी जे आपण प्रभूच्या उपस्थितीपर्यंत हयात असू, ते मरण पावलेल्यांच्या पुढे जाणारच नाही; कारण, प्रभू स्वतः . . . आज्ञा देत स्वर्गातून उतरेल, आणि ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्यांपैकी जे मेले आहेत ते आधी जिवंत होतील. त्यानंतर, जिवंत असलेल्यांपैकी जे आपण हयात असू त्यांना आकाशात प्रभूला भेटण्यासाठी ढगांमध्ये उचलून घेतले जाईल आणि अशा रीतीने आपण सदासर्वदा प्रभूसोबत राहू.”—१ थेस्सलनी. ४:१३-१७.

१८ या वचनात सांगितल्याप्रमाणे काही जण “आधी जिवंत होतील.” आधी होणारं हे पुनरुत्थान ख्रिस्ताच्या उपस्थितीची सुरुवात झाल्याच्या काही काळानंतर सुरू होणार होतं. पुढे, मोठ्या संकटाच्या काळादरम्यान पृथ्वीवर असलेल्या अभिषिक्‍त लोकांना “ढगांमध्ये उचलून घेतले जाईल.” याचा काय अर्थ होतो? जे “ढगांमध्ये उचलून घेतले” जातील, ते “मृत्यूची झोप” घेणार नाहीत, म्हणजेच ते जास्त वेळ मृतावस्थेत राहणार नाहीत. तर त्यांच्या मृत्यूनंतर, “शेवटला कर्णा वाजण्याच्या वेळी, एका क्षणात, म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तोच” ते बदलून जातील.—१ करिंथ. १५:५१, ५२; मत्त. २४:३१.

१९. “अधिक चांगले पुनरुत्थान” काय आहे?

१९ आज विश्‍वासू ख्रिश्‍चनांपैकी बहुतेक जण अभिषिक्‍त नसून त्यांना ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्यासाठी निवडलेलं नाही. पण, ते त्या दिवसाची वाट पाहत आहेत जेव्हा यहोवा या दृष्ट जगाचा अंत करेल. हे नक्की कधी होईल हे कोणालाही माहीत नाही. पण, पुराव्यांवरून दिसून येतं की तो दिवस जवळ आहे. (१ थेस्सलनी. ५:१-३) देवाच्या नवीन जगात एका वेगळ्या प्रकारचं पुनरुत्थान होईल. त्या वेळी पृथ्वीवर जीवन जगण्यासाठी लोकांचं पुनरुत्थान केलं जाईल. आणि त्यांना परिपूर्ण जीवन जगण्याची आणि कधीही न मरण्याची आशा असेल. बायबल काळात ज्यांचं पुनरुत्थान झालं होतं ते कालांतराने मरण पावले. पण, त्या पुनरुत्थानाच्या तुलनेत भविष्यात होणारं पुनरुत्थान “अधिक चांगले पुनरुत्थान” असेल.—इब्री ११:३५.

२०. पुनरुत्थान हे क्रमाने किंवा सुव्यवस्थितपणे केलं जाईल याची आपण खात्री का बाळगू शकतो?

२० स्वर्गीय पुनरुत्थानाबद्दल बायबल सांगतं, की “प्रत्येक जण आपल्या उचित क्रमानुसार” उठवला जाईल. (१ करिंथ. १५:२३) त्यामुळे, पृथ्वीवर होणारं पुनरुत्थानसुद्धा क्रमानुसार किंवा सुव्यवस्थितपणे होईल अशी आपण खात्री बाळगू शकतो. पण, काहींच्या मनात कदाचित असे प्रश्‍न येतील, की ‘अलीकडच्या काळात ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांचं पुनरुत्थान हजार वर्षांच्या सुरुवातीच्या काळात केलं जाईल का? आणि त्यांना ओळखणारे त्यांचे नातेवाईक व मित्रपरिवार त्यांचं स्वागत करण्यासाठी तिथे असतील का? नवीन जगात देवाच्या लोकांची व्यवस्था पाहण्यासाठी, बायबलच्या काळात कुशलतेनं नेतृत्व केलेल्या विश्‍वासू पुरुषांचं लवकर पुनरुत्थान केलं जाईल का? यहोवाची कधीही सेवा न केलेल्या लोकांचं काय होईल? त्यांचं पुनरुत्थान केव्हा आणि कुठे होईल?’ असे कितीतरी प्रश्‍न आपल्याही मनात येऊ शकतात. पण, त्यांबद्दल आता विचार करत बसण्याची गरज नाही; पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी थांबून राहणंच योग्य राहील. या सर्व गोष्टी यहोवा कशा प्रकारे करेल हे पाहणं खरंच खूप रोमांचित करणारं असेल!

२१. तुम्ही कोणती आशा बाळगता?

२१ तोपर्यंत यहोवावरचा आपला विश्‍वास आपण मजबूत करत राहू या. यहोवाने येशूद्वारे असं अभिवचन दिलं आहे, की त्याच्या स्मरणात असलेल्या मृत लोकांचं तो लवकरच पुनरुत्थान करेल. (योहा. ५:२८, २९; ११:२३) यहोवा मृत लोकांचं पुनरुत्थान करेल याचा आणखी एक पुरावा येशूने दिला. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबद्दल बोलताना तो म्हणाला, की यहोवाच्या “दृष्टीने ते सर्व जिवंतच आहेत.” (लूक २०:३७, ३८) खरंच, पुनरुत्थान होईल यावर विश्‍वास ठेवण्याची कितीतरी कारणं आज आपल्याकडे आहेत. आणि म्हणूनच, प्रेषित पौलप्रमाणे आपणही म्हणू शकतो: “सर्व लोकांचं पुनरुत्थान होणार आहे, अशी . . . मीसुद्धा देवाकडे आशा बाळगतो.”—प्रे. कार्ये २४:१५.

^ परि. 8 कोनशिला किंवा कोपऱ्‍याचा दगड हा इमारतीच्या दोन भिंती जिथे एकत्र येतात, तिथे भिंतींना एकमेकांशी जोडण्यासाठी व मजबूत करण्यासाठी ठेवण्यात यायचा. येशूचं पुनरुत्थान झालं, तेव्हा तो ख्रिस्ती मंडळीच्या “पायातील कोपऱ्‍याचा दगड” बनला. ही मंडळी अभिषिक्‍त बांधवांनी मिळून बनलेली होती आणि या मंडळीची तुलना आध्यात्मिक मंदिराशी करण्यात आली आहे.