सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेने पुढे आले—मादागास्करमध्ये
सिलव्याना नावाची विशीतली एक पायनियर बहीण म्हणते “पायनियरांची गरज असलेल्या भागात जाऊन प्रचार करणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रिणींचे अनुभव जेव्हा मी ऐकले, तेव्हा मलाही असं वाटलं की मी तो आनंद अनुभवला पाहिजे. पण अशा गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणं माझ्या क्षमतेबाहेर आहे, असं मला वाटलं.”
तुम्हालाही सिलव्यानासारखं कधी वाटलं आहे का? राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करण्याची तुमचीही इच्छा आहे, पण हे ध्येय गाठणं मला जमेल का अशी शंका तुमच्या मनात कधी आली आहे का? जर तुम्हाला असं वाटत असेल, तर निराश होऊ नका! यहोवाच्या मदतीने, सेवाकार्य वाढवण्यात येत असलेल्या अडथळ्यांवर हजारो बंधुभगिनींनी मात केली आहे. त्यांच्यापैकी काहींची यहोवाने कशी मदत केली आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण मादागास्कर बेटाला भेट देऊ या. हे जगातलं चौथं मोठं बेट आहे.
मागील १० वर्षांत, ११ देशांतून * ७० पेक्षा जास्त आवेशी प्रचारक व पायनियर आफ्रिकेच्या फलदायी क्षेत्रात सेवाकार्य करण्यासाठी आले आहेत. तिथले अनेक लोक बायबलचा आदर करतात. तसंच, तिथले स्थानिक प्रचारक या मोठ्या बेटात सेवाकार्य करण्याची इच्छा दाखवत आहेत. चला तर मग त्यांच्यापैकी काहींची ओळख करून घेऊयात!
भीती आणि निराशेवर मात
लुईस आणि पेर्रिन हे तिशीतलं जोडपं फ्रान्समधून मादागास्करला आलं. आपलं सेवाकार्य वाढवण्याची त्यांची फार वर्षांपासून इच्छा होती. पण पेर्रिनला थोडी भीती वाटत होती. ती म्हणते: “अनोळखी क्षेत्रात जायला मी घाबरत होते. आमचं कुटुंब, मंडळी, घर, ओळखीचा परिसर आणि दिनक्रम हे सर्व सोडून जाण्याची मला भीती वाटत होती. मला वाटत असलेली भीतीच माझ्यासाठी सर्वात मोठा अडथळा होता, ज्यावर मला मात करायची होती.” २०१२ मध्ये पेर्रिनने धैर्य एकवटलं आणि ती लुईससोबत गरज असणाऱ्या क्षेत्रात गेली. तिला या निर्णयाबद्दल कसं वाटलं? ती म्हणते: “मागे वळून पाहताना मी म्हणू शकते की यहोवा प्रत्येक वेळी आमची मदत करत होता. आणि हा खूप विश्वास वाढवणारा अनुभव होता.” लुईस म्हणतो: “मादागास्करमधल्या पहिल्या स्मारकविधीला आमचे चक्क दहा बायबल विद्यार्थी आले होते!”
फिलिप्पै. ४:१३) लुईस म्हणतो: “यहोवाने आमच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं आणि ‘देवाची शांती’ आम्हाला दिली याचा आम्हाला अनुभव आला. आमच्या सेवाकार्यामुळे आम्हाला जो आनंद मिळत होता, त्यावर लक्ष केंद्रित करायला आम्हाला मदत मिळाली. शिवाय, आमच्या मित्र-मैत्रिणींनीही आम्हाला पत्र आणि इ-मेल पाठवून टिकून राहण्याचं प्रोत्साहन दिलं.”—फिलिप्पै. ४:६, ७; २ करिंथ. ४:७.
परदेशात सेवा करताना धीर धरणं खूप आवश्यक आहे, हे लुईस आणि पेर्रिन शिकले. मादागास्करला आल्यानंतर आठ महिन्यांनी त्यांना एक दुःखद बातमी समजली. फ्रान्समध्ये त्यांच्या कुटुंबातले काही जण आजारी पडले होते. अशा वेळी आपल्या नेमणुकीत टिकून राहायला या जोडप्याला कशामुळे मदत झाली? धीर धरण्यासाठी आवश्यक असणारी ताकद मिळावी, म्हणून त्यांनी यहोवाला कळकळून प्रार्थना केली. (लुईस आणि पेर्रिन यांनी दाखवलेल्या धीराबद्दल यहोवाने त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. लुईस म्हणतो: “ऑक्टोबर २०१४ मध्ये फ्रान्समध्ये ख्रिस्ती जोडप्यांकरता बायबल प्रशाला * यासाठी आम्ही उपस्थित राहिलो. त्या प्रशालेला जाण्याची सुसंधी म्हणजे यहोवाकडून मिळालेली अविस्मरणीय भेटच होती.” या प्रशालेतलं प्रशिक्षण संपल्यावर या जोडप्याला पुन्हा मादागास्करला नेमण्यात आलं, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.
“आम्हाला तुमचा अभिमान वाटेल!”
दिदया आणि नादीन हे जोडपं वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर २०१० मध्ये, फ्रान्समधून मादागास्करला स्थलांतरित झाले. दिदया सांगतात: “आम्ही तरुण होतो तेव्हा आम्ही पायनियरींग केली. मग आमच्यावर ३ मुलांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी आली. मुलं मोठी झाली, तेव्हा आम्ही परदेशात जाऊन सेवा करण्याचा विचार करू लागलो.” नादीन म्हणते: “मुलांना सोडून जायचं या विचारानेच मला कसंतरी झालं. पण आमची मुलंच आम्हाला म्हणाली, की ‘जर तुम्ही राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा केली तर आम्हाला तुमचा अभिमान वाटेल!’ त्यांच्या या शब्दांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालं. आम्ही आज जरी आमच्या मुलांपासून दूर असलो, तरी आम्ही त्यांच्याशी सतत बोलतो म्हणून आम्हाला त्याचा आनंद वाटतो.”
दिदया आणि नादीन यांच्यासाठी मालागासी भाषा शिकणं एक आव्हान होतं. “आम्ही काही तरुण राहिलो नाही आता!” असं नादीन हसून म्हणते. मग ते ही भाषा कशी शिकले? ते पहिल्यांदा फ्रेंच भाषेतल्या मंडळीत जाऊ लागले. आपल्याला नवीन भाषा शिकता येईल अशी खात्री त्यांना पटली, तेव्हा मग ते मालागासी भाषेच्या मंडळीत गेले. नादीन म्हणते: “प्रचारात आम्ही ज्या लोकांना भेटतो, त्यांपैकी अनेकांना बायबलचा अभ्यास करायला आवडतं. आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत, याबद्दल ते आमचे आभार मानतात. आधी तर मला वाटायचं, की मी स्वप्नच पाहात आहे! या ठिकाणी पायनियरींग करायला मला आवडतं. रोज सकाळी उठल्यावर मी स्वतःला म्हणते, ‘वा! मी तर आज प्रिचींगला जाणार आहे!’”
मालागासी भाषा शिकताना काय झालं होतं, हे सांगताना दिदयाला हसूच फुटतं. ते सांगतात: “मी सभेत प्रश्नोत्तराचा भाग घ्यायचो; पण बंधुभगिनी काय उत्तर देत आहेत, हे मला समजायचंच नाही. मी फक्त त्यांना ‘थँक्यु’ असं बोलायचो. एकदा मी एका बहिणीला उत्तर दिल्याबद्दल थँक्स बोललो, तर तिच्या मागे बसलेल्या
बांधवांनी तिने चुकीचं उत्तर दिलं आहे, असं मला खुणावलं. मग मी लगेच एका दुसऱ्या बांधवाला उत्तर विचारलं आणि त्याने बरोबर उत्तर दिलं; कदाचित बरोबरच दिलं असावं!”तिने आनंदाने आमंत्रण स्वीकारलं
टायरी आणि त्यांची पत्नी नादीया यांनी २००५ सालच्या अधिवेशनात, “परस्यु गोल्ज् दॅट ऑनर गॉड” हे नाटक पाहिलं. तीमथ्यबद्दल असलेलं ते नाटक त्यांच्या मनाला भिडलं आणि यामुळे राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन सेवा करण्याची त्यांची इच्छा आणखी प्रबळ झाली. टायरी म्हणतो: “ते नाटक संपल्यावर टाळ्या वाजवताना, मी माझ्या बायकोला हळूच विचारलं ‘मग, आपण कुठे जाऊ या?’ तीही तोच विचार करत होती, असं तिने उत्तर दिलं.” मग लगेच त्यांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी पावलं उचलली. नादीया म्हणते: “आम्ही हळूहळू आमचं सामान कमी करू लागलो. मग ते चार सूटकेसमध्ये भरता येईल इतकंच उरलं!”
२००६ मध्ये ते मादागास्करला आले आणि पहिल्या दिवसापासूनच त्यांना सेवाकार्यात आनंद मिळू लागला. नादीया सांगते: “प्रचारात लोकांना भेटून आम्हाला खूप आनंद होतो.”
पण ६ वर्षांनंतर या जोडप्याला एका समस्येला सामोरं जावं लागलं. फ्रान्समध्ये राहणारी नादीयाची आई मारी-मादेलिन पडली आणि तिच्या हाताला व डोक्याला मार लागला. तिच्या डॉक्टरसोबत बोलणं झाल्यावर या जोडप्याने मारी-मादेलिन हिला आपल्यासोबत मादागास्करला राहायला बोलावलं. आणि ८० वर्षांची मारी-मादेलिन आनंदाने इथे यायला तयार झाली. परदेशात राहणं मारी-मादेलिनला कसं वाटतं? ती सांगते: “परिस्थितीशी जुळवून घेणं कधीकधी माझ्यासाठी एक आव्हान ठरतं. मी जास्त काही करू शकत नाही, पण तरीही मंडळीत माझा उपयोग होतो. मला माझ्या मुलांबरोबर राहायला मिळालं आणि यामुळे त्यांना त्यांच्या फलदायी नेमणुकीत राहता आलं, याचाच मला जास्त आनंद होतो.”
“यहोवा मला मदत करतो हे मला जाणवतं”
रिन नावाचा एक वीशीतला बांधव उत्तर मादागास्करच्या अलाओत्रा मांगोरो, या सुपीक जमीन असलेल्या भागात लहानाचा मोठा झाला. तो अभ्यासात हुशार होता आणि त्याला उच्च शिक्षण घ्यायचं होतं. पण बायबलचा अभ्यास केल्यानंतर त्याने आपला विचार बदलला. तो म्हणतो: “मी माझा अभ्यासक्रम लवकर संपवून यहोवाला हे वचन दिलं की जर मी पास झालो तर मी पायनियरींग करेन.” शिक्षण झाल्यावर रिनने त्याचं वचन पाळलं. तो एका पायनियर बांधवासोबत राहायला गेला आणि पायनियरींग सुरू करून अर्धवेळेची नोकरीही करू लागला. तो म्हणतो: “माझ्या आयुष्यातला तो सर्वात उत्तम निर्णय होता.”
पण रिन उच्च शिक्षण का घेत नाही, असा प्रश्न त्याच्या नातेवाइकांना पडला. तो म्हणतो: “माझे वडील, काका आणि माझ्या आजीची बहीण, या सगळ्यांनी मला उच्च शिक्षण घेण्याचं प्रोत्साहन दिलं. पण मला काही केल्या पायनियरींग थांबवायची नव्हती.” प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करावी, असं रिनला खूप आधीपासून वाटत होतं. ही इच्छा आणखी कशामुळे प्रबळ झाली? तो म्हणतो: “आम्ही जिथे राहत होतो तिथे चोरी झाली. माझं बरंचसं सामान चोरीला गेलं. त्या घटनेमुळे मी ‘स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा’ या येशूच्या शब्दांवर विचार करायला लागलो. स्वर्गीय संपत्ती मिळवण्यासाठी मेहनत करायचा मी निर्धार केला.” (मत्त. ६:१९, २०) राहत असलेल्या ठिकाणावरून १,३०० कि.मी. दक्षिणेकडे असलेल्या दुष्काळग्रस्त भागात तो सेवा करण्यासाठी गेला. तिथे अॅनतॅनड्रॉय लोक राहतात. पण तो तिथे का गेला?
घरात चोरी होण्याच्या एक महिन्याआधी रिनने दोन अॅनतॅनड्रॉय लोकांसोबत बायबल अभ्यास सुरू केला होता. त्यांची भाषा तो थोडीफार शिकला होता आणि राज्याचा संदेश न ऐकलेल्या अनेक अॅनतॅनड्रॉय लोकांबद्दल तो विचार करत होता. तो म्हणतो: “तॅनड्रॉय भाषा बोलणाऱ्या लोकांच्या क्षेत्रात मला जाता यावं, म्हणून मी यहोवाला प्रार्थना केली.”
रिन तिथे गेला आणि त्याला लगेच एका समस्येचा सामना करावा लागला. त्याला तिथे नोकरी मिळाली नाही. एका माणसाने त्याला म्हटलं: “तू इथे का आलास? नोकरी शोधण्यासाठी तर या भागातले लोक, तू ज्या भागातून आलास तिथे जातात!” त्यानंतर दोन आठवड्यांनी प्रांतीय अधिवेशनाला जाताना रिनकडे खूप कमी पैसे होते, पुढे काय करायचं याचाच विचार तो करत होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एका बांधवाने रिनच्या कोटमध्ये पैसे ठेवले. अॅनतॅनड्रॉयला परत जाण्यासाठी पुरतील व दही विकण्याचा एक छोटासा व्यवसाय सुरू करता येईल, इतकी ती रक्कम होती. रिन म्हणतो: “यहोवाने मला अगदी वेळेवर मदत केली. यहोवाबद्दल शिकण्याची ज्यांना संधी मिळाली नाही, अशा लोकांना आता मी मदत करू शकत होतो!” मंडळीतही त्याची खूप गरज होती. रिन म्हणतो: “मला दर आठवड्याला जाहीर भाषण द्यावं लागायचं. यहोवा त्याच्या संघटनेद्वारे मला प्रशिक्षित करत होता.” आजही रिन यहोवाबद्दल
शिकण्याची इच्छा दाखवणाऱ्या अनेक तॅनड्रॉय भाषेच्या लोकांना राज्याचा संदेश सांगत आहे.“तुझे बेत सिद्धीस जातील”
“आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील.” असं आश्वासन यहोवा आपल्याला देतो. (नीति. १६:३) आपली सेवा वाढवण्याकरता आपण अडथळ्यांवर मात करण्यासाठी जी मेहनत घेतो, त्यावर यहोवा आशीर्वाद देतो. लेखाच्या सुरुवातीला ज्या सिलव्याना नावाच्या बहिणीबद्दल सांगितलं होतं तिचा विचार करा. जास्त गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन सेवा करणं आपल्या क्षमतेबाहेर आहे, असं तिला वाटत होतं. ती सांगते: “माझा डावा पाय उजव्या पायापेक्षा साडे तीन इंच (९ सें.मी.) लहान आहे. त्यामुळे मी लंगडत चालते आणि लवकर थकते.”
असं असलं तरी, २०१४ मध्ये सिलव्याना तिच्या मंडळीतल्या सिल्वे अॅन या तरुण पायनियर बहिणीसोबत एका छोट्याशा खेड्यात प्रचारासाठी स्थलांतरित झाली. ते तिच्या घरापासून ८५ कि.मी. लांब होतं. समस्या तर होत्या पण तरीही सिलव्यानाचे स्वप्न पूर्ण झाले आणि तिला खूप मोठा आशीर्वादही मिळाला! ती सांगते: “दोरातीन नावाच्या माझ्या बायबल विद्यार्थीनीने संमेलनात बाप्तिस्मा घेतला तेव्हा मला नेमणूक मिळून फक्त एक वर्षच झालं होतं.”
“मी तुझे साहाय्यही करतो”
प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करण्यासाठी गेलेल्या या प्रचारकांच्या अनुभवांवरून त्यांचा मजबूत विश्वास दिसून येतो. आपली सेवा वाढवताना येणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी आपण जेव्हा मेहनत घेतो, तेव्हा आपण वैयक्तिक रीत्या यहोवाने त्याच्या सेवकाला दिलेल्या वचनाची सत्यता अनुभवतो. तो म्हणतो: “मी तुला शक्ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो.” (यश. ४१:१०) यामुळे यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आणखी मजबूत होतो. तसंच, आपल्या क्षेत्रात किंवा परदेशात यहोवाच्या सेवेसाठी स्वेच्छेने पुढे आल्यामुळे, नव्या जगात येणाऱ्या देवाच्या मार्गदर्शनाखाली मिळणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपण तयार असू. दिदयाच्या शब्दात सांगायचं तर: “प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करणं म्हणजे जणू भविष्यासाठी असलेलं प्रशिक्षण घेणं!” अनेकांनी हे प्रशिक्षण मिळवण्यासाठी लवकरच पाऊल उचलावं, हीच आमची सदिच्छा!
^ परि. 4 जास्त गरज असलेल्या क्षेत्रात प्रचार करणारे प्रचारक हे कॅनडा, चेक रिपब्लिक, फ्रान्स, जर्मनी, ग्वादेलोप, लक्झेंबर्ग, न्युकेलिदोनीया, स्वीडन, स्वित्झर्लंड, ब्रिटन आणि अमेरिका इथले आहेत.
^ परि. 8 आता त्या प्रशालेला सुवार्तिकांची प्रशाला असं म्हणतात. परदेशात सेवा करणारे पूर्णवेळचे सेवक या प्रशालेसाठी लागणाऱ्या अटी पूर्ण करत असतील, तर ते त्यांच्या मायदेशात किंवा दुसऱ्या देशात जिथे त्यांच्या मातृभाषेत प्रशाला असेल तिथे उपस्थित राहण्यासाठी अर्ज देऊ शकतात.