व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५२

आईवडिलांनो, मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा!

आईवडिलांनो, मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा!

“संतती ही परमेश्‍वराने दिलेले धन आहे.”—स्तो. १२७:३.

गीत ४१ तारुण्यात यहोवाची सेवा करा

सारांश *

१. यहोवाने आईवडिलांना कोणती जबाबदारी दिली आहे?

यहोवाने पहिल्या स्त्री-पुरुषाला बनवलं तेव्हा त्याने त्यांना मुलं होऊ देण्याची इच्छा दिली. बायबल याबद्दल म्हणतं: “संतती ही परमेश्‍वराने दिलेले धन आहे.” (स्तो. १२७:३) याचा काय अर्थ होतो? विचार करा तुमच्या एका जवळच्या मित्राने तुम्हाला एक मोठी रक्कम काही काळासाठी सांभाळायला दिली आहे. अशा वेळी तुम्हाला कसं वाटेल? तुमच्या मित्राने तुमच्यावर इतका भरवसा दाखवला याबद्दल तुम्हाला नक्कीच आनंद होईल. पण त्यासोबतच ती रक्कम सुरक्षित ठेवायची जबाबदारी दिल्यामुळे तुम्हाला थोडी चिंताही वाटेल. त्याचप्रमाणे, सर्वात जवळच्या मित्राने, यहोवाने आईवडिलांना अशी एक गोष्ट सांभाळायला दिली आहे जी कुठल्याही रक्कमेपेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान आहे. त्याने आईवडिलांना त्यांच्या मुलांना सांभाळायची आणि आनंदी ठेवायची जबाबदारी सोपवली आहे.

२. आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

एका जोडप्याने कुटुंब वाढवावं की नाही आणि त्यांना किती मुलं असावीत हे कोणी ठरवायला हवं? आणि आईवडील आपल्या मुलांना आनंदी जीवन जगायला कशी मदत करू शकतात? आता आपण देवाच्या वचनात दिलेल्या अशा काही तत्त्वांवर चर्चा करू या ज्यामुळे ख्रिस्ती जोडप्यांना सुज्ञ निर्णय घ्यायला मदत होईल.

जोडप्याने घेतलेल्या निर्णयाचा आदर करा

३. (क) मुलं होऊ द्यावीत की नाही हे कोणी ठरवलं पाहिजे? (ख) जोडप्याच्या नातेवाइकांनी आणि मित्रांनी बायबलचं कोणतं तत्त्व लक्षात ठेवलं पाहिजे?

काही संस्कृतीत, नवविवाहितांकडून अपेक्षा केली जाते की त्यांनी लवकरात लवकर आपलं कुटुंब वाढवण्याचा निर्णय घ्यावा. नातेवाईक किंवा इतर लोकही अशा प्रकारचा दबाव कदाचित जोडप्यांवर टाकतील. आशियामध्ये राहणारे जेथ्रो नावाचे बांधव म्हणतात: “मंडळीत ज्यांना मुलं आहेत ते मुलं नसलेल्या जोडप्यांवर कुटुंब वाढवण्याचा दबाव टाकतात.” आशियामध्ये राहणारे दुसरे एक बांधव, जेफ्री म्हणतात: “काही लोक जोडप्यांना म्हणतात, की तुम्हाला मुलं झाली नाहीत तर म्हातारपणी तुमच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नसेल!” पण मुलं होऊ द्यावीत की नाही, हा निर्णय प्रत्येक जोडप्याने स्वतः घ्यायला हवा. हे त्यांनीच ठरवायला हवं आणि ही त्यांचीच जबाबदारी आहे. (गलती. ६:५, तळटीप) हे खरं आहे की नवविवाहित जोडप्याने आनंदी असावं असं नातेवाइकांना आणि मित्रांना वाटतं. पण मुलं होऊ द्यावीत की नाही हा निर्णय सर्वस्वी त्या जोडप्याचा आहे आणि ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायला हवी.—१ थेस्सलनी. ४:११.

४-५. जोडप्यांनी कोणत्या दोन प्रश्‍नांवर चर्चा करणं गरजेचं आहे आणि ही चर्चा कधी करणं योग्य राहील? स्पष्ट करा.

जोडपं जेव्हा आपलं कुटुंब वाढवण्याचा विचार करतं तेव्हा त्यांनी दोन महत्त्वपूर्ण प्रश्‍नांवर चर्चा करणं महत्त्वाचं आहे. पहिला, त्यांना मुलं कधी  व्हावीत असं त्यांना वाटतं? दुसरा, त्यांना किती  मुलं हवी आहेत? या प्रश्‍नांवर एका जोडप्याने कधी चर्चा करणं योग्य राहील? आणि हे दोन मुद्दे इतके महत्त्वपूर्ण का आहेत?

आपल्याला मुलं असली पाहिजेत की नाही या विषयावर बऱ्‍याच जोडप्यांनी लग्नाआधीच चर्चा केली आहे. पण तेव्हा चर्चा करणं का योग्य राहील? कारण या विषयावर दोघांचं एकमत असणं महत्त्वाचं आहे. तसंच, या जबाबदारीसाठी ती दोघं तयार आहेत का, यावरही त्यांना विचार करणं गरजेचं आहे. काही जोडप्यांनी असं ठरवलं की ते लग्नाच्या एक किंवा दोन वर्षांनंतरच पालक होण्याचा निर्णय घेतील. पण का? कारण एक विवाहित जोडपं म्हणून त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि एकमेकांसोबत नातं मजबूत करण्यासाठी वेळ द्यायचा असतो.—इफिस. ५:३३.

६. आपण कठीण काळात जगत असल्यामुळे काही जोडप्यांनी कोणता निर्णय घेतला आहे?

इतर ख्रिश्‍चनांनी नोहाच्या तीन मुलांच्या व सुनांच्या उदाहरणाचं अनुकरण करण्याचं ठरवलं आहे. त्या तीन जोडप्यांनी लवकरात लवकर पालक होण्याचा विचार केला नाही. (उत्प. ६:१८; ९:१८, १९; १०:१; २ पेत्र २:५) येशूने आपल्या काळाची तुलना नोहाच्या दिवसांशी केली. आणि यात काहीच शंका नाही की आपण अतिशय कठीण काळात जगत आहोत. (मत्त. २४:३७; २ तीम. ३:१) म्हणून काही जोडप्यांनी निर्णय घेतला आहे की ते कुटुंब वाढवण्याचा विचार सध्या तरी करणार नाहीत. कारण असं केल्यामुळे त्यांना आपला जास्तीत जास्त वेळ यहोवाच्या सेवेत देणं शक्य होईल.

कुटुंब वाढवण्याचा निर्णय कधी घ्यावा आणि आपल्याला किती मुलं व्हावीत हे ठरवताना सुज्ञ जोडपी “आधी बसून खर्चाचा हिशोब” लावतात (परिच्छेद ७ पाहा) *

७. लूक १४:२८, २९ आणि नीतिसूत्रे २१:५ यांत दिलेली तत्त्वं एका जोडप्याला कशी मदत करू शकतात?

कुटुंब वाढवण्याचा निर्णय कधी घ्यावा आणि आपल्याला किती मुलं व्हावीत हे ठरवताना सुज्ञ जोडपी “आधी बसून खर्चाचा हिशोब” लावतात. (लूक १४:२८, २९ वाचा.) अनुभवी पालकांनी मान्य केलं आहे की मुलांच्या संगोपनामागे फक्‍त पैसाच खर्च होत नाही, तर वेळ आणि शक्‍तीही खर्च होते. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की एका जोडप्याने आधीच काही प्रश्‍नांवर चर्चा केली पाहिजे. जसं की: ‘कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या दोघांना नोकरी करावी लागेल का? आपल्या मूलभूत गरजा काय आहेत यावर आपलं एकमत आहे का? जर दोघं काम करणार असतील तर मुलांकडे कोण लक्ष देईल? त्या वेळी मुलांच्या विचारांना आणि कार्यांना कोण आकार देईल?’ या प्रश्‍नांवर शांतपणे चर्चा करताना, जोडपी नीतिसूत्रे २१:५ यात दिलेले शब्द लागू करण्याचा प्रयत्न करतात.—नीतिसूत्रे २१:५ वाचा.

एक प्रेमळ पती आपल्या पत्नीला साहाय्य करण्यासाठी त्याच्या परीने सर्व प्रयत्न करतो (परिच्छेद ८ पाहा)

८. जोडपी कोणत्या समस्यांसाठी तयार राहू शकतात आणि एक प्रेमळ पती काय करेल?

एका मुलाचं संगोपन करताना आई आणि वडील दोघांनी आपला वेळ व शक्‍ती देणं गरजेचं आहे. जर मुलांमध्ये वयाचं कमी अंतर असेल तर पालकांना प्रत्येक मुलाकडे लक्ष देणं कठीण जाऊ शकतं. काही जोडपी ज्यांना अनेक लहान मुलं होती त्यांनी मान्य केलं की त्यांच्यासाठी हे खूप आव्हानात्मक होतं. एक आई कदाचित शारीरिक आणि भावनिक रीत्या पार थकून जाईल. इतकी की तिला नियमितपणे प्रार्थना व वैयक्‍तिक अभ्यास करणं आणि प्रचाराला जाणं शक्य होणार नाही. तसंच, तिला ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष देऊन ऐकणं आणि त्यातून फायदा मिळवणंही कदाचित कठीण जाईल. यात काहीच शंका नाही की एक प्रेमळ पती सभेत आणि घरीही आपल्या मुलांकडे लक्ष देण्याचा पुरेपूर प्रयत्न करून आपल्या पत्नीला साहाय्य करतो. उदाहरणार्थ, तो घरकामात आपल्या पत्नीला मदत करेल. तसंच, सर्वांना नियमितपणे कौटुंबिक उपासनेतून फायदा मिळण्यासाठी तो मेहनत घेईल आणि आपल्या कुटुंबासोबत नियमितपणे सेवाकार्यातही सहभाग घेईल.

मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवणं

९-१०. आपल्या मुलांना मदत करण्यासाठी आईवडिलांनी काय करणं गरजेचं आहे?

मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवताना आईवडील कोणत्या गोष्टी करू शकतात? ते आपल्या मुलांचं या जगातल्या धोक्यांपासून कसं संरक्षण करू शकतात? यासाठी त्यांनी कोणती काही पावलं उचलणं गरजेची आहेत यावर आता आपण चर्चा करू या.

१० यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा.  शमशोनच्या आईवडिलांनी म्हणजे मानोहा आणि त्याच्या पत्नीने जोडप्यांसाठी एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. मानोहाला जेव्हा कळलं की त्याच्या घरी एक मुलगा जन्माला येणार आहे तेव्हा त्याने यहोवाकडे प्रार्थना केली. त्याच्या मुलाचं संगोपन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी त्याने यहोवाकडे विनवणी केली.

११. शास्ते १३:८ या वचनात सांगितल्यानुसार आईवडील मानोहाचं अनुकरण कसं करू शकतात?

११ बॉझनिया-हर्झेगोविना या ठिकाणी राहणाऱ्‍या निहाद आणि अलमा यांना मानोहाच्या उदाहरणावरून खूप काही शिकायला मिळालं. ते म्हणतात: “चांगले आईवडील कसं होता येईल हे शिकण्यासाठी आम्ही मानोहासारखीच यहोवाकडे कळकळून प्रार्थना केली. आणि यहोवाने आमच्या प्रार्थनांचं उत्तर अनेक मार्गांनी म्हणजे वचनांद्वारे, बायबलवर आधारित साहित्यांद्वारे, मंडळीच्या सभांद्वारे आणि अधिवेशनांद्वारे दिलं.”—शास्ते १३:८ वाचा.

१२. योसेफ आणि मरीया यांनी आपल्या मुलांसमोर एक चांगलं उदाहरण कसं मांडलं?

१२ आपल्या उदाहरणातून शिकवा.  तुम्ही जे बोलता ते महत्त्वाचं असतं, पण तुम्ही जी कार्य करता त्यांचा तुमच्या मुलांवर जास्त प्रभाव होऊ शकतो. योसेफ आणि मरीया यांनी नक्कीच येशूसमोर आणि आपल्या इतर मुलांसमोर एक चांगलं उदाहरण मांडलं. आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योसेफ खूप मेहनत करायचा. तसंच, तो आपल्या कुटुंबाला यहोवावर प्रेम करायचंही प्रोत्साहन द्यायचा. (अनु. ४:९, १०) नियमानुसार योसेफला त्याच्या कुटुंबाला “दरवर्षी” वल्हांडण सणासाठी यरुशलेमला घेऊन जाणं गरजेचं नव्हतं. तो एकटा गेला असता तरी चाललं असतं. पण तरी तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला यरुशलेमला घेऊन जायचा. (लूक २:४१, ४२) त्या काळातल्या काही कुटुंबप्रमुखांनी कदाचित असा विचार केला असेल की आपल्या संपूर्ण कुटुंबाला अशा प्रवासाला नेण्यामागे आपला भरपूर वेळ जाईल आणि ते गैरसोयीचं व खर्चीक असेल. पण योसेफला आध्यात्मिक गोष्टींबद्दल कदर होती आणि हीच गोष्ट त्याने आपल्या मुलांनाही शिकवली. मरीयालासुद्धा वचनांची चांगली समज होती. आपल्या शब्दांतून आणि कार्यांतून तिने आपल्या मुलांना देवाच्या वचनावर प्रेम करायला नक्कीच शिकवलं असणार.

१३. एका जोडप्याने योसेफ आणि मरीया यांच्या उदाहरणाचं अनुकरण करायचा कसा प्रयत्न केला?

१३ आधी उल्लेख केलेले निहाद आणि अलमा यांनी योसेफ आणि मरीया यांच्या उदाहरणाचं अनुकरण करायचं ठरवलं. यामुळे त्यांना आपल्या मुलाला देवावर प्रेम करायला आणि त्याची सेवा करायला शिकवण्यासाठी कशी मदत करता आली? ते म्हणतात: “आम्ही ज्या प्रकारे जीवन जगलो त्यावरून आम्ही आमच्या मुलाला दाखवून दिलं की यहोवाच्या तत्त्वांनुसार जीवन जगणं खूप फायद्याचं असतं.” निहाद पुढे म्हणतात: “तुमच्या मुलाने ज्या प्रकारची व्यक्‍ती व्हावं असं तुम्हाला वाटतं, त्या प्रकारे तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करा.”

१४. आपली मुलं कोणाशी मैत्री करतात हे पालकांना माहीत असणं गरजेचं का आहे?

१४ चांगली मैत्री निवडण्यासाठी आपल्या मुलांना मदत करा.  आपली मुलं कोणाशी मैत्री करतात आणि आपला वेळ कसा घालवतात हे आई आणि वडील या दोघांनाही माहीत असायला हवं. तसंच, पालकांना हे माहीत असणंही गरजेचं आहे की आपली मुलं सोशल मिडिया आणि मोबाईल फोन या माध्यामांद्वारे कोणाशी बोलतात. कारण मुलं ज्यांच्याशी मैत्री करतात त्याचा त्यांच्या विचारांवर आणि कार्यांवर प्रभाव होऊ शकतो.—१ करिंथ. १५:३३.

१५. जेसीच्या उदाहरणावरून पालक काय शिकू शकतात?

१५ पण आईवडिलांना कंप्युटर किंवा मोबाईल फोन वापरण्याबद्दल इतकं काही माहीत नसलं तर? फिलिपीन्झमध्ये राहणारे जेसी नावाचे पिता म्हणतात: “आम्हाला टेक्नोलॉजीबद्दल जास्त काही माहीत नव्हतं. पण असं असलं तरी आम्ही आमच्या मुलांना मोबाईल फोन, कंप्युटर यांच्या संभाव्य धोक्यांबद्दल शिकवलं.” जेसी यांना मोबाईल किंवा कंप्युटर यांच्या वापराबद्दल जास्त काही माहीत नव्हतं. पण यामुळे त्यांनी आपल्या मुलांना ते वापरण्यापासून अडवलं नाही. ते म्हणतात: “मी माझ्या मुलांना नवीन भाषा शिकण्यासाठी, सभेची तयारी करण्यासाठी आणि दररोज बायबल वाचण्यासाठी मोबाईल आणि कंप्युटरचा वापर करण्याचं प्रोत्साहन दिलं.” तुम्ही एक पालक असाल तर तुम्ही jw.org® वेबसाईटवर “टीनएजर्स” या भागात, मेसेज पाठवण्याबद्दल आणि आपले फोटो ऑनलाईन पोस्ट करण्याबद्दल दिलेले सुज्ञ सल्ले वाचले आहेत का आणि त्या सल्ल्यांवर तुमच्या मुलांसोबत चर्चा केली आहे का? इलेक्ट्रॉनिक साधनं तुमच्या ताब्यात आहेत की तुम्ही त्यांच्या?  आणि सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा  * या व्हिडिओंबद्दल तुम्ही तुमच्या मुलांसोबत चर्चा केली आहे का? इलेक्ट्रॉनिक साधनांचा सुज्ञपणे वापर कसा करायचा हे मुलांना शिकवताना ही माहिती मोलाची ठरू शकते.—नीति. १३:२०.

१६. बऱ्‍याच पालकांनी काय केलं आहे आणि याचे काय परिणाम झाले आहेत?

१६ अनेक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी अशा बऱ्‍याच संधी तयार केल्या आहेत, ज्यामुळे त्यांना आवेशी ख्रिश्‍चनांसोबत संगती करता येईल. उदाहरणार्थ, कोट-दि-वार या ठिकाणी राहणारे एनडेनी आणि बोमीन यांनी अनेक वेळा आपल्या घरी विभागीय पर्यवेक्षकांना राहायला बोलवलं. एनडेनी म्हणतात: “यामुळे आमच्या मुलावर चांगला परिणाम झाला. त्याने पायनियरींग सुरू केली आणि आता तो अधूनमधून विभागीय पर्यवेक्षक म्हणूनही सेवा करतो.” तुमच्या मुलांसाठीही तुम्ही अशा प्रकारच्या संगतीची तरतूद करू शकता का?

१७-१८. पालकांनी मुलांना कधीपासून प्रशिक्षण द्यायला सुरू केलं पाहिजे?

१७ मुलांना लहानपणापासूनच प्रशिक्षण द्या.  आईवडील जितक्या लवकर आपल्या मुलांना प्रशिक्षण देतील तितकं मुलांसाठी ते फायद्याचं ठरेल. (नीति. २२:६) तीमथ्यचंच उदाहरण घ्या! मोठं झाल्यावर तो प्रेषित पौलसोबत प्रचारासाठी ठिकठिकाणी गेला. त्याची आई युनीके आणि आजी लोईस यांनी त्याला “बालपणापासून” प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती.—२ तीम. १:५; ३:१५.

१८ कोट-दि-वार इथे राहणारे जीनक्लॉड आणि त्यांच्या पत्नीला सहा मुलं आहेत. सर्वांना त्यांनी यहोवावर प्रेम करायला आणि त्याची सेवा करायला शिकवलं. या जोडप्याला कशामुळे यश मिळालं? त्यांनी युनीके आणि लोईस यांच्या उदाहरणाचं अनुकरण केलं. ते म्हणतात: “आमच्या मुलांच्या जन्माच्या काही काळानंतरच, म्हणजे त्यांच्या बालपणापासूनच आम्ही देवाच्या वचनातल्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवू लागलो.”—अनु. ६:६, ७.

१९. देवाचं वचन आपल्या मुलांच्या मनावर ‘बिंबवण्याचा’ काय अर्थ होतो?

१९ यहोवाचं वचन तुमच्या मुलांच्या मनावर ‘बिंबवण्याचा’ काय अर्थ होतो? “बिंबव” या शब्दाचा अर्थ ‘एखादी गोष्ट पुन्हापुन्हा सांगून किंवा शिकवून मनात ठसवणे’ असा होतो. असं करण्यासाठी आईवडिलांनी आपल्या लहान मुलांना नियमितपणे वेळ देणं गरजेचं आहे. कधीकधी मुलांना एकच गोष्ट अनेक वेळा सांगावी लागते आणि यामुळे आईवडील कदाचित निराश होतील. पण या गोष्टीला त्यांनी एक संधी म्हणून पाहायला हवं; एक अशी संधी ज्यामुळे ते मुलांना देवाचं वचन समजवण्यासाठी आणि जीवनात लागू करण्यासाठी मदत करू शकतील.

प्रत्येक मुलाला कसं प्रशिक्षण द्यायचं हे आईवडिलांनी ठरवलं पाहिजे (परिच्छेद २० पाहा) *

२०. स्तोत्र १२७:४ या वचनात दिलेले शब्द मुलांचं संगोपन करताना कसे लागू केले जाऊ शकतात? स्पष्ट करा.

२० आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे जाणून घ्या.  स्तोत्र १२७ यात मुलांची तुलना बाणांशी केली आहे. (स्तोत्र १२७:४ वाचा.) बाण वेगवेगळ्या आकाराचे आणि धातूंपासून बनवले असल्यामुळे ते एकसारखे नसतात, त्याच प्रकारे मुलंसुद्धा एकसारखी नसतात. त्यामुळे आपल्या प्रत्येक मुलाला कसं प्रशिक्षण द्यायचं हे आईवडिलांना ठरवावं लागतं. इझरायलमध्ये राहणाऱ्‍या एका जोडप्याने आपल्या दोन मुलांना यहोवाची सेवा करण्याचं प्रशिक्षण दिलं. त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली याबद्दल ते सांगतात: “आम्ही आमच्या दोन्ही मुलांचा एकत्र बायबल अभ्यास घेतला नाही, तर प्रत्येकाचा वेगवेगळा घेतला.” पण याच पद्धतीने अभ्यास घेणं गरजेचं किंवा शक्य आहे की नाही, हे प्रत्येक कुटुंबप्रमुखाने ठरवायला हवं.

यहोवा तुम्हाला मदत करेल

२१. यहोवाकडून पालक कोणत्या मदतीची अपेक्षा करू शकतात?

२१ आईवडिलांना कधीकधी आपल्या मुलांना शिकवणं कठीण वाटू शकतं. पण त्यांनी लक्षात ठेवायला हवं की मुलं ही यहोवाने दिलेली भेट आहे. तो आईवडिलांना मदत करायला नेहमी तयार असतो. तो त्यांची प्रार्थना ऐकतो. तसंच, तो त्यांच्या प्रार्थनांचं उत्तर बायबल, ख्रिस्ती प्रकाशनं आणि मंडळीतल्या अनुभवी पालकांच्या उदाहरणाद्वारे व त्यांनी दिलेल्या सल्ल्यांद्वारे देतो.

२२. आईवडील आपल्या मुलांना कोणत्या मौल्यवान गोष्टी देऊ शकतात?

२२ असं म्हटलं जातं की मुलांना वाढवणं हा २० वर्षांचा प्रकल्प आहे. यादरम्यान आईवडील आपल्या मुलांना खूपकाही देतात. पण त्यांपैकी सर्वात मौल्यवान गोष्टी म्हणजे आपला वेळ, प्रेम आणि बायबल आधारित प्रशिक्षण या आहेत. हे खरं आहे की आईवडील देत असलेल्या प्रशिक्षणाला प्रत्येक मूल वेगवेगळं प्रतिसाद देईल. असं असलं तरी पुष्कळ मुलं यहोवावर प्रेम करायला शिकले आहेत कारण त्यांचे आईवडील यहोवावर प्रेम करणारे होते. त्या मुलांना आशियामध्ये राहणाऱ्‍या जोॲना-मे यांच्यासारखं वाटतं. त्या म्हणतात: “माझ्या आईबाबांनी मला लहानपणी प्रशिक्षण दिलं, मला शिस्त लावली, यहोवावर प्रेम करायला शिकवलं यांबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. त्यांनी मला फक्‍त जीवनच दिलं नाही, तर एक अर्थपूर्ण जीवन दिलं आहे.” (नीति. २३:२४, २५) खरंतर, आपल्या लाखो भाऊबहिणींच्याही याच भावना आहेत!

गीत ९ यहोवाचा जयजयकार करा!

^ परि. 5 विवाहित जोडप्यांनी कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला पाहिजे का? जर त्यांनी तसा निर्णय घेतला तर त्यांना किती मुलं असली पाहिजेत असाही एक प्रश्‍न त्यांच्यासमोर येतो. तसंच, ते आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला आणि त्याची सेवा करायला कसं शिकवू शकतात? या लेखात काही भाऊबहिणींची उदाहरणं दिली आहेत आणि अशी काही बायबलवर आधारित तत्त्वं दिली आहेत, ज्यामुळे आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरं मिळू शकतील.

^ परि. 15 क्वेशन्स यंग पीपल आस्कआन्सर्स दॅट वर्क खंड १ अध्या. ३६ आणि खंड २ अध्या. ११ हेदेखील पाहा.

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: एक ख्रिस्ती जोडपं त्यांना मूल हवं की नको यावर चर्चा करत आहेत. मूल झाल्यावर त्यांना मिळणाऱ्‍या आनंदासोबतच ते येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍यांचाही विचार करतात.

^ परि. 64 चित्रांचं वर्णन: आईवडील आपल्या मुलांचं वय आणि क्षमता लक्षात घेता त्यांना एकत्र शिकवण्याऐवजी प्रत्येकासोबत वेगवेगळं बसून चर्चा करतात.