व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४९

काम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा उचित काळ आहे

काम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा उचित काळ आहे

“एखाद्या एकांत ठिकाणी चला आणि थोडी विश्रांती घ्या.”—मार्क ६:३१.

गीत ३२ निर्भय व निश्‍चयी राहा!

सारांश *

१. बहुतेक लोकांचा कामाबद्दल काय दृष्टिकोन आहे?

तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी बहुतेक लोक कामाबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगतात? अनेक देशांत लोक आधीच्या तुलनेत आज जास्त मेहनत घेऊन काम करत आहेत आणि कामाला जास्त वेळ देत आहेत. खूप जास्त काम करणारे लोक इतके व्यस्त असतात की त्यांच्याकडे सहसा विश्रांती घ्यायला, कुटुंबाला वेळ द्यायला किंवा देवाबद्दल शिकून घ्यायला वेळ नसतो. (उप. २:२३) दुसरीकडे पाहता, काही लोकांना काम करायलाच आवडत नाही आणि ते काम न करण्याचे बहाणे शोधतात.—नीति. २६:१३, १४.

२-३. यहोवा आणि येशू यांनी कामाबद्दल कोणतं उदाहरण मांडलं?

कामाबद्दल जगाचा दृष्टिकोन असंतुलित आहे. पण यहोवा आणि येशू ख्रिस्त यांचा याबद्दलचा दृष्टिकोन जगापेक्षा कसा वेगळा आहे याकडे लक्ष द्या. यात काहीच शंका नाही की यहोवा देवाला काम करायला आवडतं. येशूने त्याबद्दल म्हटलं: “माझा पिता आतापर्यंत काम करत आहे आणि मीसुद्धा काम करत राहतो.” (योहा. ५:१७) जरा कल्पना करा, यहोवाने असंख्य आत्मिक प्राणी आणि अफाट विश्‍व यांची निर्मिती केली तेव्हा त्याने किती मोठ्या प्रमाणात काम केलं असेल! तसंच, यहोवाने पृथ्वीवर निर्माण केलेल्या सुंदर सृष्टीला आपण पाहतो तेव्हादेखील आपल्याला त्याच्या आश्‍चर्यकारक कामाचा पुरावा मिळतो. म्हणूनच स्तोत्रकर्त्याने अगदी योग्य तेच म्हटलं: “हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.”—स्तो. १०४:२४.

येशूने त्याच्या पित्याचं अनुकरण केलं. देवाने “आकाश” निर्माण केलं तेव्हा येशूनेही त्या कामात सहभाग घेतला. त्याने यहोवासोबत एक “कुशल कारागीर” म्हणून काम केलं. (नीति. ८:२७-३१) मग नंतर येशू जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हाही त्याने अद्‌भुत कामं केली. ती कामं जणू त्याच्यासाठी अन्‍नासारखी होती; त्या कामांमुळे त्याला आनंद मिळायचा. आणि त्याने पृथ्वीवर जी काही कामं केली त्यावरून दिसून आलं की यहोवानेच त्याला पाठवलं होतं.—योहा. ४:३४; ५:३६; १४:१०.

४. यहोवा आणि येशू यांच्याकडून आपण विश्रांतीबद्दल काय शिकू शकतो?

यहोवा आणि येशू यांनी मेहनती असण्याबद्दल आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. पण याचा अर्थ असा होतो का की आपल्याला विश्रांती घेण्याची गरज नाही? मुळीच नाही! यहोवा कधीही थकत नाही, म्हणून त्याला आपल्यासारखी विश्रांती घ्यायची गरज नाही. पण बायबल म्हणतं की आकाश आणि पृथ्वी निर्माण केल्यानंतर त्याने “काम थांबवले व विश्रांती घेतली.” (निर्ग. ३१:१७, मराठी कॉमन लँग्वेज ) मग याचा काय अर्थ होतो? यहोवाने निर्मिती करणं थांबवलं आणि घडवलेल्या सृष्टीकडे पाहण्यासाठी त्याने वेळ काढला व त्याला संतुष्टी मिळाली. येशूनेही पृथ्वीवर असताना खूप मेहनत केली. पण असं असलं तरी त्याने आराम करण्यासाठी वेळ काढला आणि आपल्या मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेतला.—मत्त. १४:१३; लूक ७:३४.

५. देवाच्या बऱ्‍याच सेवकांना काय करणं अवघड जाऊ शकतं?

बायबल आपल्याला प्रोत्साहन देतं की आपण देवाचे सेवक या नात्याने कामाचा आनंद घ्यावा. देवाच्या सेवकांनी आळशी नसून मेहनती असावं अशी त्याची इच्छा आहे. (नीति. १५:१९) म्हणूनच कदाचित तुम्ही नोकरी-व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करता. तसंच, ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने प्रचारकार्यात सहभाग घेण्याची जबाबदारीही तुमच्यावर आहे. असं असलं तरी तुम्हाला पुरेशी विश्रांती घेणंसुद्धा गरजेचं आहे. नोकरी, सेवाकार्य आणि आराम यांमध्ये काही लोकांना संतुलन राखायला अवघड जातं. तुम्हालाही असंच वाटतं का? आपण कामाला किती वेळ द्यावा आणि विश्रांतीला किती, हे आपण कसं ठरवू शकतो?

काम आणि आराम यांत संतुलन

६. मार्क ६:३०-३४ या वचनांप्रमाणे येशूने कसं दाखवून दिलं की काम आणि आराम यांबद्दल त्याचा संतुलित दृष्टिकोन होता?

कामाच्या बाबतीत आपण संतुलित दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. शलमोन राजाने प्रेरित होऊन लिहिलं: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो.” त्याने म्हटलं की रोप लावण्याचा, बांधण्याचा, रडण्याचा, हसण्याचा, नाचण्याचा आणि इतर कामं करण्याचा एक उचित काळ असतो. (उप. ३:१-८) तर हे स्पष्टच आहे की काम आणि आराम या जीवनातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. येशूचा या दोन्ही बाबतीत संतुलित दृष्टिकोन होता. एकदा प्रेषित प्रचाराच्या दौऱ्‍यावरून परत आले, पण त्यानंतर ते इतके व्यस्त झाले की “त्यांना जेवायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता.” म्हणून येशूने त्यांना म्हटलं: “एखाद्या एकांत ठिकाणी चला आणि थोडी विश्रांती घ्या.” (मार्क ६:३०-३४ वाचा.) येशूला आणि त्याच्या शिष्यांना नेहमीच हवा तसा आराम मिळत नव्हता, पण तरी येशूला याची जाणीव होती की त्यांना आरामाची गरज आहे.

७. शब्बाथाच्या नियमाविषयी शिकल्यामुळे आपल्याला काय करायला मदत होईल?

कधीकधी आपल्या रोजच्या नित्यक्रमातून आपल्याला थोडासा विसावा किंवा बदल हवा असतो. ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे आपल्याला देवाने प्राचीन काळात त्याच्या लोकांसाठी केलेल्या व्यवस्थेवरून कळते. यहोवाने त्यांना प्रत्येक आठवडी शब्बाथाचा दिवस पाळण्याचा नियम दिला होता. आज आपण मोशेच्या नियमाधीन नसलो तरी त्यात शब्बाथाविषयी जे म्हटलं आहे त्यातून आपण फायदा मिळवू शकतो. यामुळे काम आणि विश्रांती यांबद्दल असलेल्या आपल्या दृष्टिकोनाचं परीक्षण करायला आपल्याला मदत होईल.

शब्बाथ म्हणजे विश्रांतीची आणि उपासनेची वेळ

८. निर्गम ३१:१२-१५ या वचनांनुसार शब्बाथाचा काय हेतू होता?

बायबल म्हणतं की सहा दिवस काम केल्यावर देवाने पृथ्वीवर निर्मिती करायचं काम थांबवलं. (उत्प. २:२) पण यहोवाला काम करायला आवडतं आणि तो इतर बाबतीत आजही “काम करत आहे.” (योहा. ५:१७) यहोवाने सहा दिवस काम करून सातव्या दिवशी विश्रांती घेतली आणि हीच गोष्ट त्याने इस्राएली लोकांनाही करायला सांगितली. त्याने त्यांना प्रत्येक सातव्या दिवशी विश्रांती घ्यायला सांगितलं. देवाने म्हटलं की शब्बाथ हा इस्राएल आणि त्याच्यामध्ये असलेल्या एका गोष्टीचं चिन्ह आहे. शब्बाथ हा “परमेश्‍वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा” दिवस होता. (निर्गम ३१:१२-१५ वाचा.) त्या दिवशी काम करण्याची सर्वांनाच म्हणजे मुलांना, दासांना, तसंच प्राण्यांनासुद्धा मनाई होती. (निर्ग. २०:१०) यामुळे लोकांना आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष द्यायला जास्त वेळ मिळायचा.

९. येशूच्या दिवसांत शब्बाथाबद्दल काहींचा कोणता चुकीचा दृष्टिकोन होता?

शब्बाथाचा दिवस हा देवाच्या लोकांसाठी फायद्याचा होता. पण येशूच्या काळात अनेक धार्मिक नेत्यांनी त्यात अशा नियमांचा समावेश केला ज्यांचं पालन करणं लोकांना खूप कठीण जायचं. त्यांचं म्हणणं होतं की शब्बाथाच्या दिवशी कणसे मोडून खाणं किंवा एका आजारी व्यक्‍तीला बरं करणं या गोष्टीही नियमाविरुद्ध आहेत. (मार्क २:२३-२७; ३:२-५) असा दृष्टिकोन देवाच्या विचारसरणीनुसार नव्हता आणि येशूने ही गोष्ट देवाच्या इच्छेनुसार चालणाऱ्‍या लोकांना सांगितली.

येशू, त्याचे आईवडील आणि भाऊबहीण शब्बाथाच्या दिवशी आध्यात्मिक कार्यांवर लक्ष केंद्रित करायचे (परिच्छेद १० पाहा) *

१०. मत्तय १२:९-१२ या वचनांनुसार येशूचा शब्बाथाविषयी जो दृष्टिकोन होता त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१० येशू आणि त्याच्या यहुदी अनुयायांनी शब्बाथाचा नियम पाळला, कारण ते मोशेच्या नियमाधीन होते. * पण येशूने आपल्या बोलण्यातून आणि कार्यातून दाखवून दिलं, की शब्बाथाच्या दिवशी इतरांना मदत करून दया दाखवण्यात काहीच हरकत नाही. त्याने स्पष्टपणे म्हटलं: “शब्बाथाच्या दिवशी चांगलं काम करणं नक्कीच नियमानुसार योग्य आहे.” (मत्तय १२:९-१२ वाचा.) लोकांना मदत करणं किंवा त्यांना दया दाखवणं या गोष्टींमुळे शब्बाथाच्या नियमाचं उल्लंघन होतं असा विचार येशू करत नव्हता. देवाने लोकांना शब्बाथाच्या दिवशी विश्रांती घ्यायला सांगण्यामागचं कारण काय होतं, हे येशूने केलेल्या कार्यांवरून दिसून आलं. देवाचे लोक त्यांच्या रोजच्या कामातून विश्रांती घ्यायचे त्यामुळे ते देवाच्या उपासनेवर लक्ष केंद्रित करू शकले. येशू ज्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला तिथे शब्बाथाच्या दिवशी नक्कीच देवाची उपासना केली जायची. हे आपण कशावरून म्हणू शकतो? कारण बायबलमध्ये म्हटलं आहे की येशू आपल्या नगरात म्हणजे नासरेथमध्ये होता तेव्हा “शब्बाथाच्या दिवशी तो आपल्या रिवाजाप्रमाणे सभास्थानात गेला आणि वाचायला उभा राहिला.”—लूक ४:१५-१९.

कामाबद्दल तुमची काय मनोवृत्ती आहे?

११. येशूसमोर कामाबाबतीत कोणाचं चांगलं उदाहरण होतं?

११ योसेफने येशूला सुतारकाम शिकवण्यासोबतच देवाचा कामाबद्दल काय दृष्टिकोन आहे हेही शिकवलं. (मत्त. १३:५५, ५६) येशूनेही आपल्या वडिलांना रोजच आपल्या मोठ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेताना पाहिलं असेल. तसंच, पुढे जाऊन येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की “कामकऱ्‍याला त्याची मजुरी मिळण्याचा हक्क आहे.” (लूक १०:७) तर हे स्पष्टच आहे की मेहनत करणं काय असतं हे येशूला माहीत होतं.

१२. आपल्याला कोणत्या वचनांतून मेहनत घेण्याबद्दल बायबलचा दृष्टिकोन समजतो?

१२ प्रेषित पौलही मेहनती होता. येशू आणि त्याने शिकवलेल्या गोष्टी लोकांना सांगणं हे पौलचं मुख्य काम होतं. पण त्याने स्वतःचा खर्च उचलण्यासाठी कामही केलं. पौल कोणावरही “ओझे बनू नये” म्हणून “रात्रंदिवस मेहनत व कष्ट” करायचा आणि ही गोष्ट थेस्सलनीकाकरांना माहीत होती. (२ थेस्सलनी. ३:८; प्रे. कार्ये २०:३४, ३५) पौलने आपल्या कामाबद्दल लिहिलं तेव्हा तो कदाचित तंबू बनवण्याच्या कामाबद्दल बोलत असावा. करिंथमध्ये असताना तो अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांच्या “घरी राहून त्यांच्यासोबत काम करू लागला. त्यांचा तंबू बनवण्याचा व्यवसाय होता.” पण त्याने “रात्रंदिवस मेहनत” केली याचा अर्थ असा नव्हता की तो सतत काम करत होता. त्याने तंबू बनवण्याच्या कामातून विश्रांती घेतली, जसं की शब्बाथाच्या दिवशी. त्यामुळे त्याला यहुदी लोकांना प्रचार करायची संधी मिळाली, कारण यहुदी लोकसुद्धा शब्बाथाच्या दिवशी काम करत नव्हते.—प्रे. कार्ये १३:१४-१६, ४२-४४; १६:१३; १८:१-४.

१३. आपण पौलच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो?

१३ प्रेषित पौलने आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडलं आहे. हे खरं आहे की त्याला काम करावं लागलं, तरी त्याने नियमितपणे “देवाचा आनंदाचा संदेश सांगण्याचे पवित्र कार्य” करण्याकडे विशेष लक्ष दिलं. (रोम. १५:१६; २ करिंथ. ११:२३) त्याने इतरांनाही नियमितपणे प्रचार करण्याचं प्रोत्साहन दिलं. याचा परिणाम असा झाला की अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला ख्रिस्त येशूमध्ये त्याचे “सहकारी” बनले. (रोम. १२:११; १६:३) “प्रभूचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा” असं प्रोत्साहन पौलने करिंथकरांना दिलं. (१ करिंथ. १५:५८; २ करिंथ. ९:८) यहोवाने प्रेषित पौलला असंही लिहिण्यासाठी प्रेरित केलं: “जर कोणाला काम करायची इच्छा नसेल, तर त्याने खाऊसुद्धा नये.”—२ थेस्सलनी. ३:१०.

१४. योहान १४:१२ यात दिलेल्या येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो?

१४ प्रचार करणं आणि शिष्य बनवणं हे शेवटच्या दिवसांतलं सर्वात महत्त्वपूर्ण काम आहे. खरंतर येशूने म्हटलं होतं की त्याचे शिष्य त्याने केलं त्यांहूनही मोठी कार्यं करतील. (योहान १४:१२ वाचा.) शिष्यांना त्याच्यासारखे चमत्कार करता येतील असं त्याला म्हणायचं नव्हतं. तर त्याचे शिष्य, त्याने केलं त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रात, जास्त लोकांना आणि जास्त काळासाठी प्रचार व शिकवण्याचं कार्य करतील असं त्याला म्हणायचं होतं.

१५. आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत आणि का?

१५ तुम्ही जर नोकरी करत असाल तर स्वतःला विचारा: ‘माझ्या कामावर लोक मला एक मेहनती व्यक्‍ती म्हणून ओळखतात का? मला दिलेलं काम मी वेळेवर आणि अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो का?’ जर तुम्ही या प्रश्‍नांची उत्तरं होकारार्थी देऊ शकला तर तुम्ही नक्कीच तुमच्या मालकाचा भरवसा मिळवला असेल. यामुळे तुमच्या कामावरच्या सोबत्यांनी आनंदाच्या संदेशाबद्दल आवड दाखवण्याचीही जास्त शक्यता असेल. प्रचार आणि शिकवण्याच्या कामाबाबतीत स्वतःला पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: ‘मी सेवाकार्यात मेहनत घेतो असं माझ्याबद्दल इतरांचं मत आहे का? मी पहिल्या भेटीसाठी चांगली तयारी करतो का? ज्यांनी संदेशात आवड दाखवली आहे त्यांना मी पुन्हा लवकरात लवकर भेटतो का? मी नियमितपणे सेवाकार्याच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये भाग घेतो का?’ जर तुम्ही या प्रश्‍नांची होकारार्थी उत्तरं देऊ शकला तर सेवाकार्यात तुम्हाला आनंद मिळेल.

विश्रांतीबद्दल तुमची काय मनोवृत्ती आहे?

१६. येशू आणि त्याच्या शिष्यांचं विश्रांतीबद्दल काय मत होतं आणि हे इतर लोकांपेक्षा कसं वेगळं आहे?

१६ येशूला माहीत होतं की त्याला आणि प्रेषितांना अधूनमधून विश्रांतीची गरज आहे. पण त्या काळाच्या आणि आजच्या काळाच्या पुष्कळ लोकांची तुलना आपण येशूच्या उदाहरणातल्या श्रीमंत माणसाशी करू शकतो. जीवनाबद्दल त्या माणसाचं ठाम मत होतं, की “खा, पी आणि मौजमजा कर.” (लूक १२:१९; २ तीम. ३:४) आराम आणि चैन करणं या जीवनातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं त्याला वाटत होतं. याउलट येशू आणि त्याच्या प्रेषितांनी आपल्या जीवनात आराम व चैन करणं याला प्राधान्य दिलं नाही.

काम आणि विश्रांती यांबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगल्याने आपल्याला तजेला देणाऱ्‍या चांगल्या कार्यांवर लक्ष केंद्रित करायला मदत होते (परिच्छेद १७ पाहा) *

१७. आपल्याला कामावर सुट्टी असते तेव्हा आपण आपल्या वेळेचा उपयोग कसा करतो?

१७ आजही आपण येशूचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. ज्या दिवशी आपल्याला कामावर सुट्टी असते त्या दिवशी आपण फक्‍त आराम करत नाही तर लोकांना प्रचार करतो आणि सभांनाही जातो. खरंतर शिष्य बनवणं आणि सभांना जाणं या गोष्टींना आपण खूप महत्त्व देतो. त्यामुळे आपण या पवित्र कार्यांत भाग घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. (इब्री १०:२४, २५) आपण जास्त दिवसांसाठी सुट्टी घेऊन फिरायला गेलो तरी आपण सभांना जाण्याचा आपला नित्यक्रम सोडत नाही; मग आपण कुठेही असलो तरीही. तसंच, आपण लोकांना आनंदाचा संदेश सांगण्याची संधीही शोधतो.—२ तीम. ४:२.

१८. आपला राजा येशू ख्रिस्त आपल्याकडून काय अपेक्षा करतो?

१८ आपला राजा येशू ख्रिस्त याचे आपण खरंच खूप आभारी आहोत. कारण तो आपल्याकडून जास्तीची अपेक्षा करत नाही. तसंच, तो आपल्याला काम आणि विश्रांती यांबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगायला मदत करतो. (इब्री ४:१५) आपल्याला जितकी गरज आहे तितकी विश्रांती आपल्याला मिळावी अशी त्याची इच्छा आहे. तसंच, आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत करावी असंही त्याला वाटतं. त्यासोबतच त्याची इच्छा आहे की तजेला देणाऱ्‍या शिष्य बनवण्याच्या कामात आपण व्यस्त राहावं. आपण पुढच्या लेखात चर्चा करणार आहोत की आपल्याला पापाच्या गुलामीतून सोडवण्यासाठी येशूने काय केलं आहे.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

^ परि. 5 देवाचं वचन आपल्याला समजायला मदत करतं की काम आणि विश्रांती यांबद्दल आपण संतुलित दृष्टिकोन कसा ठेवू शकतो. यहोवाने इस्राएली लोकांना दर आठवडी शब्बाथ पाळायला सांगितलं होतं. शब्बाथाच्या उदाहरणातून आपण काम आणि विश्रांती यांबद्दल योग्य दृष्टिकोन कसा बाळगू शकतो हे आपण या लेखात शिकणार आहोत.

^ परि. 10 शब्बाथाच्या नियमाबद्दल शिष्यांच्या मनात खूप आदर होता. त्यांना येशूच्या मृत शरीराला लावण्यासाठी सुगंधी मसाले आणि सुवासिक तेल तयार करायचं होतं. पण शब्बाथाचा दिवस मध्येच आल्यामुळे त्यांनी ती तयारी थांबवली.—लूक २३:५५, ५६.

^ परि. 55 चित्रांचं वर्णन: योसेफ आपल्या कुटुंबाला शब्बाथाच्या दिवशी सभास्थानात घेऊन जातो.

^ परि. 57 चित्रांचं वर्णन: एक पिता आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करतो. पण सुट्टीच्या दिवशी तो आध्यात्मिक कार्यांमध्ये भाग घेतो; मग तो कुटुंबासोबत दूर फिरायला गेला असला तरीही.