व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५१

तुम्ही यहोवाला किती चांगल्या प्रकारे ओळखता?

तुम्ही यहोवाला किती चांगल्या प्रकारे ओळखता?

“ज्यांस तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्‍वरा, जे तुझा शोध करतात त्यांस तू टाकले नाही.”—स्तो. ९:१०.

गीत ३४ आपल्या नावाला जागू या!

सारांश *

१-२. ॲनेलिटोच्या अनुभवावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

तुमचे आईवडील यहोवाचे साक्षीदार आहेत का? जर असतील तर हे लक्षात असू द्या की ते यहोवाचे मित्र आहेत म्हणून तुम्हीही आपोआप यहोवाचे मित्र बनाल असं नाही. आपले आईवडील यहोवाची सेवा करत असो वा नसो, आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतः यहोवासोबत एक घनिष्ठ नातं जोडलं पाहिजे.

ॲनेलिटो नाव असलेल्या बांधवाच्या उदाहरणाचा विचार करा. तो साक्षीदार कुटुंबात लहानाचा मोठा झाला. जेव्हा तो लहान होता तेव्हा यहोवासोबत त्याची खूप घनिष्ठ मैत्री आहे असं त्याला वाटत नव्हतं. याबद्दल तो म्हणतो: “मी यहोवाची सेवा फक्‍त यासाठी करत होतो कारण माझं कुटुंब यहोवाची सेवा करत होतं.” पण नंतर ॲनेलिटोने बायबल वाचण्यासाठी आणि मनन करण्यासाठी वेळ द्यायचं ठरवलं. तसंच, तो यहोवाला अनेक वेळा प्रार्थनाही करू लागला. याचा काय परिणाम झाला? ॲनेलिटो म्हणतो: “मला शिकायला मिळालं की माझ्या प्रेमळ पित्याला, यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्याबद्दल स्वतः जाणून घेणं.” ॲनेलिटोच्या उदाहरणावर विचार केल्यामुळे आपल्या मनात काही महत्त्वपूर्ण प्रश्‍नं येतात. यहोवाबद्दल काही गोष्टी माहीत असणं आणि त्याला चांगल्या प्रकारे ओळखणं यात काय फरक आहे? यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आपण काय करू शकतो?

३. यहोवाबद्दल काही गोष्टी माहीत असणं आणि त्याला चांगल्या प्रकारे ओळखणं यात काय फरक आहे?

यहोवाचं नाव, त्याने जे म्हटलं व त्याची कार्यं माहीत असल्यामुळे आपण त्याला ओळखतो असं आपल्याला वाटू शकतं. पण यहोवाला जवळून ओळखण्यासाठी आपल्याला आणखी काहीतरी करणं गरजेचं आहे. आपण यहोवाबद्दल आणि त्याच्या गुणांबद्दल शिकत राहिलं पाहिजे. यामुळेच आपल्याला कळेल की तो एखादी गोष्ट का बोलतो व करतो. तसंच आपल्याला हेदेखील समजायला मदत होईल की आपण जे विचार आणि कार्यं करतो ते त्याला आवडतात की नाही. आणि एकदा का आपल्याला यहोवाची इच्छा समजली की मग आपण शिकलेल्या गोष्टींनुसार कार्य केलं पाहिजे.

४. बायबलमधल्या उदाहरणांवर विचार केल्याने आपल्याला कशी मदत होऊ शकते?

आपल्याला यहोवाची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे काही लोक कदाचित आपली थट्टा करतील. आणि आपण जेव्हा सभांना जायला लागतो तेव्हा तर ते विरोधही करतील. पण अशा परिस्थितीत आपण यहोवावर भरवसा ठेवला तर तो आपल्याला कधीही एकटं सोडणार नाही. खरंतर यहोवावर भरवसा ठेवणं हे त्याच्यासोबत कायम टिकणाऱ्‍या मैत्रीचा पाया घालण्याची सुरुवात आहे. पण आपण त्याला खरंच इतकं जवळून ओळखू शकतो का? हो नक्कीच! मोशे आणि दावीद या अपरिपूर्ण सेवकांच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं की देवाला चांगल्या प्रकारे ओळखणं शक्य आहे. त्यांच्या कार्यांचं परीक्षण करताना आपण दोन प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेऊ या: ते यहोवाला चांगल्या प्रकारे कसं ओळखू शकले? आणि आपण त्यांच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो?

मोशेने “जो अदृश्‍य होता त्याला” पाहिलं

५. मोशेने काय करण्याचा निर्णय घेतला?

मोशेने शिकलेल्या गोष्टींनुसार कार्य केलं.  मोशे जेव्हा चाळीस वर्षांचा होता तेव्हा त्याने “फारोच्या मुलीचा मुलगा” म्हणवून घेण्यापेक्षा देवाच्या लोकांसोबत राहण्याची निवड केली. (इब्री ११:२४) मोशेने त्याच्या मोठ्या अधिकाराच्या पदाचा त्याग केला. इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते. त्यांना पाठिंबा दिल्यामुळे फारोला खूप राग येईल हे मोशेला माहीत होतं. फारो हा खूप शक्‍तिशाली राजा होता आणि इजिप्तचे लोक त्याला देव मानायचे. खरंच मोशेचा विश्‍वास भक्कम होता! त्याचा यहोवावर पूर्ण भरवसा होता. आणि अशा प्रकारचा भरवसा कायम टिकणाऱ्‍या नात्याचा पाया असतो.—नीति. ३:५.

६. आपण मोशेच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो?

या उदाहरणातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? मोशेप्रमाणेच आपल्यालाही जीवनात काही निर्णय घ्यावे लागतात. जसं की, आपण देवाची उपासना करणार का आणि त्याच्या लोकांसोबत संगती करण्याचा निर्णय घेणार का? देवाची सेवा करण्यासाठी कदाचित आपल्याला त्याग करावे लागतील. तसंच, यहोवाला न ओळखणाऱ्‍या लोकांच्या विरोधाचा सामनाही करावा लागेल. पण आपण आपल्या स्वर्गीय पित्यावर भरवसा ठेवला, तर तो आपल्याला साहाय्य करेल अशी खातरी आपण बाळगू शकतो.

७-८. मोशे आणखी काय शिकत राहिला?

मोशे यहोवाच्या गुणांबद्दल शिकत राहिला आणि त्याची इच्छा पूर्ण करत राहिला.  उदाहरणार्थ, इस्राएली लोकांना इजिप्तच्या गुलामीतून बाहेर काढण्यात मोशेने पुढाकार घ्यावा असं जेव्हा त्याला सांगण्यात आलं, तेव्हा त्याला आत्मविश्‍वासाची कमतरता जाणवली. आणि म्हणून त्याने यहोवाला वारंवार सांगितलं की तो हे काम करण्याच्या योग्यतेचा नाही. पण यहोवाने मोशेला जे उत्तर दिलं त्यातून त्याच्याप्रती असलेली यहोवाची दया  दिसून आली. त्याने मोशेच्या भावना समजून घेतल्या आणि त्याला मदत केली. (निर्ग. ४:१०-१६) याचा काय परिणाम झाला? फारोला न्यायाचा कठोर संदेश सांगणं मोशेला शक्य झालं. मग मोशेने पाहिलं की यहोवाने त्याच्या शक्‍तीचा  वापर करून इस्राएली लोकांना वाचवलं आणि फारोचा व त्याच्या सैन्याचा तांबड्या समुद्रात नाश केला.—निर्ग. १४:२६-३१; स्तो. १३६:१५.

इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर काढल्यानंतर ते वारंवार मोशेकडे काही गोष्टींसाठी कुरकुर करू लागले. असं असलं तरी मोशेने पाहिलं की गुलामीतून सोडवलेल्या आपल्या लोकांबद्दल यहोवा किती धीर  दाखवत आहे. (स्तो. ७८:४०-४३) यहोवाने इस्राएली लोकांचा नाश करण्याचा आपला निर्णय बदलावा अशी मोशेने त्याला विनंती केली तेव्हा त्याने त्याचं ऐकलं. यावरून यहोवा किती नम्र  आहे हे मोशेला समजलं.—निर्ग. ३२:९-१४.

९. इब्री लोकांना ११:२७ या वचनानुसार मोशेचं यहोवासोबतचं नातं किती घनिष्ठ होतं?

इस्राएली लोकांना गुलामीतून सोडवल्यानंतर मोशेचं यहोवासोबत असलेलं नातं आणखी घनिष्ठ झालं. तो जणू यहोवाला पाहू शकत होता. (इब्री लोकांना ११:२७ वाचा.) त्यांच्यातली मैत्री खूप मजबूत होती आणि याबद्दल बायबल म्हणतं: “मित्रांशी बोलावे तसे परमेश्‍वर मोशेशी समोरासमोर बोले.”—निर्ग. ३३:११.

१०. यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी काय करणं गरजेचं आहे?

१० या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आपण फक्‍त त्याच्या गुणांबद्दल शिकणं पुरेसं नाही, तर त्याची इच्छा पूर्ण करणंही महत्त्वाचं आहे. आज यहोवाची इच्छा आहे की “सर्व प्रकारच्या लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्याचे अचूक ज्ञान मिळावे.” (१ तीम. २:३, ४) यहोवाची इच्छा पूर्ण करण्याचा एक मार्ग म्हणजे त्याच्याबद्दल लोकांना शिकवणं.

११. यहोवाबद्दल इतरांना शिकवल्यामुळे त्याला चांगल्या प्रकारे ओळखायला आपल्याला कशी मदत होते?

११ आपण इतरांना यहोवाबद्दल शिकवत असतो तेव्हा सहसा आपण त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखू लागतो. उदाहरणार्थ, यहोवा आपल्याला योग्य मनोवृत्ती असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करतो, तेव्हा यहोवाची लोकांप्रती असलेली दया  आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. (योहा. ६:४४; प्रे. कार्ये १३:४८) बायबल विद्यार्थी त्यांच्या वाईट सवयी सोडतात आणि नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण करतात तेव्हा आपल्याला देवाच्या वचनात किती शक्‍ती  आहे हे दिसून येतं. (कलस्सै. ३:९, १०) तसंच, लोकांना देवाबद्दल शिकता यावं आणि त्यांचा जीव वाचावा यासाठी यहोवा आपल्याला त्यांच्याकडे पुष्कळ वेळा पाठवतो. यावरून यहोवा त्यांच्याप्रती किती धीर  दाखवत आहे याचा आपल्याला पुरावा मिळतो.—रोम. १०:१३-१५.

१२. निर्गम ३३:१३ या वचनात सांगितल्याप्रमाणे मोशेने काय विनंती केली आणि का?

१२ मोशेने यहोवासोबत असलेल्या मैत्रीला मौल्यवान लेखलं.  मोशेने यहोवाच्या मदतीने बरीच शक्‍तिशाली कामं केली आणि यामुळे तो यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखू शकला. पण तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याला यहोवाबद्दल आणखी शिकता यावं म्हणून त्याने यहोवाकडे विनंती केली. (निर्गम ३३:१३ वाचा.) मोशेने यहोवाला विनंती केली तेव्हा तो ऐंशीपेक्षा जास्त वर्षांचा होता. पण इतकं वय झालं असलं तरी त्याला माहीत होतं, की त्याला अजूनही त्याच्या स्वर्गीय पित्याबद्दल बरंच काही शिकायचं आहे.

१३. यहोवासोबत असलेल्या मैत्रीची कदर दाखवण्याचा एक मार्ग कोणता आहे?

१३ आपण यातून काय शिकू शकतो? आपण बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत असू, पण त्याच्यासोबत असलेल्या मैत्रीला आपण गृहीत न धरता नेहमी मौल्यवान लेखलं पाहिजे. यहोवासोबत असलेल्या मैत्रीची कदर करण्याचा एक मार्ग म्हणजे त्याला प्रार्थना करणं.

१४. यहोवाबद्दल शिकण्यासाठी प्रार्थना करणं का महत्त्वाचं आहे?

१४ मैत्री घनिष्ठ होण्यासाठी आपसात चांगलं संभाषण असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रार्थना करून देवाशी एक जवळचं नातं जोडा आणि आपल्या मनातल्या भावना त्याला सांगायला कचरू नका. (इफिस. ६:१८) टर्कीमध्ये राहणारी क्रिस्टा म्हणते: “प्रत्येक वेळी मी प्रार्थनेत यहोवाला माझ्या भावना सांगते आणि तो मला कशा प्रकारे मदत करतो हे बघते, तेव्हा यहोवावर असलेलं माझं प्रेम आणि भरवसा वाढत जातो. यहोवा ज्या प्रकारे माझ्या प्रार्थनांचं उत्तर देतो त्यामुळे तो माझ्यासाठी एक पिता आणि मित्र बनला आहे.”

यहोवाच्या मनासारखा मनुष्य

१५. यहोवाने दावीदविषयी काय म्हटलं?

१५ यहोवाला समर्पित असलेल्या राष्ट्रात दावीदचा जन्म झाला. पण दावीदचं कुटुंब यहोवाची उपासना करत होतं म्हणून तो यहोवाची उपासना करत होता का? नक्कीच नाही. त्याने यहोवासोबत घनिष्ठ नातं जोडण्यासाठी स्वतः मेहनत घेतली होती आणि यहोवाचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं. यहोवाने दावीदविषयी म्हटलं की तो त्याच्या “मनासारखा मनुष्य” आहे. (प्रे. कार्ये १३:२२) पण दावीद यहोवाशी इतकं घनिष्ठ नातं कसं जोडू शकला?

१६. सृष्टीचं निरीक्षण करून दावीद यहोवाबद्दल काय शिकला?

१६ सृष्टीचं परीक्षण केल्यामुळे दावीद यहोवाविषयी शिकला.  तरुण असताना दावीद बराच वेळ त्याच्या वडिलांच्या मेंढरांची राखण करण्यात घालवायचा. कदाचित तेव्हाच त्याने यहोवाच्या सृष्टीवर मनन करायला सुरू केलं असेल. उदाहरणार्थ, दावीद रात्रीच्या वेळी जेव्हा आकाशातल्या असंख्य ताऱ्‍यांकडे बघायचा तेव्हा त्याला त्या ताऱ्‍यांपलीकडेही काही दिसलं असेल का? नक्कीच. तारे निर्माण करणाऱ्‍या सृष्टिकर्त्याचे सुंदर गुण त्याला दिसले असतील. यामुळे दावीदला असं लिहिण्याची प्रेरणा मिळाली की “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते.” (स्तो. १९:१, २) तसंच, मानवांची रचना ज्या अद्‌भुत पद्धतीने करण्यात आली त्यावर विचार केल्यामुळे दावीदला यहोवाच्या सृष्टीतून त्याची बुद्धीही दिसून आली. (स्तो. १३९:१४) यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टींवर दावीदने मनन केलं तेव्हा त्याला जाणीव झाली की तो यहोवाच्या तुलनेत खूप लहान आहे.—स्तो. १३९:६.

१७. सृष्टीवर मनन केल्याने आपण काय शिकू शकतो?

१७ आपण यातून कोणता धडा शिकू शकतो? यहोवाने निर्माण केलेल्या सृष्टीविषयी आपण आवड निर्माण केली पाहिजे. आपण यहोवाने निर्माण केलेला सुंदर निसर्ग पाहण्यासाठी वेळ काढू शकतो आणि त्याबद्दल विस्मयाची भावना विकसित करू शकतो. यहोवाने झाडं, फुलं, प्राणी आणि मानव यांची रचना केली आहे. तेव्हा यांवर मनन करण्यासाठी आपण दररोज थोडा वेळ काढला पाहिजे. असं केल्याने प्रत्येक दिवशी आपल्याला यहोवाबद्दल बऱ्‍याच गोष्टी शिकता येतील. (रोम. १:२०) आणि यहोवावरचं आपलं प्रेम दिवसेंदिवस आणखी वाढत जात आहे हेही आपल्याला जाणवेल.

१८. स्तोत्र १८ यात सांगितल्यानुसार दावीद काय ओळखू शकला?

१८ यहोवा मदत करत असल्याचं दावीदने ओळखलं.  उदाहरणार्थ, दावीदने आपल्या वडिलांच्या मेंढरांना सिंहाच्या आणि अस्वलाच्या पंज्यातून सोडवलं, तेव्हा यहोवा या हिंस्र प्राण्यांसोबत लढायला आपल्याला मदत करत आहे हे दावीदने ओळखलं. दावीदने महाकाय गल्याथला हरवलं तेव्हाही यहोवा त्याला मदत करत आहे हे तो स्पष्टपणे पाहू शकला. (१ शमु. १७:३७) दावीद जेव्हा दुष्ट राजा शौल याच्या तावडीतून सुटला तेव्हासुद्धा त्याला जाणीव झाली की यहोवाने त्याचा जीव वाचवला. (स्तो. १८, उपरी लेखन) एका गर्विष्ठ व्यक्‍तीने या सर्व गोष्टींचं श्रेय स्वतः घेतलं असतं. पण दावीद नम्र असल्यामुळे तो हे ओळखू शकला की यहोवा त्याला मदत करत आहे.—स्तो. १३८:६.

१९. आपण दावीदच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो?

१९ आपण यातून काय शिकू शकतो? यहोवा आपल्याला मदत करतो एवढंच ओळखणं पुरेसं नाही, तर तो आपल्याला केव्हा आणि कशी मदत करतो हेही जाणणं गरजेचं आहे. आपण जर नम्र असलो तर आपल्याला समजेल की सर्वच गोष्टी आपण स्वतःच्या बळावर करू शकत नाही तर त्या करण्यासाठी यहोवा आपल्याला सक्षम बनवतो. यहोवा प्रत्येक वेळी मदत करत असल्याचं आपण अनुभवतो तेव्हा आपलं त्याच्यासोबत असलेलं नातं आणखी मजबूत होत जातं. फीजीमध्ये राहणाऱ्‍या आयझॅक नावाच्या बांधवानेसुद्धा ही गोष्ट खरी असल्याचं अनुभवलं. तो बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत आहे. तो म्हणतो: “जीवनात मागे वळून पाहताना मी समजू शकलो, की बायबल अभ्यास सुरू केल्यापासून आतापर्यंत, यहोवाने मला वेळोवेळी मदत केली आहे. यामुळे मी यहोवाला आणखी जवळून ओळखू लागलोय.”

२०. दावीदचं यहोवासोबत ज्या प्रकारचं नातं होतं त्यावरून आपण काय शिकू शकतो?

२० दावीदने यहोवाच्या गुणांचं अनुकरण केलं.  आपण यहोवाच्या गुणांचं अनुकरण करू शकतो कारण त्याने आपली रचना तशी केली आहे. (उत्प. १:२६) आपण त्याच्या गुणांबद्दल जितकं शिकत जाऊ, तितकं आपल्याला त्याच्या गुणांचं चांगल्या प्रकारे अनुकरण करता येईल. दावीद आपल्या स्वर्गीय पित्याला चांगल्या प्रकारे ओळखत असल्यामुळे, इतरांशी वागताना तो यहोवाच्या गुणांचं अनुकरण करू शकला. पुढे दिलेल्या उदाहरणाचा विचार करा. दावीदने बथशेबासोबत व्यभिचार केला आणि तिच्या पतीला मारून टाकलं तेव्हा त्याने यहोवाविरुद्ध पाप केलं. (२ शमु. ११:१-४, १५) पण यहोवाने दावीदवर दया केली कारण त्याने इतरांवर दया केली होती. दावीदचं यहोवासोबत एक चांगलं नातं होतं आणि त्यामुळे तो इस्राएली लोकांचा आवडता राजा बनू शकला. तसंच, एक राजा कसा असला पाहिजे हे इस्राएली राजांना सांगण्यासाठीही यहोवाने दावीदच्या उदाहरणाचा वापर केला.—१ राजे १५:११; २ राजे १४:१-३.

२१. इफिसकर ४:२४ आणि ५:१ या वचनांनुसार देवाचं “अनुकरण” केल्यामुळे काय होऊ शकतं?

२१ यावरून आपण काय शिकतो? आपण देवाचं “अनुकरण” केलं पाहिजे. असं केल्यामुळे आपला फायदा तर होतोच, पण त्यासोबत आपण यहोवाला आणखी जवळून ओळखूही लागतो. आपण यहोवाच्या गुणांचं अनुकरण करतो तेव्हा आपण त्याची प्रिय मुलं असल्याचं सिद्ध करत असतो.—इफिसकर ४:२४; ५:१, वाचा.

यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखणं

२२-२३. यहोवाबद्दल शिकलेली माहिती लागू केल्यामुळे काय होईल?

२२ यहोवाची सृष्टी आणि त्याचं वचन बायबल यातून आपण त्याच्याविषयी शिकू शकतो हे आपण पाहिलं. बायबलमध्ये देवाच्या विश्‍वासू सेवकांची अशी अनेक उदाहरणं दिली आहेत ज्यांचं आपण अनुकरण करू शकतो, जसं की मोशे आणि दावीद. यहोवाने तर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती दिली आहे, पण त्याच्याबद्दल जास्तीत जास्त शिकून घेणं ही खरंतर आपली जबाबदारी आहे.

२३ आपण यहोवाबद्दल शिकायचं कधीही थांबवणार नाही. (उप. ३:११) आपल्याला यहोवाबद्दल किती माहीत आहे हे महत्त्वाचं नाही, तर आपण त्या माहितीचा उपयोग कसा करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण जर शिकलेली माहिती लागू केली आणि आपल्या प्रेमळ पित्याचं अनुकरण केलं तर तो आपल्या आणखी जवळ येत राहील. (याको. ४:८) आपल्या वचनाद्वारे तो अशी खातरी देतो की त्याला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी जे कोणी प्रयत्न करतात त्यांचा तो कधीही त्याग करणार नाही.

गीत १ यहोवाचे गुण

^ परि. 5 देव अस्तित्वात आहे असा बऱ्‍याच लोकांचा विश्‍वास आहे पण ते त्याला चांगल्या प्रकारे ओळखत नाहीत. यहोवाला ओळखण्याचा काय अर्थ होतो? मोशे व दावीद राजा यांच्याकडून देवासोबत एक घनिष्ठ नातं जोडण्याबद्दल आपण काय शिकू शकतो? या लेखात या प्रश्‍नांची उत्तरं दिली जातील.